वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर

२७ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


लोकसभा निवडणुकांचा हँगओवर संपला. आता वर्ल्डकप लवकरच सुरु होणार. त्यासाठी सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. लोकसभेत कोण जिंकणार यांचा अंदाज आपण बांधत होतो, तसंच आता आपण कोणती टीम कसं खेळेल याचा अंदाज आपण बांधत आहोत. मात्र खेळात एखादी लहान टीम, मोठ्या संघाला कधी आणि कशी हरवेल सांगता येत नाही. याची सुरवात भारताने पहिला वर्ल्डकप जिंकून केली.

भारतातल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जिंकलेल्या उमेदवारांनी जल्लोष करत फटाके फोडले. तर हरलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जिंकण्याच्या आशेवर आणलेले फटाके पोटमाळ्यावर ठेवलेत. कारण हेच फटाके वर्ल्डकपसाठी वापरू, आता काटकसर करावी असा विचार त्यांनी केला असावा. आता या फटक्यांची गंमत बघा विजयाची आशा या फटाक्यांची वात पेटवते, तर पराभवाची निराशा हीच पेटवलेली वात विझवते.

क्रिकेट वर्ल्डकप इतिहासातही बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या संघांच्या चाहत्यांना ध्यानीमनी नसलेल्या संघांनी रडवलं. नुकत्याच सुरु झालेल्या सराव सामन्यात यंदाच्याही वर्ल्डकपमधे हा ट्रेंड सुरु राहण्याची शक्यता असल्याचे संकेत अफगाणिस्तानच्या संघाने दिले आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमधे ही कमकूवत टीम, ही चांगली टीम, हा सामना जिंकणारच असं विश्लेषण करण्याचं धाडस कोण करणार नाही. या तगड्या संघांच्या चाहत्यांना रडवण्याची सुरुवात भारतानेच केली. तेही चक्क वर्ल्डकप जिंकून.

१९८३, भारताने विंडीजची हॅटट्रिक हुकवली 

वर्ल्डकप इतिहासाच्या पहिल्याच पानावर १९७५ ला आपली विजयी मोहर उमटवली ती वेस्ट इंडिजने. त्या काळत विंडीजची टीम आणि विजय यांचं समिकरणच बनलं होतं. १९७५ नंतर विंडीजने १९७९ चाही वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे १९८३ च्या वर्ल्डकपमधेही विंडीज वर्ल्ड कप जिंकून हॅटट्रिक करणार अशीच चर्चा होती.

भारताचा हा तिसरा वर्ल्डकप असला तरी भारताची पहिल्या दोन वर्ल्ड कप मधली कामगिरी सुमारच होती. भारताने ग्रुप स्टेजलाच गाशा गुंडाळला होता. त्यामुळे भारतीय टीम १९८३ च्या वर्ल्डकपमधेही विजेते पदाचे दावेदार असण्याचा प्रश्नच नव्हता. पण, कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने दोन वेळा विजयी ठरलेल्या टीमला फायनलमधे ४३ धावांनी पराभव करत विंडीजच्या हॅटट्रिकची पार धुळधान उडवली.

याच वर्ल्डकपमधे अजून एका साधारण संघांने असाधारण कामगिरी करुन दाखवली होती. ती टीम झिंम्बावेची होती. त्यांनी ब गटात ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाचा पहिल्याच सामन्यात पराभव केला. झिंम्बावेचा हा एकमेव विजय होता. पण, या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचं वर्ल्डकप मिशन ग्रुपमधेच थांबलं.

हेही वाचा: वर्ल्डकपच्या तोंडावर आयपीएलचा टीम इंडियाला फायदा की नुकसान?

लंकेने ओपनिंग बॅटसमनचं युग सुरु केलं

श्रीलंकेची टीम १९७५ पासूनच्या वर्ल्ड कपमधे खेळत आहे. श्रीलंका या स्पर्धेतली तशी जुनीच टीम आहे. पण तरीही त्याला १९९६ वर्ल्डकपपर्यंत ग्रुप स्टेजमधेच गाशा गुंडाळावा लागत होता. पण, १९९६ च्या वर्ल्डकपमधे त्यांनी एक वेगळीच रणनिती अवलंबून भल्या भल्या संघांच्या तोंडचे पाणी पळवलं. त्यांनी पॉवर प्लेमधे खऱ्या अर्थाने पॉवरचा वापर करण्याचा प्रघात सुरु केला.

लंकेने सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर येणाऱ्या जयसुर्याला कालुवितरणाबरोबर सलामीला पाठवण्याची रणनिती आखली. या दोघांचे काम फक्त पहिल्या १५ षटकात ज्यावेळी क्षेत्ररक्षण मर्यादा होती त्यावेळी आक्रमक फलंदाजी करत संघाला १०० च्या वर धावा करुन द्यायच्या ही रणनिती इतकी करागर ठरली की लंकेने भल्या भल्या संघांना पाणी पाजत वर्ल्डकपवर कब्जा केला. या वर्ल्डकपनंतरच धडाकेबाज ओपनिंग बॅट्समनचं युग सुरु झालं.

झिंम्बावेने टॉप टीमना रडवलं

१९९९ च्या वर्ल्डकपमधे अ गटात भारत, द. आफ्रिका, इंग्लंड, गतविजेता श्रीलंका, केनिया आणि झिंम्बावे यांचा समावेश होता. या गटात झिंम्बावेने पहिल्यांदा भारताचा ३ धावांनी पराभव करत, मोठा धक्का दिला. त्यानंतर ग्रुपमधे आपला अखेरचा सामना खेळताना झिंम्बावेने पुन्हा एक मोठा धक्का दिला. त्यांनी ग्रुपमधे अव्वल स्थान पटकावण्याऱ्या द. आफ्रिकेचा ४८ धावांनी पराभव केला.

गतविजेत्या श्रीलंकेलाही खराब कामगिरीमुळे ग्रुप स्टेजमधूनच आपलं परतीचं तिकीट काढावं लागलं. यामुळे अ गटात द. आफ्रिका, भारत आणि या दोन्ही संघांना हरवणारा झिंम्बावेने सुपर सिक्समधे प्रवेश केला. पुढचा २००३ मधला वर्ल्ड कप द. आफ्रिका आणि झिंम्बावे या देशात खेळवण्यात आला. या ही वर्ल्डकपमधे झिंम्बावेमुळे इंग्लंडला सुपर सिक्समधे प्रवेश मिळवता आला नव्हता. यावेळी झिंम्बावेने इंग्लंडला न खेळता हरवले होते. इंग्लंडने झिंम्बावेमधील राजकीय संघर्षाचा निषेध करत सामन्यातून वॉक आऊट केलं होतं.

हेही वाचा: विजय शंकर अंबाती रायुडूची ४ नंबरची जागा घेऊ शकेल?

पाटलांच्या कोचिंगमुळे केनिया सेमीफायनलमधे

ज्या २००३ च्या वर्ल्डकपमधे झिंम्बावेने इंग्लंडला बाय दिला होता त्यात न्यूझीलंडनेही केनियाला बाय दिला होता. पण, केनियाने या बायच्या जोरावर सुपर सिक्स आणि सेमी फायनल पर्यंत धडक मारली नाही. त्यांनी ग्रुपमधे पहिल्यांदा श्रीलंकेला ५३ धावांनी हरवत सुपर सिक्स मधे प्रवेश मिळवला. त्यानंतर सुपर सिक्समधे झिंम्बावेचा ७ विकेट्सनी पराभव केला आणि सेमीफायनलमधे प्रवेश केला. पण, भारताने केनियाचा ९१ धावांनी पराभव केला आणि केनियाचा धक्के देण्याचा प्रवास सेमीफायनलमधेच थांबवला.

केनियाचा सेमीफायनपर्यंतच्या थक्क करणाऱ्या प्रवासात भारताचा माजी खेळाडू संदीप पाटील यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केनियाने इथपर्यंत धडक मारली होती. त्यानंतर संदीप पाटील यांना बीसीसीआयमधेही मोठ मोठी पदं मिळाली. पण, त्याचा पाया केनियामधे रचला गेला.

हेही वाचा: ऋषभ पंतचं वर्ल्डकपचं तिकीट का कापलं? ते कार्तिकला कसं मिळालं?

हा पराभव भारत कधीच विसरणार नाही

२००७ च्या वर्ल्डकपमधे चार गट करण्यात आले. यामधे ब गटात भारत, श्रीलंका, बरमुडा आणि बांगलादेश या संघांचा समावेश होता. भारताचा पहिलाच सामना बांगलादेशबरोबर होता. हा सामना जिंकून भारत आरामात ग्रुपमधे टॉप करेल असं वाटत होतं. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताची टीम तगडी होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाणे खणखणीत वाजवलेल्या युवा आणि अनुभवी खेळांडूंचा भरणा होता.
 
पण, या तगड्या संघाला पहिल्याच सामन्यात बांगलादेशच्या लिंबू टिंबू समजल्या जाणाऱ्या संघाने ५ विकेट्सनी मात दिली. त्यानंतर भारताने बरमुडा सोबतचा सामना तब्बल २५७ धावांनी जिंकला. परंतु लंकेविरुद्धच्या सामन्यात ६९ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताला गटात अव्वल दोनमधे स्थान मिळवता आलं नाही. २००७ च्या वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताला बांगलादेशने परतीची तिकेटं काढून दिली.

हेही वाचा: आता वर्ल्डकपसाठी धोनीला टाळता येणार नाही

काही टीम अजूनही लिंबूटिंबूच

याच वर्ल्डकपमधे भारताबरोबरच भारताचा शेजारी पाकिस्तानलाही अशाच कटू प्रसंगाचा सामना करावा लागला. त्यांनाही आयर्लंडसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाने ३ विकेट्सनी मात दिल्याने त्यांचाही वर्ल्डकपचा प्रवास ग्रुप स्टेजलाच संपला. भारत आणि पाकिस्तान या तगड्या संघांना ग्रुप स्टेजमधून बाहेर काढणाऱ्या आयर्लंड आणि बांगलादेश या टीम मात्र सुपर ८ मधे तळातच राहिल्या.

वर्ल्ड कपमधे मोठ्या टीमना अपसेट करणाऱ्या या टीमपैकी काही टीम चांगल्या टीम म्हणून उदयास आल्या. तर काही टीमना आपल्या चांगल्या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. म्हणून ते अजूनही लिंबू टिंबू म्हणूनच गणले जातात. त्यात काही असेही टीम सआहेत ज्यांना आता वर्ल्ड कपसाठी क्वालिफायही पार करता आलेलं नाही.

हेही वाचा: यूपीत महागठबंधनचं राजकारण फेल गेलं, त्याची दोन कारणं