कशी करायची ई-लर्निंग प्लॅटफॉर्मची निवड?

१३ जुलै २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


शाळा बंद असताना मुलांकडून अभ्यास करून घेण्याचं ई लर्निंग हे एकमेव साधन पालकांकडे उरलंय. सध्या इंटरनेटवर ६०० पेक्षा जास्त ई लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. बायजू, नवनीतचं ईसेन्स, सीम्पली लर्न, खान अॅकॅडमी, असे काही प्लॅटफॉर्म भारतात लोकप्रिय आहेत. आता यातला नेमका कोणता प्लॅटफॉर्म किंवा अॅप आपल्या मुलांसाठी निवडायचं हाही मोठा प्रश्न पालकांपुढे आहे.

भारतात जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरू होतात. जुलैच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तर मुलांच्या चाचणी परीक्षाही झालेल्या असतात. यावर्षी मात्र जुलै महिना अर्धा संपत आला तरीही आपण शाळा सुरू करण्याचं नावं घेऊ शकत नाही. अनलॉक झालेली कित्येक शहरं कोरोना वायरसच्या वाढत्या प्रसारानं पुन्हा लॉकडाऊनमधे घालण्याचा सरकारचा विचार दिसतोय. अशात, शाळा सुरू करणं म्हणजे साथरोगाला पसरण्यासाठी मोकळं आमंत्रण देण्यासारखं आहे.

ही सगळी परिस्थिती पाहता मुलांच्या शाळा लवकर सुरू होणार नाहीत हे स्पष्ट दिसतंय. शाळा बंद असल्या तरी मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून अनेक शाळांनी ऑनलाईन क्लासही घ्यायला सुरवात केलीय. दिवसातून तीन ते चार तास हे क्लास चालतात. पण यात शिकवणारे शिक्षक हे टेक्नॉलॉजीत पारंगत असतीलच असं काही नाही. शिवाय प्रत्यक्ष वर्गात शिकवताना शिक्षक ज्या पद्धतींचा वापर करतात त्याच पद्धती घेऊन ऑनलाईन क्लास घेतला जात असेल तर त्य़ात त्रुटी राहणारंच. त्यामुळेच, शाळेच्या ऑनलाईन क्लासबरोबर अभ्यासात मदत करतील असे ई-लर्निंगचे अॅपलिकेशन किंवा प्लॅटफॉर्म आपल्या मुलांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पालक करतायत.

आपले पैसे गेले तरी चालतील पण हे ई-लर्निंग निदान शाळेइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त चांगल्या दर्जाचे असावं, असं पालकांना वाटत असणार. सध्या इंटरनेटवर ६०० पेक्षा जास्त ई-लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. बायजू, नवनीतचं ईसेन्स, सीम्पलीलर्न,खान अॅकॅडमी असे काही प्लॅटफॉर्म भारतात लोकप्रिय आहेत. आता यातला नेमका कोणता प्लॅटफॉर्म किंवा ऍप आपल्या मुलासाठी निवडायचं हाही मोठा प्रश्न पालकांपुढे आहेच.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

अॅप निवडणं लग्न करण्यासारखं आहे!

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ई-लर्निंग प्रोग्राम यावर संशोधन करणाऱ्या मेरी बर्न्स त्यांच्या ईलर्निंगइंडस्ट्री या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या लेखात सांगतात, ‘योग्य ई - लर्निंग प्लॅटफॉर्म निवडणं म्हणजे लग्न करण्यासारखं आहे. मात्र, असं लग्न करताना आपल्याला गरज वाटली तर त्या करारातून मोकळं होता यायला हवं, ‘घटस्फोट’ घेता यायला हवा.’ प्रत्येक प्लॅटफॉर्मची स्वतःची काही खासियत, काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टीही असतात. आपल्या मुलांसाठी कोणताही प्लॅटफॉर्म निवडण्याआधी तो प्लॅटफॉर्म आवडला नाही तर आपलं अर्थिक नुकसान न होता त्यातून बाहेर पडता येऊ शकतं की नाही हे सगळ्यात पहिले आपण बघायला हवं, असं बर्न्स यांचं म्हणणं आहे.

ही गोष्ट महत्त्वाची असली तरी एवढ्या एकाच गोष्टीचा विचार करून चालणार नाही. ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर कोर्स निवडायचा, पैसे भरायचे आणि कोर्स आवडला नाही तर त्यातून बाहेर पडायचं असं सारखंच होऊ लागलं तर मुलांचा अभ्यास कमी आणि आपले प्रयोगच जास्त होतील. म्हणूनच खूप विचार करून एकदाच मुलांसाठी चांगला प्लॅटफॉर्म निवडून द्यायला हवा. आता कोणता प्लॅटफॉर्म निवडायचा हे ठरवण्यासाठी काही निकष लावता येतील.

सगळ्यात पहिला निकष लावायचाय तो प्लॅटफॉर्मच्या वापराबद्दलचा. काही ई-लर्निंग प्लॅटफॉर्म फक्त इंटरनेटचा वापर करून साईटवर किंवा मोबाईल ऍपवर उघडता येतात. तर काहींसाठी आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलमधे सॉफ्टवेअर टाकून घ्यावं लागतं. हे सॉफ्टवेअर प्रकरण खर्चिक पडू शकतं. अनेकदा असे प्लॅटफॉर्म हाताळायला खूप अवघड वाटू शकतात. ते आपल्याला हाताळता येत असले तरी आपण नसताना आपल्या मुलांना ते वापरता येतील की नाही, हवं ते शोधता येईल की नाही याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. शिवाय, आपल्या मुलाच्या अभ्यासक्रमात असणाऱ्या गोष्टी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत की नाही हेही पहायला हवं.

मुलांची सोय पहावी

अभ्यासक्रम उपलब्ध असला तरी आपल्या मुलाला समजण्यासारखा आहे का याचा विचार केला पाहिजे. शिक्षण पद्धती कोणत्याही प्रकराची असो; मुलांना शिकण्यातून आनंद मिळायला हवा, हा शिक्षणाचा प्राथमिक नियम म्हटला जातो. तेच ई-लर्निंगलाही लागू होतं. ई-लर्निंग प्लॅटफॉर्म मुलांना हसत, खेळत, अभ्यासाचा जास्त ताण न देता शिकवतायत का, अवघड संकल्पना समजावून सांगण्यासाठी दाखवले जाणारे वीडियो, त्यातले शब्द आपल्या मुलांना समजण्यासारखे आहेत का हे सगळ्यात पहिले पहायला लागेल.

फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा काही प्रात्यक्षिकं, त्याचे वीडियो प्लॅटफॉर्मवर दाखवले जात असतील तर ते मुलांसाठी उपयोगी ठरेल. पण या प्रात्यक्षिकांमधेही आपलं मुलं किती रस घेईल, त्यात किती गुंतेल याचा विचार करून निवड करायला हवी. ठरवलेला अभ्यासक्रम वेगवेगळे खेळ, गाणी यांच्या माध्यमातून पूर्ण केला जात असेल तर मुलांना ते जास्त आवडेल. मुलं आवडीने अभ्यास करतील. पण या खेळ आणि गाण्यांमधे अभ्यास सोडून इतर गोष्टीच जास्त होत नाहीत नाही याचाही विचार करणं गरजेचं आहे.

अनेकदा एकच विषय वेगवेगळ्या इयत्तांना असतो. उदाहरणार्थ, चौथीच्या आणि नववीच्या अभ्यासक्रमातही शरीराचं विज्ञान शिकवतात. पण हे विज्ञान शिकवण्याची पद्धत वेगवेगळी असते. चौथीच्या मुलाला नववीतल्या मुलाला द्यायची माहिती देऊन चालणार नाही. त्यामुळेच प्लॅटफॉर्मवरचा अभ्यासक्रम नेमका कोणत्या वयाच्या मुलांसाठी आहे याची खातरजमा करून घ्यायला हवी.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

शिक्षक असणं गरजेचं

अभ्यासक्रम आपल्या आणि मुलाच्या वेळेत बसतोय की नाही हेही पहायला हवं. सकाळी ७ वाजता घरातल्या पालकांची ऑफिसला जाण्याची गडबड असेल आणि तेव्हाच मुलांच्या कोर्सची वेळ असेल तर दोन्ही एकाचवेळी सांभाळणं अवघड होतं. महत्त्वाचं म्हणजे, मुलांची सोय बघूनच कोर्स चालतो की नाही हे पहायला हवं. एखाद्या दिवशी आपलं मुल आजारी असेल आणि त्याचा कोर्स बुडाला तर तो भरून काढण्याची सोय आहे की नाही हेही बघता येईल.

आपण ई-लर्निंगचा कितीही जप केला तरी प्रशिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात समोरासमोर संवाद होणं गरजेचं आहे, हे आपण मान्य करायला हवं. वीडियो, पीपीटी, पीडीएफ, चित्रं यांच्या माध्यमातून मुलं चांगलं शिकतीलच. पण एखादी गोष्ट समजली नसेल किंवा मनात प्रश्न असतील तर ते विचारण्यासाठी एक तज्ञ व्यक्ती उपलब्ध आहे, असा विश्वास मुलांच्या मनात उत्पन्न व्हायला हवा. त्यासाठी शिक्षकांबरोबर रोज संवाद होणं गरजेचं आहे. ई-लर्निंगमधे हा संवाद गुगल मिट, झूम कॉलवर वगैरे होऊ शकतो. पण तशी सोय असलेले प्लॅटफॉर्मच आपल्याला निवडायचे आहेत हे लक्षात ठेवायला हवं.

हेच शिक्षक मुलांकडून घरचा अभ्यास करवून घेणार आहेत की नाही, त्या घरच्या अभ्यासाचं मुल्यमापन होणार आहे की नाही हेही पहायला हवं. यासोबतच ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर परीक्षा, छोट्या छोट्या टेस्ट व्हायला हव्यात. परीक्षा नसतील तर आपण ‘हे नेमकं का शिकायचं?’ असा प्रश्न मुलांना पडत रहाणार. शिक्षण परीक्षेसाठी नाही तर स्वतःच्या वाढीसाठी घ्यायचं असतं हे मुलांना समजावून सांगणं अवघड आहे. त्यामुळे परीक्षांचं अवडंबर करायला नको पण परीक्षा घेणारेच प्लॅटफॉर्म निवडायला हवेत. शिवाय, आपल्या मुलाला प्लॅटफॉर्मवर शिकवलेला अभ्यासक्रम कळतोय की नाही हे समजून घेण्याचा परीक्षा हा चांगला मार्ग असू शकतो.

डेटा सुरक्षितता महत्त्वाची

शाळा किंवा कॉलेज निवडताना आपण तिथे ग्रंथालय आहे की नाही, पुस्तकं आहेत की नाही हे पाहत असतो. तेच ऑनलाईन पोर्टलमधेही पहायला हवं. अनेक ई-लर्निंग प्लॅटफॉर्मची स्वतःची ऑनलाईन लायब्ररी असते. त्यात अनेक चांगली पुस्तकं पीडीएफमधे उपलब्ध असतात. कोर्स करताना अवांतर वाचन म्हणून ही पुस्तकं उपयोगी पडू शकतात. तेव्हा या ई-लर्निंग प्लॅटफॉर्म निवडताना या ऑनलाईन लायब्ररीतही एक फेरफटका मारून यायला हवा.

ई-लर्निंग प्लॅटफॉर्म निवडताना पहायची आणखी एक महत्त्वाची म्हणजे आपल्या डाटाची सुरक्षितता. तंत्रज्ञान विकसीत होतंय तसं त्याच्या सुरक्षिततेचे नवनवे प्रश्न उभे होतायत. त्यातही हे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आपली मुलं वापरणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. मुलांनी भरलेली माहिती, त्यांनी कुतूहलापोटी सर्च केलेली एखादी गोष्ट, मुलं कोणती पुस्तकं वाचतायत याची माहिती या सगळ्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. मुलांचा रस कशात आहे हे लक्षात घेऊन जहिरातींच्या माध्यमातून वेगवेगळी अमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढणं सोप्पं आहे. त्यामुळेच ई-लर्निंग प्लॅटफॉर्म किती सुरक्षित आहे, आपल्या लॅपटॉपमधल्या किंवा फोनमधल्या कोणकोणत्या गोष्टींची माहिती ते प्लॅटफॉर्म घेऊ शकणार आहे, हे तपासून मगच त्यावर शिक्कामोर्तब करणं योग्य ठरेल.

हेही वाचा : 

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?