दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

२२ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


महाराष्ट्रात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या २३ एप्रिलला होतंय. यात दक्षिण महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातली लढाई थेट राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, भाजप अशी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने इथल्या लढती चुरशीच्या झाल्यात.

दक्षिण महाराष्ट्रातले कोल्हापूर, सांगली आणिसातारा हे जिल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात. २०१४ च्या मोदी लाटेतदेखील हे बालेकिल्ले शाबूत राहिले. भाजपला सांगली वगळता इतर ठिकाणी फारसं काही हाती लागलं नाही. तरीही२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही येथे राष्ट्रवादीला खडतर आव्हानाचा सामना करावा लागतोय. हमखास निवडून येणाऱ्या जागादेखील अंतर्गत गटबाजीमुळे अडचणीत आल्यासारखी स्थिती आहे.

कोल्हापुरात आघाडीत बिघाडी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी कडवं आव्हान दिलंय. २०१४ मधे महाडिक यांनी मंडलिक यांचा ३३ हजार मतांनी पराभव केला होता.त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी एकदिलाने निवडणुकीला सामोरं गेली होती. पण विजयी झाल्यानंतर महाडिक यांनी भाजप सत्ताधाऱ्यांसोबत हातमिळवणी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे कार्यक्रम केले.

हेही वाचाः भावा बहिणींनो, चौकीदार चोर नसूही शकतो!

विधानसभा निवडणुकीत चुलत भाऊ अमल महाडिक यांना काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात उभं केलं. यात पाटील यांचा पराभव झाला. तसंच कोल्हापूर महापालिकेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत न करता भाजपप्रणित ताराराणी आघाडीला मदत केली. पणइथे त्यांच्या हाताला काही विजयाचा गुलाल लागला नाही.

काँग्रेसने सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेत सत्ता मिळवली. जिल्हा परिषद निवडणुकीतही महाडिक कंपनीने भाजप- सेनेसोबत घरोबा करून सत्ता मिळवली. तिथे धनंजय यांच्या भावजय शौमिका महाडिक अध्यक्ष झाल्या. अशा त्यांच्या आघाडीविरोधी कार्यक्रमांमुळे मतदारसंघात आघाडींच्या कार्यकर्त्यांमधे कमालीचा रोष निर्माण झाला. तो या निवडणुकीत दिसत आहे.

सतेज पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक, नेत्यांनी महाडिक यांना उघड विरोध केलाय. 'आमचं ठरलंय' असा थेट संदेश वरिष्ठ नेत्यांना दिलाय. त्यामुळे सुरवातीला एकतर्फी वाटणारी कोल्हापुरातली निवडणूक आता अटीतटीची होऊन बसलीय.

हेही वाचाः ऐसी कैसी जाहली साध्वी!

संजय मंडलिक यांना पारंपरिक भाजप, शिवसेनेच्या मतांसोबत नाराज काँग्रेस नेत्यांची मोठी रसद मिळतेय. करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर याठिकाणी महाडिकांनी स्वत:ची यंत्रणा कामाला लावलीय. दुसरीकडे कागल, चंदगड, राधानगरी-भूदरगड या मतदारसंघात मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते प्रचारात सक्रीय दिसताहेत.

मतदानादिवशी कोणकोणासाठी किती आणि कसं काम करतो. महाडिक यांचा स्वत:चा महाडिक गट किती प्रबळ ठरतो यावरच त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. धनंजय महाडिक यांच्या दृष्टीने आशादायक गोष्ट म्हणजे अरुंधती महाडिक यांच्या भागिरथी महिला मंडळाचं काम आणि जिल्हाभर पसरलेली महाडिक युवाशक्ती ही आहे.

महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सक्षम असा महिला मतदारांचा गठ्ठा निर्माण केलाय. या मंडळाच्या बळावरच त्यांना विजयाची आशा आहे. तर संजय मंडलिक यांचं मदार भाजप, सेनेची पारंपरिक मतं आणि नाराज काँग्रेस नेत्यांची मदत यावर विजयाचं गणित अवलंबून आहे. या मतदारसंघात वंचित बहूजन आघाडीकडून अरुणा माळी रिंगणात आहेत. पण त्यांचा फारसा परिणाम दिसत नाही.

हातकणंगलेत जातीय प्रचार

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने अशी पारंपरिक लढत होतेय.२०१४ मधे राजू शेट्टी महायुतीचे उमेदवार होते. नंतर मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला विरोध करत शेट्टी युतीतून बाहेर पडले. २०१९ च्या निवडणुकीसाठी ते काँग्रेसमहाआघाडीत जात निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशील माने यांनी आव्हान दिलंय.

शेट्टी यांनी २००९ मधे निवेदिता माने यांचा पराभव केला होता. यावेळी धैर्यशील माने कमी कालवधीतच शेट्टी यांच्यासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय. शेट्टी यांच्याकडून शेतकरी धोरणावरून मोदी सरकारवर होणारी कठोर टीका भाजप नेत्यांना जिव्हारी लागतेय. त्यातूनच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांनी शेट्टींच्या पराभवासाठी चंग बांधलाय.

हेही वाचाः साध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा?

मतदारसंघात जैन विरुद्ध मराठा अशी लढत निर्माण करून शेट्टी यांचा पराभव करण्याचे आखाडे बांधले जाताहेत. कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात अशा प्रकारे जातीयवादी प्रचार प्रथमच एवढ्या तीव्र स्वरुपात पाहावयास मिळतोय. हा शेट्टी यांच्यादृष्टीने चिंतेचा विषय बनलाय. शेट्टी यांचा हक्काचा मतदार असलेले शेतकरी या जातीय प्रचाराला किती बळी पडतात यावरच त्यांचा जय, पराजय अवलंबून आहे.

विरोधकांनी मात्र निवडणूक याच मुद्द्यावर कशी राहील याचं नियोजन सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवलंय. वंचित बहूजन आघाडीकडून हाजी अस्लम सय्यद यांनीही आव्हान उभं केलंय. मतदारसंघात दलित आणि मुस्लीम समाजाची मतंसहा लाखांच्या आसपास आहेत. ही मतं कोणाच्या पारड्यात किती जातात. यावर जयपराजयाचं पारडं झुकणार आहे.

मतदारसंघात शिवसेनेचे तीन, भाजपचे दोन तर राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. असं असलं तरी लोकसभेसाठी राजू शेट्टी यांना मतदान करणारा मोठा वर्ग आहे. या वर्गाच्या भुमिकेवरच त्यांची मदार आहे.

सांगलीत बॅट चालणार काय?

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुद्ध वंचित बहूजन आघाडी असा तिरंगी सामना रंगलाय. बऱ्याच घडामोडीनंतर काँग्रेसने आपली पारंपरिक जागा स्वाभिमानीला सोडली. स्वाभिमानीने वसंतदादा पाटील यांचानातू विशाल पाटील यांना उमेदवारी दिलीय. यातून स्वाभिमानीने हातकणंगले आणि सांगलीत पहिल्या टप्प्यातली निवडणुकीची गणितं जुळवण्यात काहीसं यश मिळवलंय.

वंचित बहुजन आघाडीने मतदारसंघातली धनगर समाजाची निर्णायक मतसंख्या ध्यानात घेऊन गोपीचंद पडळकर यांना तिकीट दिलंय. तिरंगी लढतीमुळे भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचीदेखील दमछाक होतेय. जत, आटपाडी, कवठे महाकाळ या भागात पडळकर यांना मिळतोय. दुसरीकडे सांगली, मिरज, पलूस मतदारसंघात विशाल पाटील यांना मिळत असलेली ताकद भाजपच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनलाय.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

कोण कोणाची किती मतं खातो यावरच जय, पराजय कोणाकडे झुकणार हे अवलंबून आहे. मतदारसंघातल्या दलित, मुस्लिम, धनगर मतांना महत्त्व आलंय.तिन्ही उमेदवार आपली पारंपरिक मतं सांभाळत या मतात किती मतं आपल्याकडे खेचतो यावरच विजय अवलंबून आहे.

भाजप उमेदवारासाठी आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विलासराव जगपात, शिवसेनेचे अनिल बाबर हे प्रचारात सक्रीय आहेत. ही पाटील यांच्यासाठी जमेच्या बाजू आहे. दुसरीकडे स्वाभिमानीसाठी आर. आर. पाटील यांची बायको सुमनताई पाटील, पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजीत कदम याचा प्रचार महत्त्वाचा ठरतोय.

संजयकाकांविषयी भाजप कार्यकर्त्यांमधे असलेली नाराजी किती तीव्र आहे, त्याचा नेमका कुणाला फायदा होईल. तसंच शेवटच्या क्षणी अंतर्गत गटबाजीत कोण कुणाचा गेम करणार यावरच अनेक गणिते अवलंबून आहेत.

साताऱ्यात राजेंची जादू चालणार की,

सातारा लोकसभेची जागा म्हणजे उदयनराजे यांची हमखास निवड अशी गणितं मांडली जातात.पण यंदा राजेंना शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्याकडून कडवं आव्हान मिळतंय. निवडणुकीआधी रंगलेला उदयनराजे- शिवेंद्रराजे वाद, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांची राजेंविषयी असणारी नाराजी तसंच मतदारसंघात कमी झालेला जनसंपर्क यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी राजेंना कष्ट करावं लागताहेत.

एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मतदानाच्या दिवसापर्यंत एवढी अटीतटीची होईल याची कल्पना कोणी केली नव्हती. नरेंद्र पाटील यांची उमेदवारी अखेरच्या टप्प्यात जाहीर झाली असली तर मोदी वोटर म्हणजेच मोदींना पुन्हा संधी देण्याची मानसिकता असणारे मतदार त्यांच्या पाठीमागे उभं राहत असल्याचंदिसतंय.

हेही वाचाः परभणी, हिंगोलीः बालेकिल्ले असूनही शिवसेनेची शेवटपर्यंत कोंडी

मतदारसंघात शिवसेनेची स्वत:ची अशी मोठी वोट बँक आहे. त्यात राजेंविरोधात नाराज असणारे अनेक कार्यकर्ते पाटील यांना अंतर्गत मदत करत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसताहे. ही मदत किती प्रमाणात वाढते यावर पाटील यांची घौडदौड अवलंबून आहे. उदयनराजे यांनी यापूर्वीचे दोन्ही विजय दणदणीत लाखांच्या फरकाने मिळवलेत. त्यामुळे विरोधी उमेदवारासाठीअगोदर हे मताधिक्य कापणं महत्त्वाचं आहे.

कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा विरोध होताना दिसत नाही. मात्र राजेंच्या दृष्टीने पाटण, सातारा आणि वाई मतदारसंघ चिंता वाढवणारे आहेत. या ठिकाणी कोण किती मदत करतं किंवा कोण कुणाचा गेम करतो यावर विजयाचे पारडे झुकणार आहे.

उदयनराजे यांच्यापुढे मोदी लाटेतही मोदींच्या इमेजचं आव्हान उभं राहिलं नव्हतं. पण यंदा प्रथमच मतदारसंघात मोदींच्या नावाने मतांची गोळाबेरीज होत असल्याचं प्रकर्षाने जाणवतंय. यात मतदारांवर राजेंची जादू कायम राहणार की मोदींच्या नेतृत्त्वाचा प्रभाव वरचढ ठरणार हे निकालादिवशीच स्पष्ट होईल. सध्या तरी राजेंना लढाई वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही.

हेही वाचाः 

भारत पाटणकरांना तरुण शुभेच्छा का देतात?

डॉ. रत्नाकर पंडितः पत्रकारितेच्या समर्पित शिक्षकाचा सन्मान

जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी