कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांना ट्रोल करणं चालू केलंय. हे असं ट्रोलिंग करून भाजपविरुद्धच्या चकमकी सहज जिंकता येतील. पण युद्ध जिंकणं कठीण आहे. त्यासाठी काय करावं लागेल याची रणनीती सांगणारा लेख.
नेत्यांची प्रतिमा उभी करणं आणि निवडणुकीचं युद्ध सोशल मीडियावर लढवणं हे आमचं व्यावसायिक काम. २०१४पासून या निवडणुकीच्या युद्धतंत्रात अनेक बदल झालेत. होताहेत. ते बदल सगळ्यात आधी आत्मसात करणारा पक्ष होता भारतीय जनता पार्टी.
२०१२ पासून म्हणजे साधारण अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून भाजपने काँग्रेस आणि सगळ्या भाजपविरोधी नेत्यांना, पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनाही सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरू केलं. कुणीही भाजपविरुद्ध काहीही लिहिलं की ही ऑनलाईन झुंड त्यांच्यावर तुटून पडते. अत्यंत अर्वाच्च्य, अश्लील, असंस्कृत भाषेत त्यांचा समाचार घेतला जातो. एका अर्थाने हे ऑनलाईन मॉबलिचिंगच असतं.
सध्या महाराष्ट्रातल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते भाजप नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतायत. त्यामुळे भाजप नेत्यांना ऑनलाईन पळताभुई थोडी झालीय. पण खरंतर भाजप नेत्यांना ट्रोल करून महाविकासआघाडीला फक्त छोट्या मोठ्या चकमकी जिंकता येतील. भाजपविरोधातलं सोशल मीडियाचं युद्ध जिंकण्यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. भाजपला हरवायचं असेल तर भाजपच्या तोडीसतोड ऑनलाईन यंत्रणा उभी करावी लागेल. पण ही यंत्रणा भाजपसारखी एखाद्या मशीनसारखी नको. तर उत्स्फुर्त असायला हवी.
हेही वाचा : आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?
पण त्याआधी आपल्याला सोशल मीडियाचं सध्याचं रूप समजून घ्यावं लागेल. फेसबुक, वॉट्सअप, इन्टाग्राम, ट्वीटर, टिकटॉक, हेलो, युट्यूब, क्वोरा, इमेल ही सध्याची सोशल मीडियावर लढण्याची टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म म्हणजे युद्धभूमी आहे. तर ट्रोलिंग, फेकन्यूज, इन्फोर्मेशन, इमेज, वीडियो ही कण्टेण्ट शस्त्र. कॅम्पेनिंग, ट्रेडिंग, गॅदेरिंग आणि टार्गेटिंग या सोशल प्रचार आणि सोशल फोकसिंगच्या काही संज्ञा.
सोशल मीडियावर वोकल मायनोरिटी आणि सायलेंट मेजॉरेटी अशी एक संकल्पना आहे. ती समजून घ्यावी लागेल. सोशल मीडियावर अनेक लोक असतात. त्यांचं विभाजन तीन प्रकारात करता येतं. पहिल्या प्रकारात आपली मतं जाहीरपणे मांडणारे, आपला विरोध जाहीर करणाऱ्या लोकांचा समावेश होतो. असे लोक सोशल मीडियावरील एकूण लोकांच्या तुलनेत कमी फार कमी आहेत. हे लोक वोकल मायनोरिटी या प्रकारात मोडतात.
दुसऱ्या प्रकारात जे स्वत: काही मत मांडत नाहीत पण दुसऱ्यांच्या मतांना पाठिंबा देतात, लाईक करतात, रीट्वीट करतात असे लोक येतात. आणि कुठलंही मत व्यक्त करत नाहीत, कुणालाही पाठिंबा देत नाहीत अशा लोकांचा एक तिसरा प्रकार आहे. असे लोक फक्त म्यूट ऑबर्झवर म्हणजे शांत राहून निरीक्षण करणारी असतात. हे तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजेच सायलेंट मेजॉरिटीचे लोक. यांची संख्या सोशल मीडियावर फार मोठी आहे.
हेही वाचा : आम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थाळी आणि दिव्यांच्या आवाहनाला सोशल मीडियावरच्या वोकल मायनोरिटीने विरोध केला. त्याची खिल्लीही उडवली. पण दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावरच्या सायलेंट मेजॉरिटीने मोदींना साथ दिली. त्यांचा कार्यक्रम यशस्वी केला. असं आपल्याकडेच म्हणजे फक्त भारतातच होतंय का? तर नाही. असं जगभरात होतंय.
ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचं की नाही याचा निर्णय इंग्लडमधे घेतला जात होता. तेव्हा ही वोकल मायनॉरिटी सोशल मीडियावर ब्रेक्झिटला विरोध करत होती. सायलेंट मेजॉरिटी मात्र ब्रेक्झिटच्या बाजूने होती. असं चित्रं ट्रम्प यांच्या कॅम्पेनमधेही दिसलं.
त्यामुळेच आपण जास्त वोकल राहिलो, खूप ट्रोलिंग केलं, भरपूर लिहिलं म्हणजे म्हणजे आपण जिंकलो अशा गैरसमजात कुणीही राहिलं, तर मोठी गफलत होईल.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
भाजपने ट्रोलिंग करून सोशल मीडियावर त्यांचा एक मतदार उभा केलाय. हा मतदार मुस्लिम द्वेषाच्या भावनेवर उभाय आणि त्याच मुद्द्यावरून भाजपनं त्याला संघटित ठेवलाय. भाजप नेते वारंवार मुस्लिम समाजाबद्दल वेगवेगळी विधानं करून या भावनेला जागृत ठेवण्यासाठी खतपाणी घालत असतात. त्यासाठीही ते सोशल मीडियाचाच वापर करतात.
आता भाजपविरोधकांना आपला मतदार नेमका कशाच्या आधारावर उभा करायचाय हे ठरवावं लागेल. त्यासाठी रणनीती आखावी लागेल. त्यावर आधारित नॅरेटिव वेगवेगळ्या मार्गाने उभी करावी लागतील. राहुल गांधीचं ‘आयडिया ऑफ इंडिया’ हे खरंतर एक चांगलं नॅरेटिव ठरू शकलं असतं. पण काँग्रेसवाल्यांना ते सोशल मीडियावर नीटपणे फुलवताच आलं नाही. त्यांनी आपली सगळी उर्जा मोदींविरोधी भावना उत्पन्न करण्यावरच वाया घालवली. पण त्याने मोदींनाच प्रसिद्धी मिळाली. मोदींचाच फायदा झाला.
हेही वाचा : सोशल मीडियात ज्ञानदा कोरोनापेक्षा जास्त वायरल का होतेय?
आपण आत्ता शिवरायांच्या मावळ्यांसारखे लढतोय. संताजी धनाजी मुघलांच्या तळावर वेळी अवेळी हल्ला करून मुघलांना जेरीस आणायचे. पण त्याने मुघल साम्राज्याचा पाडाव होत नव्हता. फक्त सततच्या हल्ल्यांनी ते त्रस्त व्हायचे. ट्रोलिंगमधला विजयही तसाच आहे. पण साम्राज्याचा पाडाव करायचा असेल तर कुठल्याही ट्रोलिंगला एका कॅम्पेनिंगमधे बदलावं लागेल. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तमिळनाडूत सुरू झालेलं गो बॅक मोदी हे कॅम्पेन.
तामिळनाडूमधल्या जलीकट्टू म्हणजे बैलांच्या शर्यतीला सरकारने बंदी घातली. हा तमिळ संस्कृतीवरचा हल्ला आहे, असं समजून तमिळ राष्ट्रीय भावनेच्या तरुणांनी मोदी सरकारच्या विरोधात हा ट्रेंड सुरू केला. सुरवातीला त्याचं स्वरूप ट्रोलिंग एवढंच होतं. पण कालांतराने जलीकट्टूचं समर्थन म्हणजे मोदींच्या विरोधातलं कॅम्पेन म्हणून समोर आलं. सगळ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही ते उचलून धरलं. अनेकदा तर ते ट्विटरवर वर्ल्ड ट्रेंडिगमधे पहिल्या नंबरला दिसलं.
मोदी तमिळनाडूत जातात तेव्हा हे गोबॅकमोदी कॅम्पेन जोर धरतं. अर्थात या ऑनलाईन विरोधाला तमिळनाडूतल्या विरोधीपक्षांनी ग्राऊंड सपोर्ट दिला. शिवाय, मोदींना काळे झेंडे दाखवणं गोबॅकमोदी असं इंग्रजीत लिहिलेले काळे फुगे सोडणं असा कल्पक विरोधही झाला. त्यामुळे या कॅम्पेनला जास्तच जोर आला. थोडक्यात तुमचं ट्रोलिंग फक्त तेवढ्यापुरतं न राहता त्याचं रूपांतर एका ट्रोलिंग कॅम्पेनमधे झालं तरच ते प्रभावी ठरतं, हे समजून घ्यायला हवं.
हेही वाचा : भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!
भाजप समर्थकही फक्त ट्रोलिंग करून थांबत नाहीत. त्यांच्या ट्रोल आर्मीला ते एका सूत्रात बांधतात. त्यांच्या भेटी घडवतात. त्यांना एकमेकांच्या संपर्कात आणतात. महाविकासआघाडीकडे असं कुठलंही संपर्क सूत्र नाही. कुणालाही ट्रोलिंगमधे आगेकूच करायची असेल तर त्यांनी आपल्या ऑनलाईन टीम एकमेकांसोबत जोडायला हव्यात. तरच ते ठरवून एका दिशेने प्रचार करू शकतील आणि तोडीसतोड यंत्रणा उभी करतील.
पण महत्त्वाचं म्हणजे भाजप आता ट्रोलिंग, आणि भेटीगाठींच्या पुढे जाऊन टार्गेटिंगमधे काम करतंय. आपल्या मतदाराला ते टार्गेट करतात आणि त्यालाच त्याचं नॅरेटीव पुरवत राहतात. त्यांची नॅरेटीव पुरवण्याची पद्धतही वेगवेगळी असते. कधी मोदींची प्रतिमा कधी अतिआक्रमक मुस्लिमद्वेष्ट हिंदुत्व असे डोस ते आपल्या मतदाराला सोशल मीडियाचा वापर करून पाजत राहतात. अशानं त्यांचा मतदार त्यांना चिकटून राहतो. दुसरीकडे जाण्यापासून परावृत्त होतो.
ट्रोलिंगचं युद्ध लढायचं असेल तर महाविकास आघाडीलाही हे करावं लागेल. आपला मतदार एकत्र उभा करावा लागेल. त्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार हे सूत्र ते वापरू शकतात. त्यामुळे हे चारही महापुरूष एका प्लॅटफॉर्मवर येतील. त्यानंतर शरद पवारांचं सर्वमान्य नेतृत्व, उद्धव ठाकरेंचं संयमी नेतृत्व आणि निष्कलंक प्रतिमा, गांधी घराण्याची सर्वसमावेशकता यावर जोर देऊन नॅरेटीव आणि मेसेजिंगची यंत्रणा उभारता येईल. आणि यासगळ्यांच्या जोरावर अनेक कॅम्पेन करावे लागतील. महाविकासआघाडी या मार्गाने गेली तर आणि तरच भाजपच्या महाकाय यंत्रणेला तोडीसतोड ऑनलाईन युद्ध महाराष्ट्रात दिसून येईल. आणि त्याला चकमकीपलीकडचं यशही मिळू शकेल.
हेही वाचा :
नेशन वॉन्ट्स टू नो अर्नब, ये जबां किसकी हैं?
कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावणं हा छळ असेलः अँजेला मर्केल
किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?
आखाती देशांतल्या तन्मय चिन्मयमुळे मोदींच्या अडचणीत होणार वाढ
भानू अथैय्याः भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही
(लेखक हे विविध पक्षांसाठी काम करणारे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)