पॅथॉलॉजीविषयी ३ : आपल्याला कॅन्सरचं निदान करून देणारं शास्त्र

०९ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


थुंकी, रक्त, लघवी इत्यादीचा वापर करून रोगाचं निदान पॅथॉलॉजीस्ट करतात. पण कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराच्या निदानासाठीही आपल्याला पॅथॉलॉजिस्टचीच मदत लागते. कॅन्सरची गाठ आलीय तिथल्या अवयवाच्या छोटा तुकड्याची तपासणी करावी लागते. यासाठी प्रचंड कौशल्य लागतं. कोरोनाच्या या काळात सर्वात जास्त मदत करणारा पॅथॉलॉजी विभाग हा किती गुंतागुंतीचा विषय असू शकतो, याची जाणीव यातून होते.

सायटोलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे काय हे आपण पाहुया. हे दोन विषय एकत्र घेण्याचं कारण ते एकमेकांना पूरक आहेत. आपलं शरीर पेशींचं बनलेलं असतं हे सगळ्यांना माहीत आहे. सगळे सजीव सुरवातीला एकाच पेशीपासून तयार होतात. या पेशीला ‘झायगोट’ असं म्हणतात. या एका पेशीचं सतत विभाजन होत असतं. या पेशींवर हळूहळू पापुद्रे किंवा लेयर तयार होतात आणि मग त्यापासून वेगवेगळे अवयव तयार होतात. असे अनेक अवयव मिळून आपली शरीरातली एकएक संस्था बनते. म्हणजे, नाक, घसा, स्वरयंत्र, फुप्फुसे वगैरे अवयव एकत्र केले तर श्वसनसंस्था बनते तसं!

अवयव तयार होतात तेव्हा पेशींमधे त्या अवयवाच्या कार्यानुसार बदल होऊन त्या एकमेकींपेक्षा वेगळ्या होतात. म्हणजे नाकातल्या पेशी नाक कसं काम करतं तसा बदल स्वतःत करून घेतात. डोळ्याच्या पेशी डोळ्याच्या कामाप्रमाणे बदल घडवतात. म्हणून नाकाच्या आणि डोळ्याच्या पेशी एकमेंकापासून वेगळ्या असतात. पण सुरवातीला त्या एकसारख्याच असतात. मेंदू, स्नायू यांसारख्या अवयवांमधे पेशींची संख्या कधीच वाढत नाही. याउलट, आपली त्वचा, बायकांच्या गर्भाशयाचं आतलं आवरण, आतड्यांचं आतलं आवरण या पेशी सतत बदलत राहतात. नव्या तयार होऊन जुन्या नष्ट होतात पण त्या मर्यादेच्या बाहेर वाढत नाहीत.

हेही वाचा : लाॅकडाऊननंतर कोणता प्लॅन उभारण्याची गरज रघुराम राजन यांना वाटतेय?

कॅन्सर म्हणजे शरीरातल्या अतिरिक्त पेशी

काही वेळा या पेशी खूप वाढल्या, प्रमाणाच्या बाहेर गेल्या तर त्यांचा गोळा तयार होतो. या गोळ्याला ट्युमर म्हणतात. अशा प्रकारे पेशी वाढण्याचं नक्की कारण अजूनही समजलेलं नाही. या ट्युमरचेही दोन प्रकार आहेत. बिनाईन म्हणजे साधा ट्युमर आणि मॅलीग्नन्ट म्हणजे कॅन्सर. साध्या ट्युमरच्या पेशी त्या अवयवाच्या पेशींसारख्याच दिसतात. तो हळूहळू वाढतो. कधीच त्या अवयवाच्या बाहेर जात नाही. याउलट कॅन्सरच्या पेशी अपरिपक्व असतात. त्या जास्त वेगाने वाढतात.

कॅन्सर अनेक मार्गांनी पसरतो. ज्या अवयवात कॅन्सरच्या पेशी निर्माण झाल्यात त्या अवयवात तो पसरण्याची भीती सगळ्यात जास्त असते. कधी कधी त्या अवयवाच्या बाहेर येऊनही तो वाढतो. स्तनांचा कॅन्सर झाला असेल तर स्तनांमधून बाहेर येऊन त्वचेपर्यंत किंवा आतमधे जाऊन स्नायूपर्यंत कॅन्सर पसरू शकतो. रक्तातूनही कॅन्सर पसरतो. एवढंच नाही, तर रक्ताप्रमाणे लिम्फ नावाचं एक द्रव्यही आपल्या शरीरात वाहत असतं. या लिम्फच्याही वाहिन्या असतात. त्यात मधे मधे लिम्फ नोड असतात. या लिम्फ नोड लिम्फ नावाचं द्रव्य गाळून घेण्याचं काम करतात. त्या नोडमधे गाठी तयार होऊ शकतात.

टिश्यू म्हणजे हिस्टोस

साधारणपणे कॅन्सर त्याच अवयवात असेल तर ती कॅन्सरची पहिली पायरी असते. लिम्फ नोडमधे गेला तर दुसरी पायरी आणि रक्तातून वेगवेगळ्या अवयवात गेला तर तिसरी पायरी येते. स्तनांच्या कॅन्सरमधे काखेतून लिम्फ नोडमधे आणि नंतर लिवरमधे जाऊ शकतो, अशा परिस्थितीलाच तिसरी स्टेज किंवा पायरी असं म्हणतात.

साध्या ट्युमरची ट्रीटमेंट तेवढा पेशींचा गोळा काढला की पूर्ण होते. पण कॅन्सरचा तेवढाच गोळा काढून चालत नाही कारण तो दिसतो त्यापेक्षा जास्त पसरलेला असतो. एक जरी पेशी राहिली तरी पुन्हा वाढ सुरू होते. त्यामुळे साधारण तो अवयव पूर्ण काढून शिवाय जवळचे लिम्फ नोड ही काढतात. उदाहरणार्थ स्तनांचा कॅन्सर असेल तर संपूर्ण स्तन आणि त्याखालचे खालचे स्नायू आणि काखेतील लिम्फ नोड काढतात.

ट्युमर होतो तेव्हा शरीरात गाठ निर्माण होते. ही गाठ साधी आहे की कॅन्सरची याचं निदान करण्यासाठी त्याचा छोटा तुकडा काढतात. याला बायोप्सी म्हणतात. यात टिश्यूचा अभ्यास करावा लागतो. या टिश्यूंना लॅटीन भाषेत हिस्टोस असं म्हणतात. म्हणून असा अभ्यास करण्याला हिस्टोपॅथॉलॉजी म्हणतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

पेशींच्या अभ्यासाचं शास्त्र

काही अवयव दुसऱ्याही कारणाने काढले जातात. उदा अपेंडिक्स, पित्ताशय. तरीही त्यात कॅन्सर नाही ना बघण्यासाठी त्याचीही तपासणी करावी लागते. कधी टी.बी.मुळेही गाठ निर्माण होते. यासाठी औषधं ही खरी ट्रीटमेंट असते. कधीकधी गरज नसताना सर्जरी होते. स्तनांमधली गाठ निदानासाठी काढली आणि त्यात कॅन्सर असेल तर पुन्हा दुसरी सर्जरी करावी लागते.

कधी मॅमोग्राफीमधे कॅन्सर वाटला म्हणून स्तन काढाला जातो. पण तर नंतर त्यात साधाच ट्युमर निघतो. शिवाय कॅन्सरसाठी काखेतले फॅटसुद्धा काढतात. त्यामुळे पेशंटचा तो हात नंतर सुजलेला राहतो. हे सर्व टाळण्यासाठी सायटोलॉजी म्हणजे पेशींचा अभ्यास हे शास्त्र आहे.

कॅन्सरच्या पेशी एकमेकांना चिकटत नाहीत, असं निरीक्षणातून असं समोर आलंय. स्त्रियांमधे गर्भाशय मुखाचा कॅन्सर खूप जास्त प्रमाणात असतो. यासाठी योनीमधल्या द्रवाचं निरीक्षण केल्यास याचं निदान लवकर होऊ शकतं. हा कॅन्सर शक्यतो चाळीशी नंतर होतो. त्यामुळे ३५ वयानंतर प्रत्येक स्त्रीने त्याची टेस्ट करून घेतली पाहिजे. त्यामुळे निदान लवकर व्हायला मदत होतं. त्याला 'पॅप स्मिअर' असं म्हणतात. ही सायटोलॉजीची सुरवात म्हणता येईल. सायटोस म्हणजे पेशी. आणि लॉजी म्हणजे शास्त्र असतं.

हेही वाचा : कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

सतत नवं ज्ञान मिळवावं लागतं

एफएनएसी म्हणजे फाईन निडल ऍस्पिरेशन सायटोलॉजी ही तपासणीची प्रक्रिया वापरूनही कॅन्सरचं निदान करू शकतो. यात ज्या गाठी हाताला लागतात त्या सगळ्या गाठीचं निदान होतं. यासाठी फक्त एक १० मिलीची सीरिंज आणि सुई लागते. भूल द्यावी लागत नाही. 

गाठ एका हाताने फिक्स करून त्यात सुई घालून वेगवेगळ्या दिशेने जोरात फिरवून नंतर सीरिंजने थोडा द्रव खेचून घेतला जातो. नंतर हे मटेरियल म्हणजे द्राव स्लाईडवर घेऊन त्याचा स्मिअर बनवून तो मायक्रोस्कोप खाली बघून निदान केलं जातं. ब्रेस्ट ट्युमर, थायरॉईड, लाळ ग्रंथी, लिम्फ नोड, त्वचेच्या खाली असलेल्या गाठी अशा सगळ्याचं निदान करून अगदी २ तासांतही रिपोर्ट देता येतो.

लिम्फ नोड टीबी, बॅक्टरिअल इन्फेकशन किंवा कॅन्सरमुळे वाढतात. पहिल्या दोन केसेस औषधाने बऱ्या होतात. त्यामुळे सर्जरी टाळता येते. लिम्फ नोडमधे कॅन्सर सापडला तर तो शरीराच्या कुठल्या भागात आहे यावरून मूळ कॅन्सर कुठे आहे ते शोधता येतं. लिम्फ नोडचाही कॅन्सर असू शकतो. त्याला लिंफोमा म्हणतात. याचं निदान बायोप्सीनेच होतं. तेव्हा बायोप्सी करावी की नाही हे समजतं.

लिव्हर, फुप्फुसे यात गाठी असतील तर अल्ट्रासाऊंड, सिटी गायडेड एफएनएसी करता येते. यातून तो मूळ तिथला कॅन्सर आहे की दुसरीकडून आला आहे ते समजतं. टी.बी. किंवा दुसऱ्या कशाच्या गाठी आहेत का हे समजतं. यामुळे मोठी सर्जरी वाचते. पण एफएनएसी करण्यासाठी खूप कौशल्य लागतं. मटेरियल न येता फक्त रक्तच आलं तर निदान होऊ शकत नाही. आणि सर्व रोगांचं ज्ञान आवश्यक असतं. अभ्यासक्रमात तीन वर्ष हेच शिकण्यात जातात. तरीही सतत नवीन ज्ञान मिळवत राहावं लागतं.

हेही वाचा : पॅथॉलॉजीविषयी १: पॅथॉलॉजिस्टना थँक्स का म्हणायला हवं?

तिसऱ्या स्टेजला केमोथेरपी

स्लाईड सीनियर पॅथोलॉजीस्टला दाखवूनही रिपोर्ट देता येतो. पूर्ण खात्री झाल्याशिवाय हा रिपोर्ट देऊ नये. याचप्रमाणे थुंकी आणि छातीतल्या पाण्यापासून फुप्फुसातल्या कॅन्सरचं आणि पोटातल्या पाण्यापासून पोटातल्या अवयवांच्या कॅन्सरचं निदान होऊ शकतं.

पूर्वी फक्त मुंबईतल्या टाटा हॉस्पिटलमधे कॅन्सरची सर्जरी व्हायची. आता बऱ्याच सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमधे कॅन्सर ट्रीटमेंट होते. तरीही अनेक छोट्या सेंटरमधे अजूनही ही सोय उपलब्ध नाही. बायोप्सी किंवा एफएनएसीमधे कॅन्सर निघाल्यास स्लाईड घेऊन पेशंटला मोठ्या हॉस्पिटलमधे पाठवतात. तिथं खात्री करून पुढची ट्रीटमेंट देतात.

तिसरी स्टेज असेल तर सर्जरी न करता रेडिएशन किंवा केमोथेरपी देतात. सांभाळता येण्यासारखी पेशंटची परिस्थिती असेल तर त्या अवयवाप्रमाणे मटेरियल बाहेर काढतात. उदाहरणार्थ, गर्भाशय असेल तर गर्भाशय, ट्युब्स, ओवरीज आणि थोडा गर्भाशयाच्या बाहेरच्या टिश्यू काढून घेतात. हे नंतर पॅथॉलॉजी विभागाकडे येतं. यात कॅन्सर कन्फर्म करून तो किती पसरला आहे ते बघावं लागतं. गर्भाशयाचा कॅन्सर गर्भाशयाच्या बाहेर गेला असेल तर लिम्फ नोडचा स्कॅन करतात. तो पॉझिटिव आला तर पुढे रेडिओ किंवा केमोथेरपी घ्यावी लागते.

हेही वाचा : पॅथॉलॉजीविषयी २ : तपासणी म्हणजे अग्निपरीक्षाच

शरीराचं निरीक्षण करत राहणं महत्त्वाचं

त्वचेचा कॅन्सर असेल तर त्याच्या भोवतीची थोडी त्वचा आणि त्वचेच्या खालचा थोडा टिश्यू काढतात. या टिश्यूला बेस म्हणतात. हे काढण्यासाठी त्वचेवर काप द्यावा लागतो. कट मार्जिन लागतं. बेस पॉझिटिव असेल तर पुन्हा सर्जरी करून आणखी थोडे टिश्यू काढावे लागतात. शिवाय केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी द्यावी लागते.

कोणती ट्रिटमेंट द्यायची, काय करायचं हे त्या अवयवाप्रमाणे ठरतं. आपल्या शरीराचं सतत निरीक्षण करून थोडा जरी बदल वाटलं तरी योग्य डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेणे हाच लवकर निदान होण्याचा मार्ग आहे. प्रत्येक गाठ ही कॅन्सर नसते. कॅन्सर लवकर समजला तर बरा होण्याची शक्यता वाढते. घाबरून जाऊन उशिर करू नये, एवढंच मी सांगेन. कॅन्सर म्हटलं की हा मरणार म्हणून दुःखी होण्यापेक्षा लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन उरलेलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं घालवणं शक्य आहे.

हेही वाचा : 

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?

राजस्थाननं भारतालाच नाही तर जगाला दिला कोरोनाविरुद्ध लढायचा मॉडेल

(डॉ. मंजिरी मणेरीकर या गेली २५ वर्ष पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी  मुंबईच्या टाटा मेमोरिअल कॉलेजमधून एमडी पॅथॉलॉजी केलंय.)