कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

०७ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


माणूस वेंटिलेटरवर आहे म्हणजे तो गेलाच, असं अनेकांना वाटतं. पण वेंटिलेटर हे दररोज हजारो रुग्णांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढतं. कोरोनात श्वसनसंस्थाच कुचकामी होत असल्याने वेंटिलेटर आणखी महत्त्वाचे ठरू लागलेत. त्यामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी वेंटिलेटरची निर्मिती जोरात केली जातेय. पण वेंटिलेटरमुळे कोरोनाच्या किती पेशंटचा जीव वाचू शकतो?

वेंटिलेटरचा तुटवडा कोविड १९ च्या पेशंटच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळं जगभरातल्या आरोग्य संस्था त्यांच्या हॉस्पिटलमधे जास्तीत जास्त वेंटिलेटर तातडीनं उपलब्ध व्हावेत यासाठी शक्य ती पावलं उचलत आहेत. कोविड १९चा संसर्ग सरळ माणसाच्या श्वसनसंस्थेवर हल्ला चढवतो. काही कारणानं परिस्थिती गंभीर झाली आणि त्यावेळी वेंटिलेटर उपलब्ध नसेल तर पेशंट दगावू शकतो.

वेंटिलेटर कसं काम करतं?

वेंटिलेटर हे एक असं वैद्यकीय उपकरण आहे जे पेशंटना श्वासोच्छवास घ्यायला मदत करतं. हॉस्पिटलमधे ऑपरेशन सुरू असताना किंवा पेशंट बेशुद्ध असताना तो स्वःतहून श्वास घेऊ शकत नाही. मग अशा वेळी वेंटिलेटरमधून त्याच्या श्वसनाची प्रक्रिया सुरू ठेवावी लागते. यामधून पेशंटच्या फुफ्फुसात ऑक्सिजन पोचवला जातो आणि धोकादायक कार्बन डाय ऑक्साईड म्हणजेच सीओटू शरीराबाहेर काढला जातो.

काही कारणानं फुफ्फुसाला सूज आली किंवा संसर्ग झाला, तर त्यात पाणी भरल्यास फुफ्फसं पूर्ण क्षमतेनं काम करू शकत नाहीत. मग श्वासोच्छवास घ्यायला अडचण निर्माण होते. अशा वेळी शरीरात ऑक्सिजनची लेवल कमी होऊन कार्बन डाय ऑक्साईडचं प्रमाण वाढतं. ही स्थिती हृदय आणि मेंदूसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळं पेशंटचा मृत्यू होवू शकतो. अशा वेळी वेंटिलेटरमधून कृत्रिम श्वासोच्छवास देऊन पेशंटचा जीव वाचवावा लागतो.

वेंटिलेटरच्या ट्यूबचं एक टोक पेशंटच्या तोंडावाटे फुफ्फुसात घातलं जातं आणि दुसरं टोक बाहेर पंप मशिनला जोडलं जातं. याला इनट्युबेशन प्रक्रिया म्हणतात. पेशंटच्या श्वासोच्छवासाचा दर आणि फुफ्फुसाची क्षमता लक्षात घेवून डॉक्टर त्या पंप मशिनमधून पेशंटच्या फुफ्फुसात किती प्रमाणात ऑक्सिजन सोडायचा हे ठरवतात.

सर्वसाधारणपणे मनुष्य दर मिनिटाला १५ वेळा श्वासोच्छवास करतो. हा दर मिनिटाला २८ इतका वाढला तर रेस्पिरेटरी फेल्युअरचा धोका वाढतो. अशा वेळी पेशंटला वेंटिलेटरवर ठेवणं आवश्यक ठरतं.

द प्रिंट वेबपोर्टलचे मुख्य संपादक शेखर गुप्ता हे `कट द क्लटर` या युट्यूब वीडियोत सांगतात, `भारतात अस्वच्छ हवा, प्रदुषण, सिगारेट आणि बीडीचं व्यसन अशा अनेक कारणांमुळं न्युमोनिया हा श्वसनाचा आजार होऊन दरवर्षी जवळपास दोन लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी सव्वा लाख म़ृत्यू हे पाच वर्षाखालच्या बालकांचे असतात. त्यांच्यावर उपचार करताना आपल्याकडील वेंटिलेटर अपुरी पडतात. ही मृत्यूची संख्या कमी करायची असेल, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात वेंटिलेटरची गरज आहे.`

हेही वाचाः तबलीगने भारतात कोरोना पसरण्याचा कट केलाय का?

कोरोनात वेंटिलेटर किती महत्वाचे?

कोविड १९ चं शास्त्रीय नाव SARS-CoV-2 म्हणजेच सिवीअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना वायरस २ असं आहे. याचा सोपा अर्थ श्वासोच्छवास घेण्यासाठी अडचणीचा ठरणारा वायरस. म्हणजे कोविड १९ हा सरळ मनुष्याच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. त्यामुळं फुफ्फुसाची आकुंचन आणि प्रसरण पावण्याची क्षमता कमी होते. परिणामी श्वासोच्छवास घ्यायला अडचण होते.

गार्डियन वृत्तपत्राच्या एका बातमीनुसार, `कोविड १९ची लागण झालेल्यांपैकी केवळ ६ टक्के लोकांना उपचाराची गरज असते. बाकीचे लोक नुसती योग्य ती काळजी घेतल्यानं बरं होतात. या ६ टक्क्यांतल्या खूप कमी लोकांना वेंटिलेटरवर ठेवायची गरज पडू शकते. त्यात वयोवृद्ध लोक आणि आधीपासून ज्यांना श्वसनासंबंधीचा आजार असल्यास अशांना वेंटिलेटरवर ठेवणं अत्यावश्यक बनतं. वेंटिलेटरनं पेशंट शंभर टक्के बरा होतो, असं नाही. पण त्याच्या मृत्यूची शक्यता कमी होते.`

देश आणि राज्यात वेंटिलेटर किती?

बीबीसीच्या एका बातमीनुसार, भारतात सध्या ४८ हजार वेंटिलेटर आहेत. तर महाराष्ट्रात ३३६३ वेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यापैकी मुंबईत ८०० वेंटिलेटर आहेत. सध्याचा विचार करता ही संख्या पुरेशी आहे. पण पुढं जाऊन कोविड १९च्या पेशंटची संख्या वाढली, तर मात्र मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

केंद्र सरकारनं वेंटिलेटर आणि इतर अत्यावश्यक आरोग्य सेवांसाठी १५ हजार कोटींची तरतूद याआधीच केलीय. वेंटिलेटरची संख्या वाढवण्यासाठी सार्वजनिक कंपन्या, औद्योगिक संस्था आणि स्टार्टअप कंपन्यांच्या माध्यमातून सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केलेत. पुण्यातल्या नोक्का रोबोटिक्स या कंपनीनं स्वस्तात वेंटिलेटर बनवण्याचं काम सुरू केलंय. मारूती सुझुकीने एजीवीए या हेल्थ केअर कंपनीशी करार केलाय. ते आता दर महिन्याला दहा हजार वेंटिलेटर तयार करणार आहेत.

केंद्रीय आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी २७ मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती. ते म्हणाले, `भेल म्हणजेच भारत हेवी ईलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि आणखी एका सरकारी कंपनीच्या माध्यमातून जूनपर्यंत ४० हजार वेंटिलेटर तयार केले जातील. इस्त्रोनंही आपल्या रॉकेट आणि सॅटेलाईट लॉन्च उपक्रमांना काही काळ स्थगिती देऊन वेंटिलेटरची निर्मिती करायचं ठरवलंय. डीआरडीओ या संरक्षण क्षेत्रातल्या संस्थेनं महिंद्रा आणि टाटा ग्रुपसोबत एक करार करून एकाच वेळी अनेक पेशंटवर उपचार करता येईल असं ‘मल्टी पेशंट वेंटिलेटर’ तयार करण्यावर भर दिलाय.`

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

जगभरात वेंटिलेटरची निर्मिती जोरात

जगभर कोविड १९च्या पेशंटची संख्या झपाट्यानं वाढतेय. ही वाढ कायम राहिली तर सध्या उपलब्ध असलेल्या वेंटिलेटरची संख्या अपुरी पडणार, हे निश्चित. हे टाळण्यासाठी जगभरात वेंटिलेटरची निर्मीती जोरात सुरू आहे.

बीबीसीच्या एका व़ृत्तानुसार, `ब्रिटनने त्यांच्या देशातील इंजिनिअरिंग कंपन्यांना बाकीची कामं तात्पुरती बाजूला सारून वेंटिलेटरची निर्मीती करण्याचं आवाहन केलंय. जर्मनीतही फियाट, निस्सान, मर्सिडीस, जीएम अशा विविध मोटार बनवणाऱ्या कंपन्यांनी वेंटिलेटर निर्मितीत शक्य तितकी मदत करण्याचं आश्वासन त्यांच्या सरकारला दिलंय. अमेरिकेनंही जर्मनीतील विविध कंपन्यांना एक लाख वेंटिलेटर तयार करण्याची ऑर्डर दिलीय.

पण किती पेशंट बरे होतात?

इतर कोणताही आजारात लाईफ सपोर्टचं काम करणाऱ्या वेंटिलेटरचा कोविड १९ च्या बाबतीत मात्र थोटा वेगळा अनुभव येतोय. लंडनमधील इंटेंसिव केअर नॅशनल ऑडिट अँड रिसर्च सेंटरनं याबाबत एक संशोधन केलंय. त्यात असं दिसून आलंय की, ब्रिटनमधे वेंटिलेटरवर असलेल्या ९८ पैकी ६५ पेशंटचा मृत्यू झालाय. वुहानमधे वेंटिलेटरवरील २२ पैकी केवळ ३ पेशंट जगले. आणि अमेरिकेत वेंटिलेटरवर असणारे १८ पैकी ६ पेशंट बरे झालेत.

अमेरिका, चीन आणि युरोपातल्या लहान लहान अभ्यासावरुन असंही दिसून आलंय की, वेंटिलेटरवरील बहुतांश पेशंटचा मृत्यू झालाय. वेंटिलेटरमुळं काही पेशंटच्या फुफ्फुसात संसर्ग होत असल्याचंही समोर आलंय.

वॉशिंग्टन पोस्टमधे आलेल्या एका बातमीनुसार, चीनमधल्या एका रिसर्च पेपरमधे कोविड १९ च्या ७१० पेशंटचा अभ्यास करण्यात आला. त्यात वेंटिलेटरवर ठेवावं लागलेले २२ पैकी १९ पेशंट दगावले. वेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंटचा मृत्यूचा हा दर ८६ टक्के इतका होता. त्याआधी वेंटिलेटरवरील ३२ पैकी ३१ पेशंटचा मृत्यू झाला होता.

याआधीच संशोधन असं सांगताय की, कोविड १९ च्या पेशंटला एकदा का वेंटिलेटरवर ठेवलं की त्यातून बाहेर येण्यासाठी काही आठवडे जाण्याची शक्यता असते. वेंटिलेटरवरचा हा काळ वाढला तर पेशंट दगावण्याच्या शक्यता वाढतात. कोविड १९ च्या केसमधे पेशंटला आपण वेंटिलेटरवर कमी कालावधीसाठी जिवंत ठेवू शकतो, पण त्याच्या जगण्याची खात्री देऊ शकत नाही. म्हणजे, कोरोनाच्या बाबतीत वेंटिलेटर काही काळ जीव वाचवू शकतो पण त्यावरील रामबाण उपाय मात्र होऊ शकत नाही.

जगायचं असेल तर काळजी घ्या

पेशंटची संख्या अशीच वाढत राहिली तर येत्या एक दोन महिन्यांत जगभरात आणि भारतात वेंटिलेटरचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर कोविड १९ च्या संसर्गाला सुरवातीच्या टप्प्यावरच थांबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन आणि वैयक्तिक स्वच्छता राखणं या गोष्टी महत्वाची भूमिका बजावू शकतात.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या एका बातमीनुसार, इटलीत कोणाला जगवायचं आणि कोणाला मारायचं हे आता वेंटिलेटरच्या उपलब्धतेवरून डॉक्टर ठरवतात. एका बाजूला वेंटिलेटरची शक्य तितक्या लवकर मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि दुसऱ्या बाजूला सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी पाळल्या नाहीत तर इटलीसारखी परिस्थिती भारतातही यायला वेळ लागणार नाही.

हेही वाचाः 

आपल्याला हात धुवायला शिकवणाऱ्या या दोघींना बिग थँक्यू

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?

पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?

१५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो