स्वप्नांचं शहर, महानगरी, मेट्रो सिटी अशी कितीतरी विशेषणं आपण मुंबई शहराला देतो. कारण हे शहर लोकांचं पोट भरतं, घर चालवतं. इथे नोकरी मिळते. लोकांच्या आयुष्याला वेग देणारं हे शहर गेल्या काही वर्षांमधे मंदावलंय. रेंगाळलंय. यालाच गतिमान करण्यासाठी सरकारनं शहरभर मेट्रोचं जाळं पसरवण्याचा प्रकल्प हाती घेतलाय.
माझी मेट्रो म्हणून आपण ज्या मेट्रोने प्रवास करतो. ती मुंबईतली पहिली वहिली मेट्रो. जून २०१४ ला पहिली वर्सोवा ते घाटकोपर ही मेट्रो सुरु झाली. सध्या मुंबईभर मेट्रोचंच काम सुरु आहे. आणि गेल्या मंगळवारीच राज्य मंत्रिमंडळाने आणखी तीन नव्या मेट्रो मार्गांना परवानगी दिलीय. महानगरी मुंबईच्या वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि वाहतुकीला गती देण्यासाठी सरकार हा प्रकल्प राबवतंय.
सध्या सुरु असलेल्या मेट्रो १ चं काम डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना २००६ मधे सुरु झालं. पण ते मुख्य बांधकाम सुरु होण्यासाठी २००८ हे वर्ष उगवलं. ट्रायल २०१३ ला झालं. आणि प्रत्यक्षात २०१४ मधे मेट्रोसिटीमधे मेट्रो धावली. मग काय, आपण सगळ्यांनीच मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेतला. त्यावेळी कितीतरी जणांनी समाधान होईपर्यंत ३-४ वेळा ही जॉय राईड केली. याआधी आपल्या मेट्रो राईड करण्यासाठी देशभर सैरवैर फिरावं लागायचं.
भारतात पहिली मेट्रो कलोनियन सिटी म्हणून ओळख असणाऱ्या कोलकात्यामधे १९८४ ला सुरु झाली. तर जगात पहिल्यांदा १८६३ ला आली. ही मेट्रो इंग्लंडच्या राजधानीत लंडनमधे सुरु झाली. आणि ही पहिली मेट्रो अंडरग्राऊंड होती. आणि आता दक्षिण मुंबईतली मेट्रोसुद्धा अंडरग्राऊंडच आहे. आपली मेट्रो तासाला ८० किमीच्या स्पीडने धावते, असं मुंबई मेट्रोने आपल्या वेबसाईटवर म्हटलंय. म्हणजे मेट्रोचं सगळ्या मार्गांवरचं काम पूर्ण झाल्यावर आपली मुंबई अगदी मेट्रोसिटीसारखी अनेकपट वेगानं सुसाट धावणार.
हेही वाचा: आग विझवण्यात मुंबईतला रोबोट अपयशी, मग जगभरात काय होतंय?
मुंबईतली मेट्रो १ म्हणजे वर्सोवा ते घाटकोपरचा मार्ग सध्या सुरू आहे त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने पुढच्या प्रकल्पांचा प्रस्ताव सादर केला. आणि त्याला मंजूरी मिळून कामाला सुरवात झालीय. आता जवळपास ४५ टक्के काम पूर्ण झाल्याचं एमएमआरडीएतर्फे सांगितलं जातं.
या मेट्रो प्रकल्पांचं काम सुरु असल्यामुळेच आपल्याला मुंबईतल्या जवळपास सर्वच भागात मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतोय. एकीकडे वाहतुक कोंडी तर दुसरीकडे काम सुरु असलेल्या ठिकाणी प्रदूषणाने डोकं वर काढलंय. धूळ, पावसात चिखल, कायमचा गोंगाट, लाईट बंद होणं हे सगळे प्रकार सुरु आहेत.
यावर एमएमआरडीचं म्हणणंय की हे काम मुंबईकरांसाठीच होतंय. थोडीशी कळ सोसली तर पुढे कधीच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. आपल्याला मुंबईला अपग्रेड करायचंय. त्यामुळे मुंबईकरांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा: पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?
सध्या शहरात सुरु असलेल्या प्रकल्पांमधे मेट्रो ३ म्हणजे कुलाबा-वांद्रे-सिप्झ हे काम दक्षिण मुंबईच्या पोटात सुरु होतं. यातलं अंडरग्राऊंड काम पूर्ण झालंय. आणि आता त्याचं एलिवेटेड काम सुरु आहे. त्याचबरोबर मेट्रो २ अ म्हणजे दहिसर ते डी.एन.नगर, मेट्रो २ ब म्हणजे डी.एन.नगर ते मंडाले, मेट्रो ४ म्हणजे वडाळा-घाटकोपर-कासार वडवली आणि मेट्रो ७ म्हणजे दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या प्रकल्पांचं काम वेगात सुरू आहे. हे सगळे मार्ग सुरू झाल्यावर जवळपास अख्खी मुंबई स्वतःशी कनेक्ट होईल.
नुकतंच राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिलेल्या प्रकल्पात मेट्रो १० म्हणजे ठाण्यातलं गायमुख ते शिवाजी चौक, मेट्रो ११ म्हणजे मुंबईतलं वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो १२ आणि कल्याण-तळोजा या प्रकल्पांचा समावेश आहे. यामधे मेट्रो १२ वगळता इतर सर्व प्रकल्पांचं काम तत्काळ सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा: मुंबईचा श्वास असणारी खारफुटीची ५४ हजार झाडं बुलेट ट्रेनसाठी तोडणार
ठाण्याला पश्चिम उपनगराशी जोडणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरच्या सार्वजनिक वाहतुकीला गती देण्यासाठी मेट्रो १० प्रकल्प आणलाय. याचा मार्गे ठाणे घोडबंदरजवळच्या गायमुख ते मिरा रोड इथे शिवाजी चौक असा असेल. मिरा रोडच्या मेट्रो ९ प्रकल्पाला हा प्रकल्प जोडण्यात येईल. मेट्रो ९ म्हणजे दहिसर ते मिरा-भाईंदर. म्हणजे मेट्रो ७ मुळे आपण अंधेरी ते दहिसर हा प्रवास करू शकतो. त्यामुळे पुढे भाईंदरवरुन आपण ठाण्याला जाऊ शकतो.
आता आपण घोडबंदर रोड किंवा जेवीएलआर रोडने बसने जातो. त्याऐवजी आपण एसी मेट्रोने अवघ्या काही मिनिटांत ठाण्याला पोचू शकतो. मग आपल्याला गर्दी आणि मुख्य म्हणजे ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही.
या नव्या प्रकल्पानुसार गायमुख, रेतीबंदर, वर्सोवा चार फाटा, काशीमिरा, शिवाजी चौक इत्यादी स्टेशन मेट्रो मार्गावर येतील. हा एकूण ११ किलोमीटरचा पट्टा आहे. आणि यासाठी साधारण ५ हजार कोटी खर्च येईल, असं एमएमआरडीएने सांगितलंय.
हेही वाचा: आज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!
वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी हा मेट्रो ११ चा मार्ग. जो वडाळा पूर्वेकडच्या ट्रक टर्मिनसपासून सुरू होईल. तर वडाळ्यापासून सुरु होणाऱ्या या मार्गाला वडाळा-घाटकोपर-कासारवडवली हा मेट्रो ४ चा मार्ग जोडण्यात येईल. कासार वडवली हा ठाणे शहराला लागून असलेला भाग. जो घोडबंदर रस्त्याला लागून आहे.
आपण मेट्रोने कासार वडवलीवरुन वडाळा आणि वडाळ्यावरुन कनेक्टेड सीएसएमटीला पोचता येईल. नाहीतर इथल्या लोकांना बस आणि रिक्षाने ठाणे लोकल मार्गावर येऊन मग सीएसएमटीला जाण्यासाठी ट्रेन पकडावी लागत होती. पण आता एकाच मार्गाने प्रवास होऊ शकतो.
हेही वाचा: १५२ वर्षांपूर्वी विरार लोकल सुरू झाली आणि त्यातून एक शहर उभं राहिलं
त्याचबरोबर चेंबूर-सातरस्ता या मोनो प्रकल्पाशी जोडला जाईल. म्हणजेच हा मधला पट्टा जिथून लोकल स्टेशन जवळ नाही. त्यांच्यासाठी मोनो तर आली पण दादरच्या मोनो स्टेशनला सोडणार. पुढे पुन्हा दादर लोकल पकडून सीएसएमटीला जावं लागतं. पण हा मार्ग जोडल्याने दक्षिण मुंबईत जाणं सोपं होईल. आणि हा मार्ग चक्क मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेमधून अंडरग्राऊंड पद्धतीने जाणार आहे.
मेट्रो ११ च्या मार्गावर एलिवेटेड वडाळा आर.टी.ओ, गणेश नगर, बी.पी.टी हॉस्पिटल इत्यादी स्टेशन येतील. तर शिवडी मेट्रो, हे बंदर, कोल बंदर, दारू खाना, क्लॉक टॉवर, कारनॅक बंदर, सीएसएमटी इत्यादी अंडरग्राऊंड स्टेशन येतील. त्यामुळे या मार्गावरचा प्रवास कसा होईल हे बघण्याची सगळ्यांना उत्सुकता असणार हे नक्की. या १४ किलोमीटरच्या मार्गासाठी सुमारे ८ हजार कोटी खर्च होणार आहे.
मेट्रो १२ साठी मात्र अजून विस्तृत प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर बनवणं शिल्लक आहे. हा अहवाल आल्यानंतर याच्या अंमलबजावणीला सुरवात होईल. कल्याण ते तळोजा हा मेट्रो १२ प्रकल्पाचा मार्ग आहे. कल्याण-डोंबिवली शहरातली वाढत्या लोकसंख्येच्या प्रवासासाठी हा प्रकल्प उत्तम असल्याचं एमएमआरडीएने म्हटलंय. तसंच कल्याण-डोंबिवलीच्या आजुबाजूच्या साधारण २७ गावांचा विकास, २७ गावांचा विकास होईल. याची पूर्ण माहिती मात्र अहवालातच येईल.
तसंच हा मार्ग कल्याण आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी बनवला जाईल. याचा डीपीआर बनवण्यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन सल्लागार म्हणून काम करेल. तसंच हा मेट्रो मार्ग नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी उपयोगी ठरेल. आणि वातानुकुलित, सुरक्षित, आरामदायी प्रवास मिळेल असंही एमएमडीएने म्हटलं.
या मार्गावर साधारणपणे ए.पी.एम.सी, कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एम.आय.डी.सी., सागाव, सोनार पाडा, मानपाड, हादुतणे, कोलगाव, निळजे गाव, वडावली, बाले, वकलण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे, तळोजा इत्यादी प्रस्तावित स्टेशन आहेत. यासाठी ११ हजार कोटींचा खर्च होण्याची शक्यता एमएमआरडीने व्यक्त केलीय.
हेही वाचा:
प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत