चर्चा तर होणारचः गुप्तेंच्या भयकथांमागचं उचलेगिरीचं गूढ

०३ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


खूप कमी काळात कथाविषय आणि शैलीमुळे लोकप्रियता मिळवलेले तरुण लेखक हृषीकेश गुप्ते साहित्यिक उचलेगिरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेत. तीनेक वर्षांपासूनच्या दबक्या आवाजातल्या या चर्चेला प्रतीक पुरी यांनी तोंड फोडलंय. सोशल मीडियावरही या वाङ्मयचौर्याची जोरात चर्चा सुरू आहे. फेसबूकवरच्या वाद-प्रतिवादाचा घेतलेला हा वेध.

आजच्या पिढीचे आश्वासक आणि प्रतिभावान लेखक म्हणून ह्रषीकेश गुप्ते यांच्याकडे बघितलं जात. पण ते सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय बनलेत. अंधारवारी, घनगर्द, चौरंग यासारख्या कथासंग्रहानंतर गेल्यावर्षाच्या सुरवातीला आलेल्या दंशकाल या त्यांच्या कादंबरीचीही खूप चर्चा झाली. होतेय. पण आता त्यांच्यावर वाङ्मयचौर्याचे म्हणजेच उचलेगिरी केल्याचे आरोप होत आहेत. गेल्या तीनेक वर्षांपासून दबक्या आवाजात सुरू असलेल्या या चर्चेला आता तोंड फुटलंय.

तरुण लेखक प्रतीक पुरी यांनीच आपला मित्र ह्रषीकेश गुप्ते यांच्या कथालेखनाचं बिंग फोडलंय. लोकसत्तामधे रविवारी आलेल्या प्रतीक यांच्या लेखाने एकंदरीत मराठी साहित्य वर्तुळात खळबळ उडालीय. गुप्ते यांच्या आजवरच्या लिखाणाबद्दल फेसबूकवरही खूप भरभरून लिहून आलंय. या उचलेगिरीचा काही जण खरपूस समाचार घेताना दिसतात. दुसरीकडे गुप्ते यांना ओळखणारे, जवळचे लोक प्रतीक यांच्यावरच आक्षेप घेत आहेत. त्यामुळे गुप्ते यांच्या भयकथांमागचं गूढ आणखी वाढलंय.

पाच मुख्य आरोप

सगळ्यात आधी आपण गुप्तेंवर प्रतीक पुरी यांनी केलेले आरोप असे,  

१) गुप्ते यांच्यावर तीन वर्षांपूर्वीच म्हणजे २०१५ मधे वाङ्मयचौर्याचे आरोप झाले. या काळात त्यांनी एकदाही समोर येऊन आपली भूमिका मांडली नाही.

२) ऑगस्ट २०१८ मधे रोहन प्रकाशनाने गुप्तेंचा 'घनगर्द' हा भय गूढकथासंग्रह काढला. यातली 'घनगर्द' ही कथा जागतिक पातळीवरचे इंग्रजी लेखक स्टीवन किंग यांच्या ‘द गर्ल हू लव्हड् टॉम गॉर्डन’ या लघुकादंबरीवर आधारित आहे. मात्र, कथासंग्रहात तसा कुठलाच उल्लेख नाही.

३) याआधी २०११ मधे मनोविकास प्रकाशनाने ‘अंधारवारी’ हा कथासंग्रह काढला. त्यातली ‘काळ्याकपारी’ ही कथापण किंग यांच्याच ‘एन’ या कथेवर आधारलेली आहे. कथेचा मूळस्रोत आपण प्रकाशकांना सांगितल्याचा दावा गुप्ते यांनी केलाय. पण आपल्याला असं काही सांगितल्याचं नसल्याचं प्रकाशकाचं म्हणणं आहे.

४) २०१७ मधे अंधारवारी कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती आली. त्यातही काळ्याकपारी ही मूळ कथा असल्यासारखंच पेश करण्यात आलं. असं करून वाचकांची फसवणूक केली.

५) गुप्तेंनी आपल्या कथेचा मूळस्त्रोत सांगायला हवा. पण त्यांनी हे वाचक, प्रकाशक यांच्यापासून लपवून ठेवलंय.

या सगळ्या आरोपांना घेऊन आता फेसबूकवर जोरात चर्चा सुरू झालीय आहे. मोठमोठ्या लेखकांनी यावर आपलं मत व्यक्त केलंय. काहीजण गुपचुप बसून पोस्ट, कमेंट वाचून मनोरंजन करून घेतायंत. 

बाजू मांडायची संधी

ज्येष्ठ लेखक संजय भास्कर जोशी यांनी लिहिलंय, ‘प्रतीक पुरीने कालच्या लोकसत्तेत लेख लिहून हृषीकेश गुप्तेच्या कथा परकीय साहित्यावर आधारित आहेत काय, या विषयावर चर्चा सुरू केली. त्याबद्दल हृषीकेश गुप्तेसकट सर्वांनी प्रतीकचे अभिनंदन करायला हवं. कारण ज्या विषयावर छुपी आणि खाजगीत शेरेबाज चर्चा चालू होती तो विषय अशा प्रकारे खुल्या चर्चेत येणे हृषीकेशलादेखील न्याय देणारेच आहे. न केलेल्या आरोपांना उत्तरे आणि स्पष्टीकरणंच देता येत नाहीत. त्यामुळे आता हृषीकेशला त्याची बाजू मांडायची संधी मिळाली आहे, हे चांगलेच आहे.’

ज्येष्ठ कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांच्या मते, `लोकप्रिय आणि गंभीर कलात्मक लेखन यांत समतोल साधू शकण्याची शक्यता असलेले काही नवे लेखकही आजूबाजूला दिसतायत. त्यातले एक गुप्ते आहेत. त्यांची कथनक्षमता, पात्रचित्रण वाचकांना  आपल्या लेखनाशी बांधून ठेवणारी आहे. त्यांना स्वत:चा आवाज सापडू शकतो आज उद्या. पण लेखकाची म्हणून एक मूल्यव्यवस्था असावी लागते. ती उसनी आणता येत नाही. तिचा अभाव असेल तर निव्वळ लोकप्रियतेच्या नादी लागून भलेबुरे मार्ग चोखाळण्याचा मोह होऊ शकतो.`

दबक्या आवाजातल्या चर्चेला फुटलं तोंड

इतके दिवस दबक्या आवाज सुरू असलेल्या चर्चेला पत्रकार, लेखक प्रतीक पुरी यांनी तोंड फोडलंय. मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून देणारे पुरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. याआधीही त्यांनी मराठीतल्या साहित्यबाह्य गोष्टींवर परखड लिखाण केलंय. देव, धर्म आणि माणुसकीची चिकित्सा करणारी ‘मोघ पुरुस’ ही त्यांची कादंबरी गेल्यावर्षीच आलीय. किंडलवर वाफाळलेले दिवस, उधळी आणि चॅलेंज ही त्यांची डिजिटल माध्यमातून पुस्तकं प्रकाशित झालीत.

फेसबूकवर सक्रीय असलेले तरुण लेखक श्रीरंजन आवटे यांनी ह्रषीकेश गुप्ते आणि वाङ्मयचौर्य प्रकरणावर पोस्ट टाकलीय. त्यांनी पोस्टच्या अधिकृततेचा मुद्दा मांडताना लिहिलंय, `प्रतीक आणि हृषीकेश या दोघांमध्येही कुठलंही वैमनस्य नाही. उलट प्रतीकने हृषीकेशच्या लेखनाविषयी वेळोवेळी लिहिलं आहे. आपण हृषीकेशच्या लिखाणाचा चाहता असल्याचं प्रतीक नेहमीच बोलत आला आहे. कुठलाही पूर्वग्रह, वैमनस्य, ईर्ष्या नसताना हा लेख लिहिला असल्याने त्याची अधिकृतता वाढते.`

प्रतीक पुरी यांच्याआधी शशिकांत सावंत यांनी वाङ्मयचौर्याच्या या प्रकरणाला गेल्या नोव्हेंबरमधे फेसबूकवर पोस्ट टाकत वाचा फोडली होती. पण त्यांच्या पोस्टकडे त्यावेळी कुणाचं लक्ष गेलं नाही. ती पोस्ट दुर्लक्षित झाली. सावंत हे वेगवेगळ्या दैनिकांत इंग्रजी पुस्तकांबद्दल परीक्षण लिहतात. तसंच इंग्रजीतल्या संग्राह्य पुस्तकांचे ते विक्रेतेही आहेत.

आरोप करणारे आताच कुठून आले?

शशिकांत सावंत त्याविषयी ताज्या पोस्टमधे म्हणतात, `सध्या अनेक अंकात ज्यांचं लेखन दिसतं ते ह्रषीकेश गुप्ते सरळ सरळ कथा चोरत होते. त्याची चर्चा इथे आहे. आताही त्यांच्या ज्या कथा भोवती दिसतात त्यात काही कॉपी आहेत. त्याबाबत नंतर. पण आधी चर्चा तर होऊ दे. मी हे लिहिलं नाही, तर इतर पंटर लिहिणारच नाही. पेंडसे, आरती प्रभूची पॅरडी करून माणूस इतका लोकप्रिय कसा होतो.`

हृषीकेश गुप्ते यांची बाजू घेणारेही फेसबूकवर अनेकजण आहेत. त्यांचा मुख्य मुद्दा आहे, ‘अंधारवारी’ हा कथासंग्रह येऊन आता सातेक वर्ष झाली. त्यावर २०१५ मधे ऐसी अक्षरे या वेबसाईटवरच्या चर्चेत वाङ्मयचौर्याचा आरोप झाला. मग हे प्रकरण आताच उकरून का काढलं?

लेखक हेमंत कर्णिक यांनी कमेंटमधे विचारलंय, ‘२०१५ सालचा धागा आत्ता उकरून काढण्यामागचा उद्देश? वरवर तरी हिडीस वाटतं. अर्थात उद्देश पटल्यास क्षमा मागेन. ऐसी अक्षरेवर जाऊन तिथली शेरेबाजी खूप खालपर्यंत वाचली. एकाही ठिकाणी हा सूर्य आणि हा जयद्रथ केलेलं नाही!

यावर सावंत लिहितात, ‘चर्चा २०१५ मधली आहे. गुप्ते यांनी शालापत्रकात लिहिलेल्या कथेची चर्चा चालू नाहीये. तू म्हणतोयस अशी समीक्षा मी करणारच आहे. एक गोष्ट करून बघ त्यांची मौजेतली दीर्घकथा आणि बाळकृष्ण प्रभुदेसाई यांची जहाज ही कथा वाचून बघ. मग तुला पॅरडी म्हणजे काय? मी काय म्हणतोय ते लक्षात येईल.’

उचलेगिरीचे तीन प्रकार

सावंत यांच्या मते, साधारणपणे तीन प्रकारे उचलेगिरी करता येते. एक, शब्दशः. दुसरी, थोडीशी मूळ कथावस्तूत फेरफार करून. तिसरी त्यातील सेंसिबिलिटीची. तिसऱ्या प्रकाराला अर्थात चोरी म्हणत नाहीत. गुप्तेंनी दुसरा प्रकार केलेला आहे. 

फेसबूकवर ‘तांबेबाबा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कथालेखक सतीश तांबे यांनी गुप्तेची बाजू लावून धरलीय. तांबेबाबांनी ‘परदे के पीछे’ कुणी तरी असल्याचाही संशय व्यक्त केलाय. 

परदे के पीछे कुणी असल्याचा संशय

तांबेबाबा लिहितात, ‘प्रतीक पुरीच्या लेखात तसं छाननी करण्यासारखं खूप काही आहे. जसं की >> लेखक हृषीकेश गुप्ते यांना आम्ही वाचक गेली काही वर्षे ओळखतो आहोत<< ह्या वाक्यात ते 'आम्ही' हा उल्लेख 'अनेक वाचक' ह्याअर्थी करतात आणि नंतर ते >> आम्हाला या गोष्टी नुकत्याच कळल्या.<< असा उल्लेख करतात आणि संपूर्ण लेखभर 'आम्ही' योजूनच लिहितात, तेव्हा वाचकाला प्रश्न पडतो की हे 'आम्ही' हे स्वतः विषयी आदरार्थी सर्वनाम आहे की ज्यांच्यावतीने ते बोलत आहेत असे त्यांच्यासोबत 'परदे के पीछे' आणखी कुणी आहेत?’ तांबे यांनी काही दिवसांपूर्वीच गुप्ते यांच्या दंशकाल या कादंबरीचं एका पेपरात परीक्षण केलंय.

आपल्या पोस्टच्या शेवटी तांबेबाबा म्हणतात, ‘प्रतीक पुरीचा हा लेख वाचून माधव मनोहर आठवले. मराठीतील वाङ्मयचौर्य त्यांच्याएवढे उघडकीला कुणीच आणले नसेल. त्यांचा व्यासंग एकुणात दांडगा होता. प्रतीक पुरी आणि त्यांच्या 'आम्ही' मध्ये जर आणखी कुणी असतील तर त्यांनी हे काम आता नेटाने पुढे रेटावे. संपादक /प्रकाशक हे व्यासंगी असतील आणि त्यांचे कुठचीही उचल ओळखण्याएवढे वाचन असेल ही अपेक्षा अवाजवी आणि म्हणूनच अव्यवहार्य आहे.’

प्रतीक पुरी यांनी लोकसत्तेतल्या लेखावरच्या आक्षेपांना दोन पोस्ट लिहून उत्तर दिलंय. पहिल्या पोस्टमधे ते लिहितात, ‘अनेकांनी असा आक्षेप घेतला की मी पुरावे दिले नाहीत. तर वर्तमानपत्रांत शब्द मर्यादा असते. त्यामुळे ते शक्य नव्हतं. पण उघडपणे नावं देऊनही जर कोणाला त्याची चाचपणीही करता येत नसेल तर त्यांच्या या आळशीपणाचा दोष माझ्यावर नको.’ पुरी यांनी आपल्या दुसऱ्या पोस्टमधे सतीश तांबे यांच्या पोस्टलाही उत्तर दिलंय. तसंच गुप्ते यांच्या कथेवरच्या आरोपांचाही सविस्तर परामर्श घेतलाय.

तर पाल चुकचुकत राहील

प्रतीक पुरी आणि हृषीकेश गुप्ते हे दोघे मित्र आहे. त्यामुळे या मित्रावरच्या आरोपांबद्दल लिहिताना आपल्याला पुरता घाम फुटल्याचं प्रतीक यांनी लिहिलंय, ‘हा लेख लिहिताना माझ्या हातापायांना घाम फुटला होता. कानशिलं तापली होती. आपल्याच मित्राविरोधात, आपल्या सहधर्मी लेखकाच्या विरोधात, आपल्या अंकाच्या लेखकाविरोधात, आपल्या आवडत्या लेखकाविरोधात हे लिहिताना माझी काय तगमग झाली ते मला माहीत आहे. हेही मी त्याला सांगितलं होतं. आता तुम्हालाही सांगतो. हा लेख लिहू नये किंवा विचार करून लिही, नाही तर सारे तुझ्यावर तुटून पडतील असे काळजीचे सल्ले अनेकांनी दिलेत मला. मलाही त्याची कल्पना होतीच की मी मधमाशांच्या मोहोळावर दगड मारतोय म्हणून. उद्या माझ्या बाजूनं कोणी बोलणार नाही उघडपणे म्हणून. मी कोणाचा आकस, द्वेषही करत नाही. गुप्तेची काळजी होती म्हणूनच त्याला विचारलं, भेटलो. कारण माझ्या मित्रावर बालंट येऊ नये, मराठी नवोदित लेखकांवर डाग लागू नये, ही इच्छा होती माझी.’

‘प्रतीक पुरी तुम्ही खरंच प्रामाणिक आणि धाडसीसुद्धा आहात. कारण असे प्रश्न पडले असतील तर लोकं बंद दरवाज्याआड विचारण्यासाठी पण कचरतात. इथे तर तुम्ही लोकसत्तेत प्रश्न उपस्थित करणारे टिपण लिहण्याची हिम्मत दाखवलीत. टेक अ बोअ’, अशी पोस्ट टाकत लेखक प्रसाद कुमठेकर यांनी प्रतीक यांचं कौतुक केलंय.

लेखिका रेखा ठाकूर लिहितात, ‘हीच भीती सतावते की साहित्यकृतीकडे निख्खळपणे पाहणं अवघड होईल. पाल चुकचुकत राहील. दाद नैसर्गिकपणे नाही दिली जाणार. माझ्यासमोर 'दंशकाल' आहे. पण आता ती असोशी मावळलेय वाचायची.’

आरोप होऊन तीन दिवस झालेत. हृषीकेश गुप्ते यांच्या बाजूने अजून कुठलाच खुलासा आलेला नाही. पण त्यांच्या बाजूने काही लोक फेसबूकवर किल्ला लढवताना दिसतात. गुप्ते येत्या रविवारी लेख लिहूनच प्रतिवाद करणार असल्याचंही सांगितलं जातंय. मात्र, गुप्ते समोर येऊन खुलासा करत नाहीत तोपर्यंत ते आरोपीच्या पिंजऱ्यात राहणार हे निश्चित. आणि मायमराठीची काळजी करणाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे.