‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच

०७ मे २०२०

वाचन वेळ : ९ मिनिटं


महाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी.

महाराष्ट्र विचाराचा शोध घेताना प्रामुख्यानं या प्रदेशाची जडणघडण कशी झाली त्या संदर्भातल्या काही गोष्टी ठळकपणे माझ्या नजरे समोर येतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रातला बहुतांश भाग दुष्काळी असल्यानं इथं एक पूरक अर्थव्यवस्था विकसित झाली. मोहिमा काढून लुटालूट करायची, हे या अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं सूत्र होतं. 

ही परंपरा प्रामुख्यानं मराठी मुलुखातच दिसते. सबंध देशात मराठी भाषक असा एकमेव गट आहे, की ज्यानं दुसऱ्या भाषिक गटावर आक्रमण केलं. बाकी भारतावर आक्रमणं झाली ती भारताच्या बाहेरच्या लोकांनी केलेली आहेत. या लुटालुटीचं केंद्र पुणे आणि नागपूर हे होतं.

हेही वाचा : पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला

लुटालुटीची अर्थव्यवस्था समजून घ्यावी लागेल 

नागपूरहून उडिसा, बिहार, अगदी बंगालपर्यंत मोहिमा निघत, तर पुण्याहून दिल्लीच्या दिशेनं लुटालुटीसाठी मोहिमा निघत. अटकेपार झेंडा रोवणं, हे त्यातूनच आलं. मोठा फौजफाटा घेऊन जात असल्यानं यात लढाई करावी न लागता खंडणी गोळा होई. अशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेची दीर्घ परंपरा आपल्याकडे आहे.

या अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाचा म्हणजेच मराठी माणसाच्या सामर्थ्याचा इतिहास आपल्याकडे आहे. आपली समाजव्यवस्था राजेशाहीची असल्यानं सामान्य माणसाला यात कुठंच विशेष भूमिका नसल्यामुळं मराठी माणसाच्या दुर्बतलेचाही मोठा इतिहास आपल्याकडे सांगितला जातो. 

राजा हरला की प्रदेश हरला, ही मानसिकताही मराठी माणसांत पाहायला मिळते. तो एक अर्थव्यवस्थेचा भाग आहे. यातूनच विशिष्ट प्रकारचा मराठी बाणा तयार होत गेला. तो बाणा म्हणजे भूमिगत लढायांचं शास्त्र ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो. शत्रूवर बेसावध असताना हल्ला करायचा आणि तो सावध होण्याच्या आत पळून यायचं, हे या गनिमी काव्याचं सूत्र. पण याचं खूप उदात्तीकरण झालं. 

मराठी माणूस देशभर या अर्थव्यवस्थेमुळेच

दरवेळी मराठी माणूस पळून आलेला आहे, असं झालेलं नाही. त्यानं सत्ता प्राप्त करून आपलं जिथं तिथं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. बडोदा, इंदोर, ग्वाल्हेर, देवास, झाशी, तंजावर अशा भारताच्या विविध भागांत मराठी संस्थानं तयार झाली. आज राजेशाही नसली तरीही त्यांचे वंशज तिथं आहेत. 

मराठी भाषिकांच्या रूपानं असं मराठी माणसाचं अस्तित्व देशभर आढळतं. हे सगळे त्याचे पुरावेच आहेत. या सगळ्याचा उगम इथल्या प्रदेशामुळं निर्माण झालेल्या लुटालुटीच्या अर्थव्यवस्थेत आहे. ती समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्र विचारापर्यंत जाताच येणार नाही. हा एक भाग.

हेही वाचा : छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही

माणुसकीचा विचार रुजायला पूरक

दुसरा महत्त्वाचा भाग इथल्या संत परंपरेचा, संत विचाराचा आहे. संत ज्ञानेश्वरांच्याही आधी महाराष्ट्रात नाथ संप्रदाय होता. महानुभाव होते. त्यातून माणुसकीचा धागा इथं रुजवला जात होता. पुढं संत ज्ञानेश्वरांसह अन्य वारकरी संतांनी तो ठळकपणे अधोरेखित केला. 

मुख्य म्हणजे या संत परंपरेचा आणि राजेशाही परंपरेचा महाराष्ट्रात कधीही टकराव झाला नाही. या दोन विचारधारा आपापल्या जागी राहून कार्यरत राहिल्या. या दोन्ही गोष्टींना एकमेकांचा विरोध न होता, माणूसकीचा विचार रुजत राहायला आपल्याकडे नेहमीच पूरक परिस्थिती होती. हे महत्त्वाचं सूत्र आपल्याकडे पाहायला मिळतं. त्यातून महाराष्ट्र विचार विकसित झाल्याचं दाखवता येतं.

महाराष्ट्र विचारात तिसरा भाग येतो तो प्रबोधनाचा. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली. ‘इतिहासातून महाराष्ट्राला काही घ्यायचं असेल तर ते फक्त भागवत संप्रदायातून घेता येईल’ असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं होतं. 

या भागवत संप्रदायात असलेल्या दोषांची चिकित्सा करूनही त्यात असणारं समतेचं तत्त्व महत्त्वाचं असल्याची त्यांनी मांडणी केली होती. रानडे यांच्यापासून सुरू झालेली ही प्रबोधनाची महत्त्वाची परंपरा प्रामुख्यानं महाराष्ट्रात ठळकपणानं दिसून येते.

वतनासाठी फंदफितुरीचीही परंपरा

चौथा भाग म्हणजे, पूर्वापार चालत आलेली ‘फंदफितुरी’ हाही या महाराष्ट्र विचाराचाच एक भाग आहे. अल्लाउद्दिन खिलजी एवढ्या लांबून आला. त्याला आपल्या लोकांनीच साथ दिली. खिलजीने यादवांना हरवलं. तेव्हा आपल्याकडे वतनदारांची पद्धत होती. खरंतर तेव्हाच्या वतनदारांनी खिलजीला विरोध करायला हवा होता, पण तसं झालं नाही.

उलट प्रत्येकानं आपल्या वतनाचं नूतनीकरण करून घेतलं. खिलजी आपलं वतन पुढंही चालू ठेवणार या एका अटीवर त्यांनी त्याला साथ दिली. गावावर आपलं राज्य आहे, यात वतनदारांना स्वारस्य होतं. इंग्रजांच्या काळातही तेच झालं. इंग्रज आल्यानंतर त्यांनी पाटील वतन तयार केलं. आपलं वतन चालू आहे ना, एवढाच त्यात विचार होता. 

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

खान्देश संस्थानाचा मराठी बाणा

इंग्रजांचं राज्य आल्यावर इथल्या राजांनी इंग्रजांना लिहिलेली पत्र आहेत. ‘तुम्ही फार काटेकोर आहात, अशी कीर्ती आहे, पण पेशव्यांनी दिलेल्या वतनाचं तुम्ही अजून नूतनीकरण केलेलं नाही’ असं सांगलीच्या राजांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र सापडलं आहे. थोड्याफार फरकानं इथले संस्थानिक, वतनदार असेच वागले. ‘ज्याचं राज्य त्याचे आम्ही’, ही ती वृत्ती होती. 

अपवाद फक्त खान्देशच्या संस्थानाचा होता. जळगाव, धुळे आणि नाशिक मिळून खान्देशचं संस्थान होतं. त्याची मालेगाव राजधानी होती. मालेगावात दाणी नावाचे सरदार होते. ते म्हणाले, ‘तुम्ही आमच्या स्वामीस हरवले, पण आम्हास कोठे हरवले.’ असं म्हणत त्यांनी लढाईचं आमंत्रणच दिलं. 

समाजमनाच्या दिशेकडे न झुकता असं आव्हान देणं ही सुद्धा इथली एक परंपराच म्हणावी लागेल. रक्तात असलेला मूळचा ‘मराठी बाणा’ ही वृत्ती या परंपरेचं पाईक.

आजच्या राजकारणात वतनदारी आहे

अशा सगळ्या गोष्टींनी महाराष्ट्राचं मन तयार झालं आहे. याचं प्रतिबिंब आजच्या समाजकारणात आणि राजकारणातही दिसतं. म्हणजे, भाजपचं राज्य आल्यावर सगळी काँग्रेसमधली मंडळी भाजपमध्ये गेली. विखे म्हणा, मोहिते म्हणा. ही सगळी एकेकाळची वतनदार मंडळी होती. काहीही करून स्वतःचं ‘वतन’ टिकवणं. त्यातून स्थानिक क्षेत्राचं नेतृत्व केंद्र आपल्याकडे ठेवणं या मर्यादित आकांक्षेनं ते वागत असतात. 

वरच्या राज्याचं नेतृत्व लक्षात घेऊन आपल्या नेतृत्वाची दिशा ठरवणं, ही ती वृत्ती आहे. आपल्या स्थानिक ‘वतन’ आपल्या हातात ठेवण्याची वृत्ती असलेली महाराष्ट्रात जवळपास ३१ महत्त्वाची घराणी आहेत. त्यांनी आपली आजवरची सत्ता प्रामुख्यानं आपल्या परिवारचा विकास करण्यातच वापरली आहे. 

त्यात जनतेचा, सामान्य माणसाचा विचार फार केला जात असल्याचं फारसं दिसत नाही. या अर्थानं म्हणायचं झालं तर महाराष्ट्र हा लोकशाहीवादी नाही, असं म्हणावं लागतं. तीही एक परंपरा लोकशाहीचा विचार रुजवणाऱ्या महाराष्ट्रातच आहे. हेही दुर्देव!

हेही वाचा : भाव पडल्यावर लगेच दूध सांडून देणारे शेतकरी आता लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?

संयुक्त महाराष्ट्रासाठी एकी झाली 

दुही ही महाराष्ट्राची वृत्ती सांगितली जाते, तसंच एकी हेही महाराष्ट्र विचाराचं वैशिष्ट्य आहे. मात्र अस्मितेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतरच तो दिसतो. मग ती अस्मिता एखाद्या समाजापुरती असो किंवा समुदायापुरती. 

जात, धर्म, समुदाय विसरून मराठी माणूस एक झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं ते १९५६ ते १९६० या काळात. मराठी राज्य निर्माण करण्यात महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचं लक्षात आलं तेव्हा. या काळात महाराष्ट्रातला जातीयवाद तात्पुरता स्थगित झाला होता.

लोकमान्य टिळकांचा मराठी बाणा

महाराष्ट्र विचारातल्या या मूलभूत वैशिष्ट्यांची चर्चा केल्यानंतर मूळ मुद्द्याकडे आपण येऊ. तो म्हणजे महाराष्ट्र विचाराच्या स्पर्शानं होणारी नेतृत्व घडण. ही घडण एका विशिष्ट प्रकारची नाही. ती काळानुसार बदलत राहिली आहे. हे महाराष्ट्र विचाराचं वैशिष्ट्य राहिलं आहे.

हे नेतृत्व शिवाजी महाराजांच्या रूपानं महाराष्ट्रानं अनुभवलं. त्यावेळी तशा नेतृत्वाची गरज होती, म्हणून ते उदयाला आलं. ब्रिटिशांच्या काळात लोकमान्य टिळकांनी नेतृत्व केलं. ‘मराठी बाणा’ ही वृत्ती टिळकांमध्ये होती. त्यांनी जनतेच्या असंतोषाचा धागा पकडला आणि पुढं त्याचं रुपांतर मोठ्या जनसंघटनेत झालं. देशाचं नेतृत्व केंद्र टिळकांकडे आलं, असं ते वातावरण होतं. महाराष्ट्र हा त्याचा केंद्रबिंदू होता. 

टिळकांनंतर हे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे सरकलं. गांधीजींच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदूही महाराष्ट्रच म्हणावा लागेल. लोकमान्य टिळक हे पुण्यात असल्यानं गांधीजींनी पुण्यात जास्त वेळ घालवला. त्यांना माहीत होतं की टिळक हे मोठे नेते आहेत. गांधीजी हे गोखल्यांचे शिष्य स्वतःला म्हणवत असले तरीही त्यांनी लोकमान्य टिळकांबरोबर कॉम्प्रमाइज केलं होतं. ते टिळकांना ‘टिळक महाराज’ म्हणत. 

लोकमान्य, महात्मा आणि महाराष्ट्र

लोकमान्यांबरोबर तीन दिवस ते सिंहगडावर राहून त्यांनी दीर्घ चर्चाही केली होती. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि असहकार ही टिळकांची चतुःसूत्री गांधीजींनी स्वीकारली. ‘षष्ठ्यम प्रति षष्ठ्यम’ हा अग्रलेख लिहून समोरचा गुंड असेल, त्यानं हिंसा केली तर मीही हिंसा करीन, ही भूमिका टिळकांनी मांडली होती. ती मात्र गांधीजींनी स्वीकारली नाही. उलट त्यांच्या या एका तत्त्वाला विरोध केला.

विविधता असणाऱ्या भारताला एक ठेवायचं असेल तर एका भारतीयानं दुसऱ्या भारतीयाला प्रेमानं जिंकलं पाहिजे, हे गांधीजींचं तत्त्व होतं. अहिंसा हा तर त्यांच्या जीवनाचा पाया होता. तू माझा विरोधक असला तरीही तुझं आयुष्य, तुझं असणं मी कबूल करतो. माझं म्हणणं मी तुला प्रेमानं पटवून देत राहीन, ही भूमिका लोकमान्यांना काही पटली नाही.

१९१५ ते १९२९ च्या दरम्यान महात्मा गांधीजींचं पहिलं चरित्र अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलं तेव्हा याच टिळकांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. त्यात गांधीजींचा प्रभाव का वाढतो आहे, हे त्यांनी नमूद केलं आहे. हे असं कसं घडू शकतं, ते समजून घेण्यासाठी महाराष्ट्र विचार समजून घेतला पाहिजे.

हेही वाचा : आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

गांधीजींच्या जडणघडणीतही महाराष्ट्र विचार

१९२० नंतर गांधीजींचं नेतृत्व उदयाला येत गेलं. ते व्रतस्थ होते. आश्रमात राहायचे. चुकीच्या गोष्टींविरोधात संघर्ष करायचे. ‘हिंदू धर्मात अस्पृश्यता असेल तर मला अस्पृश्य समजा...’ असं त्यांनी म्हटलं होतं. ‘शास्त्र बघावीत पण शास्त्रातलं जे बुद्धीला पटणार नाही, ते मानू नये’ असं सांगत त्यांनी लोकांशी नाळ न तोडता त्यांची डोकी बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

गांधीजी जे सांगत होते, ते ‘मराठी बाणा’ या तत्त्वाच्या पूर्ण विरुद्ध होतं. कारण त्यात काही शौर्यच दिसायचं नाही. त्यामुळं इथं महात्मा गांधी मर्यादित प्रमाणात स्वीकारले गेले. असं असलं तरीही आपल्या देशाच्या राज्यघटनेत जे समान दर्जाचं तत्त्व आलं, त्यात गांधीजींच्या कामाचाही महत्त्वाचा भाग आहे. अहिंसा हाच आपल्या लोकशाहीचा पाया आहे. 

त्यांनी मानवतेच्या, प्रेमाच्या संदेशाचं देशभर जागरण केल्यामुळंच देश एक होऊ शकला. अन्यथा देशभरातील सुमारे ७०० संस्थानं आणि गावोगावी असलेले वतनदार यांच्यात एकी होण्याचं कोणतंही कारण नव्हतं. नेतृत्वाचं एक अद्भुत रसायन म्हणजे गांधीजी. हे रसायन तयार होण्यात महाराष्ट्राचा वाटा अधिक आहे. 

महाराष्ट्रात गांधीजी रुजतात, टिळक का नाही?

पुत्रानं पित्याच्या विचारात भर टाकायची असते, असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्याप्रमाणे टिळकांचं वचन गांधीजींनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी सत्याग्रहानं मिळवणारच’ असं बदललं. वारकरी संतांनी सांगितलेली मूल्य त्यांनी अंगीकारली. तंतोतंत पाळली. त्यात स्वतःची भर टाकून एकादश व्रत असं सूत्र तयार केलं. 

गांधीजी मूर्तिपूजा करत नव्हते. त्यांच्या प्रार्थनेतही कोणती मूर्ती किंवा आसन नव्हतं. त्यांच्यासाठी सत्य हाच परमेश्वर होता. भारतात नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला कुटुंबप्रमुख व्हावं लागतं. सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं, हे त्यांना कळलं होतं. विविध स्वभावाच्या, विचारांच्या माणसांना सोबत घ्यायचं असेल, तर स्वतःची सहनशक्ती वाढवावी लागते. तशी ती गांधीजींनी वाढवली होती. 

स्वतःला घडवण्यासाठी त्यांनी स्वतःवरच खूप प्रयोग केले. नेतृत्व करणारा व्रतस्थ हवा. नेतृत्वाच्या डोक्यात वैयक्तिक लाभाच्या गोष्टी नसतील, तरच त्याच्या डोक्यात समाजाचा विचार नांदतो. सांगायचा मुद्दा हा की भारतासह जगाला दिशा देणारं गांधीजींचं नेतृत्व घडण्यात महाराष्ट्राचा, इथल्या संत परंपरेचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान तयार होण्यात महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे, नव्हे त्याला महाराष्ट्राचा अधिकाधिक स्पर्श आहे. 

वरकरणी त्यांचं हे तत्त्वज्ञान ‘मराठी बाणा’ या तत्त्वाशी विसंगत वाटेल. पण महाराष्ट्राची भूमी ही संतांच्या विचारांनी नांगरली गेली आहे. त्यामुळंच टिळकांचा आक्रमक राष्ट्रवाद महाराष्ट्राला पटला नाही. तो अजूनही डोकावतो, पण तो इथं काही केल्या रुजत नाही. रुजतं ते गांधीजींचं संत विचाराकडे झुकणारं भन्नाट रसायन! ‘आयडिया ऑफ इंडिया’ तयार होण्यात गांधीजींच्या या रसायनाचा मोठा वाटा आहे.

हेही वाचा : टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?

यशवंतराव हे सर्वसमावेशक नेतृत्वाचं उदाहरण

महाराष्ट्र विचाराचा स्पर्श झाला की नेतृत्व सर्वसमावेशक होतं. इथं यशवंतराव चव्हाण यांचं उदाहरण देतो. यशवंतरावांचं नेतृत्व सुसंस्कृत हातं. ‘महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य येणार नाही तर मराठी माणसाचं राज्य येईल’, ही त्यांची भूमिका लोकप्रिय होती. ती साकार करण्यासाठी त्यांनी राज्यातल्या सर्व समाजाची जोडाजोडी केली. एकेका समुदायाला जोडत त्यांनी महाराष्ट्राला शहाणपणानं आकार दिला. 

सर्वांना सोबत घेत सहकारी तत्त्वातून अर्थकारणाला चालना दिली. इथली राजेशाही लोकशाही तत्त्वाच्या आड येऊ दिली नाही. सर्व जाती-जमातींचं ऐक्य हा विचार त्यांनी राजकारणात रुजवला. त्यांच्या या नेतृत्वाला साहजिकच इथल्या मातीचा, संस्काराचा, संत परंपरेचा स्पर्श होता. ही सर्वसमावेशकता हे महाराष्ट्र विचाराचं मूळ आहे.

आज मानवतावाद महत्वाचा

मानवतावादी विचारांवर महाराष्ट्र विचार उभा आहे. मात्र अलीकडच्या समाजकारण-राजकारणात मानवतावादी विचार विरळ होत चालला आहे. शिवाजी महाराज समजून न घेता केवळ प्रतीक म्हणून वापरले गेले. त्यातून दुहीची सुरवात होत प्रत्येक समाजानं त्याचं त्याचं वेगळं प्रतीक शोधून काढलं. 

स्वतःचे दुर्गुण झाकण्यासाठी जात-धर्म राजकारणात वापरले जात आहेत. आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या ‘आरएसएस’च्या नेत्यांनी तर घटनेत ‘सेक्युलॅरिझम’ हे तत्त्व नको. ते आपल्या भारतीय इतिहासाचं प्रतिबिंब नाही, अशी मांडणी केली आहे. खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं 

संविधान हा भारताचा सर्वांत मोठा धर्मग्रंथ आहे. त्याचं पावित्र्य कमी करण्याचा प्रयत्न वेळोवेळी होतो. या सगळ्याला रोखलं गेलं पाहिजे. मानवतावादी विचारांपासून दूर जात केवळ सत्ता मिरवण्यासाठी केलं जाणारं समाजकारण-राजकारण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे. ते पुढं जायचं असेल तर परतीच्या रस्त्याशिवाय कोणताही रस्ता आता उरलेला नाही.

हेही वाचा : महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

म्हणून महाराष्ट्र निर्णायक ठरेल 

जात-धर्म, समुदायाच्या टोकदार अस्मिता पुढं होणं आणि आपापसात भांडणं होत राहणं, हे ‘आयडिया ऑफ इंडिया’ला घातक आहे. या सगळ्याला इथंच रोखलं गेलं पाहिजे. महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाल्यास, सगळीकडे ते रोखलं जाईल. मानवतावादी विचारांची ज्योत सतत तेवत ठेवणं, हेच महाराष्ट्राच्या भूमीतलं महत्त्वाचं मूल्य आहे. तोच तर महाराष्ट्राचा विचार आहे. 

'आयडिया ऑफ इंडिया’ घडवण्यात महाराष्ट्राच्या याच विचारानं मोलाचं योगदान दिलं आहे. त्यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ जपण्यात हाच महाराष्ट्र विचार भविष्यात निर्णायक भूमिका बजावेल, असं मला वाटतं.

हेही वाचा : 

राहुल कुलकर्णींना कोर्टानं वांद्रे गोंधळासाठी जबाबदार का धरलं?

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

सदानंद मोरे सांगतायत ‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला

आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं

(शब्दांकन : अभिजीत सोनावणे)