कवी, प्रसिद्ध विचारवंत यशवंत मनोहर यांनी जीवनव्रती पुरस्कार नाकारल्यानंतर भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेबद्दल चर्चा होतेय. त्यासोबत संविधानातल्या मुल्यांचाही संदर्भ देऊन परस्पर विरोधी मतं इथं नांदायला हवीत हे सूचवलं जातंय. या सगळ्याकडे नेमकं कसं बघायचं याची दृष्टी देणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.
डॉ. यशवंत मनोहर सरांनी आज विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार सरस्वती प्रतिमा पूजनामुळे नाकारला! डॉक्टरांनी आजपर्यंत लेखणीतून मांडलेला विचार आणि त्यांचं चिंतन पाहता त्यांची भूमिका त्याला साजेशी अशीच आहे. त्यांनी तो पुरस्कार नाकारला असला तरी त्या पुरस्काराचे मानकरी तेच आहेत.
ते या पुरस्काराचे मानकरी ठरले याबद्दल आणि त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन हा पुरस्कार नाकारला याबद्दलही त्यांचं अभिनंदन. तसंच त्यांना हा सन्मान देणाऱ्या विदर्भ साहित्य संघाचंही अभिनंदन! पुरास्काराबद्दल आणि सरांबद्दलही सर्वांच्या मनात जो सन्मान आणि आदर आहे तो कायम राहील अशी आशा करूया!
हेही वाचा: ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया
सरस्वती पुजन करावं न करावं हा ज्याच्या त्याच्या व्यक्तीगत श्रद्धेचा विषय आहे. सरस्वती पुजन करावंस वाटतं त्यांच्या अधिकाराचाही सन्मान व्हायला हवा. मनोहर सरांनी सरस्वती पुजनाला विरोध केलेला नाही, त्यांना पुजन मान्य नाही, ही भूमिका समजून घ्यायला हवी. काही वर्षापूर्वी प्रतिकं कोणती मान्य करावीत किंवा कोणत्या सणांना, परंपरांना स्वीकारावं आणि काय नाकारायचं हा विषय कायम चिंतनाचा राहिलाय.
भारतीय समाज, भारतात नांदलेल्या अनेक चांगल्या, वाईट गोष्टींतून घडत आलाय. अजूनही घडतोय. सांस्कृतिक जडणघडण सतत होत जाणारी प्रक्रिया आहे. अमुक संस्कृती संपली आणि तमुक संस्कृती इथं सुरू झाली असं काहीही सांगता येत नाही. कारण समाजात झालेले बदल, नवीन विचारांची जाणीव, भान हे एकदम आलेलं नसतं तर हे बदल शतकानुशतकांच्या घुसळणीतून तयार झालेले असतात.
त्यामुळे प्रतीकं किंवा त्याबद्दलची भावना बटन दाबून लाईट चालू करणं किंवा, बंद करणं अशा स्वरूपाची नसते. सत्ता बदलली, समाजात आधुनिकता आली की तात्काळ जूनं ते पुसलं जावं आणि नवीन लोकांनी ते स्वीकारावं असंही घडत नाही. मुळात असा विचार काही समाजाची वीण घट्ट करत नाही तर उलट उसवतो.
इतिहासातलं एखादं व्यक्तीमत्व, घटना, समाजाच्या मनातली एखादी भावना, श्रद्धा, मग ती वास्तव असुदेत किंवा आभासी तिचं अस्तित्व समाजात असतं हे सत्य आहे. ईश्वर आहे की नाही, माहीत नाही पण ईश्वर आहे ही भावना सामाजिक वास्तव आहे. अशा भावनांचं अस्तित्व मान्य करून, निरीश्वरवाद्यांनाही त्यांचे विचार मांडण्याचा हक्क आहे, ही गोष्ट आपण मान्य करतो, हेच आधुनिक समाजाचं वैशिष्ट्य आहे. पण हल्ली असं होताना दिसत नाही.
शहराची नामांतरं हा आज मिडियातला प्रमुख विषय आहे. औरंगाबाद हे नाव बदलावं का तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. अशा व्यक्तीचं नाव प्रतीक कसं असू शकेल असा विचार करणारेही लोक आहेत. पण इतिहासातून औरंगजेब हे व्यक्तीमत्व पुसता येईल का? याचं उत्तर स्पष्ट नाही. तरीही देशाच्या इतिहासात राजकीय किंवा सामाजिक जडणघडणीतलं एक वास्तव म्हणून हे नाव कायम राहीलंय.
यात बदल करण्याचे प्रयत्न हे सामाजिक एकोपा, शांतता, सहकार्य यावर परीणाम करणारे आहेत. म्हणून हे नाव इतिहासातल्या वास्तव घटनेचं प्रतिक म्हणून आजही कायम आहे. अगदी अशीच गोष्ट इतर प्रतिकांची, प्रथांची आहे.
हेही वाचा: पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज
भारत स्वतंत्र झाल्यावर, आता आपण ब्रिटिश काळातली सर्व प्रतिकं नाकारायची, असा विचार करणारा एक वर्ग होता. जो मोगल आणि ब्रिटीशांना समान पातळीवर पाहत होता. त्यांना परकीय समजत होता. पण भारत म्हणजेच इंडिया घडवताना, तत्कालीन नेतृत्वाची अशी भूमिका होती की, या देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय आणि आर्थिक जडणघडणीत आजवरच्या सर्व राजसत्तांनी, समाजातल्या प्रभावी विचारांनी मग त्यात धार्मिक विचारही आले. अशा सर्वांनी चांगलं वाईट योगदान दिलंय.
त्यामुळे कोणाचीही ओळख पुसणं इतिहासाला धरून नाही आणि आधुनिकतेच्या पायावर देशाची जडणघडण करायला ते उपयोगाचं ठरणार नाही. म्हणून सरकार, प्रशासनाला कोणताही धर्म असणार नाही, असं धर्मनिरपेक्ष सरकार स्वीकारलं. मात्र त्याच बरोबर प्रत्येक नागरिकाला त्याच्या श्रद्धेनुसार उपासनेचं स्वातंत्र्यही दिलं. समाजात भेदभाव करणाऱ्या, समतेच्या विरूद्ध असणा-या गोष्टींना मात्र कायद्यानं बंधनं आली.
या पद्धतीने नव्या भारताची जडणघडण करताना हजारो वर्षाच्या कालखंडात जे काही घडलं, त्यातल्या सर्व घटनांना, घटकांना आहे त्या स्वरूपात स्वीकारून त्यातून अधिकाधिक मानवतावाद समोर मांडला गेला. असं करणं वास्तवाला धरून होतं की नव्हतं हा विषय नाही. त्यात सर्वांना सोबत घेऊन नवीन एकात्म भारतीय समाज घडवण्याचं प्रबोधन मूल्य नक्कीच होतं.
देशाचा सांस्कृतिक इतिहास गौरवानं मांडताना वेद, उपनिषद, ब्राम्हणं, अरण्यकं श्रौतस्मार्त ग्रंथांबरोबरच वेदप्रामाण्य नाकारणाऱ्या बौद्ध आणि जैन दर्शनासह चार्वाक दर्शनाचाही यात समावेश होता. शिवाय इस्लामी सुफी मतातल्या सौहार्दाला गंगा जमनी तहजीब मानून तिचाही समावेश यात करण्यात आला. पण आजकाल या सर्वसमावेशकतेला आव्हान देणारे अनेक प्रवाह समाजात प्रबळ झालेत. अर्थात असे प्रवाह निर्माण होणं चुकीचं नाही. पण आधुनिक काळातही या प्रवाहांना मध्ययुगीन काळाच्या कट्टरतेनं ग्रासलंय.
वेद चातुर्वर्ण्य समर्थक आहेत हे उघडच आहे. शिवाय ते दैववादी आहेत आणि संपूर्ण श्रौतस्मार्त साहित्य वर्णव्यवस्थेचं समर्थन करतं, म्हणून ते नाकारावे असा विचार इसवी सनाच्या पूर्वी सातव्या शतकापासून समाजात आहे. तरीही वेदांचाच भाग असणाऱ्या उपनिषदांना सगळ्या समाजानं कधीही नाकारलेलं नाही. उपनिषदातला 'आत्मोदिपोभव' ही संकल्पना 'अत्त दिप भव' म्हणून स्वीकारली गेली.
पुढेही काळाच्या ओघात अनेक धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं होऊनही तिचा स्वीकार करण्यात आला. इस्लाम भारतात सुफी मतांच्या रूपात आल्यावर 'अहंम् ब्रह्मस्मी' हा विचार 'अन् हल हक' स्वरूपात काहींनी स्वीकारला! एकंदर जूनं पुर्णपणे न सोडता नवीन साच्यात टाकून त्याची नव्यानं मांडणी करत हा समाज घडलाय हे वास्तव आहे.
हेही वाचा: म्हणून आता आपण पारशी वाचवा मोहिम राबवायला हवी!
वैदिक धर्म भेदभाव करतो म्हणून वैदिक प्रतीकं नाकारायची तर आपल्या न्यायसंस्थेचं 'सत्यमेव जयते' हे प्रतीक मुंडकोपनिषदातलं आहे. उपनिषदं वेदांताचा भाग असून त्यांचा समावेश श्रुतीत होतो. यातलंच 'योग्यक्षेमंम् वहाम्यहम्' हे भारतीय आयुर्विमा महामंडऴाचं प्रतीक आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील.
आपल्या भारतीय वायुसेनेचं प्रतीक 'नभ:स्पृ.शं दीप्तंम्' हे 'नभ:स्पृबशं दीप्तिमनेकवर्ण व्यायत्ताननं दीप्त विशालनेत्रम्। दृष्ट्वाह हि त्वांम प्रव्य थितान्तपरात्मां धृतिं न विन्दा मि शमं च विष्णो ।।’
या गीतेतल्या ११ व्या अध्यायातल्या श्री विष्णुचा गौरव करणाऱ्या श्लोकांवर आधारलेलं आहे. आता गीता ही परंपरेनुसार गीतोपनिषद आणि श्रीकृष्ण स्मृती मानली जाते. चातुर्वर्ण्य समर्थकही मानली जाते. तर आता हे प्रतीक एखाद्यानं नाकारायचं म्हटलं तर फारच विचित्र स्थिती होईल.
समाजात वावरत असताना आपली वर्तणूक कशी असायला हवी, म्हणजे समाज आपली दखल तरी घेईल, हा विचार खूप महत्वाचाय. माझी एक मैत्रीण कुंकू लावणं आणि मंगळसुत्र घालणं हे स्त्रीपुरूष समतेच्या विरोधात असल्याचं म्हणते. तिचं म्हणणं योग्यही आहे. पण एका महिला मेळाव्यात तिनं कुंकू लावून घ्यायला नकार दिल्यामुळे प्रचंड विचित्र प्रसंग निर्माण झाला.
समाजातल्या प्रचलित मान्यतांनुसार कमी प्रमाणात का होईना काही लोकांची भावना म्हणून पाहायला हव्या. बरिस्टर ए. आर. अंतुले यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ श्रीवर्धनच्या महादेव मंदिरासमोर फोडला होता. तर मराठवाड्यातल्या अनेक गावात पोळ्याच्या बैलाची मिरवणूक ग्रामदैवत असणाऱ्या दर्ग्याच्या दर्शनाला येते.
महाराष्ट्रात आपण पाहतो की, अनेक सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी मुस्लिम असतात. तर दर्ग्याच्या उर्स कमिटीत हिंदू पदाधिकारी असतात. भारतीय संस्कृतीची ही सर्वसमावेशकता जशी भारतातल्या धार्मिक सौहार्दासाठी महत्वाची आहे तशी ती जातीय सौहार्दासाठीही महत्वाचीय.
सरस्वती पुजनाचा माझा अनुभव असा की, शाळेच्या दिवसांमधे अभ्यास न करणारेच माझे मित्र सरस्वती पुजनात अग्रेसर असायचे! पण एक असाही संदर्भ माझ्या वाचनात आलाय की, विजापुरचा इब्राहीम अली अदिलशाहा हा स्वत:ला सरस्वती देवीचा पुत्र समजायचा. त्यानं 'किताबे नवरस' या त्याच्या ग्रंथात श्री. सरस्वती आणि श्री.गणेश यांची वंदना रचलीय. भारतीय संस्कृती ही अशी आहे!
हेही वाचा:
आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?
यशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा
रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा
विशीतला तरुण सांगतोय, ग्रामपंचायत निवडणुकीचा जांगडगुत्ता
गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला