अमेरिकेला हव्या असणाऱ्या हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन या औषधाचा शोध युरोपातल्या एका झाडापासून फ्रेंच शास्त्रज्ञांनी लावला. तिथून कित्येक मैलांचा प्रवास करत हे औषधं भारतात आलं ते ब्रिटिशांचं आरोग्य सुधारावं यासाठी! पण औषधामुळे ब्रिटिश काळातच बंगळूरू हे चक्क दारू निर्मितीचं केंद्र बनलं. महत्त्वाचं म्हणजे त्यातूनच विजय मल्ल्याच्या दारू साम्राज्यही उभं राहिलं.
कोरोना वायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन’ या औषधाची जगभर चर्चा सुरू आहे. या औषधाची जगातली ७० टक्के निर्मिती भारतात होते. हे औषध भारताकडून मिळावं, यासाठी जगातले अनेक देश प्रयत्न करतायत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर या औषधासाठी दबावही टाकलाय.
पण या ‘हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन’चा भारताशी संबंध कसा? ते भारतात कसं पोहोचलं? ही कथा अतिशय रंजक आहे. त्यात श्रीरंगपट्टनचा टिपू सुलतान, मलेरिया आजार, ब्रिटिश सैन्य, रेशनवर मिळणारी दारू आणि अशी अनेक पात्रं आहेत.
हेही वाचा : ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित केली होती. शेवटची काही राज्यं उरली होती. त्यात अर्थातच मराठ्यांचं राज्य होतं. याशिवाय श्रीरंगपट्टनचा टिपू सुलतान हासुद्धा ब्रिटिशांशी संघर्ष करत होता. मात्र, १७९९ मधे ब्रिटिशांनी त्याचा पराभव केला आणि संपूर्ण म्हैसूर राज्य ताब्यात घेतलं. ब्रिटिश सैन्य या विजयाचा आनंद साजरा करत होतं. पण पुढच्या काही आठवड्यातच अनेक ब्रिटिश सैनिक आणि अधिकारी मलेरियामुळे आजारी पडू लागले.
श्रीरंगपट्टन हा मोठ्या प्रमाणावर पाणथळींचा, दलदलीचा प्रदेश असल्याने तिथं डासांचं प्रमाण जास्त होतं. त्यांच्यामार्फत मलेरियाचा प्रसार होतो. स्थानिक भारतीयांमधे या डासांपासून पसरणाऱ्या आजारांसाठी प्रतिकारक्षमता निर्माण झाली होती. आहारात तिखट, मसालेदार पदार्थ असल्यामुळंही फायदा झाला होता. मात्र, ब्रिटिशांना या वातावरणाची, आजारांची सवय नसल्याने ते त्याला बळी पडत होते.
पुढे परिस्थिती चिघळत गेली. त्यातून मार्ग काढणं आवश्यक होतं. त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांचा लष्करी तळ श्रीरंगपट्टनवरून जवळच असलेल्या बंगळुरूला हलवला. तिथं कॅन्टोन्मेंटची स्थापना केली. बंगळुरू तुलनेने थंड असल्याने ते ब्रिटिशांना मानवलं. मात्र, इथंसुद्धा डासांची समस्या होतीच. त्यामुळे मलेरियाचा धोका कायम होता.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?
जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा
त्याच सुमारास म्हणजे १८२० मधे दोन फ्रेंच शास्त्रज्ञांनी युरोपातील ‘सिंकोना’ झाडाच्यापासून “क्विनाईन” हे रासायनिक संयुग शोधून काढलं. ते मलेरियावरच्या उपचारासाठी उपयुक्त ठरू शकणार होतं. मात्र, त्याची मोठ्या प्रमाणावर चाचणी व्हायची होती. तरीही मलेरियाचा धोका लक्षात घेऊन भारतातल्या ब्रिटिशांनी घाऊक प्रमाणात क्विनाईन मागवून घेतलं आणि सगळ्या सैन्यामधे वाटलं. त्यांना ते नियमित घेण्यास सांगितलं. अगदी निरोगी सैनिकांनीही ते घेण्याबाबत बजावलं. मलेरियाची समस्या संपूर्ण भारतभर असल्याने भारतातल्या सगळ्या ब्रिटिश सैन्याला त्याची सक्ती करण्यात आली.
मलेरियावर ही मात्रा लागू पडली. अनेक आजारी सैनिक या औषधामुळं लगेचच बरे झाले. पण मलेरियाचे नवीन पेशंट तयार व्हायचं सत्र काही थांबलं नाही. औषध देऊनही अनेक सैनिक मलेरियामुळे आजारी पडतायत हे लक्षात आलं. यामागचं कारण शोधलं तेव्हा असं निदर्शनाला आलं की हे औषध कडू असल्याने अनेक सैनिक त्याची मात्रा घेतच नव्हते.
मग ब्रिटिश अधिकारी आणि संशोधकांनी यातून मार्ग काढण्यासाठी काही प्रयोग करायला सुरूवात केली. संशोधकांना असं आढळलं की हे औषध ‘ज्युनिपर’ फळापासून तयार केलेल्या मद्यामधे मिसळून दिलं तर त्याला गोडी प्राप्त होते. ‘ज्युनिपर’ फळापासून तयार केली जाणारी ‘जिन’ त्यासाठी उपयोगी ठरली. त्यामुळे क्विनाईनचा कडवटपणा नाहिसा झाला आणि त्याला उत्तम चव प्राप्त झाली.
हेही वाचा : युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
मग काय? ‘जिन + टॉनिक’ असे हे ‘जिन टॉनिक’ ब्रिटिश सैनिकांमधे एकदम लोकप्रिय झालं. इतकं की सैनिक दररोज न चुकता पिऊ लागले. मग ब्रिटिशांनी सैनिकांच्या दर महिन्याच्या ‘रेशन’मधे जिनच्या बाटल्या आणि हे क्विनाईन म्हणजेच टॉनिक वॉटर देणं सुरू केलं. सैनिकांना रोज ‘जिन’चा आनंद मिळू लागला. सोबत रोगप्रतिकारक शक्तीही वाढू लागली.
याची एकदा सुरूवात झाल्यावर ब्रिटिश सैनिकांकडून ‘जिन’ची आणि इतरही मद्याची मागणी बरीच वाढू लागली. त्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगळुरूच्या आसपास अनेक ‘ब्रिअरी’ आणि ‘डिस्टलरी’ सुरू केल्या. तिथं मद्याची निर्मिती करून ते भारतभर पाठवलं जाऊ लागलं. यातूनच ब्रिटिशांच्या काळातच बंगळुरू हे मद्यनिर्मितीचं प्रमुख केंद्र बनलं.
पुढं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उद्योगपती विजय मल्ल्या याचे वडील विठ्ठल मल्ल्या यांनी बहुतांश मद्यनिर्मिती कारखाने विकत घेतले. त्यांची मिळून ‘युनायटेड ब्रिअरी’ या कंपनीची स्थापना केली.
क्विनाईन आणि जिन हे ‘कॉकटेल’ मद्यपीमधे आजही लोकप्रिय आहे. नुसतं क्विनाईन हे टॉनिक या नावानं ओळखलं जाऊ लागलं. अनेक डॉक्टर आजही वेगवेगळ्या प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी, ताप कमी करण्यासाठी हेच लिहून देतात. पुढं टॉनिक हा शब्द पाश्चात्य औषधांसाठी म्हणून ओळखला जाऊ लागला.
पुढच्या काळात क्विनाईन हे वेगवेगळ्या रूपांमधे आलं आणि वेगवेगळ्या आजारांसाठी दिलं जाऊ लागलं. त्यापैकीच एक म्हणजे हायड्रॉक्झीक्लोरोक्वीन. ते मलेरियावरचं रामबाण औषध बनलं. आज कोरोना वायरसच्या संसर्गामधे जगभर त्याची मागणी वाढली आहे.
हेही वाचा :
अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात
जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर
प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट
( भवताल या पर्यावरणविषयक मासिकाच्या फेसबुक पेजवरून साभार.)