आयडिया ऑफ महाराष्ट्रः शरद पवारांच्या नजरेत महाराष्ट्र विचार

०१ मे २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज कोरोनाशी झुंजणारा महाराष्ट्र आपल्याला `आयडिया ऑफ महाराष्ट्र` खऱ्या अर्थाने समजावून सांगतोय. पुढची आव्हानं पेलण्यासाठीही हीच `आयडिया ऑफ महाराष्ट्र` आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याची मुहूर्तमेढ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी घातलीय. तो यशवंतराव नावाचा विचार काय आहे, ते हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनानिमित्त सांगत आहेत, महाराष्ट्राचे नेते शरद पवार.

१ मे १९६० रोजी एका मोठ्या संघर्षानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना होताना हे राज्य नावाप्रमाणेच महान असं राज्य होण्यासाठी त्याची वाटचाल जीवनाच्या सर्व स्तरांवर कशी असायला हवी, याचा सखोल आणि दूरगामी म्हणावा असा विचार त्या काळात निश्चितपणे झाला होता.

महाराष्ट्राचं तत्कालीन राजकीय नेतृत्व दूरगामी विचार करणारं होतं. तसंच नेतृत्व सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत होतं. राज्याच्या स्थापनेसाठी संयुक्त महाराष्ट्राची आंदोलनं, चळवळ झाली, त्याचं नेतृत्व हे खऱ्या अर्थाने विचारशीलांचं, विचारनिष्ठांचं आणि सकारात्मक कार्यनिपुणता असलेल्यांचं नेतृत्व होतं.

हेही वाचा : आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

कालातीत आदर्श शिवरायांच्या सुराज्याचा

एखादं स्वतंत्र राज्य अस्तित्वात येणं ही किती महत्त्वाची घटना आहे, त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात आणि त्यातून काय साधलं जाऊ शकतं, याचा एक कालातीत असा आदर्श नमुना महाराष्ट्रातल्या रयतेच्या ओळखीचा होता. तो अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, सुराज्याचा.

शासनप्रमुखाकडे रयतेच्या सर्वांगीण सुखाचा, प्रगतीचा आणि निरंतर विकासाचा ध्यास असेल, त्याच्याकडे धर्म आणि जातनिरपेक्षतेची दृष्टी असेल तर तो प्रतिकूल परिस्थितीही कशी अनुकूल करून घेऊ शकतो याचा सार्वकालिक आदर्श म्हणून आपण छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे पाहू शकतो.

ते भान म्हणजेच आयडिया ऑफ महाराष्ट्र

१९६० पासूनच महाराष्ट्र राज्याची घडी बसवताना या राज्याची एका समर्थ आणि संपन्न राज्यात उभारणी करताना राज्यातले राज्यकर्ते, समाजधुरीण यांच्यासहित अनेक विषयांमधल्या तज्ञांना महाराष्ट्राची शासन परंपरा, मूल्यपरंपरा आणि कल्याणकारी राज्याचा वास्तवात येऊ शकणारा आराखडा यांचं अतिशय नेटकं आणि पूर्वग्रहमुक्त असं भान होतं, असे आज मी खात्रीने म्हणतो. आजच्या विषयाच्या संदर्भात ते भान म्हणजेच खरी आयडिया ऑफ महाराष्ट्र आहे.

आज महाराष्ट्र राज्याची देशात आणि परदेशात सकारात्मक प्रतिमा आहे, महाराष्ट्राबद्दल विश्वास आहे, तो नक्कीच योगायोग नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना होताना या राज्याची धुरा विवेकवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि खऱ्या अर्थाने लोकनेते असलेल्या माननीय यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली हाही योगायोग नव्हता. ते मुख्यमंत्री पदासाठी सर्वार्थाने योग्य असं नेतृत्व होते, यात शंकाच नाही.

हेही वाचा : शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

यशवंतराव हा विचार महाराष्ट्राने सोडला नाही

मी त्यांना ‘द्रष्टा शासक’ मानतो, कारण त्यांनी महाराष्ट्राचा समग्र विकास साधण्याच्या हेतूने अनेक योजना कार्यान्वित केल्या. त्यांनी त्या योजनांचा कालबद्ध विकासाच्या दिशेने पाठपुरावा केला आणि अवाढव्य प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली. त्या सर्व योजनांच्या यशाच्या भक्कम पायावरच आजचा महाराष्ट्र उभा आहे. मी इथे यशवंतरावांचा जसा आणि ज्या संदर्भात उल्लेख केला आहे तो एका मर्यादेपर्यंतच व्यक्तिकेंद्री मानायला हरकत नाही.

माझ्या दृष्टीने यशवंतराव हा एक विचार आहे. ती सर्व समाजघटकांना एकत्र करणारी, सर्वांना सोबत घेणारी आणि जात आणि वर्गनिरपेक्ष विकासाचे ध्येय उराशी बाळगून काम करणारी प्रवृत्ती आहे. आज मागे वळून बघताना एक बाब मी समाधानाची मानेन की, यशवंतराव या विचारशक्तीचा, या कार्यप्रवृत्तीचा हात अगदी तात्पुरता अपवाद करता महाराष्ट्राने कधी सोडलेला नाही.

हेही वाचा : संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण गुजरातला किती कोटी दिले?

एकात्मता जपणारा राजकारणाचा पोत

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पक्षांचा सहभाग असला, त्यांच्या विचारधारा कमालीच्या भिन्न असल्या आणि त्यातल्या काही, प्रसंगी अगदी जहालही असल्या तरी या सर्वांनी गेली पन्नास पंचावन्न वर्षं महाराष्ट्राच्या लोकशाहीवादी, समतावादी आणि सर्वसमावेशकतावादी पायाला तडा जाईल अशा राजकारणाची कास धरलेली नाही.

महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काही काळ या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. माझा तो अनुभव जमेला धरून मी असं ठामपणे म्हणेन की अगदी अलीकडच्या काळापर्यंत या राज्याच्या राजकारणाचा पोत हा राज्याची स्वतंत्रता, त्याची वैशिष्ट्यपूर्णता आणि सामाजिक-धार्मिक एकात्मता जपणारा रहात आलेला आहे.

राज्याची निर्मिती होताना महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या विकसित राज्याची कल्पना मनात बाळगली असेल आणि प्रत्येक पुढच्या पिढीत ती संक्रमित केली असेल ती कल्पना वा ती स्थिती गेल्या साठ वर्षात आपण प्रत्यक्षात आणू शकलो आहोत, असा माझा मुळीच दावा नाही. तसा दावा कोणीही करू नये.

हेही वाचा : नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार

आपण समाधानी रहावं का? 

आज महाराष्ट्र विकासामधे देशात अव्वल आहे. अर्थातच ही विकासाची कल्पना राज्याची अन्नधान्याची उत्पादन क्षमता, औद्योगिक उत्पादन क्षमता, तांत्रिक विकास, जलव्यवस्थापन, सर्व प्रकारचं शिक्षण आणि समाजातल्या प्रत्येक घटकाची आर्थिक उन्नती यासारख्या गोष्टींशीच केवळ सीमित करून चालणार नाही. तशी ती मर्यादित करूही नये.

महाराष्ट्राला विकास वा प्रगती साधण्यासाठी आज असंख्य क्षेत्रं उपलब्ध आहेत. अशी क्षेत्रं रोजच्या रोज नव्याने निर्माण होत आहेत. मात्र राज्याच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीच्या व्यापात आपण इतके गुंतून पडलो आहोत की, अशा नवीनतम संधींच्या प्रदेशात मुशाफिरी करायला अजून काही काळ वाट पाहावी लागेल, असं वाटतं.

सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्र अनेक क्षेत्रात, विशेषतः इतर राज्यांच्या तुलनेत अधिक प्रगत, अधिक विकसित आणि अधिक विश्वसंवादी आहे, असं दाखवता येईल, मात्र त्यात आपण समाधानी आहोत का, हा आम्हा सर्व राजकारणी मंडळींना तसंच प्रत्येक विचारी माणसाला आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रश्न आहे.

मला विश्वास वाटतो की, महाराष्ट्रातला प्रत्येक विचारशील माणूस, अगदी कष्टकरी-कामगारसुद्धा, या प्रश्नाचा प्रत्येक नव्या संदर्भांचं भान ठेवून विचार करेल. हा सामान्य माणूसच महाराष्ट्रात घडू शकणाऱ्या विकासाला या पुढच्या काळात चालना देईल, तो त्या विकासाचा संवर्धक,वाहकही असेल यात शंका नाही.

हेही वाचा : 'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?

महाराष्ट्राला संकटं नवीन नाहीत

मी उद्याच्या महाराष्ट्राचा जो काही विचार करू पहातोय, करतोय त्यातून मला आज सर्व जगाला ग्रासणाऱ्या कोरोना या महासंकटाचा विचार बाजूला सारता येत नाही. जुन्या काळापासून महाराष्ट्राने, भारताने अनेक साथीचे रोग पाहिले आणि सोसलेही आहेत. त्यातून झालेली मनुष्यहानी आणि आर्थिक हानी पाहिली आहे. अर्थात मला इथे हे स्पष्ट करावंसं वाटतं की आताचं संकट मोठं असलं तरी महाराष्ट्राला अशी संकटं नवीन नाहीत. मात्र प्रत्येक संकटाचा सामना आपल्या राज्याने धैर्याने केलाय.

राज्यात लातूर, किल्लारी भागात ३० सप्टेंबर १९९३ ला मोठा भूकंप झाला होता. त्या भूकंपात हजारो लोकांना प्राण गमवावे लागले होते. त्याहून अधिक संख्येने लोक जखमी झाले. लाखो घरं उद्ध्वस्त झाली. या संकटात जीवित आणि मालमत्तेची अपरिमित हानी होऊनही लोक आणि सरकारच्या विविध यंत्रणा यांनी एकजूट, संयम तसंच धीरोदात्तपणा दाखवून त्या संकटावर मात केली.

१२ मार्च १९९३ रोजी मुंबई शहरात विविध ठिकाणी लागोपाठ बॉम्बस्फोट झाले. देशाच्या आर्थिक राजधानीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. परंतु मुंबईकरांनी अतुलनीय धैर्य दाखवून अवघ्या दोन दिवसात मुंबई पूर्वपदावर आणली.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

तीच एकजूट, धैर्य आणि संयम हवा

मुद्दा असा की, दोन्ही संकटांच्या काळात खचून न जाता विपरीत परिस्थितीवर विजय कसा मिळवायचा, पुन्हा विकासाच्या दिशेने झेप कशी घ्यायची याचा आदर्श महाराष्ट्रातील जनतेने जगासमोर उभा केला. तीच एकजूट, तेच धैर्य आणि तोच संयम महाराष्ट्रातले नागरिक कोरोनाशी संघर्ष करताना दाखवतील यात शंका नाही.

आज संपूर्ण जगात कोरोना या भयंकर संसर्गजन्य व्याधीने उत्पात मांडलाय, तो कल्पनातीत आहे. आज महाराष्ट्रात आणि त्यातही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनारुग्णांची संख्या अधिक आहे. त्यातल्या मृत्यूचं प्रमाणही मोठं आहे. पुणे, नागपूर आणि अन्य काही शहरांतदेखील कोरोनाने पाय पसरलेत. राज्यात आणि देशात भयाचं वातावरण आहे. 

राज्यात आणि देशात लॉकडाऊन असल्याने सर्वच उत्पादक स्रोत ठप्प झालेत. या संकटाचा सामना करण्यात राज्याचं सर्वांगीण नेतृत्व गुंतून पडलंय. माणसाच्या अस्तित्वालाच आव्हान देणाऱ्या या संकटाची तीव्रता कमी करण्याला आणि जनतेचे प्राण वाचवण्याला सरकारने सर्वाधिक प्राधान्य देणंच अपेक्षित आहे, आणि तेच आपण करत आहोत.

उद्याच्या महाराष्ट्राचा नव्याने विचार करुया

नजीकच्या काळात आपले राज्य आणि देश या संकटावर मात करेल यात शंका नाही. मात्र या संकटाने देशाची आणि राज्याची आर्थिक व्यवस्था अतिशय संकटात आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कोरोनापूर्व आणि कोरोनानंतरचा काळ पूर्णपणे वेगळा असणार आहे. काल आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे अनेक प्रगत देश आज घोर आर्थिक संकटात सापडले आहेत. सगळ्या जगाचीच आर्थिक, औद्योगिक, सामाजिक पातळीवर अतुलनीय अशी कोंडी झालीय.

आज उद्योग बंद आहेत, उत्पादन गोठलंय आणि सर्वच उद्योगातले कामगार उद्याच्या चिंतेने भयभीत झालेत. मला असं स्पष्ट दिसतं आहे की उद्याच्या जगाचा,उद्याच्या भारताचा आणि उद्याच्या महाराष्ट्राचा आपणाला संपूर्णपणे नव्याने विचार करावा लागणार आहे. समाजातला कोणताही एक आर्थिक वर्ग गृहीत धरून, एका वर्गाच्या हिताहिताचा विचार करून आपल्याला कोणताही निर्णय घेता येणं शक्य नाही.

हेही वाचा : शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

नव्या संधींचा फायदा उचलूया

आगामी भविष्यकाळात सगळ्या जगातच रोजगार घटून बेकारीचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळातच अनेक लहान आणि मध्यम उद्योग,  व्यवसाय बंद पडलेत. त्यापैकी थोडे उद्याच्या आर्थिक आणीबाणीच्या काळात तग धरू शकण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशा परिस्थितीत राज्यातले अकुशल कामगार, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणारे लोक, मुख्य म्हणजे शेतकरी वर्ग, निम्न आणि मध्यमवर्गातले सुशिक्षित बेकार आणि सर्व क्षेत्रातले कष्टकरी, कामगार यांना रोजगार देऊन त्यांची जगण्याची उमेद आपल्याला वाढवावी लागणार आहे.

महाराष्ट्राची आर्थिक प्रकृती सांभाळायची तर आपल्याला राज्यातल्या प्रत्येकाला म्हणजे समाजातल्या सर्व आर्थिक वर्ग, सर्व धर्मांचे अनुयायी, सर्व जातींचे समाजगट आणि अन्य वर्ग यांच्यातल्या प्रत्येकाला संपूर्णपणे वेगळा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. लोकांना स्वत:वरचा विश्वास वाढवावा लागेल.दैनंदिन व्यवहारात काटकसरीचा स्वीकार करावा लागेल.

जगावरच्या आर्थिक, औद्योगिक संकटांनंतर भविष्यात देशासाठी नव्या संधी निर्माण होतील. आपण अधिक कष्ट करून त्याचा लाभ घेतला पाहिजे. ही आव्हानात्मक स्थिती आहे. पण हे आव्हान आपण नुसतंच स्वीकारणार नसून त्यावर यशस्वीच होणार आहोत, या आत्मविश्वासाने कामाला लागावं लागेल.

या माणसांवर माझा असीम विश्वास

कोरोनानंतरच्या काळात आपल्याला इतर कोणतेही आग्रह, हट्टाग्रह, तथाकथित अस्मितांचे प्रश्न, भाषिक आग्रह धरता येणार नाहीत. ते आपण धरूही नयेत. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही काळात धर्मद्वेष, जातद्वेष यातून नको त्या घटना घडल्या आणि देशात-राज्यात धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न झाले. तसे ते उद्याच्या महाराष्ट्रात होऊन अजिबातच चालणार नाही.

महाराष्ट्राला इतिहासात कधीही नव्हती इतकी वैचारिकतेची, समंजसपणाची, विवेकी आचारांची, सहिष्णुतेची आणि परस्परांबद्दलच्या आपुलकीची नितांत आवश्यकता आहे. आयडिया ऑफ महाराष्ट्र समजून घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची जीवनावरची आणि सर्वांनी मिळून जगण्याच्या प्रयत्नांवरची अढळ श्रद्धा माझ्या चांगल्या ओळखीची आहे. या माणसांवर माझा असीम विश्वास आहे. म्हणूनच महाराष्ट्र पुन्हा उभा राहील, याबद्दल मला खात्री आहे.

(उद्या वाचा: भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ. विनय सहस्रबुद्धे यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र.)

हेही वाचा : 

भाई उद्धवराव पाटलांचा वारसा कोण चालवणार?

प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

महिला धोरणाने २५ वर्षांत दाखवली प्रगतीची नवी वाट 

श्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा

शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

(लेखक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार आहेत.)