आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!

१२ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्मलेल्या कोरोना वायरसनं सगळ्या जगाला डोकेदुखी करून ठेवलीय. एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे गोमूत्र किंवा कापूराच्या धुरानं कोरोना मरतो अशा अफवा पसरवल्या जातायत. पण मुळात कोरोना वायरस हा सजीव नसतोच. मग जो जिवंतच नाही तो मरेल कसा?

‘कोरोना वायरस यांव केल्यानं मरेल आणि त्यांव केल्यानं जगेल’ असं सगळे बोलत असतात. पण कोरोना वायरस किंवा कोणताही वायरस कशानेही मरू शकत नाही. कारण  वायरस हा सजीव नसतोच! वायरस हा एक बायो पार्टीकल म्हणजे जैविक कण आहे.

शिंपल्यात एखादा वाळूचा कण गेल्यावर शिंपल्यातलंच मटेरियल वापरून त्याचा मोती बनतो, तसंच कोणत्याही पेशीत हा वायरस नावाचा कण गेला की त्याच्या अनेक कॉपी तयार होतात. वॉट्सअप, फेसबुकवरच्या पोस्ट जशा खूप कॉपी पेस्ट होतात ना तसंच! वायरस स्वतः प्रजनन करत नाही. तर तो एका पेशीत घुसतो आणि ती पेशीच त्याच्या खूप कॉप्या तयार करते.

पेशीच्या कुलूपाची चावी वायरसकडे असते

वायरस हा एक छोटासा डीएनए किंवा आरएनए असलेला एक कण असतो. त्यावर प्रोटीनचं एक संरक्षक आवरण असतं. ते प्रोटीनचं आवरण किती मजबूत आहे किंवा त्याचा आकार कसा आहे यावरून हे आवरण माणसातल्या शरीरातल्या कोणत्या पेशीशी समर्पक किंवा मिळतंजुळतं आहे हे ठरतं. जर हे आवरण जुळलं तर वायरस त्या पेशीत संक्रमित होतो. नाही जुळलं तर दुसरी पेशी शोधतो.

सोप्या भाषेत सांगायचं, तर या कोरोना नावाच्या वायरसला काट्या काट्यांचं आवरण असतं. आपल्या शरीरातल्या काही पेशींनाही असं आवरण असतं. त्यामुळे कोरोना पेशीत घुसू शकतो. थोडक्यात, पेशींच्या कुलूपाची चावी कोरोना वायरसकडे असते.

आपल्या पेशी नेहमी आपल्या डीएनएच्या कॉपी बनवत असतात. तेच मेकॅनिजम वापरून एखादा वायरस पेशीत गेल्यावर तिथलं डीएनए किंवा आरएनए मटेरियल वापरून स्वतःच्या खूप कॉपी बनवतो. ही प्रत्येक कॉपी म्हणजे एक नवा वायरस कणच असतो. आणि मग पेशीतलं मटेरियल संपलं की पेशींची वॉल फोडून हे सर्व वायरस कण बाहेर येतात. शरीरातील इतर पेशींत घुसून त्यांनाही मारतात.

हेही वाचा : कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय

जिवंतच नाही त्याला मारणार कसं?

अशा प्रकारे मग अनेक पेशी बाधित झाल्या की पेशींचा मालक आजारी पडतो. या मालकाला म्हणजे पेशींत वायरस संक्रमित झाला आहे त्या प्राण्याला ‘होस्ट’ असं म्हणतात. होस्ट म्हणजे पाहुणचार करणारा. काही वायरसचा डीएनए हा होस्टच्या डीएनए सिक्वेन्समधे घुसून त्या प्राण्यातच जेनेटिक चेंज आणू शकतो. हा जेनेटिक चेंज पुढच्या कित्येक पिढ्यांत ट्रान्सफर होतो. किंबहुना एखादा वायरस नेमका कधी अस्तित्वात आला हे प्राण्यांच्या डीएनएतल्या या बदलावरूनच कळतं.

मुळात वायरस हा सजीवच नाही. त्यामुळे त्याला कोणत्याही औषधाने किंवा गोमूत्र, कापूर, धुरी किंवा पेस्टीसाईडनेही मारता येऊ शकत नाही. जो जिंदा ही नही है उसे कैसे मारोगे? वायरस सजीव नसल्याने तो मरूच शकत नाही. काहीही सांगता का? वायरस मरुच शकत नाही तर डॉक्टर औषधे देतात, कोरोनाची लस शोधण्यासाठी पराकाष्ठा चालू आहे ती कशाला?

मुळात या वायरसचं बाह्य प्रोटीन आवरण नष्ट झालं तर वायरसही नष्ट होतो. हे आवरण हवा, पाणी, साबण, उच्च तापमान, ऊन अशा गोष्टींमुळे नष्ट होऊ शकतं. होस्टच मिळाला नाही की एखादा वायरस जगातूनच नष्ट होतो.

लस वायरसला रोखून धरू शकते

आता वायरसला प्रतिबंध करणारी लस कशी काम करते हे पाहण्याआधी वायरस कसा काम करतो ते पाहू. आधी वायरस शरीराच्या पेशीच्या वॉल वर रिसेप्टर्स असतात तिथं बॉण्ड बनवतो आणि तिथं चिकटून राहतो. त्या रिसेप्टर्समधून हळूच पेशींच्या आत जातो. आत तो आपल्या डीएनएच्या स्ट्रेण्डचा प्रति डीएनए स्ट्रेण्ड म्हणजे डीएनएची एक पट्टी बनवतो. हे स्ट्रेण्ड मग सेपरेट होऊन अजून स्ट्रेण्ड बनवतात.

हा प्रत्येक स्ट्रेण्ड मग एक नवा वायरस बनतो. मग या नव्या बनलेल्या वायरस कणांची भरपूर संख्या झाली की हे वायरस त्या पेशींची वॉल तोडून बाहेर येतात. बाजूच्या पेशींच्या रिसेप्टर्सवर जाऊन चिकटतात आणि त्यांना संक्रमित करतात. लस या सगळ्या स्टेप्सपैकी कोणत्याही एका स्टेपवर वायरसला ब्लॉक करते.

हे ब्लॉकिंग रिसेप्टर्सवर असू शकतं.  वायरसला पहिल्या पायरीवरच थांबवणारी ही लस असू शकते. वायरसचं रिसेप्टर्सशी बॉंडींगच होणार नाही अशी केमिकल्स लसीत घातली तर हे शक्य होतं. काही लसी वायरसच्या डीएनएला केमिकल्सनी रोखून प्रति डीएनए स्ट्रेण्ड बनवू देत नाहीत. काही लसी वायरसला वॉल तोडून बाहेर येऊ देत नाहीत. काही लसी वायरसचा डीएनएच डॅमेज करून टाकतात आणि मग तो कॉपी होत नाही. अशा प्रकारे लस काम करते.

हेही वाचा : एका वायरसने जग कसं हादरवलं?

कोरोनावर लस का येत नाही?

आत्ताचा कोरोना कोविड-19 हा नवा वायरस आहे. हा नव्यानेच आलाय. डिसेंबर २०१९ च्या आधी कुणालाही या वायरसची लागण झाली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर कधी कुणी संशोधनंही केलं नव्हतं. संशोधन नसल्यामुळे त्याचे नेमके प्रोटीन्स आणि रिसेप्टर्सचे बॉण्ड कसे असतात, तो नेमका कोणकोणत्या मेकॅनीजमने शरीरात जातो किंवा नेमक्या कोणत्या केमिकल्सनी तो डीएनए रेप्लिकेट बनवतोय तेच अजून कळत नाहीय.

संशोधन झाल्यावर या गोष्टी कळतील. मग लस बनवली जाईल. पण कोणते केमिकल्स त्याच्या कोणत्या स्टेपला रोखू शकतील हे शोधायलाही वेळ लागेल. म्हणूनच कोरोनाची लस लवकर बनवली जाऊ शकत नाही.

वायरस हे सहसा प्राण्यांतून माणसांत येतात. वायरस हे मुख्यत्वे होस्ट स्पेसिफिक असतात. त्यामुळे एका प्रजातीच्या प्राण्याला लागण झालेल्या वायरसची दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याला किंवा माणसाला लागण होईलच असं नाही. मात्र एका प्रजातीत असताना वायरसच्या डीएनएमध्ये काही बदल झाला आणि हा बदल एखाद्या दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याच्या शरीराशी संलग्न होण्यास योग्य असेल तर मात्र हा वायरस दुसऱ्या प्राण्यात संक्रमित होऊ शकतो.

कोरोना चीनने तयार केला नाही

आताच्या कोविड-19 चे साधर्म्य वटवाघळं आणि खवल्या मांजरात असणाऱ्या कोरोना वायरसशी आढळले आहे. वायरस तयार करण्याइतकी टेक्नॉलॉजी अद्याप विकसित झालेली नाही त्यामुळे चीनने हा वायरस तयार केला असेल हे खरं नाही. बाकी तो लॅब मधून चुकून बाहेर गेला असू शकतो. पण तीही शक्यता कमी आहे. 

सध्याच्या परिस्थितीत हा वायरस जेनेटिक बदल होऊन वटवाघूळांतून खवल्या मांजरांत गेला आणि खवल्या मांजरांतल्या वायरसमधे जेनेटिक बदल होऊन तो माणसांत आला अशी जास्त शक्यता आहे. मांस शिजवून खाल्ल्याने वायरस सहसा नष्ट होतात हे खरं आहे. कच्च्या मांसालाही गरम पाण्यात टाकून मग धुवावं आणि मग शिजवून खावं.

वायरस असलेल्या पृष्ठभागाला किंवा गोष्टीला स्पर्श केल्यानं काही वायरसची लागण होऊ शकते. मात्र नव्या कोरोनाचे संक्रमण अशा प्रकारे होते का हे अद्याप आपल्याला नेमकं माहीत नाही. उन्हाळ्यातल्या तापमानाने काही वायरसचं प्रोटीन नष्ट होऊन ते वायरस नष्ट होतात. पण कोविड-19 कोरोना हा आताच आला असल्याने उन्हाळ्यात तो वाढतो की नष्ट होतो, हेही आपल्याला सांगता येऊ शकत नाही.

हेही वाचा : कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

आपल्याला फक्त काळजी घ्यायचंय!

हात चांगल्या सॅनिटायजरने धुतल्याने वायरसचे प्रोटीन कवच नष्ट होऊन वायरस नष्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त कुठंही अनावश्यक स्पर्श न करणं, कुणी शिंकत किंवा खोकत असेल तर त्याच्यापासून ३ फुट दुर राहणं हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. कोरोना हवेतून पसरत नाही, शिंक किंवा खोकल्याच्या तुषारांतून पसरतो. म्हणून शिंकणाऱ्या किंवा खोकणाऱ्या माणसापासून ३ फूट दूर राहिले पाहीजे. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो. 

आपण स्वतः आजारी असू किंवा आजारी माणसाची सेवा करत असू तरच मास्क वापरावा असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्लूएचओने सांगितलंय. अन्यथा उगीच मास्क वापरू नये. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो. कोरोनाचा मॉर्टेलिटी रेट हा ३.४ टक्के आहे. म्हणजे हा आजार १००० माणसांना झाला तर त्यातल्या ३४ माणसांचा मृत्यू होऊ शकतो. त्यातही म्हाताऱ्या माणसांना जास्त रिस्क आहे. ८० पेक्षा जास्त वय असणाऱ्यात हा रेट १५ टक्के आहे. मात्र हा दर अजून कमी होईल असं डब्लूएचओचं म्हणणं आहे.

सार्स या आजाराचा मृत्युदर १० टक्के आणि मर्सचा 34% इतका म्हणजे कोरोनाच्या दहापट जास्त होता. जास्त पसरणाऱ्या आजाराचा मृत्युदर कमी असतो आणि कमी पसरणाऱ्या आजाराचा मृत्युदर जास्त असतो, असा वायरसने होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा एक ढोबळ नियम असा आहे.

स्वच्छता राखणं, लक्षणं दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणं, खोकताना आणि शिंकताना नाक तोंड रुमालानं अथवा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की आपण कोरोनापासून वाचू शकतो.

हेही वाचा : 

माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?

जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?

धार्मिक हिंसाचाराचाही आपल्या इकॉनॉमीला फटका बसेलः मनमोहन सिंग

पापपुण्याची पायरी ओलांडून केरळने कसा बनवला ब्रेन डेथबाबत कायदा?

सरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला

(लेखक हे शास्त्रज्ञ, ब्लॉगर आहेत.. फेसबूकवर लिहिलेल्या त्यांच्या पोस्टचा हा संपादित अंश आहे.)