आयफोनः नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल

०९ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आयफोनच्या घोषणेला आज १२ वर्ष म्हणजे एक तप झालंय. पण या एका तपामधेच आयफोन नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल बनलाय. आतापर्यंत आपल्या मोठेपणाची, दर्जेदारपणाची, प्रतिष्ठेची गोष्टं मोठमोठ्याने सांगणाऱ्यांना अॅपलने आयफोन देऊन गप्प केलंय. ग्राहकांना अस्सल आणि नवनवी टेक्नॉलॉजी देणाऱ्या आयफोनची ही गोष्ट.

आयफोन आणि अफवा हे समीकरण आता रूढ झालंय. दर वर्ष दीड वर्षाला नवा आयफोन बाजारात दाखल होतो. प्रत्येक आयफोन येण्याच्या आधी जगभर नव्या आयफोनविषयी तर्कवितर्कांना उधाण येतं. जगात अनेक कंपन्यांचे वेगवेगळे मोबाईल आहेत. त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्यं आहेत. त्यांची किंमती खूप आहे. पण दुकानासमोर रांगा लावून मोबाईल खरेदी करण्याचं भाग्य आयफोनलाच मिळालंय.

आयफोनसाठी कायपण

आजच्या 'वापरा आणि फेकून द्या'च्या जमान्यात आयफोन भक्तांची संख्या मोठी आहे. आयफोनसाठी पैशांची व्यवस्था करायची म्हणून वैध अवैध उद्योग केल्याच्या बातम्याही दरवर्षी येतात. विशेष म्हणजे हे सगळे प्रकार मागील १२ वर्षांपासून जगभर सुरू आहेत.

दरवर्षी नवनवे मोबाईल बाजारात दाखल होतात. पण बातम्यांच्या विश्वात मोठी बातमी होण्याचा बहुमान सातत्याने आयफोनलाच मिळतोय. मोबाईलच्या जगात १२ वर्षांपासून आयफोनला असलेला मानसन्मान इतर मोबाईलला काही केल्या मिळत नाही, एकवेळ तुमच्याकडे सोनं चांदी कमी असलं तरी चालेल. पण स्वतःभोवती वलय निर्माण करायचे असेल तर आयफोन हवाच. अशा मताच्या मोबाईलधारकांची संख्या आजही खूप मोठी आहे. 

या अशा ग्राहकांमुळे आयफोन म्हणजे प्रतिष्ठा असं नवं समीकरण तयार झालंय. भारतामधे आयफोन ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीत उपलब्ध आहे. पण अनेकदा हा स्टेटस सिम्बॉल आपल्याजवळ असावा म्हणून वेळप्रसंगी कर्ज काढून आयफोन खरेदी करताना दिसतात. 

घोषणेला एक तप

अॅडम आणि इव्हच्या गोष्टीतले सफरचंद आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी निमित्त ठरलेले सफरचंद आयफोनच्याही सक्सेस स्टोरीचा भाग आहेत. एवढंच नाही तर या सफरचंदला अॅपल कंपनीशी जोडल्याने वेगळं वलय मिळालं. अॅपल कंपनीने आयपॅड, आयट्युन्स, आयपॉ़ड अशी उत्पादनं बाजारात आणली. पण आयफोनने या कंपनीच्या कामगिरीला उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवलं.

सध्या जगभरातील बलाढ्य कंपन्यांमधे अॅपलचं नाव घेतलं जातं. या इतिहासाची सुरवात झाली ती ९ जानेवारी २००७ या दिवशी. अॅपल कंपनीचे संस्थापक सीईओ स्टीव जॉब्स यांनी आयफोन १ या मोबाईलची घोषणा केली. आणि त्याच वर्षी २९ जूनला हा मोबाईल जगासमोर आला. सध्या बाजारात आयफोन १० आहे. आयफोनच्या घोषणेला आज १२ वर्षे पूर्ण होत आहेत.

मोबाईलच्या क्षेत्रातली टेकक्रांती

या १२ वर्षांमधे आयफोनमधे अनेक बदल झाले. अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असे आयफोन बाजारात आले. मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती करणारं तंत्रज्ञान आयफोनच्या निमित्ताने विकसित झालं. त्यामुळे ग्राहकांची पसंती महाग असूनही आयफोनलाच मिळाली. चालू वर्षाच्या शेवटी अॅपल कंपनीने आयफोन ११ बाजारात आणण्याची तयारी सुरू केलीय.या मोबाईलमधील वैशिष्ट्यांविषयी आतापासूनच तर्कवितर्क सुरू झालेत.

आयफोनकडे जे काही आहे ते सगळंच अस्सल आणि अव्वल दर्जाचं आहे, असं ग्राहकांचे मत आहे. दर्जेदार संगीत ऐकवणाऱ्या आयट्युन्ससह पहिला आयफोन बाजारात आला. नंतर थ्रीजी इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या आयफोनने मोबाईलची बाजारपेठ ताब्यात घेतली. पुढच्या टप्प्यात विडिओ रेकॉर्डिंगची सोय असलेला मोबाईल देण्यात आला.

आयफोनचं चौथे वर्जन २०१० मधे आला. यात रेटिना डिस्प्ले, फ्रंट कॅमेरा आणि जास्त क्षमतेचा कॅमेरा अशा सुविधा देण्यात आल्या. मल्टीटास्किंगसाठी हा एक चांगला पर्याय होता. २०११ मधे ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा, सिरी या स्मार्ट असिस्टंटची सुविधा आयफोनमधून देण्यात आली. पुढच्याच वर्षी अॅपल मॅप्स ही नवी सेवा देण्यात आली.

अस्सल तेच विकणार

२०१३ ते २०१८ या पाच वर्षात आलेल्या आयफोनच्या वर्जनमधे टचस्क्रीनसह भरपूर अपडेट देण्यात आले. आयओएस ७ या ऑपेरेटिंग सिस्टिमवर चालणारी यंत्रणा, मोठा स्क्रीन या सुविधाही देण्यात आल्या. पहिल्यांदाच ६४ बीटचा मोठा प्रोसेसर वापरण्यात आला. त्यामुळे मोबाईलवर एकाचवेळी अनेक कामं वेगाने करण्याची सोय झाली.

अॅपल पे हा पर्याय देऊन मोबाईल हे आर्थिक व्यवहारांचं माध्यम म्हणून जगासमोर सादर करण्यात आलं. फोर्सटच या प्रकाराने टचस्क्रीन मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती केली. नंतर चेहरा बघून फोन अनलॉक करण्याचा अर्थात फेस रिकग्निशनचा पर्याय देण्यात आला.

अॅपलच्या तंत्रज्ञानाने लोकांना भुरळ पाडली. अनेक कंपन्यांनी अॅपलच्या तंत्रासारखे तंत्र वापरुन नवे मोबाईल बाजारात आणले. पण तंत्रज्ञानाची नक्कल असलेले मोबाईल घेण्याऐवजी मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती करणारे, दिशादर्शक तंत्रज्ञान विकत घेण्याला ग्राहकांनी पसंती दाखवली. अस्सल आणि अव्वल या विश्वासाला पात्र ठरल्यामुळे अॅपलच्या आयफोनना ग्राहकांची असलेली पसंती सातत्याने वाढली.

कर्ज घेऊन मोबाईल खरेदीचा गुरू

भारतासह अनेक देशांमधे बँका, सर्विस प्रोवायडर कंपन्या यांनी कर्जाची सोय तसंच आयफोन एक्सचेंज अर्थात जुन्या आयफोनच्या बदल्यात थोड्या कमी किंमतीत नवा आयफोन असे पर्याय उपलब्ध करुन दिले. ग्राहकांसाठी आयफोन आणि विशिष्ट सिम कार्ड एकत्र देत मोबाईल विकायला सुरवात केली. अनेकांनी कर्ज काढून आयफोन खरेदी केले. पण प्रतिष्ठा जपण्याला महत्त्व दिलं.

बाजारात सध्या अनेक कंपन्या स्वस्त आणि महाग अशा दोन्ही प्रकारात मोबाईल आणत आहेत. पण ग्राहकांचा अॅपलच्या आयफोनवरचा विश्वास अजून तरी कमी झालेला नाही. दर २-४ वर्षांनी मोबाईल बदलणारे ग्राहकही आयफोन वापरत असतील तर एक्सचेंजचा पर्याय स्वीकारतात. नवा आयफोन घेणंच पसंत करताना दिसतात.

आपण महत्त्वाची व्यक्ती आहोत, निर्णय घेण्यासाठी सक्षम आहोत, आपल्याला फक्त दर्जेदार गोष्टीच आवडतात हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचं प्रतिक म्हणजे आयफोन. त्यामुळे जोपर्यंत आयफोन नवं तंत्रज्ञान आणून ग्राहकांना अधिकाधिक सोयीसुविधा पुरवतंय, त्यांचं प्रतिष्ठा आणि आयफोन हे समीकरण जपतंय, तोपर्यंत ग्राहकांचा आयफोनवरचा विश्वास कायम राहणार हे नक्की. किंमत वाढली तरी आयफोनची खरेदी करण्यासाठी झुंबड उडणार आणि आयफोनची चर्चा सतत सुरू राहणार.