किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे

०४ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


जागतिकीकरणाच्या रेट्यात शेतीच्या पायावर उभी असलेली जीवनशैली निश्चित मरणार आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही, असं भीती ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केली. २०१९ चा आकाशदीप सन्मान स्वीकारताना ते बोलत होते. नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांना हात घातला.

‘अमर उजाला’ वृत्तपत्र समूहाने शनिवारी २८ जानेवारीला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे आणि हिंदीतले ज्येष्ठ कथाकार ज्ञानरंजन यांना २०१९ चा आकाशदीप सन्मान देऊन कविश्रेष्ठ गुलजार यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी भाषण केलं. भालचंद्र नेमाडे यांच्या भाषणाचं शब्दांकन करून पत्रकार सुनील चव्हाण यांनी आपल्या फेसबूक पेजवर पोस्ट केलंय. नेमाडे यांच्या भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे.

भारतीय भाषा एकसारख्याच विचार करतात

माझ्यासाठी ही अत्यंत सुखद घटना आहे की अमर उजाला परिवार भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या भाषांमधल्या साहित्यिकांचा सन्मान करून एक आदर्श प्रस्थापित करीत आहे. भाषावार प्रांतरचनेमुळे बंदिस्त झालेल्या भाषा खुल्या होण्याची ही कृती आहे. मला हिंदी कधीच परकी भाषा वाटली नाही. आपण हिंदी बोलतो तेव्हा ६० टक्के शब्द मराठीच असतात. माझ्या साहित्याची सर्वाधिक भाषांतरं हिंदीत आणि त्या खालोखाल कन्नड भाषेत झालीत.

१९६० च्या सुमारास मी मराठी लघुपत्रिका लिटिल मॅगझिनमधून लेखनाला प्रारंभ केला. या काळात हिंदीतही लघुपत्रिका जोरात होत्या. त्यातही माझ्या साहित्याचे अनुवाद होत होते. आवेश, लहर, गवाह, आश्वस्त, पल, प्रतिपल आणि नंतर पूर्वाग्रह, आलोचना, बहुवचन, समीक्षा इत्यादी. तेव्हापासून हिंदी वाचकांशी माझी दोस्ती पक्की झालीय. हिंदी असो, मराठी असो, सर्व भारतीय भाषांची मध्यमा अर्थात विचार करण्याची शक्ती एकसारखी असते.

हेही वाचा: फुले दांपत्याचं काम फक्त स्त्री शिक्षणापुरतंच आहे?

साहित्यनिर्मिती सुखद तितकीच वेदनादायी

मराठीतले संत नामदेव, तुकारामांपासून विनोबा भावे, गजानन माधव मुक्तिबोध यांच्यापर्यंत मोठमोठ्या साहित्यिकांनी हिंदी ही आपलीच भाषा मानली आहे. संत तुलसीदास आणि संत एकनाथ काशीमधे एकाच पाठशाळेत शिकत होते. आणि दोघांनीही नंतर लोकप्रिय रामायणं लिहिली. माझ्या पुढच्या कादंबरीत हे दोघं होस्टेलमधे एकमेकांच्या कशा खोड्या काढतात, याच्यावर एक उतारा आहे. ‘तुला काही येत नाही रामायण, मला येतं’, असं दोघंही एकमेकांना म्हणत होते.

माझ्या एका विद्यार्थ्याला पीएच.डी. साठी एकनाथ आणि तुलसीदास यांच्या रामायणातलं साम्य शोधण्याचं काम मी दिलं होतं. साहित्यनिर्मिती ही अत्यंत झपाटणारी सुखद क्रिया आहे. पण ती तितकीच वेदनादायीदेखील आहे. बाळंतपणासारखी! लिहिताना मी एक स्त्री, माता होण्याचा अनुभव घेतो. आम्हा पुरुषांच्या वांझ जीवनात सृजनाची वेदना, जन्म देतानाच्या वेदना अनुभवण्याचा कुठलाही योग येत नाही.

जगण्याची विविधता ही समाजातल्या खालच्या स्तरात

प्रत्यक्ष लिहिताना माझ्यासमोर जो वाचक असतो तो ग्रामीण, पाहिजे त्या सोयी, सवलती न मिळणारा, कष्टाळू, असहाय तरी जगण्यावर प्रेम असणारा. थरथरत्या मनाचा, असा समाजातल्या खालच्या स्तरातला असतो. असा वाचक माझ्यासमोर नेहमी लिहिताना असतो. खालच्या स्तरावर नेहमीच ओलावा असतो. नमी असते खाली. जिवंतपणा असतो. जसंजसं उंचीवर जावं तसं वास्तव विरळ होत जातं.

कधी वातावरण ओसाड आणि खडकाळ होत जातं. कधी कधी तर बर्फही असतो पूर्ण. उंचीवर ऑक्सिजन कमी होतोच. जीवसृष्टी, वनस्पती विरळ होत जातात. खालच्या स्तरावरच वृक्षवेली, प्राणी, माणसं, त्यांच्या वस्त्या मुबलक आढळतात. इथंच जगण्याची विविधता खऱ्या अर्थाने नांदते. अशा हजारो वाचकांबरोबर मी माझा दर्द वाटून घेत आलो, ही मी माझ्या आयुष्यातली खरी कमाई समजतो. 

अगदी आपले पाकिस्तानात गेलेले महान कवी हफ़ीज़ जालंधरी म्हणतात तसंच.

दोस्तों को भी मिले दर्द की दौलत या रब
मेरा अपना ही भला हो मुझे मंज़ूर नहीं

किती भाषा मारल्या याची नोंद हवी

आम्ही नेहमी ‘बंबईया हिंदी’ बोलतो. खरं तर मुंबईची हिंदी हीच राष्ट्रभाषा व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. याचं कारण या भाषेत कोणीही कधीही चूक करू शकत नाही. अशीच राष्ट्रभाषा होणं आवश्यक आहे. खरी राष्ट्रभाषा यामुळंच ओळखली जाते. जगात कुठेही सापडणार नाही अशी भाषिक विविधता या आपल्या हिंदुस्तान उपखंडात आहे. भाषाशास्त्राचा प्राध्यापक असल्याने मी हे सांगू शकतो.

संपूर्ण भारतात १६५२ स्वतंत्र भाषा आज बोलल्या जातात. इंग्लंडमधे किती आहेत? वरच्या दोन तरी आहेत की नाही, याची मला शंका वाटते. अमेरिकेत पूर्वी ३० होत्या आता दोन, तीन उरल्या आहेत. इंग्रजी त्यातली महत्त्वाची.

माझी अशी सूचना आहे की संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या मानवाधिकार सर्वेक्षणात प्रत्येक देशात गेल्या १०० वर्षांत किती भाषा मारल्या याचा उल्लेख केला पाहिजे. १०० वर्षांपूर्वी किती भाषा बोलल्या जात होत्या आणि आज किती बोलल्या जातात, याचं एक रेकॉर्ड सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. हे कलम टाकण्यासाठी आपण सगळ्यांनी हट्ट धरला पाहिजे.

हेही वाचा: यल्लम्मा देवीची यात्रा अनुभवायलाच हवी अशी आहे

राजकीय पक्षांचं स्वभाषेवर प्रेम नाही

जगात जेवढ्या काही छोट्या, छोट्या भाषा आहेत त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असतो. ही भाषा जीवनदृष्टी उत्क्रांत होत विकसित होत असते. भाषा बोलणाऱ्यांच्या पिढ्यांनी हा दृष्टिकोन अनेक पिढ्यांपासून जोपासत आणलेला असतो. प्रत्येक भाषेतला जीवन दृष्टिकोन नाहीसा होणं बरोबर नाही. कदाचित मराठीचा चुकेल, इंग्रजीचा चुकीचा दृष्टिकोन असू शकतो पण भिल्ली भाषेचा योग्य असू शकतो. छोट्या, छोट्या गटांमधे जास्त चांगली जीवनदृष्टी असते, असं आपल्याला सिद्ध करता येईल. हे सांगताना मला लाजही वाटते.

माझ्याच देशात खेडोपाडी आदिवासी आश्रमशाळांमधेसुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचं धोरण आणि प्रस्थ दोन्ही पसरत आहे. या भाषा जगात इतर अनेक भाषांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या आहेत. उदा. आपल्या देशात भिल्ली भाषा बोलणाऱ्यांची संख्या नेदरलँड्ससारख्या देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. अशी भाषा नाहीशी होणं याचा अर्थ असे अनेक देश नाहीसे होण्यासारखं आहे. तरीही, संस्कृतीसंरक्षक म्हणवणारी सरकारंसुद्धा इंग्रजीला प्रोत्साहन देतात.

भारतीय संस्कृतीचं भांडवल करणाऱ्या पक्षांनाही स्वभाषेचं प्रेम नाही, हे आता सिद्ध झालं आहे. इंग्रजी मातृभाषा नसलेल्या जगातल्या कोणत्याही सुधारलेल्या देशात इंग्रजी वापरत नाहीत. सुधारलेल्या देशात मी म्हणतो. मागासलेल्या देशात इंग्रजी वापरतात. जर्मनी, फ्रान्स आणि इटली हे देश सोडा चीन, जपान, कोरिया अशा कुठल्याही सुधारलेल्या देशात इंग्रजीत व्यवहार होत नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानं वास्तवाचं पूर्ण ज्ञान होतं, या मताचा मी आहे. आपल्याकडे ज्ञान नाहीच. इंग्रजीतून ज्ञान मिळत नाही, मिळते फक्त माहिती.

भाषांमधून संस्कृतीचा विकास

महात्मा गांधी यांनी १९०७ मधे हिंद स्वराज पुस्तकात लिहिलं आहे की, इंग्रजी शिक्षणानं हिंदुस्थानी प्रजेला गुलाम केलं. आज २०२० पर्यंतदेखील आम्ही इंग्रजीचे गुलाम आहोत. इंग्रजी शिक्षणामुळे आपण कोणत्याच क्षेत्रात उत्तमता मिळवू शकलेलो नाही. इंग्रजी माध्यमांच्या युनिवर्सिटींमधेही नाही!

इंग्रजी भारतात येण्याआधी म्हणजे १८१८ च्या आधी म्हणजे इंग्रजांचं राज्य येण्यापूर्वी हिंदुस्थानी संस्कृती एक उच्चमूल्य असलेली संस्कृती म्हणून गणली जात होती. आज इंग्रजी शिक्षणामुळे ती एक निम्नमूल्य असलेली संस्कृती समजली जाते. एकच भूगोल, एकच इतिहास असलेल्या या उपखंडात सर्व भाषांमधून सर्वसमावेशक हिंदुस्थानी संस्कृतीची महाव्यवस्था हजारो वर्षांपासून विकसित होत आलीय.

मोठमोठ्या साहित्य परंपरा, अनेक अक्षरग्रंथ, अनेक महाकवी श्रीमंत शंकरदेव, अमीर खुसरो, तुलसीदास, कबीर, तुकाराम, मिर्झा गालिब. असे शंभर तरी! पण इंग्रजी वसाहतवादानं निर्माण केलेल्या फाळण्या, धर्मांध चळवळी, असहिष्णू मूल्ये, युद्धखोरी, राष्ट्रवाद आणि प्रवाही लवचीक जातिव्यवस्थेचं जनगणनेद्वारे म्हणजेच खानेसुमारीद्वारे कोंडवाडे तयार झाले.

शेतीवर उभी असलेली जीवनशैली मरणार

या सर्व संस्कृती विनाशक प्रवृत्तींमुळे आपल्या उपखंडाची विशाल महाव्यवस्था खंडीत होत आली आहे. अशा वसाहतवादाच्या वाताहतीनंतर आपण पुन्हा जागतिकीकरणाच्या राक्षसी यंत्रात सापडलो आहोत. जागतिकीकरण हा युरोपीय वसाहतवादाचा नवा अवतार आहे. जागतिकीकरणामुळे युरोप-अमेरिकन पद्धतीची, त्यांनाच परवडेल अशी एकाच प्रकारची आर्थिक, औद्योगिक व्यापारी जीवनशैली गरीब जगातल्या सर्व समूहांवर लादली जातेय.

शेती हा पाया असलेली जीवनशैली त्यामुळे निश्चित मरणार आहे. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या हे त्याचं उदाहरण आहे. यानंतर आपण अनेक फायद्यांचा त्याग करत सांभाळत आणलेली बहुलता आणि विविधता ही दोन मूल्यं या जागतिकीकरणाच्या लाटेत नष्ट होणार यात शंका नाही. हा विचार संकुचित आणि स्वार्थी मुळीच नाही तर तो एकूण सृष्टीतल्या विविधतेचं आणि बहुलतेचं रक्षण करणारा आहे. सर्वांच्या कल्याणाचा आहे.

हेही वाचा: 

यल्लम्मा देवीची यात्रा अनुभवायलाच हवी अशी आहे

कोकूटनूरच्या यल्लम्मा यात्रेत आजही देवदासी सोडतात का?

यल्लमाच्या भाविकांची ओढाताण सरकारला दिसत नाही का?

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

मोदी लोकशाही मार्गाने सत्तेत आलेत, त्यांना हरवण्यासाठीही तोच मार्ग वापरावा लागेल