सध्या जगभरात माणसाच्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने धुमाकूळ घातलाय. अगदी जगच डोक्यावर घेतलंय. चीनमधलं वुहान शहर या वायरसचा केंद्रबिंदू आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केलीय. ‘कोरोना वायरस’ असं नाव असलेल्या या वायरसचा वेध घेणारा हा माहितीपट.
गेल्या वर्षाअखेरची गोष्ट आहे. २६ डिसेंबरच्या सकाळी वुहान इथल्या एका हॉस्पिटलमधे सात रूग्ण दाखल झाले. सगळ्यांमधे एक कॉमन लक्षण आढळलं. त्यामुळे सातही जणांच्या फुफ्फुसाचा एक्सरे काढला. त्यात सगळ्यांनाच न्यूमोनिया झाल्याचं निदान झालं. २७ डिसेंबरलाही अशीच लक्षणं आढळणारे आणखी रूग्ण हॉस्पिटलमधे दाखल झाले. हे सगळे जण एकाच कुटुंबातले होते. इथेच कुठल्या तरी नव्या, अज्ञात आजाराचा जन्म झाला.
सात पैकी चार जणांमधे तर आणखी एक समान धागा होता. तो म्हणजे चौघांचंही वुहान इथल्या सी फूड मार्केटमधे उठणंबसणं होतं. इथूनच एका नव्या रोगाच्या शोधाचा प्रवास सुरू झाला. कोरोना वायरसमुळे हा आजार होतोय. या आजाराचं वेगळेपण शोधणाऱ्या डॉक्टर आहेत श्वसन विकारतज्ञ जहांग जियांग. आज जियांग यांच्याभोवती चीनमधे एखाद्या सेलेब्रिटीसारखा करिश्मा तयार झालाय.
सध्या या रोगाने जगभरात जवळपास २० हजार लोकांना आपल्या ट्रॅपमधे अडकवलंय. जवळपास पाचशे लोकांचा जीव घेतलाय. वुहान इथल्याच यांगते रिवर नावाच्या एका पेपरमधे डॉक्टर जियांग यांचा पहिला इंटरव्यू आला. या इंटरव्यूबद्दल इंटरनेट जगताला माहीत झालं तसं जियांग यांची स्टोरी वायरल झाली.
सरकारी दवाखान्यात श्वसनविकार तज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. जियांग या आजाराविषयी सांगतात, 'हा आजार आम्ही पहिल्यांदाच बघतोय. या आजाराने बाधित चार जणांची साऊथ चायना सी फूड मार्केटमधे उठबस होती आणि ही खूपच गंभीर गोष्ट आहे. सातही लोकांच्या फुफ्फुसांची तपासणी केल्यावर सगळ्यांचाच रिपोर्ट एकसारखा आला. कोरोना वायरसचं निदान झालेले हे पहिले रोगी होते. पण नंतरच्या काळात या रोगाचा प्रसार वाढला. मग आम्ही पुरेशी काळजी घ्यायला सुरवात केली.'
हेही वाचा: जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?
कोरोना वायरस म्हणजे एक प्रकारे वायरसचं कुटुंबच आहे. त्यातल्या नवीन मेंबरला सध्या आपण ‘नोवल कोरोना वायरस’ किंवा नुसतं ‘कोरोना वायरस’ असं म्हणतो. या कोरोनाचा मोठा भाऊ म्हणजे सार्स. २००३ मधे सार्स नावाच्या या वायरसचा चीनमधूनच प्रादुर्भाव झाला. तेव्हाही त्याची अनेकांना लागण झाली होती.
‘कोरोना वायरस सार्सपेक्षा कमी धोकादायक आहे,’ असं लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे संचालक प्रा. पीटर पायोट यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. असं असलं तरी, सध्या कोरोनापासून लोकांना वाचवण्यासाठी कोणतंही प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध नाही. यावरून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल.
नव्यानं आलेला कोरोना हा एक संसर्गजन्य वायरस आहे. ‘महाराष्ट्र राज्य आरोग्य सर्वेक्षण’ खात्यातले अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे हवेतून एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला या वायरसची लागण होऊ शकते. हा वायरस शरीरात आल्यावर ताप, सर्दी, खोकल्यासारखी लक्षणं दिसू लागतात. पण ही लक्षणं जास्त गंभीरही होऊ शकतात. श्वास घ्यायला त्रास होणं, डोकं दुखणं, घसा खवखवणं अशी लक्षणं मोठ्या माणसांमधे दिसू शकतात. तर न्युमोनियासारखे गंभीर आजार ५ वर्षाखालील मुलांना होताहेत.
आपल्या शरीरात बाहेरून एखादा वायरस आला तर तो आपल्याच शरीरातली उर्जा वापरून जिवंत राहतो. आपल्या अवतीभोवती निसर्गात असे अनेक वायरस असतात. पण त्यातल्या काही वायरसला काटेरी आवरण असतं. अशा वायरसला ‘कोरोना’ असं म्हटलं जातं. कोरोना या इंग्रजी शब्दाचं मूळ लॅटिन भाषेत आहे. लॅटिनमधे कोरोनाचा अर्थ मुकूट असा होतो. पूर्वीच्या काळी राजाच्या डोक्यावर काटे काटे असणारा मुकूट असायचा. कोरोना वायरसलाही काटे असतात. त्यावरून कोरोना असं नाव पडलंय. कोरोना वायरस फक्त प्राणी किंवा पक्ष्यांमधेच तयार होतात आणि नंतर त्याचा माणसाला संसर्ग होतो.
कोरोना वायरसंचं स्वतःचं सहा जणांचं कुटूंब आहे. फक्त हे सहा कोरोना वायरसच माणसांवर हल्ला करू शकतात. आता त्यात चीनमधे निर्माण झालेल्या नव्या कोरोना वायरसची भर पडलीय. म्हणजे आता हे सात जणांचं कुटुंब झालंय. या नव्या वायरसला ‘नोवेल कोरोना वायरस’ म्हणजे नव्यानं तयार झालेला कोरोना वायरस असं म्हटलं जातं. त्याचं शास्त्रीय नाव ‘मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना’ वायरस असं लांबलचक आहे.
कोरोना वायरसचा उद्रेक होत असल्यापासून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच ‘डब्ल्यूएचओ’चं चीनमधल्या परिस्थितीवर लक्ष आहे. त्यामुळे ३१ जानेवारीला परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ‘डब्ल्यूएचओ’ने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलीय. ‘डब्लुएचओ’चे महासंचालक टेड्रॉस अधानोम यांच्या मते, ‘सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेल्या देशांत कोरोना वायरस मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता आणि जागतिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन आपण ही आरोग्य आणीबाणी जाहीर करतोय.’
याआधीही अशाप्रकारे रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे ‘डब्लुएचओ’ने जागतिक आणीबाणी जाहीर केली होती. स्वाईन फ्लु, पोलिओ, झिका, इबोला अशा रोगांनी गेल्या दशकात धुमाकूळ घातला होता. तेव्हाही ‘डब्लुएचओ’नं जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करत वेगानं पावलं उचलली होती.
आणीबाणी जाहीर झाली, की ज्या देशांत आजाराचा प्रसार झालाय त्या देशांसाठी काही नियम आखले जातात. ज्या देशातून आजाराची निर्मिती झालीय त्या देशासाठी विशेष आणि कडक नियम असतात. यात सगळ्यांत पहिलं, या देशातून आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लादले जातात. व्यापारावरही नियंत्रण येतं. संबंधित देशांचे प्रतिनिधी आणि ‘डब्लुएचओ’ची बैठक झाल्यावरच ही आणीबाणी उठवली जाते.
हेही वाचा: कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?
भुकंपाचा केंद्रबिंदू असतो तसं चीनमधलं वुहान हे शहर या कोरोना वायरसचा केंद्रबिंदू आहे. हबोई प्रांतातल्या या शहरासह आसपासच्या परिसरात कोरोना वायरसने हैदोस घातलाय. चीनने वायरसशी दोन हात करण्यासाठी अपुऱ्या आरोग्य सुविधांवर तोडगा म्हणून वुहान इथे अवघ्या आठ दिवसांतच एक भलं मोठं हॉस्पिटल उभारलंय. दुसरीकडे चीनी सैन्यदलानेही चौदाशे जणांचा मेडिकल स्टाफ सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या मदतीला पाठवलाय.
चीनमधल्या वुहान शहरापुरता मर्यादित असलेला हा कोरोना वायरस आता दीडेक महिन्याने जगभरातल्या जवळपास २५ देशांमधे पोचलाय. एकट्या चीनमधे ४९० जणांचा जीव घेणाऱ्या कोरोनामुळे फिलीपिन्समधेही एक जण दगावलाय. भारतातही तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळलेत. सध्या चीनपुरती मर्यादित असलेली या वायरसची साथ येत्या काळात वाढून खूप जास्त लोकांना आपल्या कवेत घेऊ शकते, अशी भीती वैद्यक क्षेत्रातल्या जाणकारांकडून व्यक्त केली जातेय.
कोरोनाचा वाढता प्रसार बघून जागतिक आरोग्य संघटनेसोबतच वेगवेगळ्या देशांनीही प्रतिबंधात्मक उपाययोजना शोधायला सुरवात केलीय. या सगळ्या तयारीमागे कोरोना वायरस ही जागतिक महामारी असल्याची भीती दडलीय. महामारीला इंग्रजीत पॅंडेमिक असं म्हणतात. संसर्गजन्य आजारांसाठी पॅंन्डेमिक हा शब्द वापरला जातो. डब्ल्यूएचओच्या नियमावलीनुसार, जगाच्या वेगवेगळ्या भागातले लोक एकाचवेळी एकाच आजाराचा सामना करत असतील तर त्याला पॅन्डेमिक म्हणजेच महामारी असं म्हणतात. एखादा नवा वायरस सहजपणे एका माणसातून दुसऱ्यात संक्रमित होतो तेव्हा ही साथ जगभर पसरते.
‘डब्ल्यूएचओ’च्या या निकषानुसार, कोरोना वायरसला एक जागतिक साथ म्हणून जाहीर करण्यासाठी आता शेवटचा टप्पा उरलाय. चीनच्या शेजारी देशांमधे कोरोनाच्या संक्रमणाचे रूग्ण आढळलेत. आता सीमा ओलांडून हा रोग जगभरातही पोचतोय. जेव्हा जगाच्या वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या समुदायांमधे हा वायरस सापडेल तेव्हा कोरोनाची जागतिक साथ पसरलीय, असं जाहीर केलं जाईल.
कोरोना वायरसही जागतिक साथीचे सारे मापदंड पूर्ण करतो. महत्त्वाचं म्हणजे, नेमके औषधोपचार उपलब्ध नसतील तेव्हा तर ही साथ खूप वेगाने पसरते. याआधी २००९ मधे स्वाईन फ्लुची साथ जगभर पसरली होती. त्यामुळे जगभरात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता.
हेही वाचा: मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही
डब्ल्यूएचओच्या एका बैठकीत महासंचालक डॉक्टर टेड्रोस एढॉनॉम गेब्रेयेसुस म्हणाले, ‘चीनबाहेर कोरोना वायरसचं संक्रमण सध्यातरी मर्यादित आहे. जिथून हा वायरस जगभर पसरलाय तिथेच आम्ही पाय रोवून उभं राहत लढा दिल्यास वायरसच्या दुसऱ्या देशांतला संक्रमणाला काहीसा पायबंद बसेल. संक्रमणाचा वेग कमी होईल. जोपर्यंत एखादा वायरस आपली सगळी वैशिष्ट्यं घेऊन पसरणं सुरू करत नाही तोपर्यंत त्याचा नेमका प्रभाव, त्याचा नेमका धोका काय होईल, याचा अंदाज लावणं जवळपास अशक्य आहे.’
कोरोना वायरस सध्या ज्या वेगाने पसरतोय, ते बघता लवकरच ही साथ जगाच्या वेगवेगळ्या भागात पोचेल, अशी भीती जगातले आघाडीचे श्वसनविकार तज्ञ व्यक्त करताहेत. एखाद्या रोगाची साथ एकाहून जास्त खंडामधे पसरली तर त्याला वैद्यकीय भाषेत पॅन्डेमिक म्हणजे सर्वव्यापी साथ असं म्हणतात. ‘न्यूयॉर्क टाईम्स’मधे आलेल्या या स्टोरीनुसार, कोरोना वायरस हा एखाद्या इन्फ्लुएन्झापेक्षा अधिक वेगाने पसरतो. तसंच सार्स, मेर्स या मंदगतीच्या कोरोना भावंडांच्या तुलनेत वुहान कोरोना वायरसचा संक्रमण वेग खूप असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलंय.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसिज’ या अमेरिकन संस्थेचे संचालक डॉक्टर अँथोनी एस. फॉसी यांच्या मते, ‘वुहान कोरोना वायरसच्या संक्रमणाचा वेग खूप खूप जास्त आहे. सध्यातरी हा वेग या वायरसची जगभरात साथ पसरेल असा आहे. या साथीला थांबवता येऊ शकतं का, हे मला माहीत नाही.’
चीनमधल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवरही संशय व्यक्त केला जातोय. चीन सरकार याची नेमकी आकडेवारी जगाला देत नाही. साथीशी संबंधित वेगवेगळ्या टेस्टनुसार, कोरोनाबाधितांचा खरा आकडा लाखाच्या घरात असेल. किरकोळ साथीच्या तुलनेत कोरोना साथीचा वेग अनेकपट असतो.साथरोग तज्ञांनी सार्स आणि मेर्स या साथीवेळी ही गोष्ट बघितलीय. कोरोना वायरसने जगभरात नेमके किती लोक मेलेत याचा नेमका आकडा उपलब्ध नाही आणि हीच शास्त्रज्ञांच्या दृष्टीने सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट आहे. सार्सचं संक्रमण झालेल्यांपैकी १० टक्के जणांचा मृत्यू झाला, तर एमईआरएसने तीनपैकी एकाचा जीव घेतला.
सर्वसाधारणपणे संपर्कात आलं तरी हा वायरस संक्रमित होतो. त्यामुळे याचे नमुने प्रयोगशाळेतही तपासणं जिकीरीचं झालंय, असा दावा ‘वायरस हंटर’ म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर डब्ल्यू. इयान लिप्किन यांनी केलाय. अमेरिकेतल्या कोलंबिया युनिवर्सिटीत मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ विभागात ते कार्यरत असून सध्या ते चीनमधे आहेत. ही संस्था सध्या चीनमधल्या रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणाऱ्या संस्थेला सल्ला देतेय.
लिप्किन यांच्या मते, ‘एखाद्या लॅबमधे दिवसाला ५ हजार नमुने तपासले जाताहेत. सॅम्पल टेस्टिंगच क्षमतेहून खूप मोठं असल्यामुळेयातल्या काही सॅम्पलचे रिझल्ट चुकीचेही असू शकतात. त्यामुळे सध्या जो काही आकडा समोर येतोय तो नेमका नाही. सॅम्पल टेस्टिंगचं प्रमाण एवढं मोठं असेल तर दर्जावर नियंत्रण राखणं जवळपास अशक्य होऊन जातं.’
हेही वाचा: आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?
मराठीत एक म्हण आहे. ‘हवेत गोळीबार आणि तीन ठार’ कोरोना वायरसच्या औषधोपचाराची स्थितीही काहीशी अशीच आहे. कारण डॉक्टरांना आपला शत्रू नेमका कसा आहे? त्याची शरीरावर हल्ला करण्याची रणनीती कुठलीय? वायरसने शरीरात एंट्री केल्यावर माणसाच्या जगण्यामरण्याच्या शक्यता किती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्याच्या शरीरात कोरोना वायरसने एंट्री केलीय हे कळाल्यावर त्याच्यावर काय औषधोपचार करायचे? हे सारे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
जगभरातले सारे अव्वल दर्जाचे शास्त्रज्ञ मानवी डोळ्यालाही न दिसणाऱ्या या शत्रूशी दोन हात करण्यासाठी सरसावलेत. अशातच थायलंडने आपण कोरोना वायरसवर औषध शोधल्याचा दावा केलाय. थायलंडच्या आरोग्य मंत्र्यांच्या मते, कोरोना वायरस संक्रमित एका चीनी महिलेला फ्लू आणि एचआयवी बाधितांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा एकत्रित डोस दिला. यामुळे तिच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली. एवढंच नाही तर ४८ तासांतच महिला कोरोना वायरस पॉझिटिवमधून निगेटिव झोनमधे आल्याचा दावा करण्यात आलाय.
चीनच्या वुहान शहरातल्या जिन्यिन्तान हॉस्पिटलमधे या जीवघेण्या वायरसने बाधित रूग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. इथल्या डॉक्टर्सनी ९९ रूग्णांवरच्या औषधोपचाराची सविस्तर केस स्टडी ‘लॅन्सेट’ या वैद्यक क्षेत्रातल्या आघाडीच्या मेडिकल जर्नलला पाठवलीय. ‘लॅन्सेट’ने ती प्रसिद्ध केलीय.
या केस स्टडीनुसार, सगळ्याच ९९ रूग्णांमधे न्यूमोनियाची लक्षणं आढळली. या रूग्णांना फुफ्फुसात त्रास होत होता. त्यामुळे फुफ्फुसाला ऑक्सिजन पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांमधे पाणी जमलं. यासोबतच ८२ जणांना ताप, ८१ जणांना खोकला, ३१ जणांना श्वास घेण्यास त्रास, ११ जणांना स्नायूंमधे वेदना, तर नऊ जणांमधे भ्रमावस्थेची लक्षणं आढळली. तसंच आठ रूग्ण डोकेदुखीने त्रासले होते आणि ५ जणांच्या गळ्यात फोड आले होते. सर्व ९९ रूग्णांपैकी ४९ जणांमधे आणखी एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे, या सगळ्यांची सीफूड मार्केटमधे उठबस होती. यापैकी दोन जण ग्राहक होते.
चीनच्या ‘राष्ट्रीय आरोग्य आयोगा’च्या मते, कोरोनाबाधित मृत्यूंपैकी ८० टक्के लोकांचं वय हे साठहून अधिक होतं. तसंच ७५ टक्के जणांना अगोदरच कुठला ना कुठला आजार होता. चीनच्या ‘राष्ट्रीय आरोग्य आयोगा’च्या मते, कोरोनाबाधित मृत्यूंपैकी ८० टक्के लोकांचं वय हे साठहून अधिक होतं. तसंच ७५ टक्के जणांना अगोदरच कुठला ना कुठला आजार होता.
चीनमधल्या सरकारी रोग निवारण आणि प्रतिबंधक केंद्राच्या मते, सहा पुरुषांच्या तुलनेत पाच महिलांमधे कोरोना वायरस आढळलाय. कोरोना संक्रमणाचं प्रमाण महिला आणि पुरुषांमधे सारखं दिसतं. असं असलं तरी महिलांच्या शरीरात कोरोना वायरसच्या संक्रमणाची शक्यता कमी आहे. कारण महिलांच्या शरीरातल्या एक्स क्रोमोजोम आणि सेक्स हॉर्मोनमुळे त्यांची प्रतिकार क्षमता अधिक असते, असं जिन्यिन्तान हॉस्पिटलमधले डॉक्टर ली झांग यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलं.
‘बीबीसी’ने कोरोना वायरसने बाधित रूग्णांच्या ‘लॅन्सेट’मधे प्रसिद्ध झालेल्या केस पेपरचं विश्लेषण करताना म्हटलं, ‘कोरोना वायरसच्या संक्रमणामुळे मृत्यू पावलेले दोन रूग्ण हे धडधाकट दिसत होते. पण ते खूप दिवसांपासून सिगारेट प्यायचे. त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असू शकते. ६१ वर्षांच्या एका रूग्णामधे तर न्यूमोनियाची खूप तीव्र लक्षणं दिसली. त्याला श्वासही घेता येत नव्हता. शरीराला जिवंत ठेवण्याएवढाही ऑक्सिजनचा पुरवठा फुफ्फुसात होऊ शकत नव्हता, एवढी वाईट त्याची अवस्था होती.
वेंटिलेटरवर ठेवल्यावरही त्याचं फुफ्फुस निकामी झालं आणि त्याच्या ह्रदयाची टिकटिक थांबली. नव्व्यानवपैकी अनेक रूग्णांना अगोदरच कुठला ना कुठला आजार झालेला असल्याचंही समोर आलं. म्हणजेच आजारी माणसाला या वायरसने आपल्या ट्रॅपमधे पकडलंय. २५ जानेवारीला हॉस्पिटलमधे दाखल असलेल्या ९९ रूग्णांपैकी ५७ जण अजून हॉस्पिटलमधेच आहेत. ३१ जणांना घरी सोडण्यात आलंय. तर ११ जण दगावलेत. याचाच अर्थ असा की, कोरोना वायरस संक्रमित जवळपास १० टक्के रूग्णांचा मृत्यू झालाय.
हेही वाचा: माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?
‘न्यूयॉर्क टाईम्स’मधे आलेल्या एका स्टोरीनुसार, कोरोना वायरस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात हवेतून संक्रमित होतो ही गोष्ट शास्त्रज्ञांना कळालीय. तरी कोरोना किती खतरनाक आहे याची त्यांना पुरेशी कल्पना आलेली नाही. असं असलं तरी यावर नियंत्रण मिळवणं सहज शक्य दिसत नाही.
अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून चीनला जाणारी आपली विमानं काही काळ रोखून धरण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेने तर गेल्या दोन आठवड्यांपासून चीनमधे वास्तव्याला असलेल्या प्रवाशांना देशात एंट्री देण्यासंबंधी नवे नियम जारी केलेत. जगभर कोरोना वायरसची दहशत पसरलीय. लोकांमधे भीतीचं वातावरण तयार झालंय. या सगळ्यांमागे अमेरिका असल्याचा आरोप चीनने केलाय.
अमेरिकेने कोरोना वायरसला तिखटमीठ लावून अधिकच्या गोष्टी सांगितल्याचं चीनच्या परराष्ट्र खात्याचं म्हणणं आहे. शक्तिशाली अमेरिकेने निर्बंध लादल्याचं बघून जपान, रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर यासारख्या देशांनीही खबरदारीची पावलं उचलणं सुरू केलंय. यामुळे चीनच्या बाजारपेठेवर खूप वाईट परिणाम झालाय. या सगळ्यामुळे कुणाचा फायदा होत असेल तर तो आरोग्य क्षेत्र आणि औषधं तयार करणाऱ्या कंपन्या आणि त्यात पैसा टाकणाऱ्या गुंतवणुकदारांचा. हॉस्पिटलमधे वापरण्यासाठी रबरी हॅन्डग्लोज आणि चेहऱ्यावरचे मास्क यांचीही मागणी वाढलीय.
कोरोनावर अजून कोणतंही प्रतिबंधात्मक औषध सापडलेलं नाही. पण त्याच्या सर्दी, ताप अशा लक्षणांवर मात करणारी छोटी औषधं बाजारात उपलब्ध आहेत. प्राथमिक उपचार म्हणून सध्या रुग्णांना हीच औषधं दिली जातायत. पण आरोग्य आणीबाणी पाहता लवकरच या आजारावर प्रतिबंधात्मक औषध तयार केलं जाईल. तेव्हाही त्याचा फायदा औषध कंपन्यांना होईल.
सध्या चीनच्या अर्थव्यवस्थेलाही कोरोनाची लागण झालीय. अर्थव्यवस्थेची तब्येतही खालावत चाललीय. चीनचा अशा रोगांशी लढण्याचा पूर्वानुभव फार वाईट आहे. २००३ मधेही चीनमधूनच सार्स नावाच्या रोगाचा प्रसार झाला. तेव्हाही चीनने सपाटून मार खाल्ला होता. त्यावेळी चीनचा जीडीपी तर ११ वरून सरळ २.५ टक्क्यांवर येऊन आपटला होता. यावेळीही तो धोका असल्याचा इशारा अर्थतज्ञांकडून दिला जातोय.
‘मुर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’ हे प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितासंग्रहाचं नाव. डोंगर हलवणे ही कवी कल्पना असली तरी डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका वायरसने अख्खं जग हलवून सोडलंय. त्यामुळेच या वायरसला चिरडून टाकण्यासाठी जागतिक आरोग्य संघटेनेने कंबर कसलीय. 'संधीचं दार खुलं झालंय' असं सांगत डब्ल्यूएचओने जीवघेण्या वायरसविरोधात साऱ्या जगाने एकत्र येऊन भविष्यातल्या संकटावर जालीम तोडगा काढावा, असं आवाहन केलंय.
हेही वाचा:
गुड फॅट आणि बॅड फॅट ही नेमकी भानगड काय?
आशियातल्या सगळ्यात मोठ्या ऑटो एक्स्पोवर यावेळी मंदीचं सावट
सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा
युरोपियन युनियनशी फारकतीनंतर ब्रिटनमधे होणारे हे बदल माहीत आहेत?