‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

०४ मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


दि.पु. चित्रेंनी म्हटलंय, `समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य शोधण्यासाठी मला फ्रेंच राज्यक्रांतीत जावं लागत नाही, ती मला इथेच वारकरी विचारांत सापडतात.` हाच महाराष्ट्रधर्म आहे आणि आयडिया ऑफ महाराष्ट्रही. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी या लेखात इतिहास भूगोलाचा धांडोळा घेत महाराष्ट्रातला महान मूल्यसंचय नेमकेपणाने मांडलाय. कोलाजच्या `आयडिया ऑफ महाराष्ट्र` या लेखमालेतला एक महत्त्वाचा लेख.

महाराष्ट्र विचार नेमका काय आहे, हे पाहण्याआधी महाराष्ट्र या शब्दाकडे पाहिलं पाहिजे. काय दिसतं या शब्दातून? तर आपल्याकडे राष्ट्राची संकल्पना आहे. म्हणजे भारत हे एक राष्ट्र आहे. आणि या राष्ट्राचा एक भाग असलेला महाराष्ट्र हा प्रदेश.

शाब्दिक विचार केला असता यात विरोधाभास दिसतो. राष्ट्रात असतात ती राष्ट्रकं. म्हणजे हा शब्दप्रयोग काही काळात वापरला होता. पण महाराष्ट्राचं तसं नाही. तो महाराष्ट्र नावानंच आहे. ही विसंगती कोणाच्याही सहजपणे लक्षात येईल, अशी आहे. पण प्रत्यक्षात त्यात विसंगतीचा कोणताही मुद्दा नाही.

हेही वाचा : आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

इथे वाईट विचार रुजत नाही

महाराष्ट्र हा शब्द खूप काळापासून प्रचलित आहे. आपल्याकडे भरतवर्ष ही संकल्पना होती. इसवीसन ही संकल्पना आली. पण या दोन संकल्पनांच्याही आधीपासून महाराष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात आहे. राष्ट्र म्हटलं की भूमी आली. पण महाराष्ट्र ही संकल्पना केवळ भूमीला अनुलक्षून नाही. तर त्यात वैचारिकता आहे. धार्मिकता आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर इथं महानुभाव पंथाचे चक्रधर होऊन गेले. त्यांनी आपल्या अनुयायांना महाराष्ट्रात राहण्याचा संदेश दिला. कारण या परिसरात वाईट विचार रुजत नाही. इथली मंडळी वाईट कृत्य करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत, अशी त्यांची धारणा होती. इतकंच नाही तर, महाराष्ट्रातली भूमी, झाडंझुडुपं, डोंगर, नद्या या सगळ्याला सात्विकतेचा स्पर्श आहे. इथली माणसं सात्विक आहेत. सात्विकता हा महाराष्ट्राचा भाग असल्यानं एखादं धर्मकृत्य महाराष्ट्रात केलं तर पुण्याचं फळ महाराष्ट्रात लवकर मिळतं. त्यामुळं महाराष्ट्राची भूमी महत्त्वाची आहे, असं चक्रधरांनी नोंदवून ठेवलंय.

हेही वाचा : दांभिकतेच्या वेढ्यात अडकलेली 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'

दक्षिण उत्तरेच्या समन्वयाची संस्कृती

चक्रधर गुजरातहून महाराष्ट्रात आहे. त्यामुळं एका बाहेरच्या व्यक्तीला महाराष्ट्राबद्दल इतकी आत्मीयता वाटावी, हे मला महत्त्वाचं वाटतं. महानुभावांच्या म्हणण्याप्रमाणं चक्रधर हे साक्षात ईश्वर. म्हणजे त्यांचं म्हणणं हे ईश्वराचंच म्हणणं आहे, असं ते मानतात. चक्रधरांची महाराष्ट्राबद्दल ही धारणा कशी झाली ते मात्र सांगता येत नाही. ते त्यांनी कुठंही नमूद केलेलं नाही. पण त्यांना काही वेगळेपण जाणवलं असणार हे मात्र निश्चित!

हा झाला एक भाग.

दुसरा मुद्दा भू-राजकीय आहे. महाराष्ट्र हा दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांच्याबरोबर मध्यभागी आहे. इरावर्ती कर्वे यांनी महाराष्ट्राचं हे वेगळेपण अधोरेखित केलंय. म्हणजे उत्तरेकडे आर्य लोकांचं वर्चस्व होतं आणि दक्षिणेकडे द्रविड लोकांचं. या दोन्ही भूभागातील लोकांची संस्कृती वेगळी होती. भाषिक गट वेगळे होते. त्यामुळं दोन्ही संस्कृतीतलं दळणवळण, संघर्षाचे पडसाद, महाराष्ट्रावर उमटले. दोन्ही प्रदेशातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करताना समन्वयाची भूमिका इथल्या मंडळींमध्ये विकसित होत गेली, असं म्हणायला जागा आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

इथला भूगोल श्रम हीच प्रकृती घडवतो

शिवाय डोंगराळ, उंच-सखल, खूप झाडी असलेल्या सह्याद्रीच्या प्रदेशानंही महाराष्ट्राला घडवलं. या प्रदेशामुळं इथली मंडळी स्वभावतः काटक झाले. ऐश आरामाची प्रवृत्ती त्यांच्यात रुजली नाही. श्रम हीच त्यांची प्रकृती होती. अशा या महाराष्ट्राचं महत्त्व सगळ्यात पहिल्यांदा सर्वांसमोर प्रकर्षानं आलं ते शिवाजी महाराजांच्या काळात. स्वराज्य निर्माण करताना शिवाजी महाराजांना इथल्या प्रदेशाची आणि इथल्या काटक मंडळींची मोठी साथ लाभली.

देशातल्या डोंगरी किल्ल्यांपैकी ८० ते ९० टक्के किल्ले महाराष्ट्रात आहेत. त्याआधारेच त्यांनी आपली युद्धनीती तयार केली. या प्रदेशाचा फायदा शिवाजी महाराजांच्या पश्चातही झाला. दक्षिण दिग्विजय करण्यासाठी औरंगजेब निघाला आणि मुघल साम्राज्य विस्तारताना त्यानं कुतुबशाही, आदिलशाही संपवली. पण त्याला महाराष्ट्र संपवता आला नाही. त्याचं कारण शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या एका स्वराज्य विचाराबरोबरच महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेतही आहे.

हेही वाचा : यशवंतरावांची आयडिया ऑफ महाराष्ट्रः नवं राज्य जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठीच

आम्ही वैचारिक स्वातंत्र्य एन्जॉय करतो

महाराष्ट्राच्या भूमीसंदर्भात विचार करताना इथल्या मंडळींचा‘वैचारिक स्वातंत्र्य’ हा गुण लक्षात घ्यावा लागतो. हे वैचारिक स्वातंत्र्य महाराष्ट्रात पहिल्यापासून आहे. आणि ते इथला मराठी माणूस एन्जॉय करतो, हे मला आवर्जून सांगायचंय. त्यातूनच महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय इथं तयार होत, मोठी संत परंपरा महाराष्ट्राला लाभली. इथले संत नामदेव हे पंजाबात गेले. त्यांच्या प्रभावाने शीख धर्म तयार झाला. उत्तरेत संत परंपरा निर्माण झाली. उत्तरेतले मोठे संत म्हणून नामदेवांना ओळखलं जातं.

यातला मुख्य मुद्दा वैचारिक बंडखोरीचा असून तो महत्त्वाचा आहे. ही बंडखोरी इथं होतीच. त्याची कितीतरी उदाहरणं देता येतील. उलट हीच परंपरा महाराष्ट्रात पुढंही चालू राहिली. हे सर्व संत लढाऊ प्रवृत्तीचेच आहे. अनिष्ट वृत्तींच्या विरोधात त्यांनी कडाडून प्रहार केले आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सुधारकांच्या परंपरेला ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळंच देशाला दिशा देणारे सामाजिक विचारवंत प्रामुख्यानं महाराष्ट्रात झाले. संत ते समाजसुधारक असा एक महत्त्वाचा धागा या महाराष्ट्र विचारातला आहे.

हेही वाचा : टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?

चीड आहे ती गुलामगिरीची

आजवरच्या महाराष्ट्राचा विचार केल्यावर असं दिसतं की महाराष्ट्राला सगळ्यात जास्त चीड गुलामगिरीची आहे. मग ती बौद्धिक असो वा राजकीय. राजकीय गुलामगिरीविरोधात सर्वांच्या विरोधात उभे ठाकले, ते शिवाजी महाराज. त्यानंतर हीच राजकीय गुलामगिरी ब्रिटिशांच्या काळात दिसली.

त्याच्या विरोधात मोठं नेतृत्व लोकमान्य टिळकांच्या रूपानं महाराष्ट्रातूनच सगळ्यात पहिल्यांदा पुढं आलं. त्याचं रुपांतर पुढं स्वातंत्र्यात झालं. याचा आधार घेऊन असं सांगता येईल की लढाऊपणा, स्वातंत्र्यप्रियता हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र धर्म ही संकल्पना ही खरंतर जुनी गोष्ट. पण या संकल्पनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न न्यायमूर्ती रानडे, इतिहासाचार्य राजवाडे, विनोबा भावे अशा काही मंडळींनी केला. त्यात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य धर्माची रानडे यांनी चिकित्सा केली. ती करताना इथल्या लोकांमध्ये असलेली वेगळ्या प्रकारची सामाजिक-राजकीय भूमिका अधोरेखित केली. त्यात स्वभाषा, स्वधर्म यांचं रक्षण अभिप्रेत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

स्वातंत्र्य, समता, बंधुता इथे आहेच

या महाराष्ट्र धर्माला राजवाडे यांनी संकुचित करण्याचा प्रयत्न केला होता. पण विनोबा भावे यांनी त्याला अधिक व्यापक केलं. त्यांनी महाराष्ट्र धर्माचं त्रिविक्रम असं वैशिष्ट्य सांगितलं. वामनानं जशी तीन पावलं टाकली, त्या धर्तीवर त्यांनी ही मांडणी केली. म्हणजे इथला मराठी माणूस पहिल्या पावलात महाराष्ट्र व्यापतो, दुसऱ्या पावलात देश व्यापतो आणि तिसऱ्या पावलात तो विश्व व्यापतो.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यातली मूल्यात्मकता शेजवलकर यांनी सांगितलीय. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही आधुनिक काळातली तीन मूल्य आपल्या घटनेत आहेत. ही फ्रान्समधून आल्याचं आपण समजतो. पण खरंतर ही मूल्य महाराष्ट्रात पहिल्यापासून होतीच. थोडं विस्तारानं सांगायचं तर संत एकनाथांनी समता सांगितली, समर्थ रामदासांनी स्वातंत्र्य सांगितलं आणि तुकोबांनी बंधुभाव सांगितला. 

या तीन मूल्यांचा उत्कर्ष आपल्याला या तीन संतांच्या शिकवणुकीतून दिसतो, असं शेजवलकरांनी सांगितलं. `ही तीन मूल्यं मला वारकरी पंथातून पाहायला मिळाली, त्यासाठी फ्रेंच राज्यक्रांतीत जाण्याची गरज मला वाटत नाही`, हे अलीकडच्या काळात दिलीप चित्रे यांनीही म्हटलं आहे.

हेही वाचा : यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

नेतृत्वाबरोबर विचारांची पेरणी केली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. त्यांना मराठी असण्याचा अभिमान होता. मराठी माणसानं केलेलं हे काम म्हणूनही त्याकडे पाहावं लागतं. एका अर्थानं हे समस्त मराठी माणसाचं, वृत्तीचं प्रतीक आहे. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री झाले तेव्हा ‘हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री गेला’, असं म्हटलं गेलं. असं विविधांगी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणं हे मराठी माणसाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. 

थोडक्यात काय तर महाराष्ट्र धर्मात एक नेतृत्व करण्याची वृत्ती आहे. ते प्रभुत्व मिळवणं, सत्ता प्राप्त करणं, केवळ या अर्थाचं ते नेतृत्व नाही, तर ते वैचारिक भूमिका या अर्थानं आहे. त्यामुळंच महाराष्ट्रात निर्माण झालेल्या नेतृत्वाकडे पाहिल्यास केवळ नेतृत्व करून ते थांबले नाहीत तर त्यांनी त्याबरोबर विचारांची पेरणीही इथं केली.

महाराष्ट्र विचारात असलेली ही व्यापक दृष्टी ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानात आहे. या पसायदानांत व्यक्त झालेली विचारांची एवढी मोठी झेप अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेत आपल्याला सापडणार नाही. विचारांची व्यापकता, विश्वाचा विचार महाराष्ट्रातल्या मराठी लोकांमध्ये प्राधान्यानं दिसतो. तेच महाराष्ट्र विचाराचंही वैशिष्ट्य आहे.

हेही वाचा : 

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा

शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार

यशवंतरावांची आयडिया ऑफ महाराष्ट्र: भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल

(शब्दांकनः अभिजीत सोनावणे)