अनेकांतवाद हाच महाराष्ट्र विचाराचा पाया

१७ मे २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


संजय नहार गेली चार दशकं पंजाब, काश्मीर आणि ईशान्येकडच्या राज्यांत `सरहद`वरच्या माणसांना देशाशी जोडण्याचं काम करत आहेत. त्यांना तिथे सापडलेली `आयडिया ऑफ महाराष्ट्र` काय आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यांना सापडलेला महाराष्ट्र विचार आहे देशभक्तीचा आणि सर्वसमावेशकतेचा. त्याशिवाय ते सांगत असलेला अनेकांतवादही महाराष्ट्र विचारांच्या दृष्टीने आवर्जून समजून घ्यावा, असाच आहे.

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ही माझी प्रेरणास्थानं. या तिन्ही नावांनी माझ्यात देशभक्ती पेरली. माझ्यातल्या माणुसकीलाही दिशा दिली. ‘मैं एक इन्सान हूं और जो भी चीजें इंसानियत पर असर डालती हैं, मुझे उनसे फर्क पडता है,’ हे भगतसिंग यांचं वाक्य कायम सोबत होतं.

हेही वाचा : आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

भगतसिंगांच्या वाक्यात महाराष्ट्र विचार

या वाक्यात मला महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि वाढलेला महाराष्ट्र विचार दिसतो. कारण संतपरंपरेनी महाराष्ट्राच्या भूमीत माणुसकीची ज्योत तेवत ठेवली. संत नामदेवांनी हीच ज्योत थेट पंजाबपर्यंत नेली. त्यांच्यामुळं फक्त पंजाबातच नाही तर संपूर्ण उत्तर भारतात संतपरंपरेचा उगम झाला. शीख धर्मावर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. या
अर्थानं भगतसिंग यांच्या या वाक्यात मला महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि वाढलेला महाराष्ट्र विचार दिसतो.

पंजाबशी नातं सांगताना संत नामदेवांचा उल्लेख होतो, त्याचप्रमाणं लोकमान्य टिळक, विष्णू गणेश पिंगळे आणि शिवराम हरी राजगुरू यांचाही उल्लेख सन्मानानं करायला हवा. इतकंच नव्हे तर गुरू गोविंदसिंगांनी त्यांचा उत्तरकाळ महाराष्ट्रात व्यतीत केला, हेही विसरायला नको.

देश आधी, राज्य नंतर

केवळ आपल्या प्रदेशाचा, केवळ आपल्यापुरता विचार करणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आपल्या पलीकडे जाऊन देशाचा, विश्वाचा विचार करणं हे या भूमीचे संस्कार आहेत, असं मला वाटतं. माझ्या लहानपणीही असंच काहीसं वातावरण मला मिळालं. माझे सख्खे चुलते धनराज नहार आणि संपतलाल नहार हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते. देशभक्त केशवराव जेधे, भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या मंडळींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता.

माझा अनुभव सांगतो, ही मंडळी महाराष्ट्रात कार्यरत असली तरीही त्यांची नाळ राष्ट्रीय राजकारणाशी घट्ट जोडलेली होती. राज्यात राहून देशाचा विचार करणारी, त्या दिशेनं कृती करणारी कित्येक मंडळी महाराष्ट्रात होऊन गेली. त्यातल्या अनेक मंडळींना भेटण्याचा योग मला माझ्या चुलत्यांमुळं मिळत गेला.

स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी योगदान दिलं असल्यानं त्यांच्या कल्पना राज्यापुरत्या कधीच सीमित नव्हत्या. त्यांचा विचार प्रामुख्यानं राष्ट्राबद्दलचा होता. ‘देश आधी, राज्य नंतर’ हा विचार त्यांच्या बोलण्यात प्रामुख्यानं दिसायचा. सरोजिनी बाबर, शांताबाई शेळके, मालतीबाई बेडेकर अशा कितीतरी मंडळींना मी चुलत्यांबरोबर भेटलो. या सगळ्यांचाच कल्पनेत, कृतीत असलेला ‘देशाचा विचार’ हा मला महाराष्ट्र विचारातलाच एक महत्त्वाचा गाभा वाटला.

हेही वाचा : सदानंद मोरे सांगतायत ‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

धर्मवादाच्या पलीकडे नेणारा राष्ट्रवाद

महाराष्ट्र हा आपला असला तरीही देशासाठी आपण काम केलं पाहिजे, हेच संस्कार माझ्या मनावर लहानपणापासून कोरले गेले. असं असलं तरीही मी ज्या भागात राहत होतो, तिथं मात्र चित्र वेगळं होतं. हिंदू मजबूत झाल्याशिवाय देश मजबूत होणार नाही, अशी देशाबद्दलची भावना आमच्या मनात रुजवली जात होती. हिंदुत्व हेच सर्वश्रेष्ठ असल्याचं ठसवणारं वातावरण मी राहत असलेल्या पुण्यातल्या पूर्व भागात जाणीवपूर्वक निर्माण केलं जात होतं

अर्थात नंतर काम करत गेलो तसा राष्ट्राचा विचार करताना भारतीयत्वाचाच विचार महत्त्वाचा असल्याची जाणीव विकसित होत गेली. १९८०च्या दरम्यान पंजाब हिंसाचारात जळत असताना अस्वस्थ व्हायला होत होतं. देशासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या या राज्यासाठी आपण काही केलं पाहिजे, असं मनात यायचं. भगतसिंगांमुळं पंजाबचं आकर्षण होतंच. त्यावेळी आम्ही थेट पंजाबमधे गेलो. तिथं पदयात्रा काढल्या. मूक मोर्चे काढले. महाराष्ट्राबाहेरचे लोक महाराष्ट्राकडे किती आदरानं पाहतात याचा अनुभव पंजाबमधे त्यावेळी आला.

महाराष्ट्रातून आलो म्हणून पाय धुतले

महाराष्ट्रातून आलोय म्हटल्यावर पंजाबमधे आमचं उत्तम आदरातिथ्य झालं. इतकंच काय तर त्यावेळी आम्ही घुमानमधे गेलो असता ‘महाराष्ट्रातून आलोय’ असं कळल्यावर तिथल्या गावकऱ्यांनी आमचे पाय धुतले. हे सगळं आम्हाला खूप नवीन होतं. त्याचं कारण होतं संत नामदेव. पंजाबी माणसासाठी हे आदरस्थान. घुमानमधे संत नामदेवांची समाधी आहे, तिथल्या अभिप्रायवहीत ‘जो पंजाब सिकंदराला सैन्याच्या बळावर जिंकता आला नाही, तो पंजाब नामदेवांनी प्रेमानं जिंकला’ असं आचार्य विनोबा भावेंनी नोंदवून ठेवलं आहे.

आपण राहतो, त्या प्रदेशाबद्दल लोकांच्या मनात इतकी आत्मीयता असल्याचा अनुभव पंजाबच्या निमित्तानं आम्ही घेतला. नंतर काश्मीरमधे आम्ही काम सुरू केलं. तिथं गेल्यानंतर महाराष्ट्राकडे तितक्याच आदरानं बघणारे लोक आम्हाला भेटले. काश्मिरी लोकांच्या मनात देशाच्या अन्य भागाबद्दल राग होता. पण महाराष्ट्राबद्दल मात्र चांगली भावना त्यांच्या मनात असल्याचं लक्षात आलं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

महाराष्ट्रातून येणारे काश्मीरमधे देव

त्यावेळी काश्मीरमधे पर्यटक यायचे, ते प्रामुख्यानं महाराष्ट्रातून. ‘राजा राणी ट्रॅव्हल्स’च्या राजा पाटलांनी पहिल्यांदा काश्मीरला टूर न्यायला सुरुवात केली. तेव्हा ते त्यांच्या कोटवर तिरंगा झेंडा लावायचे. ‘भारत माता की जय’ म्हणायचे. काश्मीरमधे या शब्दांचा उच्चार करूनही त्याला कोणताही विरोध न होणं, यातच महाराष्ट्राला त्यांनी किती स्वीकारलं होतं, हे लक्षात येतं. महाराष्ट्रातून येणारी मंडळी आपल्यासाठी देव आहेत. त्यांचं आदरातिथ्य आपण केलं पाहिजे, अशी भावना काश्मिरींच्या मनात त्या काळी होती. ती आजही आहे. केसरी ट्रॅव्हल, वीणा वर्ल्ड यांनी ही मशाल आजही कायम ठेवली आहे.

आमच्या ‘सरहद’ संस्थेच्या माध्यमातून ही काश्मीरमधली मुलं पुढं पुण्यात शिकण्यासाठी आली. देशातल्या कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र, विशेषतः पुणे शहर हे आम्हाला जास्त जवळचं वाटतं, अशी या मुलांची भावना होती. ‘महाराष्ट्र का आवडतो’ असं या मुलांना सोनिया गांधींनी विचारल्यावर ‘इथली माणसं खूप चांगली आहेत’ अशी भावना या मुलांनी व्यक्त केली.

काश्मीरमधली मुलं महाराष्ट्राच्या टूरवर आली तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संघाच्या सुदर्शनजींनाही भेटली. तेव्हा ‘जितकी या माणसांची नकारात्मक प्रतिमा आहे, तितकी ही माणसं तशी नाहीत’ अशी भावना या मुलांची झाली.

महाराष्ट्राने प्रेमाने जग जिंकलंय

भक्तीच्या परंपरेबरोबरच शौर्याच्या परंपरेचा धागाही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रानं लढाया जरूर केल्या. अगदी अटकेपार मजल मारली. पण त्यात आक्रमकपणे प्रदेश काबीज केला पाहिजे, यापेक्षा प्रेमानं प्रदेशातल्या माणसांना जिंकलं पाहिजे, हा धागा अधिक आहे.

८८वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमानला घ्यायचं ठरवलं, तेव्हा आलेला अनुभव सांगतो. पंजाब सरकारनं या संमेलनाकडे त्यांच्याच राज्य सरकारचा हा उत्सव असल्याचं मानलं. संमेलनाच्या नियोजनासाठी मी आणि भारत देसडला गेलो असता बैठकीत काही छोट्या मागण्या आम्ही मांडल्या. तेव्हा मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आम्ही मांडू त्या मागण्या तिथल्या तिथं मान्य करत असल्याचं आमच्या लक्षात आलं.

इतकंच नव्हे, तर त्याहून कितीतरी पटीनं अधिक गोष्टी या संमेलनासाठी ते करणार असल्याचं आमच्या लक्षात आलं. तेव्हा मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आम्हाला म्हणाले, ‘एक नामदेव तुम्ही आम्हाला दिला आहे, हे तुमच्या राज्याचे अनंत उपकार आहेत. आता आम्हाला तुमचं आदरातिथ्य करू द्या,’ या संमेलनात पंजाबी माणसाचं आदरातिथ्य कसं होतं, हे मराठी माणसानं अनुभवलं आहे.

ईशान्य भारतातही महाराष्ट्राविषयी आदरानंच पाहिलं जातं, हे तिथं काम सुरू केल्यावर प्रकर्षानं जाणवलं. लचित बरफुकन यांना अभिमानानं ‘आसामचा शिवाजी’ म्हटलं जातं, यातंच सगळं आलं.

हेही वाचा : नामदेवांची पुण्यतिथी महाराष्ट्र आणि पंजाबमधे वेगवेगळ्या दिवशी का?

सर्वसमावेशकतेचा उदारमतवादी विचार

हे सगळं नेमकं काय आहे? हे नेमकं असं का आहे? असा विचार मी करतो तेव्हा त्याची मुळं मला महाराष्ट्रानं कायम देशाचा विचार केला, या महाराष्ट्र विचारात दिसतात. उदारमतवादी परंपरा, सर्वसमावेशक भूमिकेशी महाराष्ट्राच्या मातीचं घट्ट नातं आहे. ही भूमिका तयार होण्यात इथं नांदलेल्या परंपरांचा मोठा वाटा आहे असं मला वाटतं.

प्राचीन काळी इथं श्रमण परंपरेचा मोठा प्रभाव होता. नंतर वैदिक परंपराही इथं नांदली. मध्ययुगात संत परंपरेचा उदय महाराष्ट्रात झाला. त्याचे पडसाद इथल्या भूमीसह देशभरात उमटले. स्वातंत्र्याच्या काळात तर जहाल आणि मवाळ हे दोन्ही मतप्रवाह इथं होते. मराठी भाषेवरही इथं नांदलेल्या परंपरांचा मोठा प्रभाव असल्याचा दिसतो. प्राकृत, पाली तसेच जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव या भूमीवर आहे. तेवढ्याच आत्मीयतेनं या भूमीनं संस्कृतही स्वीकारलं आहे.

दोन हजार वर्षांपूर्वीचे नवकार मंत्राचे शिलालेख महाराष्ट्रात सापडले आहेत. जे जे काही चांगलं आहे, त्याचं नमन नवकार मंत्रात सांगितलं आहे. देव हा व्यक्तीत असतो, त्याचवेळी सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह हे तत्त्व सांगणारे जैन आणि बौदध तत्त्वज्ञान महाराष्ट्रात हजारो वर्षांपासून आहे.

तरीही महाराष्ट्राची काळजी वाटते

अशा सगळ्यांतून महाराष्ट्र घडला आहे. घडतो आहे. महाराष्ट्र विचार घडण्याला अशी मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र सधन आहे, इथं निसर्गसौंदर्य छान आहे, मोठा समुद्रकिनारा आहे, देशाला आकर्षित करणारं बॉलीवूड, आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात असल्यामुळं देशातले लोक महाराष्ट्राबद्दल तर ते चांगलं बोलतातच पण त्यांना इथले लोकही आपले वाटतात.

उदारमतवादी, सर्वसमावेशक परंपरा सांगणाऱ्या आणि रुजवणाऱ्या याच महाराष्ट्राची अलीकडच्या काळात मात्र मला काळजी वाटते आहे. प्रत्येक महापुरुषाच्या अनेक विचारांशी
आपण सहमत असतो, पण त्याचवेळी काही विचारांशी सहमत नसतो, हे ठामपणे सांगणं याच महाराष्ट्रात आता कठीण असल्याचं दिसून येतंय. त्याचं कारण इथं पसरत असलेल्या जातीय, धार्मिक विद्वेषात आहे. इतिहासातून नेमकं काय घ्यायचं, हे नकळल्यामुळं हे होतंय.

हेही वाचा : खरंच संत नामदेव चमत्कार करायचे?

महापुरुषांना एका विचारांत अडकवलंय

मतभेदांची एक दीर्घ परंपरा महाराष्ट्राला आहे. महात्मा फुले यांच्या जिवंतपणी अंत्ययात्रा काढलेल्या आहेत आणि त्याच वेळी त्यांचं कार्य पुढं नेण्यासाठी ब्राह्मण माणसानंच वाडा दिला, हेही सत्य सर्वांसमोर आहे. टिळक-आगरकर वाद तर सर्वश्रुत आहेच. हीच मतभेदांची परंपरा महाराष्ट्र आता विसरत चाललाय की काय असं वाटू लागलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी दिलेली वागणूक ही महाराष्ट्र विचारालाच अधोरेखित करणारी आहे. पण हा विचार मोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे नोंदवलं पाहिजे असं मला वाटतं.

टिळकांचा राष्ट्रवाद सांगताना आपण टिळकांना उर्दू भाषेचा अभिमान होता, जिना त्यांचे वकील होते, ही माहिती आपण सांगत नाही. सावरकरांचे बौद्ध आणि महावीर यांच्या विषयीचे न पटणारे मुद्दे उपस्थित करताना त्यांच्या देशभक्तीबद्दल, त्यांच्या जातिनिर्मूलनाच्या कामाबद्दल आणि विज्ञाननिष्ठेबद्दल आदरच व्यक्त केला पाहिजे. महाराष्ट्र विचार घडवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा कितीतरी महापुरुषांना आपण एकेका विचारांत अडकवून ठेवलं आहे. त्यातून धार्मिक-जातीय विद्वेष पेरला जातो आहे.

देश उभा करायचा असेल, तर प्रत्येक महापुरुषाच्या विचारांची तर्कसुसंगतता तपासली पाहिजे. आजच्या काळात तर्कसुसंगत असतील ते विचार मान्य करणं, हाच तर महाराष्ट्र धर्म आहे. पूर्वीच्या महाराष्ट्रात वाई, पैठण अशी कित्येक विचारांची केंद्र होती. आज मात्र केवळ पक्षीय केंद्रं महाराष्ट्रात उरली आहेत. डॉ. सदानंद मोरे यांच्यासारखा एखादाच अभ्यासक इतिहासातल्या याच ‘महाराष्ट्र धर्मा’ची आठवण आपल्या अभ्यासातून करून देतो आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्याचा या राज्याच्या निर्मितीसाठी उपयोग करून घेतला पाहिजे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जबाबदारी जास्त

‘आता विश्वात्मके देवे’ असं सांगणारे संत ज्ञानेश्वर आपल्याकडे होऊन गेले आणि त्यांच्या विचारांचं समर्थन करता करता कृती मात्र विपरीत करतो, असं काहीसं वातावरण या आपल्या महाराष्ट्रात होतं आहे. हे महाराष्ट्रासाठी, नव्हे तर देशासाठीही घातक आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्र हा विविध विचारांचा असला तरीही त्यातल्या समन्वय साधण्याच्या परंपरेकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत.

त्याकडे लक्ष देऊन एकमेकांच्या विरोधात संघर्ष करण्यापेक्षा देशाचं, जगाचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्रानं आता एक झालं पाहिजे, असं मला वाटतं. केवळ बोलण्यातला नको तर प्रत्यक्ष कृतीतल्या समन्वयवादाची महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला गरज आहे. जे सत्तेत असतात, त्यांची जबाबदारी या संदर्भात जास्त असते. आज भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक सत्तेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

संघाने आरोपांना कृतीने उत्तर द्यावं

समोरच्यावर लढाईनं मात करणे आणि प्रेमानं जिंकणे, हे जिंकण्याचे दोन मार्ग असतात. या देशाला प्रेमानं जिंकण्याची क्षमता, ताकद केवळ महाराष्ट्रात आहे. ही संधी आपण गमावता कामा नये. वैचारिक विरोधकांना शत्रू मानण्याची महाराष्ट्राची कधीही परंपरा नव्हती. ती अलीकडच्या काळात येऊ घातली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मान्य नसतील, पण त्यांचं समाजातलं योगदान, रामभाऊ म्हाळगीसारखी निर्माण केलेली चांगली संस्था, नानाजी देशमुख, एकनाथजी रानडे यांनी उभं केलेलं काम. अशा चांगल्या गोष्टींबद्दल चांगलंच बोलावं लागेल. सध्या कोरोनाच्या काळात संघानं केलेल्या कामाचं कौतुकही करावं लागेल.

मात्र इतरांना विरोध करून त्यांना राष्ट्रविरोधी ठरविण्याची भूमिका मांडणाऱ्यांपासून संघाला स्वतःला वेगळं करावं लागेल. महाराष्ट्राच्या ऐक्याला तडे पाडण्याचं काम संघाकडून केलं जात आहे किंवा संघाकडून बाह्मण वर्चस्ववादाची भूमिका राबवली जात आहे, अशा प्रकारच्या होणाऱ्या आरोपांना संघाने कृतीतून तोंड द्यायला हवं.

माझं आणि तुझंही खरं असू शकतं

‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’चा केंद्रबिंदू सर्व बाजूनं पाहणं म्हणजेच अनेकांतवाद. माझं खरं असलं तरी तुझंही खरं असू शकतं, हा अनेकांतवाद जैन तत्त्वज्ञानाचा पाया आहे. हेच तत्व महाराष्ट्र विचाराचाही पाया आहे. म्हणून श्रमण संस्कृती स्वीकारताना वैदिकांनाही सन्मानाचं स्थान देणाऱ्या परंपरेला अनेक विचारवंत ‘महाराष्ट्र धर्म’ अथवा ‘भागवत धर्म’ म्हणतात. भविष्यातील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नवनिर्माणासाठी हाच पाया असला पाहिजे असं मला वाटतं.संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या भक्तीपरंपरेनं समतेचा विचार सांगितला आहे. हाच समतेचा विचार विविध क्षेत्रामधे प्रगती करण्यासाठी भविष्यात उपयोगी ठरणार आहे. एकीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या युगामधे आधुनिकतेला स्वीकारताना मानवी मूल्यांचं महत्त्व जास्त आहे. हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगानेही मान्य करायला सुरवात केली आहे. म्हणूनच केवळ भारताचंच नाही तर जगाचं वैचारिक आणि सांस्कृतिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे, असं मला वाटतं.

हेही वाचा : 

‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोनाला रोखणारी लस बनवण्याचं काम कुठंवर आलंय?

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?

यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

शाळेच्या पुस्तकांमधे आपण कधी जग जिंकणारे ग्लोबल संत नामदेव वाचलेत?

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज

(शब्दांकन : अभिजीत सोनावणे)