फरीद झकेरिया सांगतात, लॉकडाऊनची संधी न हेरल्यास भारताचा अमेरिका होईल

२३ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारतात लॉकडाऊनचा निर्णय खूप घाईघाईत झाला. तयारीसाठी लोकांना वेळही मिळाला नाही. आता मात्र या लॉकडाऊनच्या काळात सरकारनं अधिकाधिक लोकांच्या टेस्ट करायला हव्या होत्या. तसं झालं नाही तर भारताची परिस्थिती अमेरिकेसारखी होऊ शकते, अशी भीती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत्रकार फरीद झकेरिया यांना वाटते.

फरीद झकेरिया हे पत्रकार असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची विशेष ख्याती आहे. सीएनएन वर्ल्डवाइड या अमेरिकेतल्या न्यूज चॅनेलसाठी ते 'फरीद झकेरिया जीपीएस' नावाचा कार्यक्रम करतात. या कार्यक्रमात ते जगभरातल्या घडामोडी आणि आंतराष्ट्रीय संबंधांचं विश्लेषण करत असतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती त्यांनी घेतल्यात. येल, हार्वर्ड सारख्या प्रतिष्ठित युनिवर्सिटीमधून त्यांचं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालंय. महाराष्ट्राचे माजी नगरविकास मंत्री आणि काँग्रेस नेते रफीक झकेरिया यांचे ते चिरंजीव आहेत.

इन डिफेन्स ऑफ ए लिबरल एज्युकेशन' 'द पोस्ट अमेरिकन वर्ल्ड' आणि वेगवेगळ्या देशांतल्या उदारमतवादी लोकशाहींचा अभ्यास असलेलं 'द फ्यूचर ऑफ फ्रीडम' अशा बेस्टसेलर पुस्तकांचे ते लेखक आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या घडामोडींचा विचार करताना त्यांची मांडणी अतिशय महत्त्वाची ठरते. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या घडामोडींवर फरीद झकेरिया काय सांगतात याकडे साऱ्या जगाचं लक्ष असतं.

आत्ता कोरोनाच्या निमित्तानंही टेड टॉक्स या युट्युब चॅनेलवर क्रिस अँडरसन यांनी झकेरिया यांची मुलाखत घेतलीय. कोरोना वायरसमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून आपण कसं सावरू शकतो आणि त्यासाठी काय करायला हवं, पुढचं जग कसं असेल याचं विश्लेषण झकेरिया यांनी यावेळी केलं. त्यांच्या मूळ इंग्रजी मुलाखतीतले काही महत्त्वाचे मुद्दे.

१) राष्ट्रवादाचं पीक वाढक जाणार

कोरोनाचं संकट हे अधिक नाट्यमय, जास्त जागतिक आहे. गेल्या कित्येक वर्षांत आपण असं संकट पाहिलेलं नाही. आरोग्य आणीबाणी आलीय. साथरोगाचा प्रसार जगभरात झालाय. त्यात किती लोकांचा मृत्यू होणार आणि त्याचे परिणाम काय होणारेत याबद्दल सध्या काहीच माहीत नाहीय. त्यातच एक आर्थिक संकट आपल्यापुढे उभं ठाकलंय. हे संकट काळानुसार अधिकाधिक तीव्र होत जाईल.

या आर्थिक संकटाला फक्त मंदी म्हणणं योग्य नाही. किंवा याला नुसतं अर्थव्यवस्थेतली उदासिनता असंही म्हणता येणार नाही. कारण जागतिक अर्थव्यवस्थेच्या एका मोठ्या भागाला जबरदस्त झटका बसणार आहे. कारण मला वाटतं मानवी इतिहासात जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था बंद पडण्याइतकी परिस्थिती आत्ता पहिल्यांदाच आलीय. या अर्थव्यवस्थांनी अक्षरशः काम करणंच थांबलंय. दोन माणसं एकमेकांशी संवाद करत नसल्यानं, कुठलाही व्यवहार करता येत नाही. त्यामुळे आर्थिक विनिमयाचं मूलभुत तत्त्वच पूर्ण होत नाहीय.

याचे सर्वाधिक परिणाम गरीब देशांवर होताना दिसतील. आत्तापर्यंत श्रीमंत देशांत काय चाललंय याविषयीच आपण बोलतोय. पण भारतासारख्या देशांचं काय? या देशांत लोकांच्या हातात पैसा नाही. बजेटमधे आरोग्य व्यवस्थेवर पैसा खर्च केला जात नाही. शिवाय, इथली लोकसंख्या प्रमाणाच्या बाहेर आहे. मुंबई, कलकत्ता किंवा आफ्रिकेतल्या नैरोबी यासारख्या ठिकाणी झोपडपट्ट्यांमधे अनेक लोक दाटीवाटीने राहतात.

आता या परिस्थितीला पॉलिटिकल फोडणी दिली जाईल आणि प्रत्येक माणसाला अधिक राष्ट्रवादी बनवण्याचं काम पूर्ण होईल. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे युरोपियन युनियन. पूर्वी युरोपियन युनियनमधे येणाऱ्या देशातल्या नागरिकांना इयूमधल्या इतर देशांत मुक्तपणे संचार करता यायचा. पण कोरोना आल्यावर या तथाकथित सीमामुक्त देशांनी इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सीमा आवळल्यात. इटलीने इयूकडे मदत मागितली, तेव्हा २६ युरोपियन देशांमधल्या एकाही देशानं बंधुभाव म्हणून मदतीची तयारी दर्शवली नाही.

हेही वाचा : राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

२) अर्थव्यवस्था रिस्टार्ट करणं सोप्पं नाही

कोरोनानं आपल्याला मोठा शॉक दिलाय हे खरंय. त्यातूनही काहीच दिवसांत जग पूर्ववत होईल, असं कल्पनाचित्र काही लोक रंगवत आहेत. जग पूर्ववत होईल की नाही हे कोरोनाने दिलेला हा शॉक किती काळ टिकेल यावर अवलंबून आहे. पण आत्तापर्यंत मिळालेली माहिती पाहता जग काही अंशी पूर्ववत होईल अशी आशा वाटते.

असं असलं तरी जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणं फार अवघड आहे. आधुनिक अर्थव्यवस्था म्हणजे सायकल चालवण्यासारखं आहे. आपण सायकल चालवत राहिलो तरच ती पुढे पुढे जात राहते. पण ही अर्थव्यवस्थेची सायकल एखाद्या ठिकाणी थांबली तर पुन्हा त्याच ठिकाणावरून तुम्हाला पुढं जाता येत नाही. हा सापशिडीचा खेळ आहे. परत पहिल्यापासूनच सुरू करावं लागतं. एकाचवेळी मागणी आणि पुरवठा थांबल्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा चालू करणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही.

३) माणसं एकत्र येतच राहतील

थोडक्यात काय तर, लॉकडाऊनचा काळ कमी राहिला तर आपण आपली अर्थव्यवस्था सावरू शकू. त्यातही हॉटेल, प्रवास, स्पोर्ट्स अशा क्षेत्रांना बाहेर यायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागेल. आपल्याला कोरोना वायरसवर लस सापडली तर गोष्टी कदाचित सोप्या होतील.

शंभर वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लू या साथरोगाने अनेकांचे जीव घेतले होते. कोरोना वायरसच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त होतं. पण तेव्हा हॉटेल, थिएटर वगैरे गोष्टी कायमच्या बंद करायची वेळ आली नव्हती. तर आत्ताही तशी येणार नाही.

आता लोक हॉटेल्स आणि थिएटर्स वगैरे गोष्टी नसलेल्या जगाचा विचार करताहेत. अशा लोकांना पुन्हा कधी माणसांना एकत्र भेटता येणार नाही, असं वाटतंय. पण इतक्या टोकाचं काहीही होणार नाही, असं मला वाटतं. कारण एकत्र जमणं, राहणं हा माणसाचा स्थायीभाव आहे

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

४) पुन्हा नवी असमानता

जगातले अनेक लोक डिजिटल अर्थव्यवस्थेत वावरतात. म्हणजे त्यांचं सगळं काम इंटरनेट आणि कम्युटरवर अवलंबून असतं. ही कामं ते घरात बसूनही करू शकतात. त्यामुळे लॉकडाऊन असला तरी त्याची नोकरी गेलेली नाही. पण हातावर पोट असणाऱ्या, कष्टाची कामं करणाऱ्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातायत. कामाचं डिजिटलायझेशन होऊ शकत नाही, असा मोठा वर्ग इथं आहे.

यामुळे समाजात एक वेगळ्या प्रकारची असमानता तयार होणार आहे. डिजिटल अर्थव्यस्था आणि मटेरियल अर्थव्यवस्था यांच्यातली ही अर्थव्यवस्था असणार आहे. ज्ञानाचं काम करणारे आणि कष्टाचं काम करणारे यांच्यातली ही असमानता आहे. जुन्या इतिहासाप्रमाणेच इथं पुन्हा ज्ञानाचं काम करणाऱ्यांना किंमत मिळेल, त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील. आणि हातावर पोट असणाऱ्यांची पुन्हा फरफट होईल.

पण हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे. आपण भाजीपाला ऑनलाईन मागवतो की गल्लीतल्या कोपऱ्यावर बसलेल्या बाईकडे जाऊन विकत घेतो हा आपला निर्णय असेल, आणि त्यावर ही अर्थव्यवस्था उभारेल.

५) तर भारताची अमेरिका होईल

भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती झालीय. एकीकडे वायरस येतोय. नागरिकांना त्याची लागण होतीय तर दुसरीकडे हातावर पोट असणारे लाखो लोक भुकेनं तडफडतायत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागी असलो असतो तर माझी फार बिकट अवस्था झाली असती. कोरोना वायरस संक्रमणाच्या बाबतीत भारत खूप प्राथमिक अवस्थेत होता. त्यांनी वेळीच आक्रमक पावलं उचलली असती तर कोरोनावर सहज मात करता आली असती.

भारतात प्रत्येक माणसामागे असणारी दवाखान्यातल्या खाटांची संख्या खूप कमी आहे. भारतातल्या श्रीमंतांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळतात. पण भारतातल्या ग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळेच कोरोना नियंत्रणाच्या बाहेर गेला तर त्याने संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल हे भारतीयांना माहीत होतं. त्यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय योग्यच होता.

पण नरेंद्र मोदींना प्रत्येक गोष्ट अचानक करायची सवय आहे. लॉकडाऊनसाठी तयार व्हायला त्यांनी देशातल्या ४ बिलियन लोकांना फक्त ४ तासांचा अवधी दिला. रात्री ८ ते मध्यरात्री १२ पर्यंतचा. भारत हा ५० ते ६० मिलियन स्थलांतरीत कामगारांचा देश आहे. हे कामगार राहतात शहरात. पण त्यांची घरं या शहरापासून कित्येक तास दूर आहेत. भारतात डिजिटलायझेशनचं प्रमाणंही कमी आहे.

माझ्या मते, लॉकडाऊनची तयारी करण्यासाठी मोदींनी लोकांना तीन ते पाच दिवसांचा वेळ द्यायला हवा होता. पण शेवटी नरेंद्र मोदींच्या निर्णयावर फार टीका करून चालणार नाही. त्यांनी केलं ते कोरोनाला हरवायचं या एकाच उद्देशाने केलं. आता या लॉकडाऊनच्या तीन आठवड्यांमधे त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून त्यांच्या कोरोना तपासण्या करायला हव्या होत्या. तसं झालं नसेल तर भारताची परिस्थिती अमेरिकेसारखी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

६) अमेरिकेचं काय चुकलं?

अमेरिकेची अशी परिस्थिती का झाली याचं कारण शोधताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करावीच लागेल. ट्रम्प यांचा विज्ञानावर विश्वास नाही. तज्ञांची मतं त्यांना पटत नाहीत. स्टॉक मार्केट ही एकच गोष्ट त्यांच्या केंद्रस्थानी असते आणि ते पडू नये म्हणून त्यांची धडपड चाललेली असते.

वाईट बातमी पचवायची ताकद त्यांच्यात नाही. पण फक्त त्यांच्याकडे बोट करून चालणार नाही. मीडियाशी बोलताना सुरवातीला फार चिंता करण्याची काहीही गरज नाही असं त्यांचे सल्लागार डॉ. अँथनी फौसी म्हणाले होते.

मुळातच, हा चीनकडून आलेला वायरस आहे आणि त्यामुळे तो चीनपर्यंतच मर्यादीत राहिल, असं अमेरिकेला वाटत होतं. म्हणून ड्रम्प यांनी सुरवातीला चीनमधून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली. पण त्यासोबत त्यांनी देशात आधीच आलेल्या लोकांच्या तपासण्या चालू करायला हव्या होत्या.

७) आतातरी आपण धडा घेणार का?

आतातरी या सगळ्यांतून आपण काहीएक आपण धडा घ्यायला हवा. मायकल गोव हे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत. ब्रेक्सझिट कॅम्पेनदरम्यान इंग्लंडमधल्या जनतेकडे भरपूर तज्ञ आहेत. मायकल गोव आजारी पडल्यावर काय करतात? तेव्हा ते एखाद्य गुरूकडे वगैरे गेले नसतील. तर तज्ञांकडे, डॉक्टरांकडेच गेले असतील. अशावेळी माणसं त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ, प्रशिक्षित व्यक्तींकडे जातात.

कोविड १९ चा सामना करायचा तर आपल्यालाही तज्ञांची आवश्यकता आहे. आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. विज्ञान आणि शास्त्रज्ञ यांच्यावर विश्वास असेल तरच आपल्याला माहिती अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकते.

आपण काय करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अमेरिकेतली आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याचं लक्षात आलंय. किती बेड आहेत, किती वेंटिलेटर आहेत याबद्दलची माहिती नाही. अमेरिकेच्या प्रतिमेला हा एकप्रकारचा झटका आहे. तिथली अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान सगळ्यात चांगलं आहे. पण तरीही लोकांकडे माहितीचा अभाव आहे. इटली, जर्मनी, चीन, कोरिया आणि अमेरिकेसाठी आताचा काळ मोठा हानिकारक आहे. हा काळ एकजुटीचा आहे.

कोरोना वायरस कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. ना संपत्ती, ना रंग, ना त्वचा. त्याच्यासमोर सगळे समान आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांना आपण एकत्र आणू शकलो तरच आपण कोरोनावर औषध शोधू शकू. योग्य उपचारही करू शकू. हे एक जागतिक आव्हान आहे. त्यासाठी तशाच प्रतिक्रियांची आवश्यकता आहे.

आपली सुरक्षा, तब्येत याबाबत आपण संकुचित विचार करतोय. आताच्या झटक्यामुळे आपल्याला या सगळ्याची जाणीव व्हायला हवी. अमेरिकेचं दरवर्षीचं संरक्षण बजेट ७०० बिलियन डॉलर इतकं आहे. पण सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मास्क नाहीत. वेंटिलेटर नाहीत. आतातरी आपण आपल्या प्राथमिकता कोणत्या याचा विचार करायला हवा.

हेही वाचा : 

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

पाचवीला पुजलेल्या प्लेग लॉकडाऊनमुळेच जगाला शेक्सपिअर मिळाला!

पालघर झुंडबळी सत्य कळण्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत

५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट