लवमंत्रः मुलीने दिलेला प्रेमाचा नकार मुलानं कसा पचवावा?

१४ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


लहानपणापासून मुलांना लाडात वाढवलं जातं. लाडात वाढल्यामुळे त्यांना हवी ती वस्तू मिळते. त्यामुळे मुलगी हीसुद्धा एक वस्तू आहे असा त्यांचा समज होतो. मला ती आवडलीय त्यामुळे मला ती मिळालीच पाहिजे असं मुलांना वाटत असतं. एखाद्या मुलीनं प्रेमात नकार दिला तर त्या नकाराचा आपल्याला आदर करता यायला हवा. मर्दानगीच्या भ्रामक संकल्पनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे.

एखाद्या नात्यामधे मुलीचा नकार आला की काही मुलं अॅसिड फेकणं, जाळणं अशी पावलं उचलतात. कधी कधी काही मुलं स्वत:चीही नस कापून घेण्यासारखे प्रकार करतात. नकार पचवण्यासाठी मुलांनी आधी स्वत:ला समजवायला हवं. मुलगी एक माणूस आहे आणि मुलगा म्हणजेच पुरुषही एक माणूसच आहे. त्याला वाटलेलं तो सगळं काही करुच शकेल किंवा त्याला आपल्याला हवं ते सगळं काही आयुष्यात मिळेल असं समजून त्यानं चालू नये.

लहानपणापासून मुलांना लाडात वाढवलं जातं. लाडात वाढल्यामुळे त्यांना हवी ती वस्तू मिळते. त्यामुळे मुलगी हीसुद्धा एक वस्तू आहे असा त्यांचा समज होतो. मला ती आवडलीय त्यामुळे मला ती मिळालीच पाहिजे असं मुलांना वाटत असतं. मुळात पुरुषांनी आधी हे समजून घ्यायला हवं की केवळ एक वस्तू नाहीय.

त्रास देण्यात प्रेम कुठून आलं?

‘चीज बडी है मस्त मस्त’ अशी गाणी आपल्या आजूबाजूला वाजत असतात. आपल्यावर माध्यमांचा प्रभाव खूप असतो. माध्यमांमधून जे हिरोगिरी आपल्याला शिकवली जाते त्या हिरोतलं बरंचसं आपण आपल्यासाठी स्वीकारतो. मुलींचा पाठलाग करणं, मुलींची छेडछाड काढणं हे आपणं व्यवहारात करत असतो. सिनेमांमधे हे पहिल्यांदा रोमॅंटीक वगैरे असतं. आधी ती नाही म्हणते आणि शेवटी ती हो म्हणते. पण आपल्या रोजच्या जगण्यात असं काही घडत नाही हे आपण स्वत:ला समजवायला हवं. ‘नो मिन्स नो’ हे पिंक सिनेमातलं वाक्य. जे याधीही बोललं गेलंय हे आपण पुरुषांनी, मुलांनी समजून घ्यायला हवं.

मुलगी ही माणूस आहे ती वस्तू नाही. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला प्रपोज केलं, आपल्या कोणी मागं लागलं, आपल्याला कोणी त्रास दिला तर आपण काय करु? या कटकटीपासून आपली सुटका कधी होईल असाच विचार आपण करु ना? आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला कोणी त्रास दिला तर आपल्याला काय वाटेल तसंच त्या मुलीला पण वाटेल. त्रास देण्याची भावना हे प्रेम नक्कीच नाही.

मर्दानगी ही तर फेक गोष्ट आहे!

आपण हिंगणघाटच्या प्रकरणाकडे पाहिलं तर ही गोष्ट कळून येईल. एखादी मुलगी नाही म्हणाली म्हणून मला नाही तर कुणालाच नको म्हणत हिंसक होणं खूप घातक आहे. तुझ्याकडे कुणाला बघावंही वाटणार नाही. बघितलं तर वाईट वाटेल, घाण वाटेल, तिरस्कार वाटेल अशी तुझ्या शरीराची मी अवस्था करेन असं वाटणं हे आपण संवेदनशील माणूस नसल्याचं लक्षण आहे. आपण बाईकडे, स्त्रीकडे माणूस म्हणून बघत नसल्याचं हे लक्षण आहे. आपल्या बहिणीवर कुणी काय टाकलं तर आपण त्याकडे कसं बघू? असे प्रश्न पडायला हवेत.

आपल्या बहिणीला काय झालं तर मग भाऊ म्हणून, पुरुष म्हणून आपण खूपच जागरुक असतो. माझ्या बहिणीला असं कुणी करता कामा नये, असंच आपल्या वाटत राहतं. सैराटमधे आर्ची आणि परशा प्रेम करतात. परशाला मारहाण करणं, आर्चीला मारहाण करणं त्यांना मारुन टाकणं हे कोण करत तर भाऊच करतो. आपल्यामधे मर्दानगीची संकल्पना खोलवर भिनलेली आहे. आणि मर्गानगी ही फेक गोष्ट आहे.

पुरुषाला माणूस म्हणून वाढण्यापेक्षा मर्द म्हणून घडवलं जातं. लहानपणापासून त्यांना बंदुका दिल्या जातात. धडाधड धडका मारणाऱ्या म्हणजेच हिंसेचे धडे देणाऱ्या कार दिल्या जातात. मुलीला मात्र बाहुली दिली जाते. यातून पुरुषामधे पुरुषत्वाच्या आणि बायकांमधे स्त्रीत्वाचं बीजारोपण केलं जातं. हे आपण लक्षात घ्यायला हवं.

हेही वाचाः एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?

आपण हिरो नाही, तर माणूस आहोत!

बाईकडे आपण माणूस म्हणून बघतोय का हे स्वत:ला विचारायला हवं. तिलाही नकाराचा अधिकार आहे त्यामुळे तिच्या नकाराचा आदर करायला हवा. नकाराचा आदर करत नाही ते प्रेम कसं असू शकतं? प्रेमामधे समोरच्या व्यक्तीबद्दल आस्था, काळजी असायला हवी. तिने नकार दिल्यावरही तो पचवायची ताकद ठेवायला लागते.

नकार मिळाल्यावर हिंदी सिनेमातले हिरो टिपिकली दारुत दु:ख बुडवतात. तसं आपल्याला करुन चालणार नाही. राजेश खन्ना दारु पितोय. ये लाल रंग कब मुझे छोडेगा आणि हेमामालिनी त्याच्याकडे अश्रू भरल्या नजरेनं बघते. असं आपल्या आयुष्यात घडणार नसतं हे आपण समजवायला पाहिजे. आपण हिरो नाही आहोत. आपण नायकही नाही आहोत. आपण माणूस आहोत हे स्वत:ला समजावलं पाहिजे. या मर्दानगीच्या भ्रामक संकल्पनांपासून आपण दूर राहीलं पाहिजे. 

नकार कसा स्वीकारायचा?

आपल्याला कुणी नकार दिला तर धक्का बसणं साहजिक आहे. पण तो नकार दिला तर त्या व्यक्तीचा चॉईस दुसरा काही असू शकतो किंवा त्या व्यक्तीला दुसरं कुणी आवडलेलं असू शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नकार आपल्याला ताबडतोब नाही स्वीकारता आला तर त्याक्षणी आपण तिथे स्वत:ला कंट्रोल केलं पाहिजे. भावनेच्या भरामधे आपण कोणताही निर्णय घेता नये. दुख झालेलं असताना, त्रास झालेला असताना, आनंद झालेला असताना आपण या कोणत्याही भावनेच्या भरात निर्णय घ्यायचा नाही हे आपण समजावलं पाहिजे.

स्वत:ला कुलिंग टाईम दिला पाहिजे. परिस्थितीचा शांतपणे विचार केला पाहिजे. या मुद्दयांबद्दल संवेदनशील असतील अशा आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोललं पाहिजे. बेसिकली स्त्रिया माणूस आहेत. पुरुषप्रधान व्यवस्थेमधे बाईला चीज, माल, वस्तू मानलं जातं. पुरुषाच्या लैंगिक सुखाचं साधन मानलं जातं. तिच्या माणूसपणाचा पहिल्यांदा मानसिक, भावनिक आणि वैचारिक पातळीवर स्वीकार केला पाहिजे. आपलीही अधिक चांगल्या माणूसपणाकडे वाटचाल केली पाहिजे.

नकार पालकांनीही स्वीकारायला हवा

गडचिरोलीमधे एका मुलीनं आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे तिच्या आई वडील आणि भावाने आत्महत्या केली. इच्छेविरुद्ध असल्यामुळे इथं मुलगी आईवडिलांच्या इच्छेला नकार देतेय. पालकांनी हे समजून घ्यायला लागेल की मुलांना आपापले जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. आपल्याकडे आंतरजातीय लग्नांच्या ज्या घटना असतात त्यांना पोलिस स्टेशनमधे घेऊन गेल्यावर पोलिस म्हणतात, ‘आईवडिलांनी आपल्यासाठी एवढं केलं आपण तेवढं ऐकायला नको का?’

आपण आईवडिलांचा आदर केलाच पाहिजे. पण जोडीदार मात्र आपण आपला निवडला पाहिजे. आपली मुलं विचारपूर्वक आपला जोडीदार निवडत असतील आणि पालक जबरदस्तीने करत असलेल्या निवडीला नकार देत असतील तर तो नकार पालकांनीही स्वीकारायला हवा. आपल्याकडे ऑनर किलिंगचं प्रमाण मोठं आहे. पालक आपल्या मुलांचा नकार स्विकारु शकत नाहीत. त्यांच्या या अशा इच्छा आकांक्षा इथल्या पितृसत्ताक आणि जातीव्यवस्थेमुळे तयार झाल्यात.

हेही वाचाः 

‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!

आपण स्वतःवर प्रेम करायला कधी आणि कसं शिकणार?

(लेखक हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.)