साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा पराभव त्यांच्यापेक्षा भाजपच्या जिव्हारी लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा इथे विजय झाला. सातारच्या गादीमुळे आपण सहज जिंकू, अशा हवेत असणाऱ्या उदयनराजेंना जनतेने चांगलंच जमिनीवर आणलंय. छत्रपतींच्या गादीला मान देत सातारकरांना राष्ट्रवादीने आपल्याला मत द्यायला लावलंय.
सातारच्या पोटनिवडणुकीतला पराभव उदयनराजे भोसलेंपेक्षा भाजपलाच जिव्हारी लागलाय. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची कबुली दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘मान सातारच्या गादीला, मत राष्ट्रवादीला’ या प्रचाराचा हा विजय असल्याचं सांगितलं. गादीला मान देणाऱ्या सातारकरांना आपल्याकडे वळवण्यात राष्ट्रवादीला चांगलं यश आल्याचं आजच्या निकालाने स्पष्ट केलंय.
प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी शरद पवारांनी भर पावलसात साताऱ्यात सभा घेतली. त्या सभेतले फोटोच नाही तर अख्खी सभाच सोशल मीडियावर वायरल झाली. या वायरल सभेतच पवारांनी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असतानाही उदयनराजेंना तिकीट देऊन चूक झाल्याची कबुली दिली. तसंच साताऱ्याचा प्रत्येक माणूस ती चूक सुधारण्यासाठी २१ तारखेची वाट बघतोय, असंही पवार म्हणाले होते.
कोसळणाऱ्या पावसाचा उल्लेख करत पवारांनी वरुणराजानेही आपल्याला आशिर्वाद दिलेत. त्याच्या आशिर्वादाने सातारा जिल्ह्यात चमत्कार होणार आहे आणि याची सुरवात २१ तारखेपासून होणार आहे, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला होता. त्या विश्वासावर आजच्या निकालाने शिक्कामोर्तब केलंय.
हेही वाचाः विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?
लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर तीनच महिन्यात उदयनराजे भोसले भल्या रात्री आमदारकीचा राजीनामा देत भल्या सकाळीच भाजपमधे भरती झाले. भाजपनेही मराठा समाजाची वोटबँक आपल्याकडे खेचण्यासाठी दिल्लीतच एक मोठा इवेंट घडवून आणत उदयनराजेंना प्रवेश दिला. खुद्द पक्षप्रमुख अमित शाह यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार असल्याचं उदयनराजेंनी जाहीर केलं होतं. पण तसं झालं नाही. म्हणून नंतर पंतप्रधान नाशिकला आल्यावर उदयनराजे सातारहून तिथे गेले होते. तिथे त्यांनी मोदींनी मानाचा फेटा घातला. मोदींनी उदयनराजेंसाठीही साताऱ्यात सभा घेतली. पंतप्रधान मोदी आणि शाह या दोघांनीही एकाच जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या नाहीत. साताऱ्याच्या बाबतीत शाह यांनी कराड इथे सभा घेऊन हा संकेत मोडला.
छत्रपतींच्या घराण्यातला माणूस आपल्यासोबत आल्यास जनतेमधे चांगला मेसे जाईल, असं भाजपला वाटत होतं. भाजपने उदयनराजेंसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. आज या साऱ्या घडामोडींवर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांचा पराभव झालाय. कुणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याचं समर्थन केलं नाही हे लोकांनी दाखवून दिलंय. सत्ता जाते, सत्ता येते मात्र पाय जमिनीवरच ठेवावे लागतात. सत्तेचा उन्माद जनतेला आवडत नाही हे या निकालातून स्पष्ट झालंय.’
उदयनराजे सलग तीनवेळा खासदार झाले. २००९, २०१४ आणि २०१९ मधे ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिंकले. पण जिंकल्यावर उदयनराजे मी माझा, माझा कुठलाच पक्ष नाही, असे दावे करत फिरायचे. राष्ट्रवादीतल्या जवळपास सगळ्यांच आमदारांशी पंगा घेतला. खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटीलही उदयनराजेंमुळे दुखावले होते. जिल्ह्यातली राष्ट्रवादीची तमाम नेतेमंडळी त्यांच्यावर खूप नाराज असायचे.
यंदाच्या निवडणुकीत तर उदयनराजेंना तिकीट द्यायला पक्षातून खूप उशीर झाला. पण शरद पवारांनी पुन्हा एकदा उदयनराजेंना तिकीट दिलं. आणि उदयनराजेंनी विजयाची हॅट्ट्रीक साधली. पणे तिसऱ्यांदा जिंकल्यावर पाचच महिन्यांत उदयनराजेंनी राजीनामा देत भाजपचं कमळ हातात घेतलं.
राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई सुरू असताना राजीनामा देण्याचा हा प्रकार कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. राष्ट्रवादीतली स्थानिक नेतेमंडळीही आपले जुने हिशोब चुकते करण्यासाठी कामाला लागले. त्याला काँग्रेसचंही बळ मिळालं. आजच्या निकालाने उदयनराजेंची हॅट्ट्रीक म्हणजे यश स्वबळावरच नव्हतं हे आजच्या निकालाने स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या ताकदीवरच स्टाईल स्टाईल म्हणत कॉलर उडवणारे उदयनराजे जिंकत होते.
हेही वाचाः साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का?
उदयनराजेंनी २०१९ च्या निवडणुकीत आपलं मताधिक्य घटण्यामागे इवीएम कारणीभूत असल्याचाही दावा केला. इवीएमविरोधात मोठं रान उठवलं. पण आता तेच उदयनराजे इवीएमबद्दल काहीच बोलत नाहीत. पाच महिन्यांआधी नरेंद्र मोदींवर सडकून टीका करणारे राजे आता त्यांचं तोंडभरून कौतुक करतात.
पंतप्रधानांच्या उपस्थिती झालेल्या सभेत उदयनराजे म्हणाले होते, ‘विरोधक केवळ सत्तेसाठी एकत्र येताहेत. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, असं सांगितलं जातं. या अहंकाराचं लवकरच हरण होणार असल्याचा विश्वासही बोलून दाखवला.’
उदयनराजेंनी सातारच्या विकासासाठी आपण भाजपमधे गेल्याचं सांगितलं. यावर थेट शरद पवारांनीच उदयनराजेंना टोला लगावला. पवारांनी आपल्या स्टाईलमधे १५ वर्ष खासदार होता तेव्हा काय केलं, असा सवाल विचारत उदयनराजेंच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. त्याला प्रतिसाद मिळाल्याचं आजच्या निकालाने अधोरेखित केलंय.
हेही वाचाः शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?
लोकसभा निवडणुकीत आपण मतदानातल्या मोदी फॅक्टरची खूप चर्चा केली. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून मतदानात पवार फॅक्टर काम करतो. राज्याच्या कानाकोपऱ्यात सगळ्या जातीधर्मांत पवारांना मानणारे लोक आहे. इतके दिवस हा पवार फॅक्टर एक अंडरकरंट म्हणून काम करायचा. आता निवडणुकीत आपली प्रतिष्ठाच पणाला लागल्याचं बघून हा फॅक्टर उघडउघडपणे काम करताना दिसला.
साताऱ्यातल्या पवार फॅक्टरची भीती उदयनराजेंनीही बोलून दाखवली होती. पवार साहेब निवडणूक लढवणार असतील तर आपण निवडणुकीतून माघार घ्यायला तयार असल्याचं भावूक विधान करत उदयनराजे रडले होते. आपले हे अश्रू खोटे नसल्याचंही त्यांना सांगावं लागलं. या रडण्यातच उदयनराजेंनी ही लढत किती महाकठीण होती, हे कबुल केलंय. एका अर्थाने उदयनराजेंचा पहिला पराभव इथेच झाला.
पवार फॅक्टरबद्दल श्रीनिवास पाटील यांनी खूप नेमकी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, 'शरद पवारांना अंतर देणाऱ्यांना लोकांनी उत्तर दिलंय. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही उमेदवारी लोकांनी उचलली. लोकांनी निवडणूक हातात घेतली. भविष्यात साताऱ्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.' पवारांनीही या फॅक्टरचे आभार मानण्यासाठी उद्याच सातारला जायचं जाहीर केलंय.
हेही वाचाः
नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?
मुंडे भावंडांचं भवितव्य ठरवणार १९ सेकंदांची क्लिप ठरणार?
विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला कौल देणार?
डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?