डॉ. अनिल मेनन: नासाच्या महत्वाकांक्षी मोहिमेत भारतीय वंशाचा चेहरा

१३ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ३ मिनिटं


नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेनं नुकतीच आपल्या आगामी चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहिमांची घोषणा केलीय. त्याच्या प्रशिक्षणासाठी नासाने १२ हजारामधून १० जणांची निवड केलीय. या १० जणांमधे भारतीय वंशाचे फ्लाईट सर्जन डॉ. अनिल मेनन यांचं नाव आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही फार अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.

अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाची कोणतीही अवकाश मोहीम म्हटलं की, पूर्ण जगाचं तिकडे लक्ष लागतं. आताही नासाच्या अशाच एका मोहिमेची सगळीकडे चर्चा होतेय. येत्या ५ वर्षांमधे नासाच्या महत्वाकांक्षी अशा चंद्र आणि मंगळ ग्रहावरच्या मोहीमांना सुरवात होईल. त्यासाठी तब्बल १२ हजार उमेदवार इच्छुक होते. त्यामधून फक्त दहाच उमेदवार नासाने पुढच्या प्रशिक्षणासाठी निवडलेत. या नव्या टीमला ‘आर्टेमिस जनरेशन’ असं नाव देण्यात आलंय.

पुढच्या वर्षी जानेवारीत ‘आर्टेमिस जनरेशन’च्या प्रशिक्षणाला सुरवात होईल. दोन वर्षांच्या या खडतर प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतेचा कस लागेल. ‘नासा’च्या जॉन्सन स्पेस सेंटरमधे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशन आणि डीप स्पेस रिसर्चसाठी तयार केलं जाईल. त्यांना खाजगी अंतराळयानातून घडणाऱ्या अंतराळ प्रवासाचंही सखोल प्रशिक्षण दिलं जाईल.

पण त्यात एक खास गोष्ट आहे. आणि भारताच्या दृष्टीने अभिमानाची. या मोहिमेसाठी निवड करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींमधले डॉ. अनिल मेनन हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यावर या मोहीमेसाठी प्रशिक्षणार्थींची अंतिम टीम निश्चित केली जाईल. या टीममधे मेनन यांचा समावेश झाला तर अंतराळात प्रवास करणारे ते पाचवे तर चंद्रावर जाणारे पहिलेच भारतीय वंशाचे अंतराळवीर ठरतील.

डॉक्टर ते नासाचे फ्लाईट सर्जन

डॉ. अनिल मेनन हे एका मल्याळी कुटुंबात वाढले. त्यांची आई युक्रेनियन होती. वयाच्या २० व्या वर्षी जगप्रसिद्ध अशा हार्वर्ड युनिवर्सिटीमधून त्यांनी न्युरोबायोलॉजीची पदवी घेतली. १९९९मधे त्यांनी फेलोशिप मिळवत भारतातल्या पोलिओ अभियानात सक्रीय सहभाग घेतला. पुढे २००२ते २००६ला अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमधून त्यांनी एमडी केलं. तर स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधे एमएस पूर्ण केलं.

२०१४मधे त्यांनी ‘नासा’साठी फ्लाईट सर्जन म्हणून काम केलं. त्यानंतर २०१८ला त्यांनी ‘स्पेसएक्स’ या कंपनीमधे लीड फ्लाईट सर्जन म्हणून काम करायला सुरवात केली. पुढे नासा आणि स्पेसएक्स यांनी एकत्रित आयोजित केलेल्या ‘स्पेसएक्स डेमो २’ या मोहिमेचे ते पहिले फ्लाईट सर्जन होते. अंतराळवीरांचा समावेश असलेली ‘स्पेसएक्स’ची ही पहिलीच अवकाश मोहीम होती.

अनिल मेनन यांची कामगिरी

डॉ. अनिल मेनन यांनी एरोस्पेस मेडिसीन, इमर्जन्सी मेडिसीन, वाईल्डरनेस मेडिसीन आणि सामाजिक आरोग्यविषयांमधे मास्टर्स केलंय. एरोस्पेस मेडिसीन क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना ‘थिओडोर सी लायस्टर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्याचबरोबर ‘नासा’च्या जॉन्सन स्पेस सेंटरकडूनही त्यांना गौरवण्यात आलं.

अंतराळ संशोधनासोबतच डॉ. मेनन यांनी अमेरिकेच्या वायुदलातही आपली सेवा बजावलीय. त्यांनी ४५व्या स्पेस विंगमधे फ्लाईट सर्जन म्हणून काम केलं. १७३व्या फायटर विंगमधे आपत्कालीन कर्तव्य पार पाडताना त्यांनी १००हून अधिक पेशंटची सेवा केलीय. यासाठी त्यांना ‘युएस एअरफोर्स पदक' देण्यात आलं.

अफगाणिस्तान, हिमालयासारख्या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागांत अमेरिकी वायुदलाकडून वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या उपक्रमांत डॉ. मेनन यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. हैती आणि नेपाळमधे झालेल्या भूकंप दुर्घटनेत त्यांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि वैद्यकीय कौशल्याचं कौतुक झालं. मेडिकल सायन्ससाठी महत्त्वपूर्ण ठरतील असे स्वतःचे २०हून अधिक लेखही त्यांनी प्रकाशित केले आहेत.

अभिमान भारतीय संस्कृतीचा

१९९९ला रोटरी इंटरनॅशनलची फेलोशिप मिळवून डॉ. मेनन भारत दौऱ्यावर आले होते. १९९९ ते २००१ दरम्यान त्यांचा भारतातल्या आरोग्य व्यवस्थेशी जवळून संबंध आला. भारत सरकारने पोलिओ प्रतिबंधासाठी राबवलेल्या अभियानाचा भाग म्हणून त्यांना इथल्या समाज, संस्कृतीशी पुन्हा एकदा जुळवून घेता आलं.

बहुतांश अंतराळवीर चमचमीत आणि मसालेदार खाद्यपदार्थांवर भर देतात. अंतराळात चव आणि आहाराच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याने त्यांचं कायमच भारतीय खाद्यसंस्कृतीला प्राधान्य असायचं. महत्त्वपूर्ण प्रकल्पामधे आपण भारताचं प्रतिनिधित्व करत असल्याचा आनंद ते लपवू शकले नाहीत.

डॉ. मेनन यांचे वडील शंकरन मेनन हे मूळचे केरळ इथल्या मलबारचे. तीनच वर्षांपूर्वी डॉ. मेनन यांनी सपत्नीक केरळला भेट दिली. त्यावेळी त्यांनी कोची आणि अलप्पुळासोबतच तमिळनाडूतल्या पर्यटनाचा आनंद घेतला. जॉन्सन स्पेस सेंटरमधलं प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलं तर ते पहिले मल्याळी अंतराळवीर ठरणार आहेत.