टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट

१५ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज १५ मे, जागतिक कुटुंब दिन. कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपला आधार, आपल्या हक्काची माणसं. आपण आपल्या कुटुंबासाठी मेहतीने नोकरी करत असतो. पण देशाची आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीमुळे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कधी आपली नोकरी जाईल सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो हे टू डेज वन नाईट या सिनेमात सांगितलंय.

देशाच्या आणि कुटुंबाच्या विकासात शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षणामुळे परिस्थिती बदलते ही गोष्ट समजातल्या प्रत्येक स्तरात पोचली. त्यामुळे शिक्षण घेऊन करिअर घडवण्यावर लोक भर देऊ लागले. यात कुटुंबानेही प्रोत्साहन दिलं. अगदी कर्ज काढून शिक्षण घेऊ लागले. कालांतराने समजलं की कुटुंबाच्या परिस्थितीत काहीच बदल होत नाहीय. कारण देशात आलेल्या आर्थिक मंदीमुळे कंपन्या बंद पडतायत, तर कॉस्ट कटिंग म्हणून लोकांना कामावरुन कमी केलं जातंय, रिकाम्या जागा भरल्या जात नाहीत. 

भारतानं बेरोजगारीत विक्रम केला

अशावेळी शिक्षण घेऊन करिअर करून कुटुंबाला बदलवण्याची स्वप्न बघणाऱ्यांची स्वप्नंच धुळीला मिळाली आहेत. यामुळे सगळ्या कुटुंबाची वाताहत होतेय. त्यातच भारतातल्या बेरोजगारांचा आकडा एप्रिल २०१९ मधे ७.६ टक्क्यांवर पोचला. गेल्या तीन वर्षातला हा सर्वाधिक आकडा आहे, असं सीएमआयई म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी या सरकारी संस्थेनं म्हटलंय.

कृषी क्षेत्राची झालेली वाताहत आणि वाढती बेरोजगारी या भारतासारख्या विकसनशील देशाच्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत. म्हणूनच की काय बेरोजगारीचे हे आकडे काही काळ लोकांसमोर आणले जात नव्हते. म्हणे सरकारला त्याची पुन्हा पडताळणी करायची होती. देशात दर पाच वर्षांनी बेरोजगारीचा हा आकडा जारी करण्यात येतो. यातून आपल्या अर्थव्यवस्थेची नक्की काय स्थिती आहे हे समजतं. सरकार हे आकडे जारी करण्यास उत्सुक नव्हतं.

गेल्या डिसेंबर महिन्यात बेरोजगारीचा डेटा लिक झाला. यात २०१७-१८ या कालावधीत बेरोजगारी वाढली. तिने ४५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला अशी माहिती हाती लागली. सीएमआयईनं याला पुष्टी दिली.

नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढलीय. हे मान्य करायलाच हवं. ११ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्यात ही थोडी थोडकी गोष्ट नाही. यापुढे सरकार दरवर्षी बेरोजगारीचा आकडा जारी करेल असं म्हटलं जातंय. जे सरकार भारताच्या संस्कृतीचं, कुटुंब व्यवस्थेचं गुणगान अख्ख्या जगात जाऊन गात असतं. त्यांच्या धोरणांमुळे कुटुंबाचे हाल होताहेत.

हेही वाचा : लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

जगातल्या बेरोजगारांच्या गोष्टीवरचा सिनेमा

२००९-२०१० ला अमेरिका आणि युरोपीयन देशांमधे जी मंदी आली त्यातून बेरोजगारीनं कुटुंबांची कशी वाताहत होतेय हे जगानं पाहिलंय. तिच परिस्थिती भारतावर येणार असं चित्र तयार झालंय. बेरोजगारीचा कुटुंब या युनिटवर प्रचंड परिणाम होतो. ते उद्धवस्त होऊन जातं. यातून त्या देशाची आर्थिक परिस्थिती समजते आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज येतो.

बेरोजगार कुटुंबाची ही जागतिक गोष्ट समजून घ्यायची असेल तर २०१४ ला आलेला टू डेज वन नाईट हा सिनेमा बघायला हवा. ल्युक आणि जाँ पेअर डॉरडेन या दिग्दर्शक जोडीचा हा सिनेमा. जागतिक स्तरावरच्या बेरोजगारीची खरी परिस्थिती दाखवतो. यातलं कुटुंब हे जगातल्या मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व करतं. छोट्या गोष्टीतून जागतिक आशय मांडणं ही डॉरडेन बंधुंची खासियत आहे. टू डेज वन नाईट या सिनेमानं त्यांनी ते पुन्हा एकदा दाखवून दिलं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

 

नोकरी वाचवण्यासाठी भीक मागावी लागते

नोकरी संदर्भात सततची अस्थिरता असल्यानं त्याचा मानसिक त्रास होणं साहजिक आहे. त्यातून डिप्रेशन, हायपर टेंशन, निद्रानाश सारख्या आजारांना निमंत्रण मिळतं. आणि हेच सर्व घरच्या बाईबाबतीत घडत असेल तर कुटुंबाची पार वाट लागते. यातून उभं राहण्यासाठी खंबीर आणि सतत धीर देणाऱ्या पार्टनरची गरज असते. या सिनेमातल्या मुख्य पात्र असलेल्या सांड्राकडे हे सर्व आहे. पण तरीही ती या आजारांची शिकार बनते. याला आसपासचा अस्वस्थ स्थिती जबाबदार असते.

एका छोट्या कारखान्यात काम करणाऱ्या सांड्राची नोकरी वाचवायची असेल तर तिच्या इतर १० सहकारी कामगारांनी आपला बोनस घेऊ नये, असा साधा सोपा मार्ग मॅनेजमेंट सुचवतं. ५० टक्क्यापेक्षा जास्त सहकाऱ्यांनी संमती दिली तरच सांड्राची नोकरी वाचणार. त्यामुळे या सर्व सहकाऱ्यांकडे तुम्ही बोनस न घेतल्यास माझी नोकरी वाचेल अशी भीक मागण्यासारखी परिस्थिती तिच्यावर येते. आपलं डिप्रेशन सांभाळून ती या लोकांना कशी कनविन्स करण्याचा प्रयत्नी करते, तिची नोकरी वाचते की नाही यावर हा सिनेमा आहे.

मध्यमवर्गीय कामगार वर्गाच्या मानसिकतेवर हा सिनेमा नेमकं बोट ठेवतो. यातून कामगारांची दशा आणि दिशा काय आहे हे समजतं. मानवी भावना, आशा आकांक्षाचे अनेक कांगोरे आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतात. जगातल्या सर्व कामगारांनी एकत्र यावं हे सर्व कागदावर बोलायला ठीक आहे पण प्रत्यक्षात तसं काही घडतंय का याचा विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे.

हेही वाचा : कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

मंदिरं, पुतळे महत्त्वाचे की बेरोजगारी?

परदेशात ही परिस्थिती असेल तर मग भारतात वाढणाऱ्या बेरोजगारीनं काय होईल, याची कल्पना करवत नाही. ही बेरोजगारी अशीच वाढत राहिली तर इथली माणसं झोंबी होतील अशी भीती वाटते. याचं कारण आपल्याकडची लोकसंख्या आणि एकूणच उद्योग धंद्याचं शहराकडे झालेलं विकेंद्रीकरण हा भाग अजूनही विचारात घेतला जात नाही. 

पुढच्या काळात पुन्हा एन चंद्रा यांच्या १९८६ मधल्या अंकूश सिनेमातले सुशिक्षित बेरोजगार नाक्यानाक्यावर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढतं शहरीकरण आणि परंपरागत शेतीला दिलेली बगल यातून अनपेक्षित असं उद्धवस्त भारताचं दृश्यं दिसायला लागलंय.

जाहीरनाम्यात शेकडो करोडो रुपयांची मंदिरं आणि पुतळे बनवण्याची घोषणा करणाऱ्या राजकीय पक्षांनी बेरोजगारीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. तसं घडलं नाही तर समाजातली अराजकता आणि अस्वस्थता वाढणार हे पक्कं आहे. आणि यामुळे कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त होतील. कुटुंब हा भारतीय समाजाचा पाया समजला जातो. तोच पाया निघून गेला तर काय?

हेही वाचा : 

विमान कंपन्यांना भवितव्य नाही : वॉरेन बफे

बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल

अधिक चांगल्या जगाच्या निर्मितीसाठी क्रिकेटने मदत केली तेव्हा,

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती खाण्याची अक्कल कुठून येते?

अमेरिकेत लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्पचा पाठिंबा का?

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज

१९९१ मधे भारताला कर्जही मिळत नव्हतं, पण आजचा भारत त्या संकटातून उभा झालाय