हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?

२४ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कट्टर हिंदुत्ववादी नेते असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुस्लिम अभिनेता अगदी सहजपणे स्वीकारला गेला. हे निर्माते संजय राऊत यांच्या निवडीचं आणि नवाजुद्दीनच्या अभिनयाचं यश आहेच. पण ती बाळासाहेबांच्या राजकारणाच्याही पलीकडे असणाऱ्या दिलखुलास माणूसपणाचीही पुण्याई आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त.

मराठी सिनेमातले आजवरचे सर्वात मोठे सुपरस्टार दादा कोंडकेंचं `एकटा जीव` नावाचं आत्मचरित्र आहे. पत्रकार अनिता पाध्येंनी त्याचं आडपडदा न ठेवता बिनधास्त शब्दांकन केलंय. त्यात दादा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचेही अनेक किस्से आहेत. त्यात नवल नाही. कारण दादा स्वतःला शिवसैनिक मानत आणि बाळासाहेबांना आपला नेता. ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. शिवाय वैयक्तिक आयुष्यातही ते बाळासाहेबांचा सल्ला घेत.

मुसलमानाला सिनेमात का घेतलं?

दादांनी बाळासाहेबांविषयीची छोटीशी आठवण दिलीय. तेव्हा दादा कोंडकेंचा `राम राम गंगाराम`हा सिनेमाही सुपरहिट झाला होता. त्यात दादा आणि अशोक सराफ या जोडीने मजा आणली. पण त्याच दरम्यान त्या दोघांत दुरावा झाला. `तेरे मेरे बीच में` या पुढच्या सिनेमात दादांनी अशोक सराफांच्या जागी अमजद खानना रिप्लेस केलं.

दादा आणि अशोक सराफ या दोन मराठी कलाकारांमधे पॅचअप करण्यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. ते सांगताना दादा लिहितात, `पण तेरे मेरे बीच में' मधे अमजद खानला घेतल्यानंतर एकदा बाळासाहेबांनी मला विचारलं, तुम्ही अशोकला का नाही घेतलंत आणि त्या मुसळ्याला घेतलंत? अशोकने साहेबांना सांगितलं होतं की दादांनी मला जाणूनबुजून टाळलं.`

का कोण जाणे पण `एकटा जीव`च्या पहिल्या आवृत्तीत बाळासाहेबांच्या तोंडी असलेल्या वाक्यात मुसळ्या हा शब्द बोल्ड केलाय. बाळासाहेबांनी खरंच असा शब्द वापरला असेल तर मुसळ्या या शब्दातून बाळासाहेबांनी अमजद खानचं मुसलमान असणं अधोरेखित केलंय. आज ते वेगळ्याच संदर्भात पुन्हा अधोरेखित करावं लागतं, कारण ठाकरे या बाळासाहेबांच्या बायोपिकमधे नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक मुसळ्या अभिनेताच त्यांची भूमिका करतोय.

मुसलमान विरोध ही राजकीय स्ट्रॅटेजी

बाळासाहेबांचा एकूण स्वभाव पाहता अमजद खानच्या मुसलमान असण्याविषयी त्यांना फार आक्षेप असण्याचं कारण नाही. कारण तेव्हाच्या इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांसारखेच अमजद खानशीही त्यांचे चांगले संबंध असण्याची शक्यता जास्त आहे. कारण अमजद खान सिनेमातल्या कलाकारांच्या संघटनेचेही प्रमुख होते. त्यात कुणाच्या मुसलमान असण्याचा अडथळा आलेला नव्हता. दिलीप कुमार यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री जगजाहीर होती. पुढे दिलीप कुमार यांनी निशान ए पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान स्वीकारल्यावर बाळासाहेबांनी त्यांच्यावर युसूफ खान हे मूळ नाव सांगत केलेली कडवट टीकाही लपून राहिली नाही.

मुसलमान नेत्यांना त्यांच्या धर्माचं लेबल लावण्याची बाळासाहेबांची स्टाइलच होती. शिवसेनेच्या अगदी सुरवातीच्या दिवसांत समाजवादी नेते मोईनुद्दीन हॅरिस यांना मियां म्हणत. पुढे अनेकांना त्यांनी लांड्या म्हटलं. मुलायम सिंगांना मौलाना म्हटलं. इतकंच नाही तर य. दि. फडकेंसारख्या ब्राह्मणेतर चळवळीच्या अधिकारी अभ्यासकाने बाळासाहेबांवर टीका केली. तेव्हा बाळासाहेबांनी यदिफभट्ट असं नामकरण करून त्यांच्यावर जातीचा शिक्का मारला. तो फडकेंवर फारच मोठा अन्याय होता.

अशाप्रकारे जात, प्रदेश आणि धर्माची लेबलं लावत आपल्या विरोधकांना सर्वसामान्यांपासून तोडण्याची अनेक उदाहरणं ठाकरी भाषेच्या इतिहासात शोधता येतील. अनेक विरोधकांना त्यांनी त्याच्याच बळावर आयसोलेट करून संपवलं. अमजद खानना मुसळ्या म्हणून छोट्या पातळीवर तेवढ्यापुरतं आयसोलेट करून दोन मराठी कलावंतांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे ते तेवढ्यापुरतं असावं. कारण मुसलमान विरोध हा बाळासाहेबांच्या राजकीय स्ट्रॅटेजीचाच भाग होता. त्यांच्या वैयक्तिक जगण्याचा भाग कधीच नव्हता. स्वभावाचा तर नाहीच नाही.

पुढाऱ्याच्या पलीकडचं माणूसपण

त्यामुळेच ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमधे आपल्याला हिंदू मुस्लिम दंगली दिसतात. बाबरी मशीद पाडताना दाखवली जाते. त्याचबरोबर एक मुसलमान मातोश्रीवर नमाजही अदा करतानाही दिसतो. राजकीय विचारांमधली विषारी म्हणता येईल इतकी टोकाची कट्टरता आणि वैयक्तिक स्वभावात दुसऱ्या टोकाची सर्वसमावेशकता, असा विरोधाभास हा बाळासाहेबांच्या आयुष्यातलं एक अद्भूत वेगळेपण होतं.

राजकीय नेता म्हणून बाळासाहेबांचा एक भव्य असा परसोना होता. त्या प्रभावात अडकल्यावर माणूस म्हणून बाळासाहेबांकडे बघणं शक्य होत नाही. पण त्यातून बाहेर पडल्यानंतर सापडणारं बाळासाहेबांमधलं माणूसपण विलोभनीय आहे. त्यांच्यातला सहृदयी, मोकळा ढाकळा, मिश्कील, मैत्रीला जागणारा माणूस त्यांच्यातल्या पुढाऱ्यापेक्षा कितीतरी पट छान आहे. आपल्या कार्यकर्त्यांचे लाड पुरवणं आणि त्यांच्याकडून लाड करून घेणं, त्यांना पक्षप्रमुखाच्या पुढे जाऊन कुटुंबप्रमुख बनवून गेलं. सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही स्वतःतला कलाकार टिकवणं, तर भूरळ पाडणारंच होतं. त्यांच्या या माणूसपणाच्या छटा सिनेमाच्या चिमटीत पकडणं फारच कठीण आहे.

महाराष्ट्रावर बाळासाहेबांच्या राजकीय खेळींचा, भूमिकांचा, नेतृत्वाचा, वक्तृत्वाचा आणि पत्रकारितेचाही प्रभाव होता. त्याच्याहीपेक्षा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव जास्त होता आणि आहे. त्यामुळेच त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका बनल्या. कारकीर्दीच्या सुरवातीलाच त्यांना मिथकपणाचं वलय मिळालं.

पण हे महाराष्ट्राबाहेरच्या आणि अनेकदा विदर्भ मराठवाड्यातल्याही अभ्यासकांच्या लक्षात येत नाही. ते केवळ बाळासाहेबांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमधेच बाळासाहेब शोधत राहतात. पण तिथे बाळासाहेब सापडण्याची शक्यता नाही. ते त्यांच्या दिलदार व्यक्तिमत्त्वात सापडतात.

शिवसैनिकही बाळासाहेबांसारखाच मोकळाढाकळा

आज बाळासाहेबांच्या भूमिकेत एक उत्तर प्रदेशात जन्मलेला मुसलमान भय्या अभिनेता अगदी सहजपणे स्वीकारला गेला. सोशल मीडियावरच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना त्यावरून थोडंफार खिजवलं, तितकंच. बाकी त्यात नवाजुद्दीन सिद्दीकीला बाळासाहेबांच्या भूमिकेत स्वीकारताना कोणतीही खळखळ झाली नाही. ती बाळासाहेबांच्या राजकीय नेतेपणाच्या शेकडो मैल पुढे असलेल्या सदाबहार माणूसपणाची पुण्याई आहे.

बाळासाहेबांशी दीर्घकाळ सहवास लाभलेले संजय राऊत ठाकरे सिनेमाचे कर्ताधर्ता आहेत. अमिताभ बच्चनसह अनेक नेत्यांचा विचार केल्यानंतर अचानक त्यांना नवाजुद्दीनचा सिनेमा पाहताना त्याच्यात बाळासाहेब दिसले. हे संजय राऊत यांचंही मोठेपण आहे. एरवी जहाल भाषेत मुसलमानांवर टीका करणाऱ्या राऊतांनी धर्माच्या पलीकडे जाऊन कलावंत पाहिला. याला दादच द्यायला हवी. 

अर्थात नवाजुद्दीनच्या अफाट अभिनय क्षमतेलाही त्याचं श्रेय जातंच. प्रचंड संघर्षातून त्याने आजचं स्थान मिळवलंय. तो मंटोपासून दशरथ मांझीपर्यंत, बजरंगी भाईजानमधल्या पत्रकार चांद नवाझपासून रामन राघवपर्यंत आणि किकमधल्या विलनपासून वासेपूरच्या फैजलपर्यंत भूमिका जगलाय. त्यामुळे त्याच्या कामाविषयी कुणी शंका काढू शकत नाही, इतकं त्याने स्वतःला निश्चितच सिद्ध केलंय.

राऊतांनीच शिवसेनेत आणलेल्या अभिजीत पानसेने सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. उद्धव ठाकरेंनी या निवडीवर मान्यतेची मोहर उमटवलीय. शिवसैनिकांनी नवाजुद्दीनला सहजपणे स्वीकारण्यामागचं हे एक कारणं नक्की असू शकतं. पण मुळात शिवसैनिकही बाळासाहेबांसारखाच मोकळा आहे. तो जसा दंगलीत आघाडीवर असतो, तसाच जातधर्म न बघता अडचणीच्या काळात धावून जाण्यातही असतो. तो मुसलमान मित्रांबरोबर खिमापाव खाता खाता त्यांनाच शिव्या देतो.

मोदींच्या भूमिकेत मुसलमान चालेल?

असं पहिल्यांदाच घडलंय असं नाही. कट्टर धर्मवादी नेत्यांचा आदर्श असणारे मोहम्मद अली जिना यांच्या बायोपिकमधे ख्रिस्तोफर ली हा ब्रिटिश अभिनेता आहे. त्या सिनेमात जिनांची गोष्टी आपल्या शशी कपूरने सांगितलीय. त्याच्यासारखा कुणी हिंदू अभिनेता जिनांच्या भूमिकेत पाकिस्तानात चालला असता का? नाहीच.

सुधीर फडकेंनी आपलं आयुष्य पणाला लावून वीर सावरकर नावाचा सिनेमा काढला. त्यात कुणीतरी शैलेंद्र गौर नावाचा अभिनेता सावरकरांच्या भूमिकेसाठी शोधून काढला. त्या सिनेमात तर एकाही लक्षवेधी भूमिकेत मुस्लिम कलाकार नाही. कमल हसनच्या हे राम मधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींशी साम्य असणारं पात्र आहे. ती भूमिका अतुल कुलकर्णीने अगदीच भारी केलीय.

नथुराम गोडसेसारख्या दहशतवाद्याला हीरो बनवणाऱ्या दोन्ही नाटकांमधे त्याच्या भूमिकेसाठी शरद पोक्षेसारखा हिंदुत्ववादी अभिनेताच लागला. आता नरेंद्र मोदींवरही सिनेमा येतोय. त्यात भाजपशी निष्ठा वाहिलेला विवेक ओबेरॉयच मोदींच्या भूमिकेत आहे.

यापैकी कोणत्याही म्हणजे सावरकर, गोळवलकर, गोडसे आणि मोदी यांच्यापैकी कोणत्याही हिंदुत्ववादी नेत्याच्या भूमिकेत मुसलमान अभिनेता सहजपणे स्वीकारला जाण्याची शक्यता सध्या तरी नाही. अशावेळेस ज्वलंत हिंदुत्ववादी नेते असणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीक स्वीकारला गेला, हे त्यांचं आणि त्यांच्या हिंदुत्वाचंही वेगळेपण आहे.

(या लेखात वापरलेलं व्यंगचित्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांचं आहे.)

 

हेही वाचाः

अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला काय मिळालं?
असा झाला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा