आपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात.
कार्यक्रमः ओआरएफ विश्ववेध व्याख्यानमाला
ठिकाणः रुईया कॉलेज, माटुंगा (पूर्व), मुंबई
वेळः १९ नोव्हेंबर २०१९, सकाळी १०:३०
वक्तेः सुबोध जावडेकर, मेंदूविज्ञानाचे अभ्यासक, जेष्ठ लेखक
विषयः मेंदूची स्पर्धा जगाच्या वेगाशी!
काय म्हणाले: अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण तंत्रज्ञानयुगात कशाप्रकारे जगतो
मानवी शरीरातले अवयव स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार विकसित होत जातात. आसपासची परिस्थिती बदलली की अवयवांचा आकार, रंग, काम करण्याची पद्धत बदलते. आपला मेंदूही आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःला बदलत असतो. पण यात एक गोम आहे. मानवी मेंदू शंभर वर्षाला ०.५ टक्के इतक्या गतीनं बदलतो. म्हणजेच मेंदूची बदलण्याची गती फार संथ आहे आणि त्यामानानं आपलं जग फार झपाट्याने बदलतंय.
जग ज्या वेगानं बदलतंय त्या वेगानं या जगाशी जुळवून घेणं मेंदूला फार अवघड जातंय. आपलं जगणं जास्त चांगलं व्हावं, आपल्याला आणखी सुलभतेनं जगता यावं यासाठी मेंदू किंवा आपल्या अवयवांमधे बदल होत असतो. आता हे बदल कसं होतात आणि बदलत्या काळात जगाशी स्पर्धा करत असताना मेंदूमागे पडत असताना काय होतं, तंज्ञज्ञानाचा काय परिणाम मेंदूवर होतो याविषयी आपल्याला बोलायचंय.
सुरवातीलाच एक प्रसंग सांगतो. २००८ मधे पुण्यात एक घटना घडली. उदित भारती खून खटला फार गाजत होता. प्रेमाच्या त्रिकोणातून हा खून झाल्याचा संशय होता. आदिती शर्मा हिनं प्रियकरासोबत राहता यावं यासाठी आपला नवरा उदितला प्रसादात आर्सेनिक हे विष घालून खायला दिलं. पण तिच्याविरूद्ध कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता.
तेव्हा तिनेच खून केला आहे हे सिद्ध करण्यासाठी एक नवं तंत्रज्ञान वापरून तिच्या मेंदूचा स्कॅन करण्यात आला. तिला इंजेक्शन देऊन अर्धवट बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर तिच्यासमोर काही वाक्यं म्हणण्यात आली. उदाहरणार्थ, आकाशाचा रंग निळा असतो किंवा तू आज निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहेस अशाप्रकारची.
या वाक्यांसोबतच मी आर्सेनिक हे विष विकत आणलं, मला माझा नवरा आवडत नव्हता अशीही वाक्य तिच्यासमोर बोलण्यात आली. ही वाक्य ऐकल्यानंतर तिच्या मेंदूमधे काय घडामोडी होतात हे बघण्यात आलं. पहिल्या प्रकारची जनरल वाक्यं बोलली जायची तेव्हा ती शांत असायची. पण दुसऱ्या प्रकारची वाक्य ऐकल्यावर तिच्या मेंदूमधे काही हालचाली व्हायच्या. त्यावरून खून तिनेच केला हा आरोप सिद्ध झाला.
सर्जिओ कॅनाव्हेरो नावाचा एक इटालियन डॉक्टर आहे. त्याला डोकं बदलायची सर्जरी करायची होती. एका माणसाचं डोकं काढून ते दुसऱ्या माणसाच्या डोक्यावर लावायचं अशी ही सर्जरी होती. अशी सर्जरी करण्यासाठी कोणताही देश परवानगी देत नव्हता. पण ही सर्जरी करण्याची परवानगी चीननं दिली.
रशियातला वलेरी स्पिरीडोनोव हा अपंग माणूस होता. त्याचं संपूर्ण शरीर विकलांग होतं. फक्त डोकं काम करत होतं. हा माणूस सर्जरीसाठी तयार झाला. याचं डोकं काढून ब्रेनडेड झालेल्या एका व्यक्तीवर लावायचं असं ठरलं.
सगळी जुळवाजुळव करताना त्या रशियन अपंग माणसानं लग्न केलं आणि त्याला मुलं झाली. त्यानंतर त्यानं सर्जरीमधून माघार घेतली. त्यामुळे आजतयागत ही सर्जरी पुर्ण होऊ शकलेली नाही. आता ही टीम दुसऱ्या वॉलेंटिअरच्या शोधात आहे. ही सर्जरी आज ना उद्या पूर्ण होईल. पहिली अयशस्वी झाली तरी पुढे ही सर्जरी यशस्वी होणार.
हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट या अशक्य गोष्टी वाटत होत्या. आज त्या सहज शक्य आहेत. पण ही सर्जरी झाल्यामुळे काही मोठे प्रश्न उभे राहणार आहेत. जसं की, रशियातला माणूस चीनमधे गेला आणि त्याच्यावर सर्जरी केली आणि ती यशस्वी झाली तर परत येताना त्याच्या पासपोर्टशी त्याचा फोटो जुळेल. पण बोटांचे ठसे जुळणार नाहीत. पुन्हा तो नेमका कोण आहे हेही कळणार नाही. ब्रेनडेड व्यक्तीची बायको त्याला आपला नवरा म्हणेल. तर रशियन माणसाची बायकोही त्याला आपला नवरा म्हणेल. किंवा कदाचित दोघीही त्याला नाकारतील.
हेही वाचा : आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागे दडलंय पैशांचं गणित
अरुणा शानबागची गोष्ट भारतातल्या अनेकांना माहीत असेल. १९७३ मधे वयाच्या २५ व्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाला. त्या धक्क्यानं ती बेशुद्धावस्थेत गेली. त्यानंतरची ४३ वर्ष ती अंथरुणाला खिळून होती. तिच्या या अवस्थेला वैज्ञानिक भाषेत भाजीपाल्यासारखी अवस्था असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की तिला बोलता येत नव्हतं. बोटसुद्धा हलवता येत नव्हतं. पण श्वासोच्छ्वास चालू राहतो. अन्न भरवलं तर ते पचत.
तिच्या आयुष्यातली पहिली शोकांतिका तर आपल्याला माहीत आहे. पण दुसरी शोकांतिका अशी की ४३ वर्ष तिला असं भाजीपाल्यासारखं जगावसं वाटत होतं का नव्हतं? तिला जबरदस्तीनं जगवण्यात आलं का? तुला जगायचंय की नाही असं विचारलं असतं तर तिनं काय सांगितलं असतं? कुणी म्हणेल ती बेशुद्ध होती. मग तिला कसं विचारणार?
१९७३ मधे तिला तसं विचारण्याची शक्यता नसली तरी नंतरच्या काळात बेशुद्ध माणसाशी बोलू शकता येईल, असं एक मशिन निघालं. त्या मशिनंचं नाव आहे एफ-एमआरआय. ज्याचा एफ-एमआरआय काढायचाय त्याचं डोकं मशिनमधे घालून त्या माणसाला एखादी आज्ञा दिली तर मेंदूत कोणत्या हालचाली होतात हे बघता येतं.
आपण हालचाल केल्यानंतर न्युरॉन म्हणजे मेंदूतली पेशी उत्तेजित होते. त्यामुळे साहजिकच तिला जास्त ऑक्सिजन आणि जास्त रक्तपुरवठा लागतो. त्यावरून कोणती गोष्ट करताना मेंदूचा कोणता भाग कार्यरत असतो हे कळतं. एक्स-रे सारखा हा फोटो असतो. मेंदूविज्ञानाच्या दृष्टीनं हे मशिन फार महत्वाचं आहे.
बेशुद्धावस्थेत असलेल्या पेशंटला एफ-एमआरआयच्या मशिनमधे घालायचं आणि त्याला मनातल्या मनात टेनिस खेळायला सांगायचं. त्या पेशंटला हातापायाचा एकही अवयव हलवता येत नसला तरी प्रत्यक्ष टेनिस खेळताना हातापायांचा वापर झाल्यामुळे बेशुद्ध नसलेल्या माणसाचा मेंदूचा जो भाग उत्तेजित होतो साधारण तोच भाग एफएमआरआयच्या स्कॅनमधे मनातल्या मनात टेनिस खेळताना उत्तेजित होतो.
मग या बेशुद्ध माणसाला घरामधे फिरतोय अशी कल्पना कर, असं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर बेशुद्ध नसलेल्या माणसाला घरातल्या घरात फिरण्याची कल्पना करायला सांगितली. तेव्हा दोघांच्याही मेंदूचे साधारण सारखेच भाग उत्तेजित होतायत हे समोर आलं. यावरून बेशुद्धावस्थेतही माणसाच्या मेंदूचे स्नायू चालू असतात आणि माणसाला बोललेलं कळतं हे सिद्ध झालं.
हा प्रयोग ज्यानं केला त्यानं पुढच्यावर्षी एक नवा प्रयोग केला. बेशुद्ध माणसाला 'तुझं नाव रिचर्ड्स आहे का?’ असं विचारलं. या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर टेनिस खेळायचं आणि नाही असेल तर घरातल्या घरात फिरायचं असं त्याला सांगितलं गेलं.
त्या बेशुद्ध माणसाच्या मेंदूचे जे भाग उत्तेजित होतात त्यावरून त्याला हो म्हणायचं होतं का नाही म्हणायचं होतं हे कळलं. असा प्रयोग ५४ पेशंटवर करण्यात आला. त्यातल्या ५ पेशंट्सनी एकदम बरोबर उत्तरं दिली. इतरांनी थोडी उत्तरं बरोबर दिली. काहींनी एकही बरोबर दिलं नाही.
आता यातून काही प्रश्न निर्माण होतात. समजा, अशा अवस्थेतल्या माणसाला ‘तुला जगायचंय का’ असं विचारलं आणि तो माणूस नाही म्हणाला तर काय करायचं? उत्तर नाही असेल तर टेनिस खेळ असं अरुणा शानबागला विचारलं असतं आणि तिनं टेनिस खेळलं असतं तर काय करायचं? त्या माणसाची इच्छा म्हणून त्याच्यावरचे उपचार थांबवायचे की त्याच्या नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला जगवायचं?
हेही वाचा : फारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय?
आपण अनेकदा खोटं बोलतो. आपण खरं बोलतो तेव्हा आणि खोटं बोलतो तेव्हा मेंदूतले वेगवेगळे भाग उत्तेजित होत असतात. खरं बोललो तर आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते.
समजा, एखाद्यानं मला विचारलं की तुम्ही इकडे कसं आलात? आणि मी खरं सांगितलं की बसने आलो. तर मेंदूला मी बसने आलोय एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते. पण मी टॅक्सीनं आलो असं मी खोटं बोललो तर माझ्या मेंदूला मी बसने आलो हेही लक्षात ठेवावं लागतं आणि मी टॅक्सीचं खोटं सांगितलंय हेही लक्षात ठेवावं लागतं.
त्यामुळे फक्त खरं बोलताना मेंदुतले समजा २ भाग उत्तेजित होतात. तर मी टॅक्सीनं आलो असं खोटं सांगताना खरं लक्षात ठेवलेले २ भाग आणि त्यासोबत खोटं लक्षात ठेवणारे ३ भाग असे ५ भाग उत्तेजित होतात. याचा उपयोग करून माणूस खरं बोलतो की खोटं हे शोधता येईल का असा प्रश्न आहे.
या तंत्रज्ञानाचा उपयोग करून माणूस खरं बोलतंय की खोटं हे ९० टक्के परफेक्ट सांगू शकतो, असा अमेरिकेतल्या अनेक कंपन्यांनी दावा केलाय. पण यात जाहिरातबाजी खूप आहे असं दिसून येतं. प्रत्यक्षात नार्को टेस्टपेक्षा २४ टक्के जास्त अचूकता या टेस्टमधून येऊ शकते.
ही काही उदाहरणं झाली. याशिवाय, मेंदूला रोज २० मिनिटं याप्रमाणं रोज थोडेसे विजेचे झटके देऊन मेंदूची स्मरणशक्ती वाढवणं, मेंदूमधे चीप बसवून त्याची शक्ती वाढवणं, काही औषधं घेऊन मेंदूची एकाग्रता वाढवणं, मेंदू तल्लख करून घेणं अशी अनेक नवीन तंत्रज्ञानं विकसित झालीयत. हे असं करणं बरोबर असेल की समतेच्या तत्त्वाविरूद्ध असेल असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. नैतिक अनैतिकतेचा मुद्दा इथं फार महत्वाचा असतो.
इतकंच काय, तर लोहचुंबकाचा वापर करून माणसाच्या नैतिक, अनैतिकतेच्या संकल्पना बदलण्यापर्यंतचा विकास न्युरॉलॉजीत झालाय. कॉस्मेटिक सर्जरीसारखं कॉस्मेटिक न्युरोसर्जरी करणं असे प्रकारही चालतात. हे असं पुढे फार प्रगत झालं तर श्रीमंत लोक आपल्याकडच्या पैशांचा वापर करून आपापले मेंदू तल्लख करून घेतील आणि त्याचा वापर स्वार्थासाठी करतील. त्याचा न्यायसंस्थेवर काय परिणाम होईल हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा ठरेल. पण असे प्रश्न उद्या मेंदूविज्ञानशास्त्रामुळं पुढे येणार आहेत.
मेंदूचा स्कॅन करून एखादा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करतो का फक्त मैत्रीची भावना मनात ठेवतो हेही बघणं शक्य होणार आहे. कारण मैत्री आणि प्रेमामधे मेंदूचे वेगवेगळे भाग उत्तेजित होत असतात. इतकंच काय, माइंड रिडिंग या नव्या तंत्रज्ञानावरून मेंदूमधे काय चाललंय हेही शोधून काढता येतं. हे तंत्रज्ञान अजून बाल्यावस्थेत असलं तरी या तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूत असणारी माणसाची खासगी माहिती, त्याचा खासगी डाटा, एटीएम वगैरेचे पिन नंबर काढता येणं शक्य होणार आहे. येत्या ५ वर्षांत आपला मेंदू काय विचार करतोय हे स्पष्टपणे कळू शकेल.
हेही वाचा : इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा
मीडिया आणि सोशल मीडियाचा एक वेगळा परिणाम मेंदूवर होत असतो. त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम आहेत.
तंत्रज्ञानामुळे न्युरोलॉजीत झालेल्या या प्रगतीमुळे शैक्षणिक क्षेत्रातही काही नव्या शाखांचा उदय झालाय. त्यात न्युरोइकोनॉमिक्स, न्युरोमार्केटींग, न्युरोफिलॉसॉफी, न्युरोएथिक्स अशा अनेक नव्या आणि इंटरेस्टिंग शाखा उदयाला येताहेत. या शाखांचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात २० लाख वर्षांपूर्वीचा मेंदू घेऊन आपण जगतो आहोत. अश्मयुगातल्या म्हणजे जंगलात राहणाऱ्या, फळं वेचणाऱ्या, शिकार करणाऱ्या माणसाचं आयुष्य सुखकर करण्यासाठी जो मेंदू लागतो तोच मेंदू आपण आज घेऊन जगत आहोत. त्यात फार बदल झालेला नाही. पण आजच्या आधुनिक जगातही हा मेंदू आपल्याला साथ देतो. पण गंमत अशी की हा अश्मयुगातला मेंदूही आपल्याला आजतयागत नीट समजलेला नाही.
जवळपास ४०० वर्षांपूर्वी वाक्सो-द-गामा सारखे खलाशी जगाच्या शोधात निघाले. फिरत फिरत त्यांनी काही बेटं शोधली आणि जगाचा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी तयार केलेला नकाशा अपूर्ण आणि चुकीचा होता. तसाच आपण आज मेंदूचा नकाशा तयार करत आहोत. काही बेटं, काही भाग चाचपडून पाहतोय. पण आपला मेंदूचा नकाशा आजही पूर्ण आणि परफेक्ट झालेला नाही, याची आठवण ठेवणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
श्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर
कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?
जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा
आजच्या जगात कुठल्याही एका समाजाची दादागिरी चालणार नाहीः निळू दामले