कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय

०४ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


चीनमधे नियंत्रणात आलेल्या कोरोना वायरसने आता संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलंय. भारतात अचानक कोरोना पॉझिटिव रूग्ण सापडू लागलेत. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दिल्लीत तर काही शाळांना सुट्टीही देण्यात आलीय. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे भिण्याचं कारण नसल्याचं सांगितलंय. तसंच सरकारनेही खबरदारीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.

कोरोना वायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ या रोगाचा पहिला रूग्ण काल सोमवारी दिल्लीत आढळला. त्यानंतर आज खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीजवळच्या नोएडातल्या दोन खासगी शाळा काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्यात. दिल्लीसोबतच तेलंगणामधेही इटलीहून आलेल्या एका प्रवाशाला कोरोना झाल्याचं समोर आलंय. याआधी केरळमधे कोरोनाचे तीन रूग्ण सापडले होते.

अंटार्क्टिका वगळल्यास जगभरातल्या सर्वच खंडांना कोरोनाने विळखा घातलाय. एवढे दिवस चीनमधे थैमान घालणारा कोरोना आता चीनबाहेरही वेगाने पसरतोय. जपान, थायलंड, इराण आणि इराक या देशांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांसाठी शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचाः जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?

औषध नसलेला आजार

कोरोनाचा जगभरात थैमान सुरू आहे. मात्र त्यावर कुठलीच लस किंवा खात्रीशीर औषध नाही. सगळेच देश आपापल्या पातळीवर कोरोनाच्या रूग्णांवर वेगवेगळ्या पद्धतीने औषधोपचार करत आहेत. त्यामुळे या रोगावर नियंत्रणासाठी सध्यातरी आपल्याला खबरदारीच्या उपाययोजनांवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी देशोदेशींच्या सरकारांसोबतच जागतिक आरोग्य संघटनेनंही मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. 

जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही गोष्टी सांगितल्यात. या खबरदारीच्या उपाययोजनांचा वापर करून आपण कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकतो. तसंच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नोवल कोरोना वायरसपासून बचावासाठी काही खबरदारीच्या सूचना केल्यात. या उपाययोजना सगळ्यांसाठी आहेत.

तसंच केंद्र सरकारने एक हेल्पलाईन नंबरही सुरू केलाय. +९१-११-२३९७८०४६ हा नंबर चोवीस तास उपलब्ध करून देण्यात आलाय. तसंच अधिकच्या माहितीसाठी आपण ncov2019@gmail.com या ईमेलवरही संपर्क साधू शकतो.

या देशांना जाणं धोक्याचं

स्वतःच्या तब्येची काळजी घेण्यासाठी कुठल्या उपाययोजना अमलात आणाव्यात हे सांगतानाच सरकारने प्रवासासंबंधित एक मार्गदर्शक नियमावलीही जारी केलीय. त्यानुसार, गरज नसेल तर दक्षिण कोरिया, सिंगापूर, इराण आणि इटलीला जाणं टाळा. या देशांतून भारतात येणाऱ्या किंवा ज्यांनी १० फेब्रुवारीअगोदर या देशांचा दौरा केलाय अशा व्यक्तींना १४ दिवस निगराणीखाली ठेवलं जाऊ शकतं. 

चीनहून भारतात येऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही परदेशी नागरिकाला भारताचा विसा दिला जाणार नाही. तसंच अगोदर ज्यांना विसा मिळालाय तो आता गोठवण्यात आलाय.

हेही वाचाः माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?

हे नक्की करा

१) स्वतःच्या तब्येतीची योग्य ती काळजी घ्या.

२) हात नियमित स्वच्छ धुवा.

३) हात घाण झाल्यावर ते साबण लावून पाण्याने स्वच्छ धुवा.

४) टिश्यूपेपर वापरल्यावर तो तात्काळ झाकलेल्या कचरापेटीत टाका.

५) डोळे, नाक आणि तोंडाला हात लावणं टाळा.

६) खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका. हातरुमाल, कापड नसेल तर नाकतोंडावर कमीत कमी हात तरी लावा. शिंकताना जवळ कापड किंवा टिश्युपेपर नसेल तर नाकाला हाताच्या कोपऱ्याने झाका.

७) बरं वाटत नसल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जा. तसंच नजीकच्या काळात कुठं प्रवासाला गेलं असल्यास त्याची माहिती डॉक्टरांना द्या. 

८) कोरोनाशी संबंधित महत्त्वाच्या माहितीबद्दल अपडेट रहा. तसंच आपल्या डॉक्टरने दिलेल्या सल्ल्याचं पालन करा.

९) सार्वजनिक वाहनाने प्रवास करत असाल आणि आजारी असाल तर त्याची कल्पना विमान, रेल्वे किंवा बसमधल्या स्टाफला द्या. तसंच प्रवासाला निघण्याआधीच योग्य औषधी घ्या.

हेही वाचाः कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

हे करणं टाळा

१) खोकला, तापाची लक्षण असलेल्या माणसांच्या संपर्कात येणं टाळा.

२) सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.

३) जंगली प्राण्यांच्या संपर्कात येऊ नका. तसंच कच्चं, नीट न शिजलेलं मांस खाणं टाळा.

४) जनावरांचा बाजार, कत्तलखान्यांमधे जाणं टाळा.

मास्क कसा वापरायचा?

कोरोनाचा आजार हा संसर्गजन्य आहे. तो हवेतून पसरतो. त्यामुळे गरजेनुसार, तोंडाला मास्क लावणं चांगलं. पण सगळ्यांनीच मास्क लावायची गरज नाही. कोरोनाबाधिताच्या संपर्कात येणार असेल तर धडधाकट व्यक्तीने मास्क वापरावा. तसंच सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणं असतील तर मास्क वापरा.

आणि मास्क वापरत असाल तर तुम्हाला तो लावायचा कसा आणि काढायचा कसा याबद्दल माहिती हवी. एकदा वापरलेला मास्क पुन्हा वापरू नका. तोंडाला मास्क लावताना, काढताना काळजी घ्यायला हवी.

तोंडाला मास्क लावण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. मास्क काढताना त्याच्या समोरच्या भागाला हात लावू नका. मागच्या दोऱ्यांना पकडून मास्क काढा. काढल्यावर लगेच तो कचरापेटी टाका. नंतर हँडवॉश किंवा साबण हाताला नीट चोळा आणि मग हात पाण्याने नीट धुवा.

हेही वाचाः 

एका वायरसने जग कसं हादरवलं?

ओबीसी जनगणनेचं आपण स्वागत करायचं की विरोध?

जगातल्या दोन नंबरच्या ऑटो एक्स्पोवर यंदा मंदीचं सावट

पापपुण्याची पायरी ओलांडून केरळने कसा बनवला ब्रेन डेथबाबत कायदा?

सरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला