कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

१६ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रत्येक मानवी मृतदेहाची नीट विल्हेवाट लावली पाहिजे, हा माणसाचा मुलभूत अधिकारच आहे. पण सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या देहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक कचरताहेत. अशा मृतदेहामुळे कोरोना वायरस आपल्यात येईल, अशी भीती लोकांना वाटतेय. पण कुठलाही गैरसमज करून घेण्याआधी आपण डब्लूएचओने दिलेल्या गाईडलाइन्स तपासल्या पाहिजेत.

काही वर्षांपूर्वी आफ्रिकेत इबोला नावाच्या विषाणूचा असाच प्रसार होत होता. कोरोनाप्रमाणेच हा इबोला रुग्णाच्या शरीरात सर्दी किंवा खोकल्याच्या मार्गे पसरत असे. पण फक्त एवढंच नाही तर रुग्णाचा घाम, थुंकी, मल, रक्त डोळ्यातल्या पाण्यातही इबोलाचे विषाणू असतात. त्यामुळे इबोलाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला योग्य उपचार मिळाले नाहीत तर त्याचा मृत्यू अटळ आहे, असंच समजलं जायचं. शिवाय, त्यावेळी आफ्रिकेत इबोलाबद्दल अनेक गैरसमजही पसरले होते. या अफवांमुळेच इबोला संसर्गानं मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या देहाची नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावली. त्यामुळे विषाणूंचा प्रसार कमी होण्याऐवजी आणखी वाढला, असं एका संशोधनातून समोर आलं.

आता कोरोना संसर्गानं मृत्युमुखी पडलेल्यांच्या देहांबद्दलही असे गैरसमज समोर येत आहेत. भारतात कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत दोघांचा जीव गेलाय. आपल्याकडे भारतात मृत व्यक्तीच्या धर्मानुसार त्याचे नातेवाईक मृतदेहावर अंतिम संस्कार करतात. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात मृतदेह दफन करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात मृतदेहाला अग्नी दिला जातो.

धर्म कुठला का असेन माणसाच्या मृतदेहावर सन्मानानं अंत्यसंस्कार केले जायला हवेत, हा प्रत्येक माणसाचा मुलभूत हक्कच म्हणता येईल. बेवारस असो किंवा कुठल्यातरी रोगाने ग्रासलेला असो. त्या मृतदेहाची नीट विल्हेवाट लावली गेलीच पाहिजे. 

हेही वाचा : १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?

मृतदेह जाळला तर काय होईल?

पण कोरोनाच्या संसर्गानं मृत्यू पावलेला मानवी देह जाळला तर त्या वाफेतून कोरोनाचे विषाणू हवेत पसरतील, अशी भीती व्यक्त केली जातेय. अगोदरच अफवाबाजीमुळे कोरोनाबद्दल गैरसमज पसरलेत. त्यातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबद्दलचा नवा संभ्रम तयार झालाय.

‘द लल्लनटॉप’ने दिलेल्या एका बातमीनुसार, १३ मार्चला दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधे कोरोना संसर्गामुळे एका बाईचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचं काय करायचं असा प्रश्न होता. नातेवाईकांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे आमच्यावरवर सोपवून द्यावं, असं हॉस्पिटल प्रशासनाच्या मनात होतं. तर त्या महिलेच्या मृतदेहावर आपल्या पद्धतीप्रमाणे लाकडावर जाळून अंत्यसंस्कार व्हावात, असं नातेवाईकांच्या मनात होतं.

शेवटी आग्रहाखातर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. पण दिल्लीच्या कुठल्याच स्मशानभूमीत प्रेताला अग्नी देण्याची परवानगी दिली जात नव्हती. शेवटी, सीएनजी स्मशानभूमीत इलेक्ट्रिक मशीनमधे मृतदेह जाळण्यात आला. ‘अंत्यसंस्काराच्या बाबतीत काहीही गोंधळ नाही. साध्या माणसासाठी जसं केलं जातं तसंच याही केसमधे केलं जावं. हा वायरस हवेतून पसरत नाही. आणि मुळात खूप उष्णता असेल तर तो मरतो. त्यामुळे मृतदेह जाळण्यात काहीही गैर नाही,’ असं दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले.

दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी ‘हा वायरस मृतदेहातून पसरू शकत नाही. हा श्वसन संस्थेतल्या द्रव्यांपासून म्हणजे कफ, लाळ इत्यादीतून पसरू शकतो. खोकला किंवा शिंक ही याची प्रमूख कारणं आहेत. त्यामुळे मृतदेहावर अंत्य संस्कार करण्यात काहीही धोका नाही,’ असं स्पष्ट केलं.

हेही वाचा : अविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय?

धोका फक्त संसर्गित मतदेहापासूनच?

खरंतर, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या शरीराचं विघटन व्हायला सुरवात होते. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर कोरोना किंवा इतर संसर्गजन्य आजार झालेला असो किंवा नसो सगळ्याच मृतदेहापासून इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. पण कोरोना, इबोला, कॉलरा अशा मोठ्या आजारांमुळे मृत्यू पावलेल्या देहांपासून जास्त धोका असतो. त्यामुळेच त्यासाठी एक प्रक्रिया राबवावी लागते.

‘इतरही इन्फेक्शनमधे मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. तिच पद्धत इथं वापरावी लागेल. एचआयवी, सेप्टिसीमिया, टीबी असे रोग झालेल्या मृतदेहावर अंत्य संस्कार करताना जी प्रक्रिया वापरली जाते तिच प्रक्रिया कोरोना संक्रमित मृतदेहासाठी वापरावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. के. अग्रवाल यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : कोरोना: रँडच्या वधाला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू

मृतदेह जाळायचा की पुरायचा?

डब्लूएचओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गाईडालाईन्सनुसार, विषाणूंनी संक्रमित झालेल्या मृतदेहाला आधी डिसइन्फेक्टेड करावं लागेल. म्हणजेच त्या मृतदेहाचं निर्जंतुकीकरण करावं लागेल. त्यासाठी काही औषधांचा थर मृतदेहाच्या शरीरावर चढवला जातो. त्यानंतर हा मृतदेह सील म्हणजेच हवाबंद केला जातो. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा सूट वापरला जातो.

आणि मगच हा मृतदेह अंत्य संस्कारासाठी नेण्याची परवानगी देता येते शिवाय, अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्लाही या गाईडलाईनमधे देण्यात आलाय. खांद्यावरून अंतिम यात्रा काढण्याऐवजी स्ट्रेचरवरून नेण्यात यावं. उष्णतेमुळे हा वायरस नष्ट होतो. त्यामुळे मृतदेह जाळणं जास्त योग्य राहील. पण मृतदेह पुरण्यातही काही गैर नाही, असंही सांगण्यात आलंय.

या सगळ्यात मृतदेहाच्या नातेवाईकांच्या आणि मृतदेह हाताळणाऱ्या सगळ्यांच्याच आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हॉस्पिटल स्टाफपासून ते स्मशानभूमीमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही विचार करायला हवा. प्रत्यक्ष मृतदेहाशी कुणालाही संपर्क करण्याची वेळ येऊ नये, याची काळजी घ्यायला हवी.

हेही वाचा : 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार

माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?

कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस