जीवघेण्या चिनी कोरोना वायरसपासून आपण कसं सुरक्षित राहायचं?

२४ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


चीनच्या वुहान शहरात एका नव्या कोरोना विषाणूची निर्मिती झालीय. या विषाणूमुळे ताप सर्दी खोकला अशा साध्या लक्षणांसोबतच न्युमोनिया सारखे आजार होऊन माणूस मृत्यूमुखीही पडू शकतो. या विषाणूविषयी अजून काहीही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे यावर लस उपलब्ध नाही. पण काही सोपे उपाय करून या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करता येईल.

आपला सख्खा शेजारी असलेल्या चीनमधे सध्या एका वायरसने हाहाकार माजवलाय. एका अख्ख्या शहराला वाळीत टाकण्यात आलंय. काही काही बाजारपेठा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्यात. सगळ्या एअरपोर्ट्सवर कडक पाळत ठेवण्यात आलीय. रस्ते, बाजारपेठा, दुकानांबाहेर सगळीकडे फवारणी करून निर्जुंतूकीकरण करण्याचं काम सुरू आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांना हाय अलर्ट देण्यात आलाय. एक नवी धोक्याची सूचना चीनच्या सरहद्दीत वाजतेय.

या संकटाचं नाव आहे कोरोना वायरस. चालत्या, बोलत्या माणसांना काही दिवसांतच मृत्यूच्या दाढेत ढकलणारा हा विषाणू किंवा वायरस चीनमधे मोठ्या वेगाने, अगदी विद्यूत वेगाने पसरतोय. नुसता चीनमधेच नाही तर चीनच्या सीमा ओलांडून दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपानमधेही या वायरसने एंट्री केलीय. आता तर या वायरसनं अमेरिकेचंही दार ठोठावलंय.

काय आहे कोरोना वायरस?

नव्यानं आलेला कोरोना हा एक संसर्गजन्य वायरस आहे. महाराष्ट्र राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे हवेतून एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला या वायरसची लागण होऊ शकते. हा वायरस शरीरात आल्यावर ताप, सर्दी, खोकल्यासारखी लक्षणं दिसू लागतात. पण ही लक्षणं जास्त गंभीरही होऊ शकतात. श्वास घ्यायला त्रास होणं, डोकं दुखणं, घसा खवखवणं अशी लक्षणं मोठ्या माणसांमधे दिसू शकतात. तर न्युमोनियासारखे गंभीर आजार ५ वर्षाखालील मुलांना होताहेत.

आत्तापर्यंत चीनमधल्या ५०० पेक्षा जास्त लोकांवर या वायरसने हल्ला केलाय. ९ लोकांचा मृत्यूही झालाय. पण अजूनपर्यंत या वायरसनं आजारी पडलेला एकही माणूस बरा झालेला नाही. म्हणूनच मार्गबर्ग आणि इबोलानंतर हा जगातला तिसरा सगळ्यात धोकादायक वायरस असं कोरोनोला म्हटलं जातंय.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्लूएचओनेही या वायरसचं गांभीर्य ओळखलंय. या वायरसशी दोन हात कसं करायचं यावर चर्चा करण्यासाठी डब्लूएचओही एक तातडीची बैठक बोलावणार आहे. डब्लूएचओचे प्रवक्ते तारिक याशरेविच यांनी ट्विटरवरून ही दिली. ‘काही दिवसात चीनमधे आणि दुसऱ्या देशात या वायरसचे आणखी रोगी सापडू शकतात. वुहानच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत डब्लूएचओची एक टीम वायरसवर काम करतेय,’ असं त्यांनी जाहीर केलंय.

हेही वाचा : ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा घेताना काय काळजी घ्यावी?

हा तर कुटुंबातला नवीन मेंबर!

आपल्या शरीरात बाहेरून एखादा वायरस आला तर तो आपल्याच शरीरातली उर्जा वापरून जिवंत राहतो. आपल्या अवतीभोवती निसर्गात असे अनेक वायरस असतात. पण त्यातल्या काही वायरसला काटेरी आवरण असतं. अशा वायरसंना ‘कोरोना’ असं म्हटलं जातं.

विकिपीडियाच्या माहितीनुसार, कोरोना या इंग्रजी शब्दाचं मूळ लॅटिन भाषेत आहे. लॅटिनमधे कोरोनाचा अर्थ मुकूट असा होतो. पूर्वीच्या काळी राजाच्या डोक्यावर काटे काटे असणारा मुकूट असायचा. कोरोना वायरसलाही काटे असतात. त्यावरून कोरोना असं नाव त्याला पडलं असावं. हे कोरोना वायरस फक्त प्राणी किंवा पक्ष्यांमधेच तयार होतात आणि नंतर त्याचा माणसाला संसर्ग होतो.

कोरोना या वायरसंचं सहा जणांचं एक कुटूंबच आहे. फक्त हे ६ कोरोना वायरसच माणसांवर हल्ला करू शकतात. आता त्यात चीनमधे निर्माण झालेल्या नव्या कोरोना वायरसची भर पडलीय. चीनमधे सापडलेल्या या वायरसला 'नोवेल कोरोना वायरस' म्हणजे नव्यानं तयार झालेला कोरोना वायरस असं म्हटलं जातंय. त्याचं शास्त्रीय नाव मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना वायरस असं लांबलचक आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच अशा प्रकारचा वायरस सापडलाय. त्यामुळेच या वायरसवर काय औषधोपचार करावेत हे डॉक्टरांना कळेना. शास्त्रज्ञ औषधोपचार शोधण्याच्या कामाला लागलेत. हा वायरस काय करतो, तो कशामुळे आला, शरीरात तो कसा शिरतो आणि त्यामुळे काय धोका निर्माण होऊ शकतो याविषयी शास्त्रज्ञ अजूनही अभ्यास करतायत.

दाटीवाटीने जनावरं ठेवल्याने वायरसची निर्मिती

चीनच्या वुहान शहरात या वायरसची निर्मिती झाली असल्याचं सांगितलं जातंय. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला या वायरसचा पहिला पेशंट चीनमधे सापडला. तिथून हा वायरस चीनच्या इतर शहरात पसरला. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी ख्रिसमस आणि नववर्षाची सुट्टी साजरी करण्यासाठी खूप सारे पर्यटक घराबाहेर पडतात. गेल्या काही वर्षांत देशांच्या सीमा ओलांडून सुट्टी एन्जॉय करण्याचा ट्रेंड आलाय. यंदाही खूप सारे पर्यटक एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करत होते. त्यातून हा वायरसही फार कमी काळात वेगवेगळ्या देशांमधे पसरला. काही दिवसांपूर्वी  अमेरिकेतही या वायरसचा एक रोगी सापडलाय.

वुहान शहराची लोकसंख्या जवळपास १ कोटी १० लाख एवढी आहे. वुहानमधून या वायरसचा उद्रेक झाल्यामुळे त्याला वुहान कोरोना वायरस असंही म्हटलं जातं. बीबीसीवरच्या एका विडिओनुसार वुहान शहरात शेकडो लोक तापानं आजारी पडलेत. त्यातले अनेक लोक वुहानमधल्या एका स्थानिक बाजारपेठेच्या संपर्कात होते. चीनमधल्या अशा बाजारपेठेत मांसाची आणि प्राण्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. अनेकदा वेगवेगळ्या जातीचे प्राणी दाटीवाटीनं एकाच जागी ठेवलेले असतात. त्यातूनच नव्या वायरसची निर्मिती होत असल्याचं याआधीच्या वायरसच्या अभ्यासामधे समोर आलं होतं.

वुहानच्या बाजारपेठेतही तसंच काहीतरी घडलं असल्याची शक्यता बीबीसीच्या विडिओत व्यक्त करण्यात आलीय. पण कोणत्या प्राण्यापासून हा वायरस माणसांत आला आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी कोणतं औषध घ्यायचं याविषयी अजून कोणतंही संशोधन झालेलं नाही. हा वायरस आणखी पसरू नये यासाठी वुहानमधल्या लोकांना बाहेर न जाण्याचं आणि बाहेरच्या लोकांना वुहानमधे न येण्याचं आवाहन तिथल्या सरकारनं केलंय.

हेही वाचा : मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही

खबरदारीचे उपाय काय?

या वायरसबाबत काहीही संशोधन झालेलं नसल्यानं वायरसची लागण होऊ नये म्हणून नेमकी काय खबरदारी घ्यायची याविषयी अजून काहीही स्पष्टता आलेली नाही. पण महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खात्याने याबाबत काही खरबदारीच्या उपाययोजना राबवायला सुरवात केलीय. पुण्यातल्या आरोग्य सेवा संचालनालयाने जनहितार्थ एक प्रसिद्धीपत्रक काढलंय. यात कोरोनापासून बचावासाठी काय खबरदारी घ्यावी याची माहिती दिलीय. पुण्यातल्या राष्ट्रीय वायरस विज्ञान संस्थेत या वायरसच्या निदनाची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय प्रवास टाळणं, विशेषतः चीनमधे जाणं टाळा. तसंच बाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क वगैरे लावून या वायरसची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. ताप किंवा सर्दी नेहमीपेक्षा वेगळी आहे, असं जराही वाटलं तर लगेच डॉक्टरांना दाखवून खात्री करून घेण्याचं आवाहनही या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आलंय.

शिवाय शिंकताना, खोकताना हातरूमालाचा वापर करणं, वारंवार हात धुणं असे काही साधे उपाय करूनही या रोगाचा प्रसार थांबवला जाऊ शकतो, असं डॉक्टर प्रदीप आवटे कोलाजशी बोलताना सांगतात. मांसाहार करणाऱ्यांनी मांस चांगलं शिजवून खाण्याचा सल्ला डॉ. आवटे देतात.

थर्मल स्क्रिनिंगद्वारे एअरपोर्टवर तपासणी

भारतासोबतच वेगवेगळ्या देशांनीही या वायरसचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरवात केलीय. जवळपास सगळ्याच देशांत आंतरराष्ट्रीय विमानं येणाऱ्या एअरपोर्टवर थर्मल स्क्रिनिंग बसवण्यात आलेत. विकिपीडियावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, थर्मल स्क्रिनिंगमधे माणसाच्या शरीराचं तापमान किती हे कळतं. माणसाच्या शरीरात कोणताही वायरस आला तर त्या वायरसला मारून टाकण्यासाठी शरीराचं तापमान वाढवलं जातं. यालाच ताप आला असंही म्हणतात. हेच तापमान थर्मल स्क्रिनिंगमधे मोजलं जातं.

एअरपोर्टवर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगमधे तपासणी केली जातेय. एखाद्याचं तापमान वाढलेलं दिसलं तर त्या माणसाची आणखी तपासणी केली जाते. काही संशयास्पद आढळलं तर त्या माणसाचे रिपोर्ट्स लॅबमधे चेक करायला पाठवले जाताहेत. चीनमधून येणाऱ्या सगळ्याच प्रवाशांना आजारपणाच्या लक्षणांबाबत दक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्यामुळे थर्मल स्क्रिनिंगमधून एखादा प्रवासी सुटला तरी संशयित रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या पाठपुरावा एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम म्हणजेच आयडीएसपीद्वारे करण्यात येईल, असं डॉ. आवटे सांगतात.

डोळ्याला दिसणारही नाही अशा या वायरसनं जगभरात खळबळ उडवून दिलीय. आंतरराष्ट्रीय प्रवास करताना काळजी घेणं, कोरोना वायरसने आजारी असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहणं आणि त्यांनाही इतरांपासून दूर ठेवणं एवढंच आपण सध्या करू शकतो.

हेही वाचा : 

पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला?

मानसिक आरोग्य नीट राहिलं तरच खेळाडू यश मिळवतील

रधोंचा विचार समाजाच्या राजकीय आणि सामजिक स्वास्थ्याबद्दलचा