यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता

०३ मे २०२०

वाचन वेळ : ३० मिनिटं


संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येण्याच्या पाच महिने आधीच यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप सांगितला होता. ते तेव्हा विशाल द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. ५ जानेवारी १९६०ला सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी अगदी सविस्तर नव्या महाराष्ट्राचा विचार सांगितला होता. त्यांची आयडिया ऑफ महाराष्ट्र सांगणारं हे भाषण नव्या राज्यासमोरच्या समस्या, त्यांच्यावरचे अक्सीर इलाज आणि नवनिर्मितीची दिशा सांगतं. हे त्यांचं महत्त्वाचं भाषण. 

आज या सभेमध्यें बोलत असतांना दीड-दोन वर्षांपूर्वी मी सांगलीस आलों होतों, त्याची मला आठवण येते. त्या वेळीं अशाच एका प्रसंगीं आपल्याशीं माझ्या मनांतले कांहीं विचार मीं व्यक्त केले होते. त्याच्याहि अगोदर कांही वर्षांपूर्वी माझ्या मनांतील भावना आणि विचार याच सांगलीमध्यें आपल्यापुढें मांडण्याचा मीं प्रयत्न केला होता. हें सर्व पाहतां माझ्या आयुष्यांतील कांहीं महत्त्वाच्या प्रसंगीं माझें म्हणणें मीं सांगलीच्या भूमीवरच मांडावें असा योगायोग दिसतो.

आज आपण माझ्या हस्तें भारताचे नेते आणि पंतप्रधान पंडित जवाहरलालजी यांच्या पुतळ्याचें अनावरण केलें. तुम्हां सर्वांच्या वतीनें मी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करतों आणि असें वचन देऊं इच्छितों कीं, भारताचे नेते ज्या तत्त्वासाठीं, ज्या विचारासाठीं, ज्या ध्येयासाठीं स्वतःचें जीवन जगत आहेत त्या तत्त्वासाठीं, त्या विचारासाठी आणि त्या ध्येयासाठी आपण या भागांतले सर्व लोक कटिबद्ध आहोंत.

पंडितजींच्या समोर गांधीजींची प्रतिमा आहे आणि गांधीजींच्या समोर पंडितजींची प्रतिमा आहे. गुरू-शिष्य एकमेकांसमोर, तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर, साक्षी आहेत. त्यांना साक्षी ठेवून जें तत्त्व त्यांनी आपल्या जीवनात आम्हांला शिकविलें तें तत्त्व अखेरपर्यंत आम्ही आचरूं अशी शपथ आज आपण घेत आहोंत, हाच या पुतळ्याच्या अनावरण समारंभाचा खरा अर्थ आहे असें मी मानतों.

हेही वाचा : यशवंतरावांची आयडिया ऑफ महाराष्ट्र: भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल

आज या औचित्यपूर्ण प्रसंगी मी माझे कांही महत्त्वाचे विचार आपल्यापुढें ठेवूं इच्छितो; ते विचार आतां लवकरच साकार होणाऱ्या नवमहाराष्ट्रासंबंधीं आहेत. या नवमहाराष्ट्राचे प्रश्न जर आपणांस यशस्वी रीतीनें सोडवावयाचे असतील तर त्यांचे स्वरूप आपण नीट समजावून घेतलें पाहिजे. त्या दृष्टीनें महाराष्ट्रांतील बहुतेक विचारवंत आज या प्रश्नांची जी चर्चा करीत आहेत ती स्वागतार्हच आहे. कारण, विचारवंतांनी हें काम केलेंच पाहिजे. वेगवेगळ्या प्रश्नांचे पृथक्करण करून त्यांची उलटसुलट बाजू लोकांच्या पुढें त्यांनी मांडली पाहिजे आणि ते तशी मांडीतहि आहेत. आणि म्हणून यासंबंधींच्या चर्चेत आज जाहीरपणानें प्रवेश करण्याचें मी ठरविलें आहे. 

दुसरें असें की, कांहीं प्रश्नांसंबंधी माझी एक विशिष्ट दृष्टि आहे. तेव्हां महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे मी कोणत्या दृष्टीनें पाहतों हें महाराष्ट्राच्या जनतेपुढें विचारासाठीं मांडणें मी माझें कर्तव्य समजतों. लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचीं पहिलीं पावलें टाकलीं जाणार आहेत. अशा वेळी कोणत्या दिशेनें माझे मन काम करीत आहे, कोणते प्रश्न आम्हांला आमच्यासमोर ठेवावयाचे आहेत आणि त्या प्रश्नांची उकल आम्हांला कोणत्या पद्धतीनें करावयास पाहिजे याचा आराखडा जर आम्हीं विचारपूर्वक आमच्यापुढें ठेवला नाहीं तर आंधळ्यासारखा प्रवास करण्याचा प्रसंग आमच्यावर येईल. परंतु आम्हांला आंधळ्यासारखा प्रवास करावयाचा नाहीं, डोळसपणानें करावयाचा आहे.

निश्चित ठिकाणीं जाण्यासाठीं आम्हांला हा प्रवास करावयाचा आहे, आणि एका निश्चित गतीनें तो पुरा करावयाचा आहे. अशा प्रकारची उमेद आणि ईर्षा आम्हालां आमच्या मनांत निर्माण करावयाची आहे. आणि म्हणून लक्षांत घेण्यासारखे आज आमच्या समोर कोणते प्रश्न आहेत याचा आपण विचार करावयास पाहिजे. माझ्या मतें हे प्रश्न तीन प्रकारचे आहेत. कांहीं राजकीय प्रश्न आहेत, कांहीं सामाजिक प्रश्न आहेत आणि कांहीं आर्थिक प्रश्न आहेत.

आज महाराष्ट्रापुढें जे राजकीय प्रश्न आहेत त्यांतील भावनात्मक ऐक्याच्या प्रश्नाला माझ्या मतें आपण पहिलें स्थान द्यावयास पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्यें गेल्या दोन-तीन वर्षांत ज्यांनी प्रवेश केला आहे, पण अजूनही ज्यांच्या मनांत थोडासा संशय आहे, अशा विदर्भाला आणि मराठवाड्याला, भावनेनें आमच्याशीं एकरूप होतां येईल असें वातावरण आतां आपणांला महाराष्ट्रांत निर्माण करावयाचें आहे. इतिहासानें यांत कांही अडचणी निर्माण करून ठेवल्या असल्या तरी त्या आतां आपण बाजूला सारल्या पाहिजेत.

पूर्वी हिंदुस्तानचा जो इतिहास घडला त्याला तुम्ही आणि मी जबाबदार नाहीं. कारण तो इतिहास तुम्हीं आणि मी, तुमच्या आणि माझ्या हातांनी घडविला नाहीं. ज्या मराठवाड्यांत आमची मूळ मराठी भाषा बोलली गेली, जिथें ती रांगली आणि चालती-बोलती झाली आणि म्हणून ज्या मराठवाड्यांचे वर्णन मराठी मायबोलीचें माहेर असें आम्ही करतो तो मराठवाडा मोंगलाईत जाऊन पडला.

तेथें तो शें-दीडशें, दोनशें, तीनशें वर्षे राहिला; तेथील वातावरणांत, तेथील परंपरेंत, तेथील भावनांच्या आवरणांत त्याची वाढ झाली. त्याचप्रमाणें मध्यप्रदेशचें जें राज्य इंग्रजांनीं निर्माण केलेंत्यांत वऱ्हाडाचे कांहीं भाग कांही शतकापासून जाऊन पडले. ते तेथील वातावरणांत, तेथील परंपरेंत आणि तेथील पार्श्वभूमींत वाढले. आणि असे हे आपण सर्व, गेली दोन-तीन वर्षे एके ठिकाणीं नांदावयाचा प्रयत्न करीत आहोत.

परंतु विदर्भांतील कांहीं लोकांच्या मनांत एका स्वतंत्र राज्याची भावना होती. अशा वेळीं, समोर राजकीय संकट दिसत असतांनाहि माझ्या मंत्रिमंडळांत काम करणारे माझे साथी आणि बाहेर काम करणारे आमचे अनेक कार्यकर्ते यांनीं महाराष्ट्रात सामील होण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. मला या विदर्भांतील माझ्या मित्रांचें जाहीर अभिनंदन करावयास पाहिजे. डॉ. खेडेकरांसारख्या माझ्या सहकाऱ्यांना मला जाहीर धन्यवाद दिले पाहिजेत.

त्याचप्रमाणें विदर्भाची मागणी करून अखेरपर्यंत ती मांडण्याचा ज्यांनीं प्रयत्न केला, परंतु शेवटीं झालेला निर्णय शिरसावंद्य मानून महाराष्ट्राच्या जीवनाशीं समरस होण्याचा ज्यांनी निर्धाराने निर्णय घेतला ते माझे नागपुरांतील साथी श्री. कन्नमवार आणि त्यांचे सहकारी यांनाहि मला जाहीर धन्यवाद दिले पाहिजेत. आतां तुमची व माझी, महाराष्ट्राचें राजकारण चालविणाऱ्यांची जिम्मेदारी आहे कीं, त्यांना आपण आपुलकीनें, प्रेमानें जवळ घेतलें पाहिजे.

हेही वाचा : यशवंतरावांची आयडिया ऑफ महाराष्ट्रः नवं राज्य जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठीच

मेहेरबानी म्हणून नव्हे तर तो त्यांचा हक्क आहे म्हणून; आम्ही त्यांना चांगले वागवणारे कुणी तरी दादा आहोंत अशा भावनेनें नव्हे, तर ते आणि आम्ही भाऊ-भाऊ आहोंत, एका महान् कार्याचे साथीदार आहोंत या भावनेनें. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा विश्वास त्यांच्या मनांत निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हीच आज महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपल्याला विसरून चालणार नाही.

तेव्हां जे आमचे कांहीं विरोधी मित्र छोट्या-छोट्या प्रश्नांचीं दुखणीं घेऊन त्यांचा महाराष्ट्रभर बाजार मांडण्याचा प्रयत्न करतांना दिसतात त्यांना मला सांगावयाचे आहे कीं, या छोट्या-छोट्या प्रश्नांच्या चिंध्या जमविण्यासाठीं आपण जेवढा वेळ खर्च करीत आहांत त्यापैकीं निम्मा वेळ तरी महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनें आज ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्यांच्या विचारासाठीं द्या; विदर्भांतील या मंडळींना जवळ करण्याच्या दृष्टीनें विचार करण्यासाठी कांहीं वेळ द्या.

आज विदर्भांतील या मंडळींच्या मनांत जे संशय असतील, जे रागलोभ असतील, किंवा जे पूर्वग्रह असतील ते सर्व संशय, ते सर्व रागलोभ, ते सर्व पूर्वग्रह रेशमाच्या हातानें, आईच्या आणि थोरल्या भावाच्या ममतेनें दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनें महाराष्ट्राच्या जीवनांतील ही पहिली महत्त्वाची राजकीय समस्या आहे. याकडे जो दुर्लक्ष करील तो महाराष्ट्राचें नुकसान करील असें मला आपल्याला सांगावयाचें आहे. गेल्या तीन वर्षांत विदर्भांतील अनेक मंडळींना भेटण्याची, त्यांचें कार्य पाहण्याची मला संधि मिळाली. त्यांचीं मनें सांभाळण्याचा मीं प्रयत्न केला; तसेंच त्यांनींहि मला चांगलें वागविलें. जणुंकांहीं मी त्यांच्यामध्यें पांच पंचवीस वर्षे राहिलों आहें इतक्या ममतेनें आणि प्रेमानें त्यांनीं मला वागविलें. 

परंतु त्यांनी मला चांगले वागविलें किंवा मीं त्यांना चांगलें वागविलें या वैयक्तिक नात्याचा हा प्रश्न नव्हे. प्रातिनिधिक नात्यानें आम्ही एकमेकांशी ज्या तऱ्हेनें वागलो आहोंत तें वागणें आम्हांला पुढें वाढवावयाचें आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला त्याच भावनेनें आमच्याशी एकरूप करण्याची ही जबाबदारी आहे. हळुवारपणानें आपणांस ही जबाबदारी यापुढें पार पाडावयाची आहे.

नाहीं तर आपण आपले पडलों कोल्हापूर-साताऱ्याकडे; नागपूर, चांदा, भंडारा दूर आहेत, त्यांच्या प्रश्नांचा विचार करण्याची आम्हांला काय जरुरी आहे, अशा विचारांत जर जनता आणि आपण कार्यकर्ते फसलों तर मग महाराष्ट्राच्या मागणीचा आम्हांला खरा अर्थच कळलेला नाहीं असें म्हणावे लागेल. महाराष्ट्राची घोषणा करणें सोपें आहे, पण महाराष्ट्राची जिम्मेदारी हातांत आल्यानंतर त्यांतून निर्माण होणारे प्रश्न समजून घेऊन आपुलकीच्या नात्यानें ते सोडविण्याचा प्रयत्न करणें हें महत्त्वाचे काम आहे. माझ्या मतें महाराष्ट्राचें राजकारण हीच एक महत्त्वाची समस्या आहे.

हेही वाचा : बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?

महाराष्ट्रापुढें जे महत्त्वाचे सामाजिक प्रश्न आहेत, त्यांपैकीं जो पहिला मोठा प्रश्न आहे त्यासंबंधी मी आतां बोलणार आहें. तो प्रश्न मोठा नाजुक असला तरीसुद्धां त्यासंबंधीं उघड उघड चर्चा झाली पाहिजे आणि मींसुद्धां तिच्यामध्यें भाग घेतला पाहिजे. हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनासंबंधींचा आहे. या विषयावर महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनीं गेल्या दोनचार महिन्यांत लेख लिहिले असून मीं ते काळजीपूर्वक वाचले आहेत. 

त्यामध्यें महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचें वर्णन 'भंगलेलें मन'या शब्दांनी केलें आहे. तें खरें कीं खोटें या विषयांत न जातां तें तसें आहे असें आपण गृहीत धरूं. तेव्हां कोणत्या अर्थाने तें भंगलेलें मन आहे, हें पाहणें जरुरीचें आहे. महाराष्ट्राच्या मागणीचा पाठपुरावा करीत असतांना आमचा एक आवाज, एक मन होतें. त्यासारखें चित्र मीं महाराष्ट्राच्या जीवनामध्यें पूर्वी कधींहि पाहिले नव्हतें. मी त्यावेळी शिव्या खात होतों तरी मला आनंद वाटत होता. मी म्हणालों, ठीक आहे. अशी एक शक्ति उभी होत आहे ही चांगली गोष्ट आहे.

कारण माझी त्या शक्तीवर एक निष्ठा आहे, विश्वास आहे. पण आश्चर्य पहा.हें एक दिसणारें मन, एक दिसणारें चित्र, संयुक्त महाराष्ट्र येतो आहे म्हटल्याबरोबर ताबडतोब संशयानें आणि शंकेनें भरलें. म्हणजे भंगलेलें मन आहे यांत शंका नाहीं. महाराष्ट्राच्या जीवनांतील जे सामाजिक प्रश्न आहेत त्यांत सर्वांत महत्वाचा प्रश्न हा आहे कीं, हें जें भंगलेलें मन आहे तें आम्हांला सांधावयाचें आहे.

ब्राह्मण ब्राह्मणांकरितां विचार करतो, मराठा मराठ्यांपुरता विचार करतो. महार महारांकरितां विचार करतो, माळी माळ्यांकरितां विचार करतो. हे मासले मीं केवळ नमुन्या दाखल सांगितले. जातीयवादाच्या या विषारी विचारापासून आपण महाराष्ट्राला मुक्त केलें पाहिजे, जातीयवादाचा हा विचारच समूळ नष्ट केला पाहिजे. तेव्हांच महाराष्ट्राचें सामाजिक मन एकजिनसी होईल. परंतु हें कार्य आपण एका दिवसांत, एका रात्रींत करूं शकणार नाहीं. त्यासाठीं विचारी माणसांनी विचारपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय हें घडून येणार नाही.

परंतु आज काय घडत आहे ? या बाबतींत मी नागपूरच्या माझ्या एका मित्राचा उल्लेख करणार आहें. तो म्हणजे श्री. माडखोलकरांचा. ते एक मोठे विचारवंत व थोर साहित्यिक असून त्यांचे माझ्याशीं मैत्रीचे संबंध आहेत. त्यांनी असा प्रश्न उभा केला आहे कीं, महाराष्ट्राच्या निमित्तानें निर्माण होणारे राज्य हें मराठा राज्य आहे कीं मराठी राज्य आहे? असले प्रश्न उभे करणें ही भंगलेलें मन सांधण्याची प्रक्रिया नाहीं. 

परंतु अशा तऱ्हेचा प्रश्न उभा करून जातीय आणि संशयाचें वातावरण निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केला तर मला त्यांना जरूर सांगावयाचे आहे कीं, हें मराठा राज्य मुळींच होणार नाहीं. जोपर्यंत माझ्या हातांत सत्तेचीं सूत्रें असतील तोपर्यंत निदान, मी हें राज्य एका जातीचें, मराठ्यांचे, किंवा आणखी एखाद्या जातीचें होऊं देणार नाहीं. तें तसें होत आहे असें वाटलें, तर महाराष्ट्राच्या कल्याणाकरितां, मराठा जातींत जन्माला आलो आहें म्हणून मला कदाचित् एका बाजूला हटावें लागलें तरी मी हटण्याचा प्रयत्न करीन, पण ही गोष्ट मी होऊं देणार नाहीं.

आणि म्हणून साहित्यिकांना आणि विचारवंतांना मी विचारूं इच्छितो कीं, कशासाठी हा वाद आपण पुन्हा उभा करीत आहांत? ते संशय, त्या शंका आणि त्या आशंका यांमुळें माझें मन भरून येतें. पुष्कळ वेळां मला बोलणें अवघड होतें. खरोखरच अशा तऱ्हेचे संशयांत पाडणारे प्रश्न आपण कां निर्माण करीत आहांत? मी नेहमीं सांगत आलों आहें कीं, 'मराठा' हा शब्द जातिवाचक नाहीं. आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्राला 'मराठा' हें नांव दिलेंतें काय तो शब्द जातिवाचक आहे म्हणून दिलें?

'मराठा' शब्दामागें महाराष्ट्राच्या एकजिनसी जीवनाची भावना आहे. 'मराठा' शब्दाचा हाच अर्थ आम्हांला अभिप्रेत आहे आणि म्हणून मराठी राज्य हें कोणा एका जमातीचें राज्य मुळींच होतां कामा नये, या गोष्टींवर माझा जरूर विश्वास आहे. पण हा जातीयवादी विचार सर्व समाजामध्यें आहे. मी असें म्हणत नाहीं कीं, मराठा समाजांत जातीयवादनाहीं, ब्राह्मण समाजांत नाहीं, माळी समाजांत नाहीं. सगळ्या समाजांत तो आहे. नाहीं कुठें?

परंतु आम्ही विचारपूर्वक पंचवीस-पंचवीस वर्षे, तीस-तीस वर्षे राष्ट्रीयवादी भावनेला वाहून घेतलेलीं माणसें आहोंत. त्यांच्या अंगीं उगीच कांहींतरी चिटकवून मनाला यातना देऊ नका, जसें मराठ्यांबद्दल इतरांनी बोलतां कामा नये तसें मराठ्यांनींहि इतरांबद्दल बोलतां कामा नये असें माझें मत आहे.

परंतु मराठा राज्य कीं मराठी राज्य हा जो प्रश्न उपस्थित करण्यांत आला आहे त्याच्याशी संबंधित असा एक दुसराहि प्रश्न आहे. तो प्रश्न आतां मी आपल्यासमोर मांडणार आहे. हा जो विचार येतो कीं, हें मराठा राज्य होईल कीं काय, त्याच्या पाठीमागें कांही कारणें आहेत. या कारणांचा आपण आपल्या मनाशी विचार केला पाहिजे. 

या कारणांपैकीं मुख्य कारण असें आहे की, बुद्धीची, ज्ञानाची सेवा करण्याचें काम ज्या समाजांनीं आजपर्यंत केलें, हिंदुस्तानच्या अलीकडच्या इतिहासांतहि ज्यांनी वैचारिक नेतृत्व केलें त्यांच्या मनांत अशी शंका निर्माण होत आहे कीं, गेल्या दहाबारा वर्षांपासून, निवडणुकीचें राजकारण आल्यापासून संख्याबळावर कांहीं माणसें पुढें जात असतांना आपल्या गुणांची उपेक्षा आणि अवहेलना होणार आहे कीं काय? अशा प्रकारची जी भावना कांहीं समाजांच्या मनांत निर्माण झाली आहे, तिचा आपण विचार केला पाहिजे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

मी पुन्हा एकदां त्यांना सांगतो कीं, त्यांच्या मनांत निर्माण झालेल्या भावनेचा खरा अर्थ मी समजून घेऊं इच्छितो. निव्वळ कर्तृत्ववान, बुद्धिमान अशीं जीं माणसें आहेत त्यांना असें वाटावयाला लागलें कीं, हिंदुस्तान स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्रहि मोठा झाला, पण ज्या महाराष्ट्राच्या निर्मितीकरितां आपण प्रयत्न केले त्या महाराष्ट्राची निर्मिति झाल्यानंतर आमची जागा पाठीमागच्या बाकांवर राहणार आहे कीं काय? हा विचार त्यांच्या मनांत येणें स्वाभाविक आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगितलें पाहिजे कीं, हें'भंगलेलें मन' जर आपल्याला एक करावयाचें असेल तर त्यासाठीं दोन गोष्टींची आवश्यकता आहे.

त्यांतली पहिली गोष्ट, पहिलें पथ्य असें आहे की, आपण संशयानें एकमेकांकडे पाहावयाचें नाहीं, संशय निर्माण करावयाचा नाहीं. संशयाचें वातावरण निर्माण झालें तर तें आपल्या हातानें आपण दूर केलें पाहिजे. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती गुणांची पूजा, 'मेरिट'चें महत्त्व. निवडणुकांत, राज्य कारभारांत आणि अनेक सामाजिक महत्त्वाच्या कामांत गुणांना महत्त्व दिलें पाहिजे. गुणांची पूजा होणें अत्यंत जरूर आहे आणि याच भावनेचा पाठपुरावा आपणांकडून झाला पाहिजे. भंगलेलें मन सांधण्याचे माझ्या मतानें हेच दोन उपाय आहेत. ह्या दोन गोष्टी जर आपण स्वीकारल्या तर हें भंगलेलें मन जोडण्याच्या दृष्टीनें आम्हांला पुष्कळच प्रगति करतां येईल.

या भंगलेल्या मनाचा दुसरा एक परिणाम महाराष्ट्राच्या जीवनांवर झालेला आहे, तो म्हणजे नवबौद्धांचा प्रश्न होय. त्याला महार समाजाचा प्रश्न म्हणून आपण सामान्यतः म्हणतों. परंतु निव्वळ महार जातीचा तो प्रश्न आहे या दृष्टिकोनातून मी त्याकडे पाहात नाहीं. डॉक्टर आंबेडकरांनीं त्या समाजांत नवी जागृति निर्माण केली व अनेक बुद्धिमान, विचार करणाऱ्या कर्तृत्ववान तरुणांचा एक नवा वर्ग त्यांनीं त्या समाजांतून निर्माण केला. एवढ्या मोठ्या संख्येनें तुमच्या आमच्या बरोबर जो समाज महाराष्ट्रांत वावरला आणि ज्याला आपण अस्पृश्य म्हणून बाजूला फेकून दिलें त्या समाजाचा स्वाभिमान आज जागृत झाला आहे. 

ह्या समाजांत जे कर्तृत्ववान आणि बुद्धिमान लोक आहेत त्यांना आपण आतां जवळ केलें पाहिजे, आपलेसें केलें पाहिजे. आम्हांला कुणाची सहानुभूति नको आहे, आमचा जो हक्क आहे तो आम्हांला मिळालाच पाहिजे आणि आम्ही तो मिळविणार आहोंत, या जिद्दीनें काम करण्याची कुवत त्यांच्यांत निर्माण झाली आहे. तिचें आम्हीं स्वागत केलें पाहिजे. नवीन महाराष्ट्र चांगल्या कर्तृत्ववान हातांनी घडवावयाचा असेल तर मनांत असलेले जुने राग व जुने द्वेष दूर केले पाहिजेत. त्यांचा तो रिपब्लिकन पक्ष असला तरी हरकत नाहीं.

सामाजिक आणि बाकीच्या इतर क्षेत्रांत आम्हीं त्यांना जवळ केलें पाहिजे. तुमच्या शहरी जीवनांत ठीक आहे. पण महाराष्ट्र हा जास्तींत जास्त खेड्यांतच राहतो. आणि म्हणून खेड्यांत राहणारा जो बहुसंख्य हिंदू समाज आहे त्याच्या वागणुकीमध्यें, त्याच्या मनामध्यें, आपण या समाजासंबंधीं एक प्रकारची भागीदारीची भावना निर्माण केली पाहिजे, एक प्रकारची समरसता निर्माण केली पाहिजे आणि अशा रीतीनें खेड्यांत एकजिनसी समाजजीवन निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

हे शब्द जे मी वापरीत आहें त्यांची प्रक्रिया मोठी अवघड आणि लांबलचक आहे याची मला जाणीव आहे. परंतु मी नुसत्या शब्दानें खचून जाणारा माणूस नाहीं. ही एक गरज आहे आणि म्हणून गेल्या दोनतीन वर्षांचा माझा हा प्रयत्न आहे कीं, त्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न, नवबौद्ध म्हणतात म्हणून नव्हे, तर माझें कर्तव्य आहे म्हणून मी ते हाताळले पाहिजेत. 

माझें स्वतःचे असें मत आहे कीं, डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीमध्यें महार वतनाचा प्रश्न अधिक उदारपणें, अधिक समजूतदारपणानें जर आम्ही त्यांच्याशीं बोलूं शकलों असतों तर त्यांच्या अनुयायांमध्ये आणि आमच्यामध्यें आज जो एक प्रकारचा मानसिक तुटकपणा निर्माण झाला आहे तो कदाचित् निर्माण झाला नसता. आणि म्हणून यापुढें जाणत्या बुद्धीनें, भागीदारीच्या भावनेंनें, महाराष्ट्रांतील या लोकांचा प्रश्न आपण सोडविला पाहिजे. महाराष्ट्राच्या समाजजीवनांतील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणून आपण या प्रश्नाकडे पाहिलें पाहिजे.

हेही वाचा : बगलबाज अर्जुनापेक्षा दगलबाज शिवराय शतपट श्रेष्ठ

महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनांतील जी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे तिचें वर्णन 'महाराष्ट्राच्या जीवनांतील विविधतेची जाणीव' अशा शब्दांत आपणांसकरतां येईल. The awareness of the varieties in the social life of Maharashtra असें नांव या जाणिवेला, तिच्या संबंधानें प्रबंध लिहावयाचा प्रसंग आला तर मी देईन. परंतु तशी कांहीं आपत्ति माझ्यावर येणार नाहीं असें मी धरून चालतों. 

या विविधतेची उत्तम साक्ष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन. पण शेतकरी ज्या भागांत राहतो त्याच भागांतील शेतकऱ्यांचे जीवन त्याला फार महत्त्वाचें वाटतें असें आपण पाहतों. कोल्हापूरच्या भागांतील शेतकरी त्या भागांतील उसाच्या शेतीचा, लिफ्ट इरिगेशनचा जो प्रश्न आहे तोच सर्व हिंदुस्थानातील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे असें समजतो.

परंतु खरें तसें नाहीं. आपण महाराष्ट्राच्या चतुःसीमा लक्षांत घ्या. आपला हा महाराष्ट्र अपरंपार मोठा आहे. तो अस्तित्वांत आला म्हणजे तो केवढा मोठा आहे याची आपल्याला अधिक चांगली कल्पना येईल. आपल्या मागणीप्रमाणें – बेळगांव - कारवारपासून आपली मागणी आहे - तो दक्षिणेकडून जो वर जातो तो सातपुड्याच्या पहिल्या तीन पुड्या आपल्या काखेंत मारतो; आणि पश्चिमेला तो पश्चिम समुद्राला बरोबर घेऊन उंबरगांवच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचतों. आणि इकडे पूर्वेला तो औरंगाबाद - नांदेडच्या पुढें गोदावरीच्या कांठानें चांदा भंडाऱ्याच्या बाजूला जातो. 

इतका मोठा आहे हा तुमचा आमचा महाराष्ट्र. तर कृपा करून महाराष्ट्र म्हणजे दोन सातारा आणि कोल्हापूर जिल्हे असा या भागांतील लोकांनी आपला समज करून घेऊं नये. त्याचप्रमाणें रत्नागिरी ठाण्याच्या लोकांनीं सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा भाग म्हणजे महाराष्ट्र असें मानतां कामा नये. महाराष्ट्राचा शेतकरी म्हणजे तुमच्या आमच्या टापूंतील लोक किंवा तुमचे आमचे नातेवाईक नव्हेत.

पंचगंगेच्या आणि कृष्णेच्या कांठाला काम करणारा जसा मराठा शेतकरी आहे, जैन शेतकरी आहे, तसाच ठाण्याच्या, कुलाब्याच्या बाजूला सुरेख शेती करणारा आगरी शेतकरी आहें आणि वसईच्या आवतींभोंवती सुंदर बागायत व भातशेती करणारा ख्रिश्चन शेतकरीहि आहे. रत्नागिरीच्या भागांत आपण गेलांत तर तेथें आपणांला कुणबी शेतकऱ्याची बाग सांपडेल आणि वर खानदेशच्या बाजूला जाल तर आरशासारखी स्वच्छ शेती करणारा लेवा पाटीदार शेतकरी आपल्याला भेटेल.

तसेंच आपण अकोल्यास जा, अमरावतीस जा, नागपूरच्या बाजारांत जा आणि तेथून पुढें चांद्याच्या जंगलांत जा आणि पंचगंगा, वारणा, कृष्णा, गोदावरी, तापी, वैनगंगा ह्या सगळ्या नद्यांच्या कांठांनी फिरा. आणि मग वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न असणारे, वेगवेगळ्या परंपरा असणारे, वेगवेगळ्या भावना असणारे, वेगवेगळ्या जमातींतून आलेले हे सर्व शेतकरी आहेत असें आपणांस आढळून येईल. आणि म्हणून यापुढें जेव्हां तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार कराल तेव्हां सबंध महाराष्ट्रामध्यें पसरलेल्या शेतकऱ्यांचें, काळ्या जमिनींतून नवीन संपत्ति काढणाऱ्या, शेतींतून सोनें निर्माण करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांचें चित्र तुमच्या डोळ्यापुढें आले पाहिजे.

हें बहुजन समाजाचें चित्र आहे. बहुजन समाज याचा अर्थ आपली एक जमात आणि आपले कांहीं पाव्हणे रावळे असा जर कोणी करीत असतील तर ती चुकीची कल्पना आहे हेंहि आपण लक्षांत घेतलें पाहिजे. ही जाणीव जर आमच्या विचारांच्या पाठीमागें नसेल तर आमचे निर्णय चुकीचे येतील. कारण कोठलाहि विचार हा क्रियाशील होण्यापूर्वी तो भावनेनें समजून घ्यावा लागतो आणि जर भावना अपुरी असेल किंवा चुकीची असेल तर तींतून येणारा निर्णय, तींतून येणारा विचार हा अपुरा आणि चुकीचा असण्याची शक्यता असते. आणि म्हणून या 'अवेअरनेस'ची अतिशय आवश्यकता आहे. ही गोष्ट मी आपणांपुढे फार आग्रहपूर्वक मांडीत आहें.

तिचाहि आपण आपल्या मनाशीं विचार करावा. माझ्या मतानें महत्त्वाचे असणारे हे तीन सामाजिक प्रश्न आहेत. ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर अमका अमकेतर असा विचार करण्यापेक्षां सगळ्या लोकांची, एकजिनसी कार्यकर्त्यांची सेना आम्हांला उभी करावयाची आहे, ही भावना आमच्यांत असली पाहिजे आणि त्या दृष्टीनें प्रयत्न करण्याची आपण खटपट केली पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट मला आपणांला आग्रहपूर्वक सांगावयाची आहे.

हेही वाचा : यशवंतरावांच्या अखेरच्या दिवसातल्या आठवणी

तिसरा प्रश्न आर्थिक क्षेत्रांतला आहे. पण आर्थिक प्रश्नांची चर्चा इतकी झालेली आहे कीं, मी या बाबतींत कांहीं नवीन सांगणार आहें अशांतला भाग नाहीं. मी जुन्याच गोष्टींची कदाचित पुनरावृत्ति करीन. पण त्याची आवश्यकता आहे म्हणून मी हें बोलत आहें. महाराष्ट्रांतील आर्थिक प्रश्न सर्वसाधारणपणें तीन प्रकारचे आहेत. पहिला प्रश्न शेतीचा आहे, दुसरा प्रश्न उद्योगधंद्यांचा आहे आणि तिसरा प्रश्न मध्यवर्गीयांच्या प्रश्नांतून निर्माण झालेला आहे. पण हे प्रश्न हिंदुस्तानांत आपणांला कोठेंहि पाहावयास मिळतील. 

मी आतांच आपल्या पुढें महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले जे विशिष्ट स्वरूपाचे सामाजिक आणि राजकीय प्रश्न मांडले ते सगळेच प्रश्न कांही इतरांच्या पुढें नाहींत. पण आर्थिक प्रश्नांची जी वर्गवारी मीं आतां आपल्यासमोर ठेवली आहे ती वर्गवारी कदाचित हिंदुस्तानच्या कोणत्याहि प्रांतांत आपणांला पहावयास सांपडेल. परंतु महाराष्ट्रांत त्या वर्गवारीला जो कांही विशिष्ट अर्थ आहे तो आपण समजावून घेतला पाहिजे.

महाराष्ट्रांतील शेतीचे, मघाशींमीं सांगितलें की, वेगवेगळे प्रश्न आहेत. उदाहरणार्थ, कोंकणांतील शेतीचाच प्रश्न घ्या. मी या राज्याची जबाबदारी घेईपर्यंत, मुख्यमंत्रिपदाची नव्हे तर त्याहिपूर्वी, मला नेहमीं असें वाटे कीं, सगळीकडचे शेतीचे प्रश्न सोडविले जातात मग या रत्नागिरीच्या शेतीचाच प्रश्न कां सोडविला जात नाहीं? रत्नागिरीच्या शेतीचा प्रश्न सुटला पाहिजे. पण मी रत्नागिरीच्या शेतीच्या प्रश्नाचा जेव्हां जवळून अभ्यास केला, तेव्हां माझें असें मत झाले कीं, रत्नागिरीमध्यें शेतीचा प्रश्नच नाहीं.

रत्नागिरीमध्यें प्रश्नच असला तर तो फळबागायतीचा आहे. आणि फळबागायत जेथें संभव आहे तेथें जाऊन कुठें तरी आपला गहूं, कापूस, ऊस अथवा भुईमूग काढण्याचा आपण प्रयत्न करूं लागलो तर त्या कोंकणच्या काळ्या कातळावर आपलें कपाळ फोडून घेण्यापेक्षां कांहीं कार्य आपणांकडून घडणार नाहीं. रत्नागिरीनें महाराष्ट्राला दोन अमोल गोष्टी दिल्या आहेत, एक म्हणजे उत्तम रसदारफळें आणि दुसरी श्रेष्ठ कर्तृत्वाची माणसें. रत्नागिरीचें हें आम्हांला देणें आहे असें आम्हीं मानलें पाहिजे. 

तेथून जरा वर आपण आलों म्हणजे सह्याद्रीच्या या टोंकाला लागून असणारा जो प्रदेश आहे त्यांतील शेतीचा खरा महत्त्वाचा जर कोणता प्रश्न असेल तर तो बागायती शेतीसंबंधींचा आहे असें आपणांस दिसून येईल. कारण जेथें बागायती शेती करण्यांत आली आहे, तेथें उंसाची कारखानदारी म्हणजेच साखरेची कारखानदारी निर्माण झालेली आपणांस आढळून येईल.

परंतु याहिपेक्षां माझ्या मतानें महाराष्ट्राच्या शेतीचा जर कोणता महत्त्वाचा प्रश्न असेल तर तो महाराष्ट्रांतील मोठाच मोठा, लांबलचक असा जो दुष्काळी भाग आहे त्यासंबंधींचा आहे. पारनेरच्याहि आपण थोडें वर गेलों म्हणजे हा भाग सुरू होतो. येवलें-नांदगांवपासून त्याची सुरुवात होते आणि नंतर तो खालींजतपर्यंत जातो. असा हा महाराष्ट्रांतील मोठाच मोठा दुष्काळी पट्टा आहे. तेथे पाऊस १०-१५ इंचांपेक्षा अधिक पडत नाहीं. म्हणून तेथें बागायती शेती होण्याची कधीं फारशी शक्यता नाहीं. तेथील लोक शेंकडों वर्षांपासून दुष्काळानें अगदी थकून गेलेले आहेत. या टापूंतल्या शेतकऱ्यांची शेती आणि जीवन कसें समृद्ध करतां येईल हा माझ्या दृष्टीनें नंबर एकचा महत्त्वाचा प्रश्न आहे.

हेही वाचा : शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?

उद्योगधंद्यांचाहि प्रश्न महत्त्वाचा आहे. आमच्यामध्यें मुंबई शहर आहे आणि त्याची वाढ उद्योगधंद्यांमुळें झाली आहे यात शंका नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये तर या शहराची अफाट वाढ झालेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी अमेरिकेंतील एका बँकेचा प्रतिनिधि मला भेटावयास आला होता. तो म्हणाला, 'चार वर्षांपूर्वी मी या मुंबई शहरामध्ये आलों होतों आणि आज पुन्हा तुमचें हे मुंबई शहर पाहतांना मला तें माझ्या ओळखीचें वाटत नाहीं.' इतक्या झपाट्यानें या शहराची वाढ झालेली आहे. मुंबई शहरांत उद्योगधंद्यांची वाढ होणें स्वाभाविक आहे, कारण तें एक उत्तम बंदर आहे.

परंतु लोकांच्या मनांत अशी शंका आहे कीं, राज्यांत बदल झाला तरी मुंबईचें नुकसान होईल. पण मी त्यांना सांगूं इच्छितों कीं, राज्यात बदल झाला तरी मुंबईचें कांहींहि नुकसान होणार नाहीं. आम्ही प्रेमानें, जिव्हाळ्यानें मुंबई शहरांतील मंडळींना, वागविणार आहोंत. गुजराथी, मारवाडी, पारशी, सिंधी, पंजाबी जे जे कोणी असतील ते ते सर्व आमचे भाऊ आहेत. आम्हीं राष्ट्रीय भावनेनें हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्यामुळें मुंबईमध्यें कांही बदल होणार नाहीं. 

इतकेंच कीं कांहीं लोक आमच्यावर रागावून निघून जातील. जातील बिचारे, त्याला आपण तरी काय करणार? त्यांना आपण प्रेमानें निरोप देऊं. जर असे कोणी गेलेच तर त्यांची जागा घेणारे आणखी कोणी येतील. कारण जे लोक मुंबईत व्यापाराकरितां किंवा उद्योगाकरितां आले ते केवळ मुंबई शहराच्या प्रेमामुळें आलेले नसून बंदराला व्यापार केला तर तो फायदेशीर होतो, कारखानदारी केली तर ती फायदेशीर होते म्हणून आले. त्यामुळें ते मुंबई सोडून जातील अशी शंका मला वाटत नाहीं.

परंतु आम्ही कर्तव्यांत चुकतां कामा नये. प्रेमानें, बंधुभावानें हा प्रश्न सुटावा म्हणून आम्हीं टीका सहन केल्या, आरोप सहन केले. परंतु आम्ही या तत्त्वाला बळकट धरून राहिलों. आम्हीं आमचा संयुक्त महाराष्ट्र या निष्ठेंतून आणला आहे. तेव्हां मुंबई शहरांतील जे प्रश्न आहेत ते आम्हांला याच भावनेंने सोडवावे लागतील. मुंबई शहरामध्यें कारखानदारी करणारे मारवाडी, गुजराथी, पारशी, पंजाबी, सिंधी हे सगळे आमचे भाऊ आहेत. या सगळ्या भावांनी आमच्या येथें राहावें, आपण सुखी व्हावें आणि मुंबईला समृद्ध करावें म्हणजे महाराष्ट्र आपोआप समृद्ध होईल. अशीच आमची त्यांना विनंती राहील आणि अशीच आमची वर्तणूकहि राहील.

पण केवळ औद्योगिक मुंबई शहर सुधारलें म्हणजे महाराष्ट्र सुधारला असें नाहीं. मला आठवतें कीं, हिंदुस्तानांतील कांहीं परिषदांत मुंबईचा मुख्यमंत्री म्हणून मी बसलों असतांना पुष्कळ वेळां मला एक विचित्र अनुभव आला आहे, आणि तो म्हणजे आम्हीं सगळ्या गोष्टी मागितल्या तरी चालतात, पण उद्योगधंद्यांच्या बाबतींत आम्ही कांही मागितलें म्हणजे बाकीच्यांच्या डोळ्यांवर येतें. ते विचारतात, मुंबईला आणि उद्योगधंदे?

त्यांची समजूत अशी कीं, मुंबई राज्यांत सर्वत्र मुंबई शहरासारखीच औद्योगिक परिस्थिति असली पाहिजे. परंतु येथें असे कितीतरी मागासलेले भाग आहेत कीं, जेथें अद्यापि कुठलेहि उद्योगधंदे गेलेले नाहींत. आपणांला या मागासलेल्या भागांचा आतां विकास करावयाचा आहे. त्याचप्रमाणें विदर्भाचे, मराठवाड्याचे जे कांही अविकसित भाग आहेत त्यांचाहि आपणांस विकास करावयाचा आहे. उदाहरणार्थ, नागपूरच्या बाजूला अनेक उद्योगधंदे वाढण्याची शक्यता आहे. कोळसा आणि लोखंड यांची विपुल संपत्ति तेथें आहे.

कारखानदारीसंबंधींच्या आमच्या कांही चुकीच्या कल्पना आहेत, कापडाच्या गिरण्यांना आपण कारखानदारी म्हणतों. मी तर त्याला कारखानदारी म्हणत नाहीं. कापड तयार करणाऱ्या कारखानादारीला, कंझ्युमर्स गुड्स तयार करणाऱ्या कारखानदीराला, लोक म्हणतात म्हणून कारखानदारी म्हटलें पाहिजे इतकेंच. ज्याला खरी कारखानदारी म्हणतां येईल, अशी लोखंडाची कारखानदारी असूं शकते, कोळशाची असूं शकते, यंत्रनिर्मितीची असूं शकते, रासायनिक द्रव्यांच्या निर्मितीची असूं शकते. अशा प्रकारच्या कारखानदारीकरितां लागणारा मालमसाला, साधनसामुग्री, नागपूरच्या आवतींभोंवती, विदर्भाच्या भागांत आहे. आम्हांला तिकडे लक्ष दिलें पाहिजे, त्या प्रश्नाला प्राधान्य दिलें पाहिजे.

हेही वाचा : आणि यशवंतरावांनी पाकिस्तानवर हल्ल्याचा आदेश दिला

त्याचबरोबर आमच्या शेतीमध्यें जो माल तयार होतो, ज्या वस्तु तयार होतात त्या वस्तुचा पक्का माल तयार करण्यासाठीं आम्हांला कारखाने उभे करतां आले पाहिजेत. हें असली काम आहे. आजपर्यंत आमच्याकडे उंसाचे मळे होतें. या मळ्यांतील उंसाचे केव्हां तरी गुऱ्हाळकरून पाव्हण्यारावळ्यांना किंवा इष्टमित्रांना बोलावून त्यांना रस पाजावयाचा व राहिलेला ऊंस कोठें तरी अडत्याच्या दुकानांत विकून टाकावयाचा म्हणजे संपलें शेतीचें काम, असें लोक मानीत असत. पण आपण आतां त्या उंसाचे मोठ्या प्रमाणावर साखरेचे कारखाने उभे करावयाला शिकलों आहोंत. तेंव्हा आमच्या शेतीमध्यें जो कांही माल तयार होतो त्याचा पक्का माल बनविण्यासाठीं आम्हांला कारखाने उभे करतां आले पाहिजेत.

आतां पश्चिम महाराष्ट्रांत हिंदुस्तानांतील लोकांच्या नेतृत्वानें लोखंडी कारखान्यांची, इंजिनियरिंग वर्क्स ज्याला आपण म्हणतों त्यांची कारखानदारी सुरू झालेली आहे. इंजिनियरिंगच्या कारखानदारीची परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे. कोल्हापूरच्या भागांत कुशल कारागिरी करणारे लोक आहेत. कोठलीहि इंजिनियरिंगची परीक्षा पास न झालेली आमची ही मिस्त्री मंडळी उत्तम इंजिनें तयार करतात. ही जी कांहीं आमची अक्कल आहे, हें जें कांही आमचें कौशल्य आहे, त्याचा आम्हांला अभिमान वाटावयास पाहिजे.

या लोकांच्या बुद्धीला, कर्तृत्वाला जर आम्हीं खतपाणी दिलें तर यांतून कांहींतरी नवीन निर्माण होण्याचा संभव आहे. म्हणूनच आपण या बाबतींत जोराचा प्रयत्न करावयास पाहिजे. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांतून उद्योगधंद्यांची वाढ झाली पाहिजे. हा आज आमच्यासमोर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे.

तिसरा जो प्रश्न आहे तो मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांतून निर्माण होणारा असून त्यांतहि शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासंबंधानें विस्तृत बोलण्याचा हा प्रसंग नाहीं. कारण मी आपल्याशीं फार वेळ बोलत राहिलों आहें. आमच्या शिक्षणाची पद्धति कशी असावी हाहि आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजपर्यंत आम्हीं ज्या तऱ्हेंचें शिक्षण घेतलेंतें शिक्षण चांगलं असेल, योग्यहि असेल, परंतु त्यामुळें आमच्यांत नोकरीपेशाची मनोवृत्ति निर्माण झाली आहे. 

आम्हांला असें सांगण्यांत येतें कीं, आमची बुद्धिच-आमचा पिंडच-नोकरीपेशाचा आहे. मला ही गोष्ट मंजूर नाहीं. आजपर्यंत आम्हीं नोकऱ्या केल्या अशी कल्पना करूं या. परंतु नोकऱ्यासुद्धां आम्हांला ब्रिटिश राजवटीतच कराव्या लागल्या. आम्ही महाराष्ट्रांतले लोक तोपर्यंत शेती करीत होतों, जमलें तर राज्य करीत होतो, नाहीं तर परस्परांशीं भांडत होतों. परंतु हें नोकरी करण्याचें तंत्र, हें पेन्शनीचें वेड आमच्या डोक्यांत ब्रिटिश राजवटीनें भरविलें. तेव्हां आमची बुद्धिच तशी आहे हें एक थोतांड आहे.

आम्हीं आमच्या मनांतून तें काढून टाकलें पाहिजे. आमच्यामध्येंहि कांहीं उद्योगधंद्याचें कर्तृत्व निर्माण करतांयेतें. तें तसें निर्माण करून, त्याची वाढ करून या क्षेत्रांतहि पुढें जाण्याचा आम्ही प्रयत्न करावयास पाहिजे. आम्हीं आमच्यामध्यें किर्लोस्करांसारख्या व्यक्ति निर्माण केल्या. आजहि आमच्या येथें मोठ्या पल्लेदार बुद्धीने विचार करणारे कारखानदार निर्माण होत आहेत, ते काय आमच्यांत उद्योगधंद्याची दृष्टि नसण्याचें लक्षण आहे?

हेही वाचा : दांभिकतेच्या वेढ्यात अडकलेली 'आयडिया ऑफ महाराष्ट्र'

मी म्हणतों, खऱ्या अर्थांनें आमच्यामध्येंहि ही दृष्टि आहे. फक्त आम्हांला तांत्रिक शिक्षण, वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षण घेतलें पाहिजे. अशा तऱ्हेच्या शिक्षणाला आम्ही प्राधान्य दिलें पाहिजे. याशिवाय ज्याला आपण निव्वळ ह्युमॅनिटीजचें शिक्षण म्हणतों अशा तऱ्हेच्या शिक्षणाचेंहि अर्थात् महत्त्व आहेच. तें मूलभूत शिक्षण आम्हांला मंजूर आहे. आणि या शिक्षणाच्या बाबतींत, शिक्षणाची सारीं दारें सताड उघडी करून तें खालच्या थरापर्यंत पोहोंचविण्याचें आमचें ध्येय असलें पाहिजे.

मी तर असें म्हणेन कीं, या तऱ्हेच्या शिक्षणाचे प्रकाशझोत अगदीं शेवटच्या थरापर्यंत जर आम्ही नेऊं शकलों, तर महाराष्ट्राची शक्ति इतकी जबरदस्त वाढेल कीं, त्याला कोणाच्याहि मेहेरबानीवर अवलंबून राहण्याचें कारण राहणार नाही. तो स्वतःचे रक्षण करील आणि राष्ट्राचेंहि रक्षण करील. हा एक महत्त्वाचा विचार मला या निमित्तानें आपल्यापुढे मांडावयाचा आहे.

राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत माझ्या दृष्टीनें महाराष्ट्रापुढें आज ज्या समस्या आहेत त्यांची चर्चा करून त्यांसंबंधी माझ्या मनांतील विचार आज आपल्यापुढें मांडण्याचा मीं प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणें त्यांतून निघणारीं, माझ्या बुद्धीला सुचतील अशीं उत्तरेंहि आपणांला मीं दिलीं आहेत. आणि आज मी प्रत्यक्ष तुमच्यापुढें बोलत असलों तरी तुमच्यामार्फत सबंध महाराष्ट्राशींच मी बोलत आहें, आणि म्हणून तुमच्यामार्फत महाराष्ट्रांतील सर्व जनतेला, जेथपर्यंत माझा आवाज पोहोंचू शकेल तेथपर्यंत, मी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो कीं, या सगळ्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांची उत्तरें देण्याचें काम आतां तुम्हांआम्हांला करावयाचें आहे. 

हें काम सोपें नाहीं. हें काम तुम्हीं एकट्या यशवंतराव चव्हाणांवर सोपविलें किंवा त्यांच्या मंत्रिमंडळांतील सहकाऱ्यांवर सोपविलें तरी आम्ही सुद्धा कुणी माणसेंच आहोंत; म्हणून आमच्या हातून त्यांत चुका होणारच नाहींत असे सांगू शकत नाहीं. मीं मागे आपल्याला सांगितलें होतें कीं आमच्या शक्तीला, आमच्या बुद्धीला जितकें झेपेल तितकें करण्याचा आम्ही प्रयत्न करीत राहू आणि त्याप्रमाणें आम्हीं तो प्रयत्न केलाहि आहे. आमच्या हातून चुका घडलेल्या नाहींत असा आमचा दावा नाहीं आणि पुढें त्या घडणार नाहींत अशी प्रतिज्ञाहि नांहीं.

हेही वाचा : शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

प्रतिज्ञा एका गोष्टीची आहे, ती म्हणजे आमच्या बुद्धीला पेलेल त्या हिंमतीनें आम्ही निर्णय घ्यावयाचा प्रयत्न करूं आणि प्रामाणिकपणें तो अंमलांत आणण्यासाठीं झटू. एका गोष्टीची मात्र आम्हांला जरुरी आहे. आपला आशीर्वाद आम्हांला पाहिजे, आपल्या प्रेमाचा आधार आम्हांला पाहिजे. आपल्या आशीर्वादाच्या बळावरच आम्ही ही जबाबदारी उचलतो आहोंत. म्हणून आपली शाबासकीची थाप जरी नसली तरी आपली रागाची नजर नसावी, एवढीच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे.

गेल्या दोनचार महिन्यांत जबाबदारी घेऊन आम्हांला कांहीं निर्णय घ्यावे लागले. आम्हांला महाराष्ट्रापुढील प्रश्नांची नुसतीच तात्त्विक चर्चा करावयाची असती तर किती तरी प्रश्न मीं तुमच्यापुढें मांडले असते, कारण मला ते जास्त माहीत आहेत. घोड्यावर बसणाऱ्यालाच घोड्याची खोडी माहीत असते. त्याचप्रमाणें राज्यकारभाराचे प्रश्न आम्ही हाताळतों म्हणून त्यांत काय दोष आहेत तें आम्हांला जास्त माहीत आहे. परंतु आम्हांला निव्वळ तात्त्विक चर्चा करून दोष काढावयाचे नव्हते. तेथें बसल्यावर 'दे, घे' करून मला निर्णय घ्यावयाचे होते.

आपल्या खेड्यांतील गोष्ट आहे, ती मी आपल्याला सांगतों. एका छोट्या वस्तादाची एका चांगल्या वस्तादाशीं गांठ पडली. सुरुवातीला छोट्या वस्तादाला जमून गेलें, पण पुढें जेव्हां अवघड प्रश्नांची चर्चा सुरू झाली तेव्हां छोट्या वस्तादानें सांगितलें कीं, या प्रश्नाचें उत्तर माझ्या वस्तादांना विचारल्याशिवाय मी देऊं शकत नाहीं.

त्याप्रमाणें तर मला सांगतां येत नव्हतें. मी जर तुमच्यातर्फे निर्णय घ्यावयास बसलों आहें तर मला निर्णय हे घेतलेच पाहिजेत. कारण आम्हांला अनेक तऱ्हेचे प्रश्न हाता वेगळे करावयाचे होते. त्यांत आम्हीं मुंबईचा प्रश्न हा महत्त्वाचा आणि मानाचा मानला होता. तो नुसताच मानाचा प्रश्न नव्हता तर तो आमच्या हिताचाहि प्रश्न होता. मुंबई विदर्भ आणि मराठवाड्यासह आम्हांला एक मराठी राज्य लवकरांत लवकर निर्माण करावयाचें होतें.

मला निर्णय घेते वेळीं असें म्हणतां आलें नसतें कीं, तुमचें आमचें दहा खेड्यांचे जमत नाहीं ना - मग पडूं द्या हा प्रश्न तसाच लोंबकळत. या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत आम्ही कांही करणार नाहीं. ही कांहीं तत्त्वनिष्ठेची भाषा नाहीं. नाहीं लागत निकाल तर पडूं द्या प्रश्न बाजूला, असें करून नाहीं भागत. तेथे कांही केलें पाहिजे, म्हटलें पाहिजे. संग्रामांत उभा राहिलों आहे. समोरच्या माणसाचा पवित्रा पडलेला आहे. तिथें पुस्तकांतील आकृत्या पाहून मीं पवित्रा घ्यावयाचाकीं काय? तिथे धैर्यानें आणि विश्वासपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत, बाबी निकालांत काढल्या पाहिजेत. अशा निर्णयात्मक स्वरूपाच्या व्यवहारी राजकारणाची, दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या जिम्मेदारीच्या राजकारणाची आतां आवश्यकता आहे.

हे सर्व प्रश्न मी हेतुपूर्वक आपल्यापुढें मांडीत आहें. हे सगळे प्रश्न आपण समजावून घेतले पाहिजेत. कारण महाराष्ट्र राज्य हें महाराष्ट्राच्या जनतेचें राज्य आहे. आणि तसें तें जनतेचें राज्य व्हावयाचें असेल तर जनतेनें राजासारखा राज्याचा विचार केला पाहिजे. हें काम एकदोन माणसांशीं करार करून होणारे नाहीं. माझ्या ठिकाणीं तुम्ही तिथें असतां तर तुम्हीं कोणता निर्णय घेतला असता, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. निव्वळ म्हणणें मांडणें सोपें आहे, प्रश्न निर्णयाचा आहे. परंतु कांही तात्त्विक फॉर्म्युले लावून राजकारणाचे प्रश्न सुटतील कांहें आपणच सांगा.

फॉर्म्युल्यांनी जर राजकारणांचे प्रश्न सुटत असते तर एकच फॉर्म्युला दुसरीकडे लावला असता आणि दुसरीकडचा फॉर्म्युला तिसरीकडे गेला असता. परंतु फॉर्म्युल्यांनीं हे प्रश्न सुटत नाहीत. खरी अडचण अशी आहे कीं, जगांत फॉर्म्युले चालत नाहींत. जर फॉर्म्युल्यांनी प्रश्न सुटत असते तर संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न पांच वर्षांपूर्वीच सुटावयास पाहिजे होता. परंतु कांही गुंतागुंत होती. कांही परिस्थितीच्या अडचणी होत्या. मनांतल्या अनेक गोष्टींची उकल करावयाची होती. मनाशीं सारखा विचार करून यांतून मार्ग काढावयाचा होता. अशा पूर्ण विचारानंतरच हा संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न आम्हीं राष्ट्रीय वृत्तीच्या पार्श्वभूमीवर सोडविला आहे; मित्रामित्राच्या, बंधूबंधूच्या वृत्तीनें सोडविला आहे.

हेही वाचा : आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

याच पार्श्वभूमीवर कांही देवाण-घेवाण करावी लागली. परंतु त्यांत महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनें घाबरून जावें अशा प्रकारचे कांही होतें असें मला वाटत नाहीं. कारण मीं असें पाहिलें कीं, शेवटीं राष्ट्र आणि महाराष्ट्र यांच्या प्रवृत्ति कांहीं परस्परविरोधी नाहींत. आमची राष्ट्रनिष्ठा आणि आमची महाराष्ट्रनिष्ठा या एकमेकांच्या हातांत हात घालून चालणाऱ्या असल्या पाहिजेत. म्हणून आपण अशी भावना निर्माण करतां कामा नये कीं, आमच्या महाराष्ट्राच्या विरोधी,आमच्याशीं वैर करणारीं कुणीतरी माणसें कोठेंतरी बसलेली आहेत. अशा भावनेनें आपल्याच मनानें आपल्याविरुद्ध एखादा शत्रु निर्माण करून आणि त्याच्याशीं आपल्याच मनांतली समशेर काढून लुटुपुटूची लढाई करीत बसण्यामध्यें कांहीं अर्थ राहिलेला नाहीं.

आपणहि पराक्रम करूं शकतों, विजय मिळवूं शकतो, या भावनेची आज आपणांला आवश्यकता आहे. आमचे कोणी विरोधी आहेत, आमचें कोणी भलें होऊ देत नाहीं अशी भांडखोर, रडवी, निराशावादी, विफलतेची भावना निर्माण करणारी वृत्ति आपण राजकारणांतून मोडून काढली पाहिजे, तिला बाजूला टाकलें पाहिजे आणि विजिगीषु भावनेनेंपुढें जावयाचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हीहि कर्तृत्व करूं शकतो अशी भावना, असा आशावाद तरुणांमध्ये, कार्यकर्त्यांमध्यें आपण निर्माण केला पाहिजे, आणि अशा भावनेंतून कर्तृत्वाचा एक सुंदरसा बाग निर्माण केला पाहिजे. आमचा इथें पराभव झाला, तिथें पराभव झाला हें किती वेळ आपण सांगत बसणार आहोंत?

कांहीं दिवसांपूर्वी मीं एका चांगल्या लेखकाचा लेख वाचला. त्यांत मला एक फारच महत्त्वाचा विचार सांगितलेला दिसला. तो विचार मला येथें सांगितल्याशिवाय राहवत नाहीं. आजच्या हिंदुस्तानच्या संदर्भात त्यानें आपल्या नियोजनाचीं दोन सर्वांत महत्त्वाची साधनें सांगितलीं आहेत. त्यांतलें पहिलें साधन म्हणजे मनुष्यबळ आणि दुसरें साधन म्हणजे वेळ. चाळीस कोटि लोकांचा हा देश कांहीं न करतां जर फुकट एक वर्ष बसून राहिला तर आमची फार मोठी शक्ति वायां गेली असें होईल. कारण त्या श्रमाच्या बळावर आम्ही कितीतरी पुढें गेलों असतों.

आणि दुसरें म्हणजे जग त्या काळांत आमच्या कितीतरी पुढें निघून जाईल. म्हणून महाराष्ट्रांतील तीन कोटि जनतेच्या मनांत विफलतेची, विषादाची आणि पराभवाची भावना निर्माण करून महाराष्ट्रांत असंतोषाचें वातावरण पसरविण्याचा जे प्रयत्न करतील ते महाराष्ट्राचें फार मोठें नुकसान करतील. मला त्यांना सांगावयाचें आहे कीं, कृपा करून ह्या गोष्टी बंद करा.

इंग्रजांविषयीं नेपोलियन एकदां म्हणाला होता कीं ह्या वेड्यांना आपला पराभव केव्हां झाला हेंच कळत नाहीं. नेपोलियनच्या शब्दांत थोडा फरक करून मी या वेळी सांगूं इच्छितों कीं आमच्या विरोधकांना आणि आमच्या कांही मित्रांना आमचा जय केव्हां झाला हेंच कळलें नाहीं. म्हणून मला त्यांना सांगावयाचें आहे कीं ही पराजयवादी वृत्ति लोकांच्या मनांत निर्माण करून आपण महाराष्ट्राची शक्ति वायां घालवूं नका.

आज खेड्यांतल्या शेतकऱ्यांमध्ये, फॅक्टरीमधल्या मजुरांमध्ये, शहरांतल्या विद्यार्थ्यांमध्यें सगळीकडे नवी शक्ति निर्माण झाली आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्यें आनंदाचा, सोहळ्याचा क्षण निर्माण झाला आहे. ही नवी शक्ति उभी करण्याचें तुम्हांआम्हांला इतिहासाचें आव्हान आहे. तें आम्ही स्वीकारणार कीं नाहीं यावर आमचे पुढील जीवित कार्य अवलंबून आहे. कोणाला कांही वाटो, मला तरी महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल दुर्दम्य आशा आहे, माझा तसा विश्वास आहे. एवढी कर्तृत्ववान परंपरा असणाऱ्या, अनेक जाती आणि जमाती असणाऱ्या, शिवाजीच्या परंपरेनें शोभायमान झालेल्या महाराष्ट्राचा इतिहास असा अडून बसणार नाहीं. तो पुढेंपुढें जाणार आहे. तो महाराष्ट्राचें जीवन उज्ज्वल करील.

एवढेंच नव्हे तर जी मानवी मूल्यें आम्हांला आमच्या परंपरेंतून मिळालेली आहेत त्यांच्या बळावर मानवी जीवनाची सेवा करण्यांतहि तो मागें हटणार नाहीं, असें एक स्वप्न महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत मला दिसतें आहे. महाराष्ट्राच्या भवितव्याची ही मोठीच मोठी, लांबच लांब सफर आहे. त्या सफरींतील आम्ही प्रवासी आहोंत ही भावना नम्रतेनें आपलें प्रत्येक पाऊल टाकतांना आपण आपल्या मनाशीं ठेवली पाहिजे.

माझ्या आवतीभोंवती बसणाऱ्या माझ्या मित्रांकडे, माझ्यापेक्षां वडीलधाऱ्या मंडळींकडे, माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या उगवत्या पिढीकडे मी याच भावनेनें पाहतो आहें. याच एका भावनेनें आपण वागलों तर मला वाटतें कीं, ही जी सफर तुम्हांआम्हांला पुरी करावयाची आहे ती पुरी करण्यांत आपण निश्चित यशस्वी होऊं. आज मी असा आपणांशी बोलत असतांना ती सफर मला माझ्या डोळ्यांसमोर दिसते आहे, विजेच्या प्रकाशनानें लखलखल्यासारखी दिसते आहे. ती लांबची सफर आहे, कष्टाची सफर आहे, उद्योगाची सफर आहे. पण ती पुरी केलीच पाहिजे. कारण त्यामध्यें जनतेचें कल्याण आहे.

हेही वाचा : 

शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

'मुंबई आमचीच', असं आम्ही मुंबईचे मराठी लोक का म्हणतो?

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा

शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

(साठ वर्षांपूर्वीचं हे भाषण जुन्या व्याकरणाच्या नियमांप्रमाणे उतरवलेलं आहे. ते तसंच कायम ठेवलेलं आहे. हे भाषण ybchavan.in या वेबसाईटवरून साभार.)