पंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज

०३ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


हावडा ब्रिजने पाहिलं नाही असं काही नाही. आणि हावडा ब्रिज पाहिला नाही तो कुणी नाही, असं बंगालमधे म्हणतात. आजच्याच दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारीला १९४३ मधे हा पूल सामान्यांसाठी खुला झाला. त्याच्यासारखी बांधणी असलेला जगातला अधिक रहदारीचा आणि जास्त लांबीचा हा सहावा पूल आहे. त्याचबरोबर तो कोलकात्याच्या समाज आणि संस्कृतीचं एक विभिन्न अंग बनून डौलाने उभा आहे.

भारताची ओळख बनलेली जी काही निवडक प्रतीकं आहेत, त्यातल्या बहुतांश खुणा या प्राचीन किंवा मध्ययुगीन काळातल्या आहेत. पण आधुनिक भारताचा पहिला भव्य आयकॉन म्हणावा, असा मानबिंदू म्हणजे हावडा ब्रिजच. त्याला आपल्या प्रबोधन आणि आधुनिक युगाला सांधणारा दुवा म्हणता येईल. या विक्रमी पुलाने भारताला नवी ओळख मिळवून दिली. आजही हावडा ब्रिज दिसला की भारत, बंगाल आणि कोलकाता या तिन्ही गोष्टी आपोआप नोंदल्या जातात.

आज ३ फेब्रुवारी. आजपासून बरोबर ७६ वर्षांपूर्वी हावडा ब्रिज सर्वसामान्यांसाठी खुला झाला. गेल्याच वर्षी कोलकात्याने मोठ्या उत्साहाने त्याचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या ऐतिहासिकतेची साक्ष देत तो आजही भक्कमपणे उभा आहे. ब्रिटिश स्थापत्याचा हा अनोखा संगम कोलकाताचंच नाही तर आजच्या भारताच्या वैभवाचं प्रतीक आहे. पर्यटकांसाठी हा ब्रिज आकर्षणाचा विषय आहे.

आणि हावडा ब्रिज प्रत्यक्षात आला

हुगळी नदी कोलकात्याची लाईफलाईन. हावडा आणि कोलकाता यांना जोडणारा महत्वाचा दुवा. मात्र १८ व्या शतकापर्यंत हुगळी नदी पार करण्यासाठी पूल नव्हता. छोट्या जहाजांनी नदी पार जावं लागायचं. १८६२ मधे तत्कालीन बंगाल सरकारने यावर विचार केला. त्यावेळी जॉर्ज टर्नबुल हे ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीचे चीफ इंजिनिअर होते. हुगळी नदीवर पूल बांधता येऊ शकतो का ह्याची माहिती घेण्याच काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. या आधी जॉर्ज टर्नबुलनी हावडामधे कंपनीसाठी रेल्वे टर्मिनस बनवलं होतं.

१८७४ मधे २२ लाख रुपये खर्च करुन एक पुलही बनवण्यात आला. त्याची लांबी १५२८ फूट तर रुंदी ६२ फूट होती. तो मूळ हावडा ब्रिज. १९०६ मधे हावडा रेल्वे स्टेशन बनल्यानंतर हळूहळू ट्रॅफिक आणि लोकांची वर्दळ वाढू लागली. त्यामुळे तिथं पुलाऐवजी एक फ्लोटिंग ब्रिज बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होत. काहीकाळ ब्रिजचं काम ठप्प झालं.

१९२२ मधे न्यू हावडा ब्रिज कमिशनची स्थापना झाली. त्यासाठी एक कायदाही बनवण्यात आला. निविदा मागवण्यात आल्या. जर्मनीच्या एका कंपनीने कमी दराची निविदा जमा केली. पण १९३५ च्या दरम्यान जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने ते काँट्रॅक्ट रद्द केलं. नियमावलीत बदल करुन हे काम ब्रेथवेट बर्न अँड जेसॉप कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं. १९३७ ते १९४२ मधे हावडा ब्रिज प्रत्यक्षात येऊन ३ फेब्रुवारी १९४३ लोकांसाठी खुला करण्यात आला.

जपानी हल्ल्यामुळे उद्घाटन रद्द

कोलकात्याचा हावडा ब्रिज हा ब्रिटिश स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. काँटिलिवर पद्धतीने बांधला गेलेला जगातला तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब पूल म्हणून या ब्रिजची ओळख बनली. आताही तो जगातला सर्वाधिक लांबीचा अशा प्रकारचा सहावा मोठा ब्रिज आहे.

पूर्ण ब्रिज हुबळी नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर उभ्या २८० फूट उंच पायांवर उभा आहे. एकूण लांबी २३१३ फूट लांबी असलेला हा पूल म्हणजे अभियांत्रिकी आश्चर्याचा आगळा नमुना म्हणता येईल. ब्रिजच्या दोन्ही पायांमधलं अंतर १५०० फूट आहे. पुलाच्या मुख्य दोन लेनची एकूण रुंदी ७१ फूट आहे. त्यांच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी १५ फुटांचे फूटपाथ आहेत. याची खासियत म्हणजे स्टीलच्या सुट्या भागांना जोडण्यासाठी नट बोल्ड ऐवजी धातूंपासून बनवलेल्या रिवेट्सचा वापर करण्यात आला.

ब्रिज बनल्यानंतर त्यावरून ट्राम धावली होती. १९९३मधे ट्रॅफिक वाढल्यानंतर मात्र ब्रिजवरच्या ट्रामचा आवाज बंद झाला. दुसऱ्या महायुद्ध काळात हा ब्रिज नष्ट व्हावा म्हणून बॉम्ब गोळ्यांचा मारा जपानी सेनेकडून करण्यात आला. त्यामुळे पुलाचं कोणतंही नुकसान मात्र झालं नाही. या हल्ल्यामुळे त्यातून या पुलाचा भक्कमपणा सिद्ध झाला. जपानी सेनेने १९४१ ला अमेरिकी सेनेच्या पर्ल हार्बर वर हल्ला केला. त्यामुळे सावधगिरी म्हणून ब्रिज तयार झाल्यानंतरही उद्घाटनाचा कार्यक्रम टाळण्यात आला.

टाटा स्टीलच्या पोलादाने उभारणी

ब्रेथवेल, ब्रेन अँड जेसॉप या कंपनीने हावडा ब्रिज प्रत्यक्षात बांधला. अत्यंत कौशल्याची गोष्ट असल्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या तीन मोठ्या कंपन्या एकत्र आल्या. बीबीजे म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंपनीने स्वातंत्र्यानंतरही अनेक पूल बांधले. पुढे १९८७ ला या कंपनीचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. ती भारत सरकारच्या अवजड उद्योग खात्याची कंपनी बनली.

विशेष म्हणजे या भक्कम पोलादाचं श्रेय एका भारतीय कंपनीलाच आहे. ती कंपनी आहे, टाटा स्टील. या पुलाच्या कायमस्वरूपी वापरासाठी २६,५०० टन स्टील वापरण्यात आलं होतं. त्यापैकी २३,५०० टन स्टील जमशेदपूरच्या टाटा स्टील कंपनीने पुरवलं होतं. त्यामुळे हावडा ब्रिजच्या ७५वं वर्षं टाटा स्टीलनेदेखील मोठ्या उत्साहात साजरं केलं.

सर्वाधिक रहदारीचा पोलादी पूल

हुगळी नदीवर हावडा ब्रिजनंतर विद्यासागर सेतू, विवेकानंद सेतू आणि निवेदिता सेतू हे तीन पूल उभारले गेले. मात्र आजपर्यंत सर्वात जास्त चर्चेत राहिलाय तो हावडा ब्रिज. रोज या ब्रिजवरून साधारण सव्वा लाख वाहनं आणि पाच लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. इतकी रहदारी जगातल्या कोणत्याही काँटिलिवर पुलावर होत नाही.

जपानी हल्ल्लाने हावडा ब्रिजवर परिणाम झाला नाही. पण पुलावरून जाणाऱ्या लोकांनी थुंकल्यामुळे मात्र त्याचं नुकसान झालं. हावडा ब्रिजचं मेंटेनन्स करणाऱ्या कोलकाता पोर्ट ट्रस्टने सांगितलं की गुटखा आणि पान खाऊन थुंकल्यामुळे २००७ ते ११ या काळात ब्रिजच्या पोलादाची जाडी सहा मिलीमीटरने खरवडली गेलीय. २००५मधे एक व्यापारी जहाज आदळल्यानेही पुलाची हानी झाली. नंतर त्याच्या डागडुजीत ८ टन स्टील लागलं. मुळातल्या स्टीलसारखंच स्टील मिळावं म्हणून खूप आटापिटा करावा लागला.

हावडा ब्रिज गेटवे ऑफ कोलकाता नावाने प्रसिद्ध आहे. पण याचं अधिकृत नाव फारसं कुणाला माहीत नाही. नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं नाव त्याला देण्यात आलंय. रवींद्र सेतू हे त्याचं सरकारी नाव आहे. १९६५ मधे हा निर्णय घेण्यात येऊन आजही हावडा ब्रिज हेच नाव रूढ आहे.

सिनेमावाल्यांचा लाडका सांस्कृतिक सेतू

हावडा ब्रिज कायमच सिनेमावाल्यांचं आकर्षण होता. शक्ती सामंता यांनी हावडा ब्रिज नावाचा सिनेमाही १९५८ मधे बनवला होता. मधुबाला आणि अशोक कुमार यांनी लीड रोल केला. पण गाजली ती ओपी नय्यर यांची गाणी आणि त्यावर थिकरणारी हेलन. गीता दत्त यांनी गायलेलं `मेरा नाम चिन चिन चू` आणि आशा भोसलेंचं `आइए मेहरबां` या गाण्यांमुळे हा सिनेमा अजरामर झाला.

इतरही कित्येक सिनेमांत हावडा ब्रिज दिसला. अनेकदा तो कोलकता शहर दाखवण्यासाठी होता. पण अनेक सिनेमांत त्याचं असणं कायमचं लक्षात राहिलं. त्यापैकी बिमल रॉय यांचा दो बीघा जमीन, सत्यजित रेंचा पराश पथर, मृणाल सेन यांचा नील अक्सर नीचे असे क्लासिक्स होते. १९६२ मधला चायना टाउन आणि १९७१ च्या अमरप्रेम या सिनेमांमध्ये हा ब्रिज दिसतो. १९६९ चा सिनेमा खामोशीमधल्या 'वो शाम कुछ अजीब थी' या प्रसिद्ध गाण्याला हावडा ब्रिजमुळे वेगळा आयाम सापडतो.

त्यानंतरही देवानंद यांचा तीन देवियां, राज कपूरचा राम तेरी गंगा मैली, इंग्रजी सिनेमा सिटी ऑफ जॉय या सिनेमांत तर हावडा ब्रिज लक्षात राहावा असा आहेच. पण मनिरत्नमचा युवा, इम्तियाज अलीचा लव आज कल, अनुराग बासूचा बर्फी, यशराजचा गुंडे या एकविसाव्या शतकातल्या सिनेमांमधेही हावडा ब्रिज चांगलाच डोकावतो.

दुर्गापूजेपासून सिनेमापर्यंत अनेक गोष्टींचा साक्षीदार म्हणून हावडा ब्रिजची ओळख जगाला झालीय. भारताच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालण्याचं काम केलं. कोलकाता आणि हावडा या दोन शहरांसोबतच आपल्या कला आणि संस्कृतीला जोडणारा हा सेतू आहे. दररोज लाखो लोक या ब्रिजवरून ये जा करत असतात. यात कामकरी, कष्टकरी, व्यापारी यांचा भरणा अधिक आहे. औद्योगिक विकासाचा साक्षीदार म्हणून हा ब्रिज उभा आहे. शहरी आणि ग्रामीण जनसमूहाला सांधण्याचं काम या पुलाने केलं. त्यातून भारताचं सांस्कृतिक वैभव समृद्ध करण्याचं काम झालं.