कोरोना वायरस लसीच्या प्रयोगात सहभाग कसा घ्यायचा?

३१ जुलै २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोरोना वायरसची साथ संपवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे लसीकरण. त्यामुळेच जगातल्या अनेक संस्था कोरोनाची लस शोधण्याचा प्रयत्न करतायत. अंतीम टप्प्यात आलेल्या या संशोधनात माणसांवर प्रयोग केले जातात. मग या प्रयोगात आपल्यालाही भाग घेण्याची संधी आपल्याला मिळाली तर?

जगातल्या वेगवेगळ्या संस्था कोरोना वायरसविरोधातली लस शोधण्याच्या मागावर आहेत. फेब्रुवारीमधे वायरसने धुमाकूळ घालायला सुरूवात केली तेव्हापासूनच संशोधकांनी त्या विरोधातली लस शोधण्याचे प्रयत्न चालू केले होते. हे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आहेत, असं म्हणायला हरकत नाही. या अंतिम टप्प्यात लसीचा प्रयोग माणसांवर केला जातो आणि लस घेतल्यानंतर माणसांवर त्याचे काही इतर परिणाम तर होत नाहीत ना किंवा लस घेतल्यानंतर ते वायरसशी किती चांगल्या पद्धतीने लढू शकतात याची चाचणी केली जाते.

परदेशातल्या अनेक संस्थांनी केलेल्या मानवी प्रयोगाचे फोटो आपण पाहतो. त्या माणसांविषयी आपल्या मनात फार आदरही दाटून येतो. प्रयोगात भाग घेणारी ही माणसं म्हणजे खरंतर तुमच्या माझ्यासारखी सामान्य नागरिकच असतात. त्यांच्यासारखीच प्रयोगात भाग घेण्याची संधी आपल्याला मिळाली तर?

हेही वाचा :  कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोवॅक्सिनची प्रगती

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर या सरकारी संस्थेकडून कोरोना वायरसविरोधातल्या लसीची मानवी चाचणी होणार आहे. कोवॅक्सिन असं या लसीचं नाव असेल. कोणत्याही लसीचा मानवी प्रयोग एकूण ३ टप्प्यात पार पाडला जातो. कोवॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या प्रयोगाला ड्रग कंट्रोलर जनरेशन ऑफ इंडिया या संस्थेनं मान्यता दिलीय. देशातल्या १२ हॉस्पिटलमधे हा प्रयोग पार पाडला जाईल. १८ ते ५५ या वयातले स्वयंसेवक या प्रयोगासाठी लागणार आहेत.

हैदराबाद, रोहतक, पटना, कांचीपुरम, दिल्ली, गोवा आणि भूबनेश्वर या शहरात प्रयोग चालूही झालेत. प्रयोगाचा पहिला टप्पा १७ जुलैला सुरू झालाय. या टप्प्यात ५० लोकांना लसीचा डोस देण्यात आलाय. या स्वयंसेवकांवर त्याचा कोणताही परिणाम किंवा साईड इफेक्ट दिसला नाही अशी माहिती या लसीच्या प्रयोगावर काम करण्याऱ्या संशोधक डॉक्टर सविता वर्मा यांनी एएनआयशी बोलताना दिली. आता या प्रयोगाचा दुसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे. त्यात ७५० स्वयंसेवकांना सामील करून घेतलं जाईल.

ही लस दिल्यानंतर स्वयंसेवकांवर खूप लक्ष ठेवायला लागतं. त्यांना काही त्रास होत नाहीय ना याची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. काही त्रास चालू झालाच तर त्यांना लगेचच औषध पाणी पुरवावं लागतं. त्यामुळेच प्रयोगात भाग घेण्यासाठी शक्यतो ज्या भागात लसीचा प्रयोग होणार आहे त्याच भागातल्या लोकांना सामील करून घेतलं जातं.

सहभाग कसा घ्यायचा?

अशा प्रकारच्या प्रत्येक प्रयोगात कुणाला घ्यायचं आणि कुणाला घ्यायचं नाही याचे पक्के मापदंड ठरलेले असतात. कोवॅक्सिनच्या प्रयोगात १८ ते ५५ या वयोगटातल्या लोकांनाच घेतलं जाणार आहे. त्यातही स्वंयसेवकाला डायबेटिस, बीपी, हायपरटेन्शन, हृदयरोग, फुफ्फुसाचा आजार, अस्थमा, कॅन्सर किंवा एखाद्या औषधापासून ऍलर्जी असं काही नसेल तरच त्याला लस टोचली जाते. गरोदर बायका, लहान मुलं किंवा म्हाताऱ्या माणसांना प्रयोगात अजिबात घेतलं जात नाही. शिवाय, तुम्ही इतर औषधं किंवा खेळाडूंना लागतात तशी संप्रेरकं घेत नाही ना हेही पाहिलं जातं.

यापैकी कोणताही त्रास नसणारी व्यक्ती लसीच्या प्रयोगात भाग घेण्यासाठी हॉस्पिटलच्या फोन नंबरवर फोन करावा लागतो. हे फोन नंबर आणि हॉस्पिटलची माहिती त्या त्या हॉस्पिटल्या वेबसाईटवर उपलब्ध असते. अनेकदा पेपरमधे किंवा न्यूज चॅनेलवरूनही ही माहिती पुरवली जाते. अनेकदा हॉस्पिटलच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनाही याची माहिती दिली जाते.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

हॉस्पिटल बळजबरी करू शकत नाही

लसीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याआधी हॉस्पिटल आपल्याकडून एक फॉर्म भरून घेतं. इन्फॉर्म्ड कन्सेण्ट फॉर्म असं याचं नाव असतं. थोडक्यात, कोरोना वायरसच्या लसीचा प्रयोग माझ्या शरीरावर करण्याची परवागनी आहे, असंच आपण हॉस्पिटलला लिहून देतो. हा फॉर्म भरण्याआधी प्रयोगाविषयी सगळी माहिती दिली जाते. लस कशी आहे, कधी दिली जाईल, कोण देणार, काय परिणाम होऊ शकतात, तसं झालं तर काय केलं जाईल इत्यादी सगळी माहिती सांगिण्यात येते.

फॉर्म घेऊन त्यांना घरी जायचं असेल आणि वाचून नंतर जमा करायचा असेल तर तसंही करण्याची परवागनी असते. एकदा का स्वयंसेवक प्रयोगासाठी तयार झाला की त्याकडून फॉर्मसोबत आधार कार्ड मागवून नोंदणी केली जाते. स्वयंसेवकांची सगळी माहिती गुप्त ठेवण्याची जबाबदारी हॉस्पिटल प्रशासनाची असते. महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही माणसाला जगातलं कोणतंही हॉस्पिटल लसीच्या प्रयोगात भाग घेण्याची बळजबरी करू शकत नाही.

प्रयोगात भाग घेतल्याबद्दल पैसे मिळतात?

निवडलेल्या स्वंयसेवकांची वैद्यकीय चाचणीही केली जाते. त्यांचं स्क्रिनिंग होतं. ब्लड टेस्ट, युरीन टेस्ट आणि कोरोनाची स्वॅब टेस्ट केली जाते. या सगळ्याचे रिपोर्ट नॉर्मल आले तरच त्यांना लसीच्या प्रयोगासाठी बोलवलं जातं. 

महत्त्वाचं म्हणजे, नियमानुसार स्वयंसेवाकाला येण्या जाण्याचा खर्च द्यावा लागतो. अनेकदा लस बनवणाऱ्या कंपनीकडून त्यांना प्रयोगात भाग घेतल्याबद्दल रोख मानधनही देण्यात येतं. ड्रग कंट्रोलर जनरेशन ऑफ इंडिया हे मानधन ठरवते. पटनामधे एका स्वयंसेवकाला प्रत्येक भेटीमागे १००० रूप मिळत असल्याची माहिती द क्विंटच्या एका लेखात देण्यात आलीय.

या पैशामुळे अनेकदा गरीब लोक जीवाची पर्वा न करता लस टोचून घ्यायला तयार होतात. प्रशासनाकडून निरोप येईल तेव्हा तेव्हा हॉस्पिटलमधे येतात. काही त्रास झाला, ताप आला, दुखलं तरी ते सहन करतात. या सगळ्याचं मोल कधीही पैशात केलं जाऊ शकत नाही. त्यामुळेच लसीच्या प्रयगोता भाग घेणाऱ्या सगळ्यांनाच आपण मनापासून थँक्स म्हटलं पाहिजे. 

हेही वाचा : 

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?