माणसं देवळाच्या कळसाला नमस्कार करतात, पण पायाखाली गाडलेला दगड नेहमीच उपेक्षित राहतो. भारतानं चंद्रावर केलेल्या यशस्वी सॉफ्टलँडिंगचं कौतुक आज देशासह जगभरात सुरू आहे. पण साठच्या दशकात जेव्हा देशात पुरेसं अन्नही नव्हतं, तेव्हा अवकाश संशोधनाचं स्वप्न सुरू होतं ते केरळमधल्या एका चर्चमधून. भारताच्या संशोधकांनी चर्चमधे सुरू केलेल्या त्या कामाचा वेलू आज चंद्रापर्यंत पोहचलाय.
रामभद्रन अरवमुदन. हे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राचे आणि बेंगळुरूतील इस्रो उपग्रह माजी संचालक होते. आज ज्या इस्रोचं नाव, चंद्रयान-३ च्या यशामुळे जगभर गाजतंय, त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते या संस्थेचा भाग होते. त्यांनी आपल्या या कारकीर्दीबद्दल आणि इस्रोच्या प्रवासाबद्दल एक पुस्तक लिहंलंय. त्याचं नाव आहे, 'इस्रो: अ पर्सनल स्टोरी'.
या पुस्तकात त्यांनी केरळमधील थुंबा येथील एका चर्चचं वर्णन केलंय. याच चर्चमधून इस्रोचं काम सुरू झालं. ही जागा का महत्त्वाची होती, ती चर्चकडून घेण्यासाठी काय काय करावं लागलं, तिथं झालेली ती ऐतिहासिक प्रार्थना सभा, मग पुढे त्या चर्चचं काय झालं ते अगदी आज त्या चर्चमधे काय आहे, इथपर्यंतच्या अनेक गोष्टी त्या पुस्तकात आहेत. आज भारताचा चंद्रविजय साजरा करताना, या पायाच्या दगडाचं स्मरण करायला हवं.
भारतातच्या ख्रिस्ती धर्माची सुरूवात केरळमधूनच होते. तिथपासूनची परंपरा असलेलं एक चर्च केरळमधील तिरुवअनंतपुरम शहराजवळच्या थुंबा येथे होतं. त्याचं चर्चचं नाव होतं, मेरी मॅग्डालीन चर्च. मेरी मॅग्डालीन ही ती स्त्री आहे, जिला पुनुरुत्थानानंतर येशू ख्रिस्त प्रथम दिसला होता. त्यामुळे ख्रिस्ती धर्मात या चर्चला महत्त्वाचे स्थान आहे.
अशी आख्यायिका आहे की, केरळमधे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी या चर्चची पहिली रचना बांधली होती. त्यावेळी मातीच्या भिंती असलेले आणि नारळाच्या झावळांपासून बनवलेले छत असलेले हे चर्च होते. पुढे तिथं एक दगडी गॉथिक पद्धतीचं दिमाखदार इमारत असलेलं चर्च झालं.
या चर्चची जागा किती महत्त्वाची होती, हे कदाचित त्यावेळी त्या चर्चच्या निर्मात्यांना माहीत नसावी. पण साठच्या दशकात भारतीय अवकाश कार्यक्रमाचे अध्वर्यू डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा यांना त्या जागेचं महत्व कळलं होतं. ही जागा जवळजवळ पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताजवळ होती. त्यामुळे इथून रॉकेट लाँचिक होणं, जास्त सोयीचं होतं. त्यामुळे आता ही जागा मिळवण्यासाठी चर्चला विनंती करण्यात आली.
चर्चच्या जागेचं भौगोलिक महत्व डॉ. विक्रम साराभाई यांना चांगलंच पटलं होतं. कारण, देशभरातील काहीशे जागा बघितल्यानंतर ही जागा निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे चर्चच्या या जागेसाठी डॉ. साराभाई यांनी त्यावेळचे लॅटिन चर्चचे बिशप पीटर बर्नार्ड परेरा यांची भेट घेतली. त्यांना आपल्या कामाचं महत्व, देशासाठी त्याचं योगदान पटवून दिल्यावर बिशपनी त्यांच्याकडे थोडा वेळ मागितला.
बिशप म्हणाले की, तुम्ही या रविवारच्या प्रार्थनासभेला याल का? साराभाईंना नकार देण्याचं काहीच कारण नव्हते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या 'इग्नायडेट माइंड्स' या पुस्तकातही या प्रसंगाचा उल्लेख केलाय. ते म्हणातात की, चर्चमधे जमलेले स्थानिक मच्छिमार ख्रिस्ती बांधव आणि सर्वांना उद्देशून बिशपनी रविवारचा उपदेश सुरू केला.
त्यात ते म्हणाले की, फादर म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. आपल्यासोबत आज देशातील एक मोठे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना आपलं चर्च, मी राहत असलेलं घर आणि आसपासची थोडी जागा अवकाशाच्या शोधासाठी हवी आहे. त्यांचं काम मानवतेसाठी महत्वाचं आहे. म्हणजे तेही माझ्यासारखं देवाचंच काम करताहेत. तर आपण हे देवाचं घर त्यांना देऊयात का?
बिशपच्या या वेगळ्याच मागणीमुळे समोरची लोक क्षणभर स्तब्ध झाली. त्यांना काही कळेनासच झालं? पण बिशप ज्या आत्मविश्वासानं त्यांना सांगत होते, ते पाहून त्यांना हे काहीतरी महान काम आहे याची खात्री पटली आणि हळूहळू समोरच्या गर्दीतून आवाज येऊ लागले. आमेन, आमेन, आमेन! धर्म आणि विज्ञान यांनी एकत्र येऊन मानवतेची भरारी घेण्याचा तो एक सुवर्णक्षण होता.
चर्चमधील प्रार्थनासभेतील याच सुवर्णक्षणी इस्रोचा पाया केरळमधे घातला गेला. बिशप पीटर बर्नार्ड परेरा यांनी त्यांचं पॅरिश चर्च आणि शेजारील बिशप हाऊस भारताच्या अवकाश कार्यक्रमाला दिलं. तिथं देशातलं पहिलंवहिलं असं, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्च स्टेशन (TERLS) सुरू झालं. या TERLS चं पुढे विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) असं नामकरण करण्यात आलं.
चर्चची जवळपास ९० एकर जमीन, ज्यात एका शाळेचाही समावेश होता. तसंच तिथल्या स्थानिक १८३ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं आणि एकूण ८०० एकर जागा या केंद्रासाठी संपादीत करण्यात यश आलं होतं. या जागेवर हळूहळू रॉकेट लाँन्च स्टेशन उभं राहत गेलं. पण चर्चची मुख्य इमारत, तिथली वेदी जपण्यात आली. त्याच चर्चच्या प्रार्थनागृहात रॉकेटचं बांधकाम सुरू झालं.
पहिलं रॉकेट, ज्याचं नाव नायके अपाचे होतं, ते तर वेदीच्या समोरच बनविण्यात आलं. बिशपचं घर हे डिझाइन करणारं कार्यालय झालं. वेली हिल्सवर संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र उभारण्यात आलं. आसपास राहायची व्यवस्था करण्यात आली. तिथल्या मोठमोठ्या घुमटात फिरणारी कबुतरं ही आमची मित्र झाली होती, असा उल्लेख अरवमुदन आपल्या पुस्तकात आठवणीनं करतात.
तिथल्या ख्रिस्ती बांधवांना वचन दिल्याप्रमाणे नव्या चर्चसाठी मूळ जागेपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पल्लीथुरा येथे नवी जागा देण्यात आली. नवीन शाळा बांधण्यासाठी जागा देण्यात आली. त्याच प्रमाणे विस्थापित झालेल्या कुटुंबांचं पल्लीथुरा येथे १० केंद्रांमधे पुनर्वसन करण्यात आलं. या सगळ्यामुळे दुसरीकडे अवकाश कार्यक्रमांना मात्र मोकळी जागा मिळाली.
अवकाश संशोधन सुरू झालं तरी, जुन्या चर्चचा बराचसा भाग हा ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करण्यात आला. तिथले गॉथिक टॉवर्स, कमानदार दरवाजे, मोठमोठ्या खिडक्या आणि तिथली जुनी स्मशानभूमी आजही सुरक्षित आहे. दरवर्षी २ नोव्हेंबरला विशेष परवानगी घेऊन तिथे 'ऑल सोल डे' आयोजित केला जातो.
माणसानं ठरवलं, समंजसपणा दाखवा तर धर्म हा वैज्ञानिक प्रगतीमधे अडथळा होत नाही, याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे थुंबामधील अवकाश संशोधन आणि या चर्चची कहाणी आहे. २१ नोव्हेंबर १९६३ हा दिवस देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी चर्चच्या आवारातून देशातील पहिले रॉकेट आकाशात झेपावलं. भारताच्या अवकाश कार्यक्रमाची ही मुहूर्तमेढ होती.
भारताचा अवकाश कार्यक्रम पुढे मोठा होत गेला. आता त्यासाठी आणखी एका लाँचिंग स्टेशनची गरज होती. बंगालच्या उपसागराजवळ असलेल्या श्रीहरिकोटा येते १९७१ मधे हे नवं केंद्र सुरू करण्यात आलं. या नव्या केंद्राला पुढे डॉ. साराभाई यांच्यानंतरचे अवकाश कार्यक्रमाचे शिल्पकार सतीश धवन यांचं नाव देण्यात आलं.
१९८५ मधे थुंबा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील जुन्या भव्य चर्चचं रूपांतर, स्पेस म्युझियममध्ये करण्यात आलं. आज या म्युझियमला दर महिन्याला हजारो लोक भेट देतात. या म्युझियममधे भारताच्या गौरवशाली अंतराळ कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे. यात वेगवेगळ्या रॉकेट्सच्या प्रतिकृती, अंतराळातील अनेक घटना यांचा आढावा घेण्यात आला आहे.
आजही या जुन्या चर्चची बाह्य वास्तू तशीच ठेवण्यात आली आहे. तिथं आधी चर्च होतं याचा सन्मानानं उल्लेख केलेला आहे. तसंच बिशप परेरा यांचीही आठवण तिथल्या माहितीलेखात आवर्जून नोंदविण्यात आली आहे. याच बिशप यांचं नाव, या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधील म्युझियमला द्यावं, अशी मागणी होतेय.
धर्म आणि विज्ञान यांच्यातील सनानत संघर्ष आजवर अनेकदा मांडला गेलाय. चर्चनेही युरोपात केलेला विज्ञानविरोध अनेकदा सांगितला गेलाय. पण, भारतात याच धर्मानं विज्ञानाचं महत्त्व ओळखून, सहअस्तित्वाचा आदर्श घालून दिला. विक्रम साराभाई हे जैन होते, सतीश धवन हिंदू होते, एपीजे कलाम हे मुस्लिम होते आणि जिथं या तिघांनीही काम केलं ती ख्रिस्ती चर्चची जागा होती.
आज या म्युझियमच्या वेबसाइटवर लिहिलं गेलंय की, “आज हे स्पेस म्युझियम ज्या भव्य इमारतीमधे आहे, तिथं १९६० पर्यंत सेंट मेरी मॅग्डालीन चर्च होते. हे ठिकाण भारतीय अंतराळ कार्यक्रमाचं जन्मस्थान आहे. या चर्चमध्येच देशातलं पहिलं रॉकेट उभारलं गेलं”. ही गोष्ट जगाला कळणं महत्त्वाचं आहे. विशेषतः आज सर्वत्र धार्मिक हिंसाचार वाढत असताना, तर हे कळणं अधिकच गरजेचं आहे.