कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

१६ मे २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


आता आपल्याला मुलामुलींशीही कोरोनाबद्दल नीट संवाद साधावा लागणार आहे. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे मुलांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. पण त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. मुलांच्या या सगळ्या प्रश्नांची योग्य शास्त्रीय उत्तरं आपण दिली पाहिजेत. त्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे.

आपण बागेत का नाही जायचं? आत्याला आपल्या घरी बोलवूया का? माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला जायचं का? शाळेला सुट्टी का दिलीय? आई, आज तू आणि बाबा घरी कसे? तुम्हाला कामावर जायचं नाही का? आपण बाहेर जेवायला का जात नाही? तू मला चिप्स, बिस्किटं का आणत नाहीस? सारखं सारखं कशाला हात धुवायचा? अजून किती दिवस आजी भेटणार नाही? भाजी घ्यायला मी पण येऊ का?

असे एक ना अनेक प्रश्न लहान मुलं रोज विचारात असतात. बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे तर आपलं संपूर्ण आयुष्यच या मुलाबाळांनी घेरलेलं असतं. कोरोना साथरोग म्हणजे काय, त्याने काय होतं आणि तो आला म्हणून आपण घरात का बसायचं हे त्यांच्या छोट्याशा मेंदूला न कळण्याजोगं असतं. आपले आईबाबा त्यांच्यासाठी सुपरहिरो असतात. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आई बाबांना माहीत आहेत, असा गैरसमज त्यांना असतो. त्यामुळेच आपलं कुतूहल शमवण्यासाठी ते प्रश्न विचारत राहतात.

बरं, एका प्रश्नाचं उत्तर दिलं की लगेच पुढचा प्रश्न तयारच असतो. शेवटी या प्रश्नांना कंटाळून काही पालक त्यांना तू लहान आहेस तुला कळणार नाही, किंवा ते देवाचं असतं असं म्हणून उत्तर देणं टाळतात. पण याने मुलांचं कुतूहल शमत नाही. ती पुन्हा प्रश्न विचारतात नाही तर वेगळ्या मार्गानं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात.

मुलांना माहिती देण्याचं कर्तव्य 

आपण मुलांपासून कितीही लपवलं तरी कुठून तरी कोरोना वायरसबद्दल काहीतरी त्यांच्या कानावर पडतंच. अगदी नाही पडलं तरी परिस्थिती नेहमीसारखी नाहीय, थोडं तणावपूर्ण वातावरण आहे हे त्यांना जाणवतं.

त्यामुळे मुलं प्रत्यक्ष प्रश्न विचारत नसली तरी त्यांच्या मनात या गोष्टी चालू असतातच. त्यांच्या मनात या गोष्टीची भीतीसुद्धा बसू शकते. म्हणूनच, कोरोना वायरसबद्दलची सगळी वैज्ञानिक माहिती आपल्या मुलांना सोप्या शब्दांत सांगणं, हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मोठ्या माणसांना किंवा एखाद्या डॉक्टरला समजणारी वायरसबद्दलची गुंतागुंतीची प्रक्रिया या लहान मुलांना समजणार नाही. पण त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देऊन त्यांचं कुतूहल शांत करणं शक्य आहे.

आता ही उत्तरं देताना काही काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कारण आपल्या प्रत्येक शब्दाचा मुलं फार बारकाईनं विचार करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या अमेरिकेतल्या संस्थेनं मुलांना कोरोना वायरसबद्दल माहिती देताना काय काळजी घ्यावी याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्व सांगितलीत. त्याचा वापर करून आपण मुलांसोबत चांगला संवाद घडवून आणू शकतो.

हेही वाचा : आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं

संवाद चालू करण्यापूर्वी

१. कोरोनाबद्दल आपल्याला काय माहितीय?

मुलांना उत्तरं द्यायची असतील तर आधी कोरोना वायरसबद्दलची सगळी माहिती आपल्याला माहीत असायला हवी ना! ही माहिती इंटरनेटवर सहज मिळू शकते. पण त्यातली सगळीच माहिती खरी असेल असं नाही. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आलेली माहिती वाचणं योग्य ठरेल. एकदा ही सगळी माहिती आपण घेतली आणि आपल्या आत पचवली की मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देणं सोपं पडेल.

समजा, मुलांनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नसेल तर मुलांवर चिडण्याऐवजी मला माहीत नाही हे मान्य करावं. मी तुला या प्रश्नाचं उत्तर शोधून सांगतो किंवा आपण दोघं मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधूया, असं मुलांना सांगता येऊ शकतं.

आपल्या ओळखीतल्या एखाद्या डॉक्टरशी किंवा आरोग्य अधिकाऱ्याशी मुलांचं फोनवर बोलणं करून देता येईल. आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या विषयातल्या तज्ञ लोकांकडून घ्यायची असतात याची सवय मुलांना यातून लागेल. 

२. विज्ञानाशी तडजोड नको

काहीही झालं तरी मुलांना शास्त्रीय माहितीच आपल्याला द्यायची आहे. कोरोना वायरस दुष्ट लोकांना मारण्यासाठी देवबाप्पाने पाठवलाय, हे उत्तर विज्ञानाला धरून नाही. त्याची निर्मिती हा एक अपघात आहे हे मुलांपर्यंत पोचलं पाहिजे. आता माहिती देऊन झाल्यावर कोरोना वायरसमुळे खूप लोक मरू नयेत यासाठी डॉक्टर खूप प्रयत्न करतायत. तरी सगळ्यांना सुखी ठेव अशी प्रार्थना आपण देवाकडे करू, असं म्हणता येईल.

किंवा मुलांना खोटी, अर्धवट वैज्ञानिक माहिती देणंही बरोबर नाही. थोडक्यात, मुलं खूप प्रश्न विचारत असतील, त्रास देत असतील असं काहीही झालं तरी विज्ञानाशी तडजोड करायची नाही, ही गोष्ट आपल्याला नीट लक्षात ठेवावी लागणार आहे.

३. माहिती सोपी कशी करायची?

कोरोना वायरस शरीरात कसा शिरतो, तिथे जाऊन तो काय करतो याची भरमसाट माहिती आपल्याकडे आहे. पण मेडिकलमधल्या अवघड संकल्पना वापरून ही माहिती मुलांना सांगितली तर त्यांना त्यातलं काहीही कळणार नाही. एन्झायम, प्रोटीन असं अवघड अवघड त्यांना समजणार नाही. आपली भाषा सोपी असायला हवी.

यासाठी इंटरनेवर सर्च करून त्यांना कोरोना वायरसचा फोटो दाखवता येईल. किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनेलने बनवलेले लहान मुलांसाठीचे वीडियो दाखवता येतील. त्यांच्या वयाला झेपेल इतकीच माहिती त्यांच्यापर्यंत पोचायला हवी. भारत सरकारनंही कोरोनाबद्दल माहिती देणारे काही कार्टूनवजा विडिओ बनवलेत. तेही आपण हेल्थ मिनिस्ट्रीच्या युट्युब चॅनलवरून शोधून मुलांना दाखवू शकतो. टीवी चॅनलवरची अतिरंजित माहिती दाखवणं टाळलेलं बरं.

हेही वाचा : कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

 

संवाद करत असताना

१. मुलांशी बोलण्यासाठी वेळ काढा

मुलं स्वतःहून प्रश्न विचारत नसतील तर आपण त्यांना जवळ बसवून त्यांच्याशी संवाद चालू करायला हवा. आधी मुलांना काय माहीत आहे, हे ऐकून घ्यायला हवं. आपण त्यांचं ऐकून घेतलं तरच ते आपलं ऐकून घेतील, हा संवादाचा साधासोप्पा नियम आहे.

२. स्वतः शांत रहा आणि मुलांना धीर द्या

तुम्ही काय बोलता त्याचा मुलांवर प्रभाव पडतो. तसंच तुम्ही कसं बोलता त्याची प्रभाव पडत असतो. तुम्ही बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव मुलं टिपत असतात. कोरोना वायरसविषयी सांगताना तुमच्या चेहऱ्यावर ताण असेल तर त्याचा मुलांवर नकळत परिणाम होतो.

आपण एखाद्या विमानातून जात असू आणि विमान जोरजोरात हलू लागलं तर विमानातली एअरहोस्टेस आपल्याला शांतपणे आश्वस्त करते. आपलं कोरोना वायरस हे संकट मोठं आहेच. पण मुलांनी त्याचा ताण घेऊ नये यासाठी आपल्या चेहऱ्यावरचे भाव शांत असायला हवेत.

३. मुलांना खरी आणि अचूक माहिती पुरवायचीय 

या संकटाचा अनावश्यक ताण मुलांना द्यायचा नाही हे खरं असलं तरी त्यासाठी आपण देत असणाऱ्या माहितीसोबत तडजोड करून चालणार नाही. त्यांच्या वयानुसार आवश्यक ती माहिती मुलांना दिली पाहिजे.

फक्त कोरोना वायरसबद्दलच नाही तर वायरसबद्दलच्या अफवा, खोट्या बातम्या याविषयीही मुलांना सांगायला हवं. कोरोना वायरसमुळे समाजातल्या कोणत्या घटकांना काय त्रास सहन करावा लागतोय हेही सांगायला हवं. मुलांच्या मनात त्या सगळ्यांविषयी संवेदनशीलता निर्माण व्हायला हवी. 

४. आरोप करणारी भाषा टाळा

एखाद्या धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या माणसामुळे कोरोना वायरस पसरतो, असा आरोप करणारी भाषा कमीत कमी मुलांसमोर तरी वापरू नका. मुलांसमोर शास्त्रीय पद्धतीनंच बोललं पाहिजे. असं न केल्यास संबंधित व्यक्ती, समाज, धर्म याबद्दल मुलांच्या मनात स्टीग्मा किंवा पूर्वग्रह तयार होऊ शकतात.

कोरोना वायरस स्वतः जात, धर्म, वंश पाहत नाही आणि जगातला कुठलाही माणूस मुद्दाम कोरोना वायरस पसरवत नाही. त्यामुळे बिनबुडाचे समज मुलांमधे पेरणं काळजीपूर्वक टाळायला हवं. माणसा माणसात भेद निर्माण करणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगऐवजी आपण फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग केला पाहिजे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

५. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काय करता येईल?

कोरोनाबद्दल माहिती देऊन झाली की त्या माहितीच्या आधारावर कृती काय करायची हेही मुलांना सांगायचंय. एखाद्या खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या माणसापासून शारीरिक अंतर पाळायचं, लोकांना खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरण्याची शांतपणे आठवण करून द्यायची, शाळेत गेल्यावरही दुसऱ्यांमुळे आपल्याला किंवा आपल्यामुळे दुसऱ्यांना कोरोना वायरसची लागण होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची हे सगळं सांगायला हवं.

मास्क लावणारी सगळी माणसं आजारी नसतात तर मास्क कशा प्रकारे आपलं संरक्षण करतो हे सांगताना मास्क कसा लावायचा, तो कसा काढायचा हेही शिकवायला हवं. साबण आणि पाण्याचा वापर करून हात कसं धुवायचे याचंही प्रात्यक्षिक त्यांच्याकडून करून घ्यायला हवं. सॅनिटायझरचा योग्य वापर त्यांना समजावून सांगायला हवा. तसं मुलांना सॅनिटायझर वापरायला देणं घातक ठरू शकतं.

६. समाजातल्या मदत करणाऱ्या लोकांविषयी

कोरोनाच्या संकटातही लोक एकमेकांना दयाळूपणे कशी मदत करतात याबद्दल मुलांना आवर्जून सांगायला हवं. आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक आणि सामाजिक काम करणारी तरुण मुलं यांच्या गोष्टी मुलांना सांगायला हव्यात. सफाई कर्मचाऱ्यांबद्दल त्यांना सांगायला हवं.

डॉक्टर, नर्सेस, पोलिस अशी सगळी माणसं सगळ्या समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी झटतायत हे सांगायला हवं. त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना मुलांच्या मनात निर्माण करायला हवं. हा सगळा समाज एकमेकांना मदत करतो हे पाहून मुलांना दिलासा मिळतो.

७. तुम्ही त्यांच्यासोबत आहात, हे सांगा

मुलांना आपण हे सारं सांगतोय, पण आपल्या बोलण्यानं मुलांच्या मनात निराशा तर निर्माण झाली नाही ना हे तपासायला हवं. मुलांचे हावभाव, त्यांचा आवाज, त्यांचे डोळे यावरूनही या गोष्टीचा अंदाज आपल्याला बांधता येईल.

पुन्हा कधीही काहीही बोलावंसं वाटलं तरी तुम्ही तुमच्या लेकराचं म्हणणं ऐकून घ्याल याची त्याला आठवण करून द्यायला हवी. तुम्हाला त्यांची काळजी वाटते आणि या संकटकाळात आपण सगळे सोबत आहोत हेही त्यांना सांगणं गरजेचं आहे.

हेही वाचा : WHOनं सांगितलेल्या खाण्यापिण्याबद्दलच्या पाच टिप्स भिंतीवर चिकटवा

संवाद पूर्ण झाल्यानंतर 

आपल्या मुलांशी आपण बोललो तरी रोज त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ते नीट वागतात की नाही, हे बघावं. एवढं बोलून त्यातल्या किती गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांचं निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे.

१. आपली मुलं काय ऐकतात?

आपण मुलांना खरी माहिती देत असलो तरी टीवी, रेडियो किंवा इंटरनेटवर काय सांगितलं जातं यावर आपलं नियंत्रण नसतं. असं काही मुलांच्या ऐकण्यात किंवा वाचनात येतंय का हे तपासून पहायला हवं.

कोरोनावर मिळालेली अतिरिक्त माहिती किंवा सारखा सारखा तोच विषय समोर राहिला तर मुलांच्या मनात काळजी निर्माण होईल. न्यूज चॅनेल, रेडियोवरच्या साउंड इफेक्टमुळेही असं होऊ शकतं. त्यामुळे मुलं स्क्रिनसमोर जास्त वेळ घालवणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.

२. मुलांना सतत आश्वस्त करत रहा

टीवीवरून सतत त्रासदायक दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येत असली तरी आपल्या आसपासची परिस्थिती तेवढी भीषण आहे का याबाबत त्यांना सांगायला हवं. त्याचा त्यांना ताण येत असेल तर तो घालवण्यासाठी त्यांना खेळात वेळ घालायला लावणं, गाणी ऐकून त्यावर डान्स करणं, असं करता येऊ शकेल.

मुलांच्या रोजच्या दिनक्रमात बदल होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यांच्या झोपायच्या, उठायच्या, खेळायच्या वेळा बदलायला नकोत. तुमचा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असला तरी आपल्या घरापर्यंत आजार येऊ नये यासाठी कोण कसं प्रयत्न करतोय याची माहिती त्यांना द्यायला हवी. कोरोनाची लागण झाली तरी हॉस्पिटलमधे जाऊन उपचार घेऊन आपण बरे होऊ शकतो, तिथे डॉक्टर आपली खूप काळजी घेतात, असं सांगून आपण त्यांना आश्वस्त करायला हवं.

हेही वाचा : पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो

३. स्वतःचीही काळजी घ्या

तुम्ही स्वतः मानसिक आणि शारीरिकरित्या सृदृढ असाल तरच मुलांना धीर देऊ शकाल. आपण कितीही सांगितलं तरी या संकटाला मोठी माणसं कशी सामोरी जातात यावरून मुलांची प्रतिक्रिया ठरत असते. मोठ्यांच्या पावलावरच ती पाऊल ठेवतात. तुम्ही आतून शांत आहात हे मुलांनी ओळखलं तर त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळतो.

तुम्ही स्वतःच तणावाखाली असाल तर स्वतःला थोडा वेळ द्या आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांकडे, नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रीणींकडे मदत मागा. मुलांसोबतच आपला ताण घालवण्यासाठीही आपण प्रयत्न करायचे आहेत.

आपल्या मुलांची अशा प्रकारे काळजी घेऊन या तणावाच्या परिस्थितीपासून आपण त्यांना वाचवू शकतो. आपण सुरक्षित वातावणात राहतो म्हणून आपल्याला असा विचार करणं शक्यही होतं. पण मुंबई, पुण्यातून चालत घरी जाणारे किंवा रोजगार नसल्याने घरात खायला अन्नही न आणू शकणारे आईबाप आपल्या मुलांना कसं समजावत असतील?

हेही वाचा : 

कोरोना पाहणारी पिढी 'शेवटची पिढी' ठरेल का?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं