आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मधे खेळापेक्षा वादच जास्त होतायत. धोनी ग्लोव्जनंतर आता झिंग बेलवर वाद सुरु आहे. भल्याभल्या बॉलर्सचे मारलेले बॉल स्टम्पवर आपटूनही जर बेल्स पडत नाहीत. आतापर्यंतच्या सर्वच मॅचमधे या परिस्थितीचा सामाना क्रिकेटरना करावा लागला, त्यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत क्रिकेटर्सच्या कामगिरीपेक्षा इतर विषयांवरच जास्त चर्चा होतेय. आता चर्चा रंगली ती जिद्दी झिंग बेल्सची. बॉलरचा बॉल स्टम्पवर आदळला की या बेल्स खाली पडतात आणि बॅट्समन आऊट होतो. मात्र क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत फास्ट बॉलरनं टाकलेला बॉल स्टम्पवर आदळूनही बेल्स खाली पडलेल्या नाहीत.
भारतात नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमधे या बेल्स जिद्दी होत्या हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. मात्र वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतही या झिंग बेल्सनी बड्या बड्या बॉलरना धक्का देत आपण कुणाचंही ऐकणार नाही असंच सांगितलंय.
क्रिकेटच्या महाकुंभातल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा बॉलर आदिल रशिदने दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन क्विंटन डीकॉकला चकवलं आणि बॉल स्टम्पवर जाऊन आदळला. मात्र त्यावेळी घडलं भलतंच बॉल स्टम्प्सवर आदळला तरी बेल्स काही पडल्या नाहीत. रशिद फिरकी गोलंदाज असल्याने त्याच्या कमी वेगामुळे बेल्स पडल्या नसतील असं म्हणत अनेकांनी त्याकडं दुर्लक्ष केलं.
पण त्यानंतर न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघात सामना झाला. त्यावेळीही न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टनं श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेचा त्रिफळा उडवला. मात्र यावेळीही बेल्स काही स्टम्पवरून खाली पडल्या नाहीत. आजच्या घडीचा अतिवेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने ख्रिस गेल बॉल टाकला त्यावेळीही नेमकं तेच घडलं.
हेही वाचा: सचिन बाद झाल्यानंतर, युवराजने टीवी सुरु ठेवला
बॉल वेगाने स्टम्प्सला घासून गेला तरी बेल्स काही पडल्या नाहीत. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने बांग्लादेशच्या सैफुद्दीनला टाकलेला बॉल स्टम्पवर आदळूनही बेल्स काही हटल्याच नाहीत. मात्र हेच वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत पाचव्यांदा घडलं.
जगातील एक क्रमाकांचा गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवला. मात्र झिंग बेल्स काही स्टम्पसवरून पडल्या नाहीत आणि वॉर्नरला जीवदान मिळालं. तेव्हा झिंग बेल्सचा वाद उफाळून आला. अशाप्रकारे बेल्स न पडणं म्हणजे बॉलरवर अन्याय असल्याची प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिलीय. जर अशाप्रकारे बेल्स पडल्या नाही तर एखाद्या निर्णायक सामन्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने दिलीय.
हेही वाचा: टीम इंडिया आणि धोनी क्रिकेट खेळायला गेलेत, ‘युद्धा’वर नाही
क्रिकेटमधे सुरूवातीला लाकडाचे स्टम्पस आणि लाकडाच्या बेल्स वापरल्या जात होत्या. मात्र काळानुरूप क्रिकेटमधेही बदल झाले. क्रिकेटचं स्वरुप, क्रिकेटर्सचे कपडे, क्रिकेट बॉल, क्रिकेटच्या नियमांसह अनेक गोष्टी बदलत गेल्या. या बदलातील प्रमुख आणि महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटचे स्टम्प्स तसंच बेल्स.
गेल्या काही वर्षांपासून महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धांमधे आयसीसीने लाकडी स्टम्पस आणि बेल्सऐवजी एलईडी स्टम्प्स आणि एलईडी बेल्सचा वापर सुरु केला. हे स्टम्पस आणि बेल्स लाकडाचे स्ट्म्प्स आणि बेल्सपेक्षा वजनदार असतात. शिवाय यांत कॅमेराही बसवलेला असतो आणि विद्युत वायरही असतात.
हेही वाचा: भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते
बेल्स हलल्या तरी बॉल आदळताच त्यातील लाईट पेटते. त्यामुळे रनआऊट, एलबीडब्ल्यू तसंच झेलबादचे निर्णय देणे अंपायरला सोपं झाल्याचा दावा आयसीसीने केला. बॉल स्टम्पसवर आदळला की बेल्सची लाईट पेटते. मात्र स्ट्म्प्सवरून बेल्स खाली पडल्या नाही तर बॅट्समनला नॉटआऊट ठरवलं जातं. आयसीसीच्या नियमानुसार बेल्स स्टम्प्सवरून पूर्णपणे खाली पडल्यानंतरच बॅट्समनला आऊट दिलं जातं.
वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत पाच वेळा स्टम्प्सला बॉल आदळूनही बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे आयसीसीच्या या झिंग बेल्स वादात सापडल्या आहेत. क्रिकेटर्स आणि माजी क्रिकेटर्स यावर टीका करू लागलेत. मात्र आयसीसीने या बेल्स बदलण्यास नकार दिलाय.
हेही वाचा: १९९२ मधे पाकिस्तानने जे केलं, ते यंदा दक्षिण आफ्रिका करू शकते?
२०१५ च्या वर्ल्डकपपासून या बेल्स वापरल्या जात आहेत. एक हजाराहून अधिक सामन्यात या झिंग बेल्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत हे वाद निर्माण झाले असतील. मात्र त्यामुळे बेल्स बदलणार नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलंय.
दुसरीकडे या झिंग बेल्समुळे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत वाद निर्माण झाल्याने या झिंग बेल्सची निर्माती कंपनीही स्टम्प्ड झालीय. बेल्समधे अशी समस्या का निर्माण झालीय याचा कंपनीकडे अभ्यास करण्यात येत असल्याचं कंपनीचं व्यवस्थापक डेव्हिड लिगर्टवूड यांनी सांगितलं आहे.
या बेल्सचा सध्या सर्व बाजूंनी अभ्यास करण्यात येतोय. तसंच यांत काही त्रुटी राहिल्या आहेत का हेसुद्धा तपासलं जात असल्याचं लिगर्टवूड यांनी सांगितलं. यात काही तांत्रिक बदल करता येतील का, ज्यामुळे भविष्यात बॉल आदळल्यानंतर या बेल्स आरामात खाली पडतील याबाबत समीक्षा करत असल्याचंही लिगर्टवुड यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा: वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर