द्वेषावर हिंसेने विजय मिळवायचा की प्रेमाने?

११ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


गेल्या दोनचार दिवसांत भारतीय सुरक्षा दलातल्या पोलिसांच्या भाषणांचे दोन विडिओ वायरल झालेत. दहशतवाद, नक्षलवाद संपवताना मानवाधिकारांचं काय करावं, या विषयावर या दोघांनी आपापली मतं मांडलीत. खुशबू चौहान आणि बलवान सिंग यांच्या वायरल झालेल्या या विडिओंची ही स्टोरी.

'मानवाधिकारांच्या दबावामुळे एखाद्या जवानाला युद्धाचं मैदान सोडून पळून जावं लागणं ही काही शौर्याची गोष्ट नाही. ती आत्महत्या आहे. देशाच्या संरक्षण दलाचे हात बांधून ठेवणाऱ्या मानवाधिकारांचं पालन करणं शक्य नाही.'

हे शब्द, ही वाक्य आहेत सीआरपीएफच्या महिला पोलिस अधिकारी खुशबू चौहान यांची. एका वादविवाद स्पर्धेत त्या बोलत होत्या.

२७ सप्टेंबरला दिल्लीत आयटीबीपी म्हणजेच इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस या पोलिस दलाकडून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे एक वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता - ‘मानवाधिकाराचा वापर करून देशातल्या दहशतवादाचा सामना करता येईल का?’

सोशल मीडियावर भाषण वायरल

नवी दिल्लीतल्या पोलिस संशोधन आणि विकास ब्युरोच्या सभागृहात ही वादविवाद स्पर्धा पार पडली. सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल्स, सशस्त्र सीमा बळ, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस अशा पोलिस बळांकडून प्रत्येकी दोन स्पर्धकांनी सहभाग घेतला.

वादविवाद स्पर्धा असल्यानं विषयाच्या प्रतिकूल आणि अनुकूल म्हणजेच मानवाधिकाराच्या बाजुने आणि विरोधात अशा दोन्ही भूमिका स्पर्धकांना मांडायच्या होत्या. या स्पर्धेत सीआरपीएफच्या खुशबू चौहान यांनी विषयाच्या विरोधात छप्परतोड भाषण केलं. मानवाधिकारामुळे दहशतवादाला कसं बळ मिळतं हे त्यांनी सांगितलं. यासाठी त्यांनी अनेक कविता, कोटेशन्स यांचा आधार घेत वाक्यावाक्याला प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. त्यांचं हे कौतूक इथंच थांबलं नाही. तर सोशल मीडियावरही त्यांचं भाषण वायरल झालं.

स्पर्धेत खुशबू चौहान यांनी चार मिनिटांत आपली बाजू मांडली. मानवाधिकारांमुळे सैनिक आणि पोलिसांना मोठ्या पदावर असूनही ठाम कृती करून दहशतवादी किंवा नक्षलवादी यांना ठार मारता येत नाही. मग दहशतवाद संपणार कसा, असा युक्तिवाद खूशबू यांनी मांडला.

पोलिसांना मानवाधिकार काम करू देत नाही

खुशबू म्हणाल्या, 'पुलवामा, मुंबईतल्या ताज हॉटेलवरचा दहशतवादी हल्ला आणि छत्तीसगडमधल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शरीरांचे ढीगच्या ढीग डोळ्यासमोर येतात. तेव्हा विषयाच्या अनुकूल बाजुने बोलणारे मानवाधिकारामुळे दहशतवाद आणि नक्षलवाद संपवता येऊ शकतो असंच म्हणतील का? अरे भारता हवेत फडकण्यापेक्षा जास्त मी जवानांच्या मृतदेहावरच जास्त का गुंडाळला जातो असं आता तिरंगाही विचारू लागलाय.'

'या मानवाधिकारामुळे दहशतवादी सुखरूप आहेत आणि आपल्या जवानांचा मात्र जीव जातो. त्यांचं कुटुंब उघड्यावर पडतंय. एखाद्या दहशतवाद्याच्या बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळीला कुणाची हत्या करायचीय हे ठरवावं लागत नाही. मात्र, पोलिसांच्या बंदुकीतून निघणारी गोळी एखाद्या दोषीला जाऊन लागली नाही तरी चालेल पण कोणत्याही निर्दोष माणसाला लागू नये याची काळजी घ्यावीच लागते. कारण, असं झालं तर समाज आणि मीडियावाले मानवाधिकारांच्या नावाखाली पोलिसांवर टीका चालू करतील,' असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा : गांधी विरोधकांचा पंथ निर्माण करताना

प्रत्येक अफजल मारून टाकू

खुशबू म्हणाल्या, 'पोलिस आणि सीमेवर लढणारे सैनिक हे देशाच्या संरक्षणासाठी जबाबदार असतात. पण सुरक्षेसाठीच पोलिस गोळी चालवतात तेव्हा त्यांचावर टीका होते. गोळी चालवणाऱ्या सैनिकाची नोकरी जाते. आणि त्या भीतीने पोलिसांना दहशतवाद्यांसमोर नमतं घ्यावं लागतं.'

'पोलिसांची नोकरी गेल्यावर त्यांच्यासाठी मानवाधिकाराचा पुरस्कार करणारा कुणीही येत नाही. पण एक अफजल माराल तर प्रत्येक घरातून अफजल तयार होईल असं म्हणणाऱ्या कन्हैय्या कुमारच्या बाजुने सगळे मानवाधिकारवाले जमा होतात. पण कोणत्याही घरात अफजल गुरू जन्मला तरी त्याला मारून टाकू. एवढंच काय, ज्या गर्भाशयात अफजल गुरू वाढत असेल ते गर्भाशयसुद्धा संपवून टाकू.'

‘सीमेवर लढताना शत्रुला अहिंसेचं तत्त्वज्ञान सांगून काहीही उपयोग होत नाही. तिथे बाँबचं उत्तर बाँबनेच द्यावं लागतं,’ असं म्हणून खुशबू चौहान यांनी आपलं भाषण थांबवलं. त्यांच्या भाषणाचा वीडिओ अनेक लोकांनी शेअर केला आणि सीआरपीएफच्या या पोलिस अधिकारी ‘भारत की बेटी’ म्हणून वायरल झाल्या.

स्पर्धा कुणी जिंकली?

हे भाषण ऐकल्यावर स्पर्धेत खुशबू चौहान यांनीच पहिला क्रमांक पटकावला असणार अशी आपली खात्रीच होते. पण खरंतर स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं ते मानवाधिकारांच्या बाजुने बोलणारे आयटीपीबीचे पोलिस अधिकारी पनव कुमार यांना. मानवाधिकारांचं उल्लंघन न करता पोलिस आणि सैनिकांना आपलं कर्तव्य बजावता येऊ शकतं असा त्यांच्या भाषणाचा सूर होता.

सुरक्षा व्यवस्था कितीही बळकट झाली तरी ज्या कारणांमुळे दहशतवाद आणि नक्षलावद फोफावतो, ज्या कारणांमुळे तरूण मुलं हिंसेकडे वळतात त्या कारणांचा सामना बंदुकीच्या बळावर केला जाऊ शकत नाही, अशा युक्तिवादानं पनव कुमार यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.

जर कोणताही हिंसक नेता देशातल्या तरूणांना दगडं मारण्यासाठी उचकवू शकतो तर त्याच दगड मारणाऱ्यांना देशाच्या विकासात जोडून घेण्यात आपण का कमी पडतो? असं म्हणत पवन कुमार यांनी विषयाला वेगळंच वळण दिलं.

हेही वाचा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार

पोलिसांकडूनही मानवाधिकाराचं उल्लंघन

भारत की बेटीच्या या भाषणाला आसाम रायफल दलाचे जवान बलवान सिंग यांनी प्रत्यूत्तर दिलं. बघता बघता त्यांचंही भाषण सोशल मीडियावर फिरू लागलं. पवन कुमार यांच्याप्रमाणेच बलवानसिंग हेही मानवाधिकाराच्या बाजुने बोलत होते.

ते म्हणाले, 'देशात जिथे दहशतवाद, नक्षलवाद आणि कट्टरवादी शक्तींचा धोका वाढतो तिथं शांतता अबाधित राखण्यासाठी सुरक्षा दलांना तैनात केलं जातं. जिथे या सुरक्षा दलांकडून मानवाधिकारांचं उल्लंघन केलं जातं तिथंच मानवाधिकार आयोग जाब विचारतं.'

'२००० ते २०१२ पर्यंत मणिपूरमधे पोलिस आणि सुरक्षा दलांवर मानवाधिकारांचं उल्लंघन करून सामान्य माणसाची विनाकारण हत्या केल्याचे १५२८ गुन्हे नोंदवले गेलेत. २०१६ मधे देशात पोलिसांच्या गोळीबारात ९२ नागरिक मारले गेलेत. ३५१ जखमी झालेत. याच वर्षांत लाठीमाराच्या घटनांमधे ३५ नागरिकांचा जीव गेला आणि ७५९ जखमी झाले.'

हेही वाचा : आरेत झाडं तोडण्याचं समर्थन आणि विरोध का होतोय?

द्वेष प्रेमाने संपतो

बलवान सिंग पुढे म्हणाले, 'बाँब, बंदुक आणि हिंसेच्या बळावर शांतता प्रस्थापित करणं शक्य असतं तर आत्तापर्यंत जम्मु-कश्मीर, झारखंड, छत्तीसगढ यासारख्या राज्यात शांतता आली असती. पण असं झालं नाही. द्वेषाला द्वेषानं नाही तर क्षमा आणि प्रेमाच्या भावनेनं जिंकता येतं.'

'अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी चार वर्ष सुरू असलेलं गृहयुद्ध संपवण्यामागे एकच कारण सांगितलं होतं. ते म्हणजे मी माझे सगळे शत्रू संपवले. कसं? त्या सगळ्यांना मी मित्र करून घेतलं. द्वेषाची जागा प्रेम घेतं तेव्हा शत्रुत्व खऱ्या अर्थानं संपतं. खरी लढाई लोकांच्या हृदयाशी लढायची असते. आणि ही लढाई मानवाधिकारांचं उल्लंघन करून लढणं शक्य नाही.'

हेही वाचा : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या चार महत्त्वाच्या गोष्टी

नेटकऱ्यांनी निवडला प्रेमाचा मार्ग

‘खरं शौर्य कुणाला मारण्यात नाही तर कुणालातरी वाचवण्यात असतं’ या वाक्यानं बलवानसिंग यांनी समोरच्यांची मनं जिंकून घेतली. बलवानसिंग यांच्या भाषणात भावनिक आवेशापेक्षा आकडेवारी आणि तथ्यांना जास्त महत्व दिलं गेलंय.

खुशबू चौहान यांनी सांगितलेला मार्ग फक्त दहशतवाद्यांना मारण्याची भाषा करत नाही तर सामान्य माणूस आणि गर्भाशयात वाढणाऱ्या बाळालाही मारून टाकण्याची भाषा करतो. कोणताही जीव आईच्या पोटात वाढत असतो तेव्हाच तो पुढं जाऊन दहशतवादी होणार असं ठरत नसतं. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याला दहशतवादी बनवत जाते हे टीकाकारांनी खुशबू चौहान यांच्या लक्षात आणून दिलं.

खुशबू चौहान यांच्या भाषणाचं कौतूक होत असताना दुसरीकडे त्यांच्यावर तितकीच टीकाही होतेय. त्यांनी सांगितलेला दहशतवाद संपवताना हिंसा करायची हा विचार न पटण्यासारखा आहे, असं अनेकांचं म्हणणं होतं. त्यापेक्षा बलवानसिंग यांचा द्वेषाला प्रेमानं जिंकण्याचा मार्ग नेटकऱ्यांना आवडलाय.

हेही वाचा :

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!