कॅमेरा विकत घेताय, मग हे नक्की वाचा

१९ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज सोमवार १९ ऑगस्ट. वर्ल्ड छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी डे. आपल्या सगळ्यांना फोटो काढायला, त्या आठवणी जपायला आणि इतरांना दाखवायला खूप आवडतात. फोटोग्राफी बिझनेसही खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि डिजिटल फोटोग्राफीमुळे आता कुणीही सहज फोटोग्राफी करू शकतं.

स्माईल प्लीज, से चीझ ऑर पनीर, लेट्स पाऊट असं आपण फोटो काढताना हमखास म्हणतो. पूर्वी फोटो स्टुडीओत जाऊन फॅमिली फोटो किंवा कामासाठी लागणारे पासपोर्ट, स्टॅम्पसाईजचे फोटो तसंच एखादा रोलचा कॅमेरा घेऊन तो फिरायला जाताना नेणं. यापलीकडे फोटोग्राफीचं आपल्या आयुष्यात काही विशेष स्थान नव्हतं.

आणि डिलिटल कॅमेरा भारतात आला

आज आपल्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आलाय. त्यातल्या भन्नाट फिचरचा वापर करून सगळेच फोटोग्राफी करू लागलेत. त्यामुळे मोबाईल फोटोग्राफी ही कन्सेप्ट आली. त्यात आयफोन, ओप्पो आणि वन प्लससारख्या मोबाईल कॅमेऱ्याची क्वालिटी तर खूप भारी. अगदी बिग स्क्रिन सिनेमांचेही काही शॉट मोबाईलवर शूट होऊ लागलेत. पण तरीही कॅमेऱ्याची क्रेझ कमी झालेली नाही.

सिंगल लेन्स रिफ्लेक्स अर्थात एसएलआर कॅमेरे हे प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी वापरले जायचे. १९७५ ला पहिला डिजिटल कॅमेरा बनला. अमेरिकेतल्या ईस्टमॅन कोडॅक कंपनीच्या इंजिनियर स्टीवन सॅसन यांनी हा कॅमेरा बनवला. आणि १९८९ ला पहिल्यांदा याच कंपनीचा डिजिटल कॅमेरा भारतात आला.

हेही वाचा: विद्या सिन्हाचं मन सुंदर होतं म्हणून ती सुंदर होती

एलएलआर हा फक्त प्रोफेशनलसाठी नाही

पुढच्या काळात कॅमेऱ्यात बरेच बदल होत गेले. इतर कंपन्यांना बाजूला सारून फक्त कॅनन आणि निकॉनच्याच कॅमेऱ्यांनी बाजार व्यापला. जगभरातल्या फोटोग्राफरमधे फक्त या दोन कॅमेऱ्यांमधे कोणता कॅमेरा बेस्ट यावर वाद व्हायचे. पण सध्या फोटोग्राफर्सनी या दोन्ही कॅमेऱ्यांना आपलंसं केलंय.

डिएसएलआरमुळे फोटो काढणं सहज सोप्पं झालं. अगदी गंमतीने असंही म्हटलं जातं की फोटोग्राफी न शिकलेलेसुद्धा या कॅमेऱ्यामुळे फोटोग्राफर होतात. हल्ली कॅनन, निकॉनच्या हौशी फोटोग्राफरसाठी बनवलेल्या छोट्या कॅमेऱ्यांपेक्षा लोक डिएसएलआर घेऊ लागलेत. त्यामुळे एसएलआर हा फक्त प्रोफेशनल फोटोग्राफरसाठी ही संकल्पना मागे पडलीय. यात निकॉनच्या तुलनेत कॅननची किंमत कमी असते आणि त्यांच्या कॅमेऱ्यांची आवकही जास्त आहे.

कॅमेऱ्यांच्या विक्रीत वाढ

२००० नंतर सोशल मीडियाचं फॅड आलं. हेसुद्धा फोटोग्राफी ग्लॉरिफाय होण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. सोशल मीडियावर एखाद्या मजकुरापेक्षा फोटोच जास्त शेअर होतात. त्यामुळे कँडिड, सेल्फी, ३६० डिग्री आणि असे बरेच प्रकार फोटोग्राफीत आले. फोटोग्राफी तंत्राचा भावही वधारला. आजच्या मोठ्या व्यवसायांपैकी फोटोग्राफी हासुद्धा मोठा व्यवसाय बनलाय.

फोटोग्राफी वाढली म्हणजे कॅमेऱ्यांचंही मार्केट वाढणार. कॅमेरा घेण्याचं प्रमाण गेल्या दहा वर्षांमधे खूप वाढलंय. हे प्रमाण जवळपास ४५ टक्क्यांनी वाढलंय. ही माहिती बिझनेस स्टँडर्ड वर्तमानपत्राने नुकत्याच एका बातमीत दिली. कॅमेऱ्याची माहिती, कोर्सेस, गाईड करणाऱ्या वेबसाईट, युट्युब ट्युटर, आपले मित्र मंडळी, फोटोग्राफी शिक्षक हे सगळे आपल्याला कॅमेऱ्याची माहिती देण्यासाठी आहेत. पण तरीही आपण गोंधळतो.

हेही वाचा: जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल

पॉईंट अँड शूट की मिररलेस कॅमेरा?

कॅमेरा घेण्यापूर्वी आपण कॅमेरा समजून घ्यायला हवा. कॅमेऱ्याचे खूप प्रकार आहेत. पण आपण सोप्प्या ३ भागात समजून घेऊ. कॉम्पॅक्ड कॅमेरा. ज्याची फिक्स्ड लेन्स असते. जो वजन आणि आकाराने लहान असतो. सहज कुठेही घेऊन जाण्यासारखा. अगदी वृद्धांपासून लहान मुलं कुणीही वापरू शकतात असा हा कॉम्पॅक्ड कॅमेरा.

यात पॉईंट अँड शूट असतं. यात मिररलेस सेन्सही येते. ज्याने लो लाईटमधे शूट करायला सोप्पं. आणि मूळात हा कॅमेरा लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही वापरू शकतं. यातले फोटो हे किमान आताच्या स्मार्टफोनपेक्षा चांगले येतात. बाकी प्रत्येक कॅमेरा आणि बजेटनुसार यात वेगवेगळे कॅमेरे मिळतात.

दुसरा प्रकार म्हणजे मिररलेस कॅमेरा. मिररलेस कॅमेरा हा कॉम्पॅक्ड कॅमेऱ्यापेक्षा मोठा आणि डिएसएलआर कॅमेऱ्यापेक्षा लहान असतो. यात लेन्स बदलण्याची सोय असते. त्यामुळे चांगल्या कॉलिटीचे फोटो काढता येतात.

हा कॅमेरा हौशी फोटोग्राफर, बडिंग फोटोग्राफर्सना सरावासाठी खूप चांगला आहे. यात घरगुती समारंभापासून सगळ्या प्रकारची फोटोग्राफी करता येते. आणि हा कॅमेरा डिएसएलआर एवढा जड नसतो.

डिएसएलआरचे प्लस आणि मायनस पॉईंट

डिएसएलआर हा कॅमेऱ्यातला तिसरा प्रकार. डिएसएलआर जड असतो, सहज कुठेही नेता येत नाही. हा मायनस पॉईंट आहे. आपल्या प्रोफेशनल फोटोग्राफर मित्र मैत्रिणींना आपण त्यांच्या डिएसएलआरला अगदी लहान बाळासारखं जपताना पाहिलं असेल. या कॅमेऱ्याची वेळच्या वेळी सर्विसिंग करणं गरजेचं असतं.

या कॅमेऱ्याचे बरेच पॉईंट आहेत. सगळ्या प्रकारचं शुटींग करता येतं. याला फक्त गरजेनुसार वेगवेगळ्या लेन्स लावल्या की झालं. हो म्हणजे या लेन्स अगदी ५० हजारांपासून ५ लाखांपर्यंत मिळतात. पण यात वाईल्ड लाईफ, पोट्रेट, लँडस्केप, मॉडलिंग, प्रोडक्ट, वेडिंगपासून सगळं काही करता येतं. आणि अनेक युट्यूबर्स, वेबसिरीज करणारे याच कॅमेऱ्याला प्राधान्य देतात.

यातल्या ऑप्शन्स आणि फिचरबरोबर खेळून आपण छान क्रिएटिव फोटो काढू शकतो. या कॅमेऱ्यात सगळं काही आहे. फक्त फोटोग्राफर कसा त्याचा वापर करतो त्यावर बाकीच अवलंबून आहे, असं फोटोग्राफर डेविड पॉल सांगतात. पॉल हे द फोटोग्राफर आय मॅगझिनमधे फोटोग्राफी ट्रेंडवर कॉलम लिहितात.

हेही वाचा: भारतात बॉलिवूडसारखे आणखी किती वूड आहेत?

दर १५ दिवसांनी बदलतात किंमती

आता कॅमेरा घेताना तो आपल्याला नेमका कशासाठी हवाय. हा विचार करून कोणत्या प्रकारचा घ्यायचा हे ठरवावं लागेल. पण किंमत. वर्तमानपत्रातल्या जाहिरातीत कॅमेऱ्याच्या किंमती तर आकाशाला पोचलेल्या असतात. खरंतर कॅमेऱ्याच्या किंमती कधीच स्थिर नसतात. दर १५ दिवसांनी त्या बदलत असतात.

मागणी वाढल्यामुळे कॅमेऱ्याच्या किंमती कमी होताहेत. १५ ते २० टक्क्यांनी कमी झाल्यात. कॅमेऱ्याची बेसिक किंमत कमी असते. पण त्याच्यासोबतच्या वस्तूंमुळे किंमत वाढते. म्हणजे लेन्स, ट्रायपॉड, मेमरी कार्ड, कॅमेरा बॅग, लेन्स फिल्टर, लेन्स प्रोटेक्टर, फ्लॅश, कॅमेरा क्लिनिंग किट इत्यादी वस्तू या गरजेच्या असल्यामुळे घेतल्या जातात. आणि एकूण बिलाची रक्कम वाढते.

यातल्या कोणत्या वस्तू घ्यायचं हे आपण प्राधान्यक्रमाने ठरवू शकतो. तसंच सध्या डिएसएलआर कॅमेऱ्यांच्या किंमती २५ हजारांपासून पुढे आहेत. आपण सेकेंड हँड कॅमेरा ७ हजारांपासून पुढे घेऊ शकतो. पण त्यात काही फॉल्ट असल्यास लगेच लक्षात येत नाही. आणि सर्विसिंगला पैसे घालवण्यापेक्षा नवा कॅमेरा घेतलेला बरा. कारण डिएसएलआरचं मेन्टनंस करणं खूप आवश्यक असतं, असं फॅशन फोटोग्राफर स्वानंद मेढेकर यांनी सांगितलं.

कॅमेरा कुठून घ्यावा?

महत्त्त्वाचं म्हणजे कॅमेरा घेताना कॅमेऱ्याचा सेन्सर, वाईड एरिया, क्रिएटिव फिल्टर कोणते मिळताहेत हे बघावं. तसंच कॅमेरा आधी पूर्ण टेस्ट करून घ्यावा. तसंच आपण कॅमेरा कोणत्याही ठिकाणाहून घेऊ नये. कारण यात फसवणूक होण्याची शक्यताही असते. कॅनन आणि निकॉनचे अनेक नकली मॉडेल बाजारात आलेत.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं शोरुम, कंपनीच्या वेबसाईटवरुन किंवा मुंबईतल्या सीएसएमटीच्या कॅमेरा मार्केटमधूनच घ्यावा. तसंच कॅमेरा दाखवणाऱ्या व्यक्तीला सारख्या फिचर्सचे वेगवेगळ्या कंपनीचे कॅमेरेही दाखवायला सांगावेत. तसंच कोणीतरी ५ डी सांगितला म्हणून घ्यायला न जाता. प्रत्येक कॅमेऱ्यातला फरक समजून आणि त्याची गरज जाणूनच कॅमेरा घेतला पाहिजे. नाहीतर महागडा कॅमेरा पडून राहण्यात काही अर्थ नाही, असं सिनेमेटोग्राफर चिन्मय जाधवने सांगितलं.

मग आपणही यावर्षी नवा कॅमेरा घेऊन. नव्या आठवणींचा कोलाज नक्की करूया.

हेही वाचा: 

नाथ पै नावाचा झंझावात समजावून सांगणारी पुस्तकं

म्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी!

कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?

पंतप्रधानांना देशातल्या तिन्ही सैन्यदलांचा एकच प्रमुख का हवाय?