भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय?

१४ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकणाऱ्या भारतीय गोलंदाजांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. पूर्वी चांगली बॉलिंग कऱणारा एकही खेळाडू भारताच्या ताफ्यात नव्हता. पण आता असे पाच खेळाडू आपल्याकडे आहेत. जसप्रीत बुमराह याचं नाव यात सगळ्यात वर घेतलं जातं. असे दर्जेदार खेळाडू निर्माण होण्यामागे तीन चार कारणं सांगता येतील.

भारतीय वेगवान माऱ्याची सध्या जोरदार चर्चा चालूय. पाच दर्जेदार आणि भेदक असे जलदगती गोलंदाज आज भारतीय क्रिकेट संघाकडे आहेत. त्यापैकी दोघांना विश्रांती देण्याची चैनही भारताला परवडतेय. पूर्वी एकाच टप्प्यातून चेंडू फलंदाजापर्यंत टाकण्याची सफाई असणाऱ्या हातात नवा चेंडू देण्याचा दरिद्रीपणा करणाऱ्या भारतीय संघाकडे आज चांगले वेगवान गोलंदाज आहेत. या गोष्टीवर विश्वास ठेवणंही काहींना कठीण जातंय. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव आणि भुवनेश्वर या पाचही गोलंदाजांनी अलिकडे भारतीय संघाला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधे चांगलं यश मिळवून दिलंय.

खूप आधी म्हणजे १९३२ साली भारताला कसोटी दर्जा प्राप्त झाला तेव्हा मोहम्मद निस्सार हा खराखुरा वेगवान गोलंदाज भारतापाशी होता. त्याने लॉर्डसवर इंग्लिश फलंदाजीला दणकाही दिला होता. मात्र त्यानंतर जलदगती म्हणता येतील असे गोलंदाज अपवादानेच खेळले. त्यात रमाकांत देसाई, करसन घावरी, अबीद आली अशी नावे घेता येतील.

कपिल देवचा उदय होईपर्यंत कधी पतौडी, कधी गावसकर तर कधी चक्क यष्टीरक्षक कुंदरन याने नवा चेंडू हाताळल्याच्या घटना घडल्या होत्या. एकनाथ सोलकर या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला बळेबळे मध्यमगती गोलंदाजही बनवलं गेलं होतं आणि त्यानेही जेफ बॉयकॉट सारख्या दिग्गज सलामीवीराला सातत्याने बाद करून संघाला बोनस मिळवून देण्याचं काम केलं होतं.

हेही वाचा : पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

कपिल देवच्या येण्यानं गोलंदाजी सुधारली

एकूणच भारतीय गोलंदाजीचा भार फिरकी गोलंदाजच वाहायचे. भारतातल्या खेळपट्ट्या त्यांना अनुकूलच असायच्या. परदेशात सगळी परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांच्या गुणवत्तेवरच भरवसा ठेवला जाई. प्रसन्ना, बेदी, चंद्रशेखर, वेंकटराघवन ही चौकडी फिरकीत माहीर असल्यानं त्यातही आपली छाप पडायची. तरीही भारताचं वेगवान माऱ्याबाबतचं दारिद्र्य लपून रहात नव्हतं.

कपिल देव हा खरा वेगाने गोलंदाजी करणारा हिरा मिळाल्यावर थोडा फरक पडला. मग श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, पुढे झहीर खान यांनी भारतसुद्धा वेगवान गोलंदाज घडवू शकतो हे स्पष्ट केलं. एमआरएफ फाउंडेशान, फ्रॅन्क टायसन, डेनिस लिली यांनी दरम्यान भारताला मदत केली आणि काही चांगले वेगवान गोलंदाज तयार करून दिले.

आज भारताकडे ताशी १४०-१५० किमी वेगाने सतत मारा करणारे चार तरी गोलंदाज आहेत. बुमराह सर्वात धोकादायक गोलंदाज आज मानला जातोय. त्याची चेंडू टाकण्याची विचित्र शैली आणि गोलंदाजीतली विविधता यामुळे तो प्रतिस्पर्ध्यांना खेळण्याच्या आधीच घाम फोडणारा गोलंदाज मानला जातोय. उमेश यादवकडे भरपूर वेग आहे तर इशांत शर्मा या ताफ्यातला सर्वाधिक अनुभवी असल्याने त्याची सुद्धा गोलंदाजी परिपक्व ठरतेय. शम्मीने आपल्या दोन्ही प्रकारे स्विंग करण्याच्या करामतीवर वेगासह पकड बसवलीय. भुवनेश्वर वेगात कमी असला तरी तो चेंडू स्विंग करण्यात सुलतान मानला जातो. यामुळे या पाचही जणांचा आज दरारा आहे.

एकाच गोलंदाजावर भार पडत नाही

हा बदल कसा झाला? त्याबद्दल अलिकडे एका परिसंवादात भारताचे माजी प्रशिक्षक संजय बांगर आणि माजी वेगवान गोलंदाज राजू कुलकर्णी यांनी प्रकाश टाकला. त्यांच्या मते सध्या या गोलंदाजांना जो सहाय्यकांचा ताफा मिळालाय त्याला याचं बऱ्यापैकी श्रेय जातं. फिजिओथेरपीस्ट, ट्रेनर, प्रत्यक्ष गोलंदाजीचे प्रशिक्षक, आहारतज्ञ आणि मनोबलासाठी ध्यान देणारे तज्ञ या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे या गोलंदाजांना तंदुरुस्त राहून आपली गोलंदाजी अधिक परिणामकारक करायचं जमतंय.

मुख्य म्हणजे एकाच गोलंदाजावर भार पडत नाही. पूर्वी एखादाच बऱ्यापैकी मध्यमगती गोलंदाज असायचा. त्याला आधी नेटमधे तास न तास गोलंदाजी करून मुख्य फलंदाजांना सराव द्यावा लागायचा. यातच त्याची उर्जा संपायची. शिवाय प्रत्यक्ष सामन्यात त्याला बरीच षटके टाकावी लागायची. यामुळे तो लवकर निस्तेज व्हायचा. 

आता छोट्या छोट्या स्पेसमधे या गोलंदाजांना वापरलं जातं. त्यामुळे त्यांचा मारा भन्नाट ठरतो. नेटमधे सरावासाठीही आता स्थानिक गोलंदाज मागवले जातात. प्रमुख गोलंदाजांचा आहार, व्यायाम, प्रकृती याकडे सतत लक्ष पुरवत असल्याने त्यांची कारकीर्द प्रदीर्घही ठरतेय.

हेही वाचा : कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

गोलंदाजांना आयपीएलचा फायदा

भारतातल्या खेळपट्ट्या आता क्युरेटर दलजीतसिंगने घेतलेल्या मेहनतीमुळे जलदगतीसाठी पोषक झाल्यात. त्यावर गवत ठेवलं जातं. पूर्वी सगळ्या पाटा असायच्या. त्यामुळे जलदगती गोलंदाज नाऊमेद व्हायचा. आता तशी परिस्थिती नाही.

पूर्वी काही गैरसमज होते. म्हणजे वेगवान गोलंदाजाने अधिक व्यायाम करायचा नाही. त्याने त्याचे दंडाचे, खांद्याचे स्नायू आखडतात. तसंच खेळताना पाणी, फळांचा रस, सरबत पिऊ नये. त्यामुळे पोटावर परिणाम होतो. अशा तऱ्हेचे गैरसमज होते. ते आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान यांनी खोडून काढलेत. याचाही फायदा गोलंदाजांना होतोय.

आयपीएल स्पर्धेचाही फायदा गोलंदाजांना झाल्याचं बांगर, प्रवीण अमरे आधीच म्हणाले होते. अनेक विदेशी गोलंदाज आणि माजी क्रिकेटपटू आयपीएलमधे भाग घेतात. माजी क्रिकेटपटू प्रशिक्षक या नात्याने येतात. ही मंडळी बहुमोल टीप्स भारतीय गोलंदाजांना देत असतात. त्यांच्यामुळे चेंडू स्विंग करण्यापासून ते फॉलो थ्रू पर्यंत अनेक गोष्टींत सुधारणा करायचं या गोलंदाजांना सोपं जातंय.

भारतीय गोलंदाजी आता विनोदानं घेतली जाणार नाही

नवे चेंडूसुद्धा या गोलंदाजांच्या पथ्यावर पडलेत. चेंडूची शिवण कशी वापरायची हे समजू लागल्यानं गोलंदाज चांगलेच प्रभावी ठरू लागलेत. भारतीय गोलंदाजांचे प्रशिक्षक भारती अरुण यांची मेहनतही उपयोगी पडते आहे. त्यांच्या उमेदीच्या अरुण यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काळात बिलकुल छाप पडता आली नव्हती. पण त्यांना गोलंदाजांना नेमकं मार्गदर्शन करायची युक्ती अवगत आहे.

या सर्वांचा परिणाम भारतीय वेगवान मारा दर्जेदार होण्यात झालाय. आणखी अनेक युवा गोलंदाज सध्या स्थानिक सामन्यांत चमकताहेत. त्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजी आता विनोदाने न घेता प्रतिस्पर्धी गांभीर्यानेच घेतील यात शंका नाही. हा मारा गोडाकडून तिखटाकडे वळलेला आहे.

हेही वाचा : 

मानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील

अश्विनची मुरलीधरनशी बरोबरी, आता कुंबळेंचा रेकॉर्ड मोडणार?

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?