चौकीदार ऑल इज वेल

२३ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


सध्या चौकीदारी चर्चेत आहे. फारच दुर्लक्षित असलेल्या या पेशाला अचानक पोलिटिकल अर्थ मिळालाय. त्यामुळे सामाजिक, आर्थिक संदर्भही चिटकून आलेत. पण ही चौकीदारी चालते कशी, याची एका सर्वसामान्य माणसाने नोंदवलेली ही निरीक्षणं.

भारतात चौकीदार बनण्यासाठी कुठलीही पात्रता लागत नाही. साधारणपणे सुशिक्षित नागरीक चौकीदारी करत नाही. सुशिक्षित माणसाचा एक मोठा दोष आहे. त्याला ठेकेदाराच्या आज्ञा पाळता येत नाहीत. आलेल्या गेलेल्याला सलाम करता येत नाही. वेळप्रसंगी धटींगणगिरीही करता येत नाही. दबंग मेम्बर्सची घरकामं करता येत नाहीत.  टोपी घालता येत नाही किंवा टोपी बदलताही येत नाही.

मग तो या कामासाठी अपात्र ठरतो आणि हे क्षेत्र इतरांसाठी खुलं राहतं. इतर जण याकडे वळतात. इतर कुठंही नोकरी मिळण्याची शक्यता नसली की चौकीदारी केली जाते. कुणालाही चौकीदाराचा ड्रेस घातला की चौकीदार म्हणून उभं करता येतं. ड्रेस मापातच असला पाहिजे असंही नाही. बरं यात शिक्षणाची, वयाची, शारीरिक, बौद्धिक क्षमतेची, प्रामाणिकपणाची, पूर्वइतिहास तपासण्याची अशी कुठलीही अट नाही.

चौकीदार नेमणारा ठेकेदार सोसायटीच्या माथी कुठलाही चौकीदार मारू शकतो. ठेकेदाराचं ऐकणं एवढीच त्याची पात्रता. फारतर सोसायटीतल्या काही धटिंगणांची घरगुती कामं केली की चौकीदारी आणि ठेकेदारी सलामत राहते. ते फारच डोळ्यावर आलं, सोसायटीने फारच तक्रार केली तर ठेकेदार दुसरीकडचा चौकीदार इकडे आणतो, लोकांचा आवाज बंद करतो. सहसा असा इकडे आलेला चौकीदार हा त्या दुसऱ्या सोसायटीला नकोसा झालेला असतो किंवा तिकडे काहीच कामाचा नसतो म्हणून इकडे आलेला असतो.

पण ते कळेपर्यंत काही महिने जातात. नागरिकांच्या आणि सोसायटीच्या मेंबरच्या दृष्टीने गोळाबेरीज शून्यच राहते. पुन्हा तक्रार, पुन्हा बदल. जास्तच त्रास झाला तर ठेकेदार बदल. इथेही गोळाबेरीज शुन्यच असते. कारण तेही कळेपर्यंत १-२ वर्ष जातात. चौकीदार बदलून, ठेकेदार बदलून लोकं कंटाळतात.

आता नवीन ट्रेंड आलाय. मोठा ठेकेदार आपल्या मुलाच्या नावाने, बायकोच्या नावाने अजून दोन वेगळ्या ठेकेदारी संस्था काढतो. चौकीदारांची आयात निर्यात चालू राहते. वेगवेगळ्या नावाने तेच टेंडर भारतात. बाकी नवीन प्राणी या धंद्यात शिरणार नाही, त्यांचं टेंडरच भरलं जाणार नाही अशी व्यवस्था केली जाते. म्हणजे ठेकेदाराचं कंत्राट बदललं तरी ठेकेदारी घरातच राहते.

सोसायटीला सगळं कमी खर्चात हवं असतं. ठेकेदारी मिळताना आश्वासनं दिली तरी पुरतात, ती पूर्ण केली पाहिजेच असंही काही बंधन नसतं. म्हणजे कुठल्याही ठेकेदारापासून आता कुठलीही सोसायटी आजकाल तशी अपेक्षाच ठेवत नाही. आपल्या कर्माची फळं असा अध्यात्मिक विचार करून ठेकेदाराची निवड केली जाते. ठेकेदार मग त्याला हवा तसा चौकीदार नेमतो. सगळ्यात विशेष म्हणजे काही ठिकाणी ठेकेदार आणि चौकीदार एकच असतात, सोसाटीला ते कळत नाही.

काहीवेळा ठेकेदारी हा त्यांचा मुख्य धंदा नसतोच मुळी. नेमलेल्या सोसाटीचे कुठले मेंबर्स श्रीमंत आहेत, सोसायटीची किंवा मेम्बर्सची कुठली स्थावर वा जंगम मालमत्ता कुठं आहे, त्यांच्या काय भानगडी आहेत, कोणाशी भांडण आहे, यावर त्याची बारीक नजर असते. सोसायटीचा पैसा कुठे खर्च होतो ते कळतंच की. ही माहिती महत्वाची असते आणि त्याला किंमत असते. ती किंमत ते बाजारात कशी वसूल करतात हे सर्वसामान्यांना कळतही नाही.

सामान्य मेंबर फक्त चोरी झाली की इकडे तिकडे धावाधाव करतो. आरडाओरडा करतो. फार झालं तर एफआयआर दाखल करतो. मग आपल्या पोटापाण्याची, पोराबाळांची व्यवस्था करण्यात, संस्कृतीरक्षणात अगदीच गेलाबाजार वॉट्सअप, फेसबूकच्या सामाजिक कार्यात गुंतून जातो.

चोरीही विसरली जाते आणि चोरही मोकाट राहतो. ठेकेदार तर यात कुठंच गुंतत नाही. मधूनमधून ठेकेदारच सुरक्षा व्यवस्थेला धोका होईल, अशी व्यवस्था करतो. मग मोटारसायकल जळते. गाडीचं पेट्रोल चोरीला जातं. सायकल चोरीला जाते. असे प्रसंग सोसायटीच्या मेंबर्सना घाबरवून सोडतात. मग ठेकेदाराचं आणि चौकीदाराचं महत्व वाढतं. ठेकेदार हाच आपला एकमेव तारणहार आहे असा मेंबर्सना साक्षात्कार होतो. ठेकेदारी कायम राहते. सोसायटीचे दबंग देखील यात सामील होतात. सोसायटीचे प्रॉब्लेम्सदेखील कायम राहतात.

रात्रपाळीचा चौकीदार दिवसा दुसरी नोकरी करत असतो आणि सुरवातीचे २ तास रात्रपाळी करून सगळे झोपले की उरलेले ८ तास सुखनैव झोपतो. २ तास जागं राहून ६ तास झोपण्याचा पगार घेतो. किंबहुना त्याचसाठी तो रात्रपाळीवर येतो. उठल्यावर दिवसपाळीच्या चौकीदाराकडे चावी दिली की याची ड्युटी संपते. रात्री काही गुन्हा घडला असेल आणि दिवसपाळीच्या चौकीदाराकडे गेले तर तो रात्रपाळीच्या चौकीदाराकडे बोट दाखवतो आणि स्वतःची सुटका करून घेतो.

रात्रपाळीचा चौकीदार कालांतराने दिवसपाळीचा चौकीदार बनतो. दिवसपाळीचा मग रात्रपाळीचा. वेगवेगळ्या ठेकेदारांचे वेगवेगळे चौकीदार रात्री मुक्कामाला एकाच खोलीत असतात. सगळ्यांची अंडीपिल्ली सगळ्यांना माहीत असतात. सगळे एकमेकांना धरून असतात. कारण कोणी सांगावं, पुन्हा पाळी किंवा ठेकेदारी बदलली तर?

चौकीदारी आणि ठेकेदारी यावर अजून अभ्यास करून श्वेत पत्रिका का काढू नये बरं, अध्यक्ष महोदय? 
 

(लेखक हे अर्थकारण आणि समाजकारणाचे विश्लेषक आहेत.)