वर्ल्डकप सेमीफायनलमधे 'या' चार टीमला एंट्री मिळणार

२० जून २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


यंदाच्या वर्ल्डकपमधे काही धक्कादायक निकालांमुळे सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळणार हे आताच सांगणं कठीण होऊन बसलंय. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात.

क्रिकेट वर्ल्डकपला दिवसेंदिवस रंग चढतोय. मॅचचा आकडा वाढतोय तसं टूर्नामेंटमधली रंगत आणखी वाढतेय. दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडने मात दिल्यानंतर वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधे कुणाला कुणाला एंट्री मिळणार हे काहीस स्पष्ट होताना दिसतंय. सुरवातीला व्यक्त करण्यात येत असलेल्या शक्यतांनुसार न्यूझीलंड, इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया या टीम सेमीफायनलमधे पोचतील.

आतापर्यंतचा एकूण ट्रेंड काय?

सध्या या चार टीम्सना सेमीफायनलमधे एंट्री मिळण्यात काही अडचण नाही. तरीही क्रिकेटमधे कुठलीच गोष्ट निकाल लागेपर्यंत आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही. पण आतापर्यंतचा एकूण ट्रेंड बघितल्यास गेल्यावेळचा विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड, दोनवेळचा विजेता भारत आणि अजूनपर्यंत वर्ल्डकप जिंकता न आलेली यजमान इंग्लंडची टीम यांना सेमीफायनलमधे संधी मिळू शकते.

यंदाच्या वर्ल्डकपमधे ही धक्कादायक निकालही लागलेत. या निकालामुळे आताच सेमीफायनलमधे कुणाला एंट्री मिळेल हे छातीठोकपणे सांगता येत नाही. पाकिस्तानकडून तगड्या इंग्लंडचा पराभव तसंच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला कागदावरच्या दुबळ्या बांगलादेशच्या टीमने पराभूत केलं. यामुळे सेमीफायनलमधे कोण जाणार याच्या नव्या शक्यता तयार झाल्यात. तरीही भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या टीमला सेमीफायनलमधे जाण्यापासून रोखणं आता सहज शक्य नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका वगळता सगळ्याच टीम्सनी आतापर्यंत प्रत्येकी पाच मॅच खेळल्यात. भारत चार, तर आफ्रिकेने सगळ्यात जास्त सहा मॅच खेळल्यात. सर्व पाच मॅच हरलेल्या अफगाणिस्तानची सेमीफायनलमधे जाण्याची संधी संपलीय. दुसरीकडे पाच मॅच खेळून तीन पॉईंट्स मिळवणाऱ्या पाकिस्तान आणि सहा मॅच खेळून तीन पॉईंट्स कमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी सेमीफायनलचा रस्ता पार करणं खूपच कठीण होऊन बसलंय.

हेही वाचाः विराट असा कसा तू वेगळा वेगळा

बांगलादेशची धक्कादायक खेळी

अफगाणिस्तानच्या टीमचा सामना आता भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्टइंडिजशी आहे. पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशशी लढायचंय. दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायचे आहेत.

तसंच पाच मॅच खेळून पॉईंट्स मिळवणाऱ्या वेस्ट इंडिजला आणि पाच मॅचमधून चार पॉईंट्स कमावणाऱ्या श्रीलंकेच्या रस्त्यातही अनेक अडथळे आहेत. कारण येत्या काळात या सगळ्यांची तगड्या टीम्सविरोधात मॅच होणार आहे. वेस्ट इंडिजला न्यूझीलंड आणि भारतासोबतच अफगाणिस्तान आणि श्रीलंकेशीही लढावं लागणार आहे. या मॅचचा निकाल काहीही लागू शकतो.

या सगळ्यांमधे बांगलादेशच्या टीमने धक्कादायक खेळी करत मोठ्या आशा निर्माण केल्यात. बांगलादेशने पाच मॅच खेळून पाच पॉईंट्स कमावलेत. त्यांना दोन मॅचमधे विजय तर दोनमधे पराभवाचं तोंड बघावं लागलंय. एक मॅच ड्रॉ झालीय. आता बांगलादेशचा सामना ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तानच्या टीमशी आहे. यामधे बांगलादेशची टीम भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरोधात जिंकली तरी त्यांचे पॉईंट नऊ होते. एवढ्या पॉईंटच्या जीवावर सेमीफायनलचा रस्ता गाठणं सध्यातरी शक्य दिसत नाही.

याच सगळ्यात मोठं कारण म्हणजे, सध्या अव्वल असलेल्या चार टीम्सपैकी भारताचा अपवाद वगळता पाच-पाच मॅच खेळून आठ पॉईंट मिळवलेत. भारताने चार मॅचमधे सात पॉईंट्सची कमाई केलीय. महत्त्वाचं म्हणजे या चारही टीम्सची नेट रनरेटही खूप चांगलाय. उरलेल्या टीम्समधे वेस्ट इंडिज वगळता बाकी सगळ्यांचा नेट रनरेट खूपच निराशाजनक आहे. बांगलादेशचा नेट रनरेटही मायनस ०.२७ एवढा आहे.

हेही वाचाः बेल पडत नाहीत, बॅट्समन आऊट होत नाही आणि आयसीसी नियम बदलत नाही

न्यूझीलंड नेट रनरेटमधे अव्वल

नेट रनरेटमधे न्यूझीलंडची टीम अव्वलस्थानी आहे. त्यांच्याकडे पाच मॅचमधून नऊ पॉईंट्स झालेत. एक मॅच ड्रॉ झालीय. त्यांचा नेट रनरेट प्लस २.१५ एवढा असून तो १.८६ रनरेटसह दुसऱ्या नंबरवर असलेल्या इंग्लडपेक्षा दुप्पट आहे. न्यूझीलंडची टीम अजूनपर्यंत अपराजित आहे. आता न्यूझीलंडचा सामना वेस्ट इंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तगड्या टीम्सशी आहे. न्यूझीलंडच्या टीमचं सेमीफायनलमधे पोचणं जवळपास निश्चित आहे. पण त्यांना टॉप टूमधे स्थान मिळेल की नाही हे सांगणं थोडं कठीण आहे.

यजमान इंग्लडची टीम दुसऱ्या स्थानी आहे. पण त्यांना पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागलाय. तरीही आतापर्यंतची एकूण कामगिरी बघता इंग्लंडला सेमीफायनलचे तिकीट मिळेल, असं दिसतंय. पण त्यासाठी इंग्लंडला टॉप टूमधे स्थान मिळवणं खूप गरजेचं आहे. नाही तर इंग्लंडच्या हाती निराशा लागू शकते. कारण आता इंग्लंडचा सामना श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंडशी आहे.

सध्या ऑस्ट्रेलियाची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आपल्या दुसऱ्याच मॅचमधे ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्डकपचे आपणच दावेदार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. पण एखाद्या पराभवावरून आपण ऑस्ट्रेलियाला मोडीत काढू शकत नाही. भारताने पाकिस्तानलाही पराभवाचं तोंड दाखवलंय. या विजयाने टीम इंडियाचं मनोबल खूप उंचावलंय.

तरीही आता भारताचा सामना वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार, यजमान इंग्लंडशी आहे. टीम इंडियाचा अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंकेशी सामना आहे. या टीम्सला हरवणं तसं भारतासाठी अवघड नाही.

हेही वाचाः 

पाकसोबत मॅच नको म्हणणारा गौतम गंभीर आता काय म्हणतोय?

अधीर रंजन चौधरीः माजी नक्षलवादी ते काँग्रेसचा संसदीय दलाचा नेता