कोरोना वायरसचा जगभर बोलबाला आहे. त्याच्या काट्या काट्यांच्या आवरणामुळे त्याला कोरोना असं नाव मिळालंय. पण त्याचं शास्त्रीय नाव सार्स-कोव-१९ असं आहे. अशा वायरसचा शोध माणूसच लावतो आणि स्वतःच त्याचं बारसंही करतो. पण असं नाव ठरवताना त्याला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात.
सध्या कोरोना वायरसमुळे जगभर अस्वस्थता पसरलीय. कांजण्या, पोलिओ, देवी, गोवर, रुबेला, गालफुगी, हेपॅटिटिस, सार्स, बर्ड फ्लू असे अनेक आजार वेगवेगळ्या वायरस मुळेच होतात. ही सगळी नावं अनेकदा चर्चेत असतात किंवा त्याबाबत आपण ऐकलेलं तरी असतं. माणसांनी या वायरसबद्दल संशोधन केलं, वायरसच्या स्वभावाचा अभ्यास केला आणि त्याला ओळख मिळवून देण्यासाठी त्याचं बारसंही केलं.
अशा वेगवेगळ्या वायरसची माहिती, त्यांच्या नामकरणाचा इतिहास 'द प्रिंट' या वेबपोर्टलवरच्या एका कार्यक्रमात पत्रकार शेखर गुप्ता यांनी सांगितलाय. हा सगळा इतिहास इंटरेस्टिंग आहे. गंमत म्हणजे, अनेक वायरसना थेट नद्या, प्राणी, जंगलांची नावही दिली गेलीत. त्याचे दाखले गुप्ता यांनी दिलेत.
एखाद्या वायरसला नाव द्यायचं तर त्याला एका प्रोसेसचा भाग व्हावं लागतं. नदी, नाले किंवा गावाचं नाव देताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यामागे मोठ्ठं पॉलिटिक्सही खेळावं लागतं. आपण ठेवलेल्या नावामुळे कुठल्या गावाचं किंवा माणसाची बदनामी होऊ नये याची काळजी घ्यावी लागते.
हेही वाचा : सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!
२००३ साली खवले मांजराकडून एक वायरस माणसात आला. तो वायरस माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करत असे. इंग्रजीत श्वसनसंस्थेला रेस्पिरेटरी सिस्टम असं म्हणतात. म्हणून या आजाराला सार्स कोव म्हणजेच सिवियर एक्युट रेस्पिरेटरी सीन्ड्रोम कोरोना वायरस असं नाव दिलं गेलं. त्यानंतर २०१२ च्या आसपास मध्य पूर्व देशातून असाच एक कोरोना वायरस उंटामधून माणसात आला. त्या जागेच्या नावावरून मिडल इस्ट रेस्पिरेटरी सीन्ड्रोम असं नाव या दुसऱ्या वायरसला देण्यात आलं.
आपला आत्ताचा कोरोना वायरस पहिल्यांदा चीनमधल्या वुहान शहरात हा वायरस सापडला. त्यामुळे त्याला वुहान वायरस असंही म्हटलं जात होतं. नंतर त्यावर संशोधन झाल्यावर हा वायरस कोरोना फॅमिलीतला आहे, असं लक्षात आलं. या फॅमिलितल्या सार्स आणि मर्स या वायरससारखाच हाही श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. त्यामुळेच त्याचं शास्त्रीय नाव सार्स कोव २ म्हणजे सिवियर एक्युट रेस्पीरेटोरी सीन्ड्रोम कोरोना वायरस २ असं ठेवण्यात आलं. तर त्यापासून होणाऱ्या आजाराला कोविड – १९ म्हणजेच २०१९ मधे आलेला कोरोना वायरस डिसीज असं नाव देण्यात आलं.
या कोरोनाचा जन्म झाल्यापासून त्याचं बारसं करण्यापर्यंत साधारण दिड ते दोन महिन्यांचा काळ लागला. हे नाव ठेवण्यामागेही भरपूर राजकारण असल्याचं प्रिंटच्या वीडियोमधे शेखर गुप्ता यांनी सांगितलंय. सार्स या वायरसचं मूळ हे चीनच्या दक्षिणेकडच्या भागात म्हणजे वुहान शहरात होतं. पण त्याचं नाव ठेवताना मर्स प्रमाणे चीनच्या कोणत्याही शहराचा उल्लेख यात केला गेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर कोरोनाचा उल्लेख चायना वायरस असा केला होता, असा महत्वाचा संदर्भ गुप्ता यांनी जोडलाय. पण जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला तसं नाव देणं मुद्दामच टाळलं.
दक्षिण आफ्रिकेतल्या काँगो इथं यामबुकटू गावात १९७६ मधे पहिल्यांदा इबोला नावाच्या एका वायरसचा प्रसार झाला होता. पिरर पियर्ट या शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला. ज्या यामबुकटू गावात हा वायरस सापडला त्या गावाचं नाव या वायरसला देण्याचा विचार पियर्ट यांनी केला होता. पण गावाची बदनामी होईल, म्हणून त्याला विरोध झाला. त्याआधी नायजेरियात लसा नावाचा वायरस आढळला होता. यात गावची बदनामी झाली होती. मग काँगो नदीवरून नाव ठेवण्याचा विचार आला. पण 'क्रायमेईन काँगो हिमेरेजिक फिवर वायरस' म्हणजेच कसा वायरसचं नाव या काँगो नदीवरून आधीच ठेवण्यात आलं होतं.
काँगो ही आफ्रिकेतली मोठी आणि जगातली सगळ्यात खोल नदी. कसा नावाच्या वायरसला या काँगो नदीचं नाव दिलं होतं. पण या वायरसच्या नावाची मोठी किंमत तिथल्या लोकांना मोजावी लागली. मनात असलेल्या पूर्वग्रहांमुळे नदीच्या आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या लोकांकडे कायम शंकेनं पाहिलं जायचं, असं असं गुप्ता यांनी सांगितलं. याच काँगो नदीच्या जवळून इबोला नदी जाते. त्या नदीवरून पिरर पियर्ट यांनी शेवटी त्या वायरसला इबोला हे नाव दिलं.
मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार डासापासून होतात हे आपल्याला माहितीय. पण २०१८ मधे भारतात अशाच एका आजाराचा प्रसार वाढला होता. तो वायरस होता झिका. २०१८ मधे राजस्थानातल्या जयपूरमधे झिका वायरसचे रुग्ण आढळून आले होते. गर्भवती महिला आणि लहान मुलांना याचा सगळ्यात जास्त धोका होता.
झिका वायरसचा १९४७ मधे पहिल्यांदा शोध लागला. आफ्रिकेतल्या युगांडामधे जिका नावाचं जंगल आहे. त्यावरून त्याला झिका हे नाव पडलं, असं शेखर गुप्ता यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय. ७ वर्षांनी म्हणजेच १९५४ मधे नायजेरियातल्या एका व्यक्तीमधे पहिल्यांदा या वायरसचा संसर्ग झाला. पुढे आफ्रिकन देशांमधे याचा प्रादुर्भाव वाढत गेला. तो इतका फैलावला की झिका वायरसमुळे २००६ मधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला अर्थात डब्लूएचओला जागतिक आणीबाणी जाहीर करावी लागली होती.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?
कोरोनाचा प्रभाव कमी होतोय न होतोय तोवर २३ मार्चला चीनच्या युनान शहरात एका व्यक्तीचा हंता नावाच्या वायरसनं मृत्यू झाला. आधीच कोरोनाचं थैमान आणि त्यात हंतासारख्या वायरसनं एकाचा जीव जाणं ही गोष्ट सगळ्यांसाठी चिंतेत भर टाकणारी होती. पण या वायरसचा प्रसार होण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे. या वायरसविषयी विस्तृत माहिती ही सेंटर्स फॉर डिसीज कन्ट्रोल अँड प्रिवेंशन अर्थात सीडीएस या शासकीय आरोग्यविषयक साइटवर वाचायला मिळते.
उंदरांची लाळ किंवा त्याच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यावर माणसाला या वायरसची लागण होऊ शकते. वायरसच्या जवळपास २१ वेगवेगळ्या प्रजाती आहेत. कोरोना वायरसपेक्षा हा वायरस अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं जातं.
१९७८ मधे पहिल्यांदा या वायरसची एक प्रजाती दक्षिण कोरियाच्या हंतन नदी किनाऱ्याजवळ आढळली होती. त्यामुळे याचं नामकरण हंता वायरस असं झालं.
दक्षिण अमेरिकेत बोलविया नावाचा एक देश आहे. इथे माचुपो नावाची एक नदी वाहते. तिचं नाव जगभरात माहिती झालं ते माचुपो या वायरसमुळे. सर्वात धोकादायक वायरस मार्बर्ग वायरस आहे. इबोलासारखीच त्याची लक्षण असतात. जर्मनीतल्या एका लहान नावाच्या नदी जवळच्या एका छोट्या शहरावरून हे नाव या वायरसला देण्यात आलं. पण त्या नदीशी त्याचा प्रत्यक्ष असा संबंध नव्हता. स्वाईन फ्लु डुक्करामुळे आला. त्यामुळे वायरसचं नामकरण स्वाईन फ्लु असं झालं.
हेही वाचा : संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ
ललनटॉप या वेब पोर्टलवरही याबाबत एक वीडीओ प्रसिद्ध करण्यात आलाय. त्यात वायरसला नाव ठेवताना कोणती खबरदारी घेतली जाते आणि ही नावं कशी दिली जातात याबद्दल सांगितलं गेलंय. प्रत्येक वायरसला एखादं नाव द्यावंच लागतं. त्या नामकरणाची एक प्रक्रिया आहे. तसंच काही नियमही आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूएचओ स्वतःहुन कोणत्याही वायरसला नाव देत नाही. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. लोकांना चांगलं अन्न आणि पशुधन मिळावं तसंच प्राण्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी डब्ल्यूएचओची 'वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर एनिमल हेल्थ' या संस्थेसोबत अन्न आणि कृषी या विषयावर काम करणारी 'फूड अँड एग्रीकल्चर ऑफ द युनायटेड नेशन्स' या दोन संस्थांशी सल्लामसलत केली जाते, अशी माहिती या वीडियोत सांगण्यात आलीय.
कोणत्याही वायरसला नाव द्यायचं तर काही गोष्टी ठरलेल्यात. त्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. सुरवातीला वायरसचा संसर्ग किती प्रमाणात होईल याची शक्यता विचारात घेतली जाते. एखाद्या रोगाची लक्षणं माणसांमधे दिसायला लागतात आणि माणसांचं मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते तेव्हा वायरसचं नाव शोधायला सुरवात होते. अर्थात तोपर्यंत त्याला कोणतंही अधिकृत नाव दिलं जात नाही.
जगभरातल्या आजारांचं वेगवेगळ्या प्रकारांमधे वर्गीकरण करणाऱ्या 'इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज' अर्थात आयसीडी या संस्थेचीही या सगळ्यामधे महत्त्वाची भूमिका असते. एखादं नाव डब्ल्यूएचओनं दिलं तरी त्याला मान्यता द्यायचा किंवा त्याला नकाराचा अधिकार आयसीडीला आहे. महत्वाचं म्हणजे ही संस्था डब्ल्यूएचओच्या अखत्यारीत काम करते. पण स्वतंत्र निर्णयही घेऊ शकते. नाव ठरवायचं तर काही निकषही पाळावे लागतात. विज्ञान, भाषा आणि धोरण या तिन्ही गोष्टींचं संतुलन त्यात महत्वाचं आहे. असंही ललनटॉपने डब्ल्यूएचओच्या माहितीचा संदर्भ देऊन म्हटलंय.
हेही वाचा : किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
कोरोना वायरसचा प्रसार झाल्यापासून चीन मधल्या लोकांबाबत अनेक उलट्या सुलट्या गोष्टी पसरवल्या जातायत. तिथल्या प्राण्यांच्या बाजाराचे फोटो, वीडियो वायरल करून त्यांना शिव्या शापही दिल्या जातायत. चीनी लोक कसे वाईट आहेत याबद्दल चर्चा केली जातेय. यानं फक्त चीनी लोकांबद्दलच नाही तर छोटे डोळे असणाऱ्या सगळ्याच मंगोलियन वंशाच्या माणसांबद्दल लोकांच्या मनात घृणा पेरली जातेय.
याचाच परिणाम म्हणून सध्या जगभरात मंगोलियन वंशांच्या लोकांना कोरोना कोरोना अशी हाक मारून चिडवणं चालूय. मंगोलियन लोकांबद्दल असणाऱ्या गैरसमजुतीमुळे एक माणूस एका मंगोलियन मुलीच्या तोंडावर थुंकल्याची घटना अमेरिकेत घडली होती. अशाप्रकारे कुठल्याही गावाबद्दल, शहराबद्दल किंवा माणसांबद्दल द्वेष पसरू नये म्हणूनच वायरस किंवा आजाराला नाव देताना भरपूर काळजी घ्यावी लागते. ही काळजी घेण्याची जबाबदारीही आपल्या सगळ्यांची आहे, हे विसरून चालणार नाही.
हेही वाचा :
युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही