टीम इंडियाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकलीय. आजपर्यंत कधीच झाला नाही असा हा महापराक्रम आहे. त्यातून टीम इंडियाच्या जमेच्या पारड्यात खूप काही आलंय. पण अजूनही सुधारणेला खूप वाव आहे. आज या महत्त्वपूर्ण वळणावर टीम इंडियाचे प्लस मायनस तपासायची गरज आहे.
आतापर्यंत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात एकही क्रिकेट सीरिज जिंकली नव्हती. कॅप्टन विराट कोहलीने तब्बल ७१ वर्षानंतर भारतीय चाहत्यांचं हे स्वप्न साकार केलंय. या विजयामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. या सीरिजमधे टीम इंडियाने एक संक्रमण पूर्ण केल्याचं खुद्द कोहलीने सांगितलं. त्यामुळे या सीरिजमधल्या यश अपयशाचा ताळेबंद मांडणं गरजेचं आहे. कारण या दौऱ्याने टीमची आगामी काळातली दिशा ठरवलीय.
महेंद्रसिंह धोनीने २०१५ मध्ये टीममधून अचानक रिटायर होण्याची घोषणा केली. त्यानंतर कॅप्टनशीपची माळ कोहलीच्या गळ्यात पडली. त्याआधी तो वनडे टीमचं नेतृत्व करत होताच. त्यामुळे त्याला टेस्टमधे नेतृत्व करणं काही अवघड गेलं नाही. पण, टेस्ट ही ५ दिवसांची असते. इथे प्रत्येक सेशनमधे आपले वेगळे रंग दिसतात. त्यामुळे नेतृत्वाचा कस लागतो.
विराटची सुरवातीची काही वर्ष भारतात खेळत असल्याने ती स्वप्नवत गेली. पण जाणकारांना त्याच्या काही उणिवा जाणवत होत्या. त्या उणिवा विजयपथावर असताना झाकल्या गेल्या. पण परदेशात पाऊल ठेवल्यानंतर या उणिवांची जाणिव झाली. संघनिवड, बॉलिंग चेंजेसची विराटची गणितं चुकली. तसंच सेशनवरचं नियंत्रण राखण्यात अपयश येत होतं. टेस्टमधे वनडेसारखं आक्रमक खेळण्याचा अट्टाहस त्याला भोवला. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली.
पण, दोनेक परदेशी दौऱ्यातल्या बसलेल्या पराभवाच्या झटक्याने विराट चांगलाच भानावर आला. त्याने टेस्ट ही टेस्टसारखं खेळायला सुरवात केली. त्यामुळेच त्याने चेतेश्वर पुजाराच्या शैलीचा आदर केला. त्याचं फळ त्याला ऑस्ट्रेलियात मिळालं. याचबरोबर त्याने योग्यवेळी बॉलिंगमधे योग्य ते बदल केले. त्यामुळे सेशनवरची त्याची पकड चांगलीच मजबूत झाली. याचाच अर्थ, तीन वर्षानंतर विराटला आता टेस्टमधे कसं नेतृत्व हवं याची चांगलीच कल्पना आलीय.
ओपनर बॅट्समन म्हणून खेळायला येणं तसं स्पेशलिस्टसारखं असतं. तिथे कुणालाही फीट करून चालत नाही. ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्यापूर्वीच भारताचा ओपनर पृथ्वी शॉ सरावाच्या सामन्यात जायबंदी झाला. हा भारतासाठी मोठा धक्का होता. त्यामुळे पहिल्या दोन मॅचमधे भारताला फॉर्म हरपलेल्या मुरली विजय आणि लोकेश राहुलला खेळवण्यावाचून पर्याय उरला नाही.
पहिल्या दोन टेस्टमधे याचा भारताला चांगलाच फटका बसला. या ओपनिंग जोडीने दोन मॅचमधे चार डावात ३, ६३, ६ आणि ० धावांची सलामी दिली.
भारताने तिसऱ्या टेस्टमधे सलामीची जोडी बदलली. मयांक अग्रवालला संधी दिली. त्याने तीन डावात मिळून १९५ धावा केल्या. यामुळे भारताकडे आता सलामीसाठी चांगलेच ऑप्शन तयार झालेत. पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, मुरली विजय आणि शिखर धवन हे ऑप्शन आहेत. आता त्यांच्यात स्पर्धा निर्माण झालीय. त्याचा फायदा नक्कीच टीमला होईल.
टेस्ट टीममधला आघाडीचा बॅट्समन चेतेश्वर पुजाराने चार टेस्टमधे तब्बल ५०० हून अधिक रन काढले. ही भारताची या दौऱ्यातील जमेची बाजू आहे. आधी चेतेश्वर पूजाराची भारतीय उपखंडातला सर्वात चांगला टेस्ट बॅट्समन अशी ख्याती होती. या दौऱ्यात त्याने भारतीय उपखंडाबाहेरही दणदणीत सेंच्युरी ठोकू शकतो, हे त्याने सिध्द केलं. ऑस्ट्रेलियात ठोकलेल्या तीन सेंच्युरीमुळे पुजारा मॉडर्न क्रिकेटमध्ये फिट बसत नाही, असं म्हणणाऱ्यांची तोंडं बंद केलीत.
विराटने संघाची धूरा हातात घेतल्यावर सुरवातीच्या काळात पुजाराचं टेस्ट टीममधलं स्थान धोक्यात आलं होतं. आता या सीरिजमधल्या त्याच्या दमदार खेळीमुळे तो आता टेस्टमधे भारताचा आघाडीचा बॅट्समन म्हणून गणला जाईल.
भारतीय बॅट्समन आईच्या पोटातूनच फिरकीपटूला खेळण्याची कला शिकून येतात, असं बोललं जातं. या कलेचा सध्याच्या टीम इंडियातल्या बॅट्समनला विसर पडला होता. ते वनडे आणि टी २० खेळण्यात इतके मग्न होते की त्यांना रणजी ट्रॉफीत खेळून आपली फिरकी खेळण्याची कला तासून घेता आली नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये मोईन अलीने दमवलं. आता हाच कित्ता ऑस्ट्रेलियात नॅथन लायन गिरवणार असं पहिल्या टेस्टनंतर वाटत होतं. पण, दादाने कानमंत्र दिल्यानंतर भारतीय बॅट्समननी स्टंप आऊट होत लायनचा स्पिन काऊंटर केला.
भारतीय बॅट्समन विशेषतः नवोदित मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी लायनचा चांगला समाचार घेतला. सिडनीसारख्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर लायनला यश मिळू दिलं नाही. अजिंक्य रहाणेसाठी फिरकी खेळणं डोकेदुखीचं ठरत होतं. तरीही त्याने आपल्या फिरकी खेळण्याच्या शैलीत केलेला सकारात्मक बदल टीम इंडियासाठी दिलासा देणारा आहे. त्यामुळे आता भारत फिरकीपुढे नांगी टाकण्याची नामुष्की येणार नाही, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
टीम इंडियाच्या इतिहासात फिरकीच्या तिकडी तसंच जोड्यांची मोठी परंपरा आहे. पण अशीच परंपरा आता फास्ट बॉलिंग डिपार्टमेंटमधेही सुरु झालीय. होल्डिंग मार्श आणि गार्नर ही वेस्ट इंडिजची, मॅग्रा, ब्रेट ली आणि गिलेस्पीची ऑस्ट्रेलियाची तिकडी होती. तशीच भारताचीही तिकडी आता नावारुपाला येत आहे.
बुमराह, शामी आणि इशांत भारतात एक वेगळं फास्ट बॉलिंग कल्चर तयार करत आहेत. त्यांनी मिळवलेलं यश हे भारतातल्या अनेक फास्ट बॉलरांच्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. या दौऱ्यात भारताने ऐहिासिक विजय मिळवण्यात या फास्ट बॉलरांचा मोलाचा वाटा आहे.
धोनी रिटायर झाल्यापासून टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने दिनेश कार्तिक, पार्थिव पटेल आणि वृध्दीमान साहा यांना ट्राय करून बघितलं. पण धोनीसारखा बॅटिंग आणि किपिंग दोन्ही रोल चांगल्या पद्धतीने करणारा विकेटकिपर मिळाला नाही. पण हा शोध या सीरिजने संपला. ऋषभ पंतच्या रुपाने आपल्याला विकेटकीपर मिळालाय.
त्याने अवघ्या ९ टेस्ट मॅचमधे दोन सेंच्युरी ठोकल्या आहेत. त्यातली एक इंग्लंडमध्ये तर एक विक्रमी सेंच्युरी ऑस्ट्रेलियात ठोकलीय. पंतने विकेटच्या मागेही विक्रमी कामगिरी केलीय. त्याने आतापर्यंत फक्त दोनच टेस्ट सीरिज खेळल्यात. त्यात त्याने भारताचा सर्वात चांगला विकेटकीपर असलेल्या धोनीचे अनेक विक्रम मोडलेत.
रवींद्र जडेजा टीम इंडियात आला त्यावेळी तो अष्टपैलू म्हणून आला. पण त्याची बॅटींगमधली कामगिरी म्हणावी तशी होत नव्हती. त्यामुळे त्याला टीममधलं आपलं स्थानही गमवावं लागलं होतं. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या फलंदाजीला बहर आला. याचबरोबर त्याने शेवटच्या दोन टेस्टमधे आपल्या बॉलिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या चमकदार कामगिरीमुळे त्याचं टीममधलं स्थान पक्कं झालं.
जवळपास एक वर्षांपासून टेस्ट टीममधे रिस्ट स्पिनराचा बोलबाला होता. त्यात या डावखुऱ्या फिरकी बॉलरचं करिअर संपलं की काय असं चित्र निर्माण झालं होतं. पण अजूनही ऑर्थोडोक्स स्पिनरमध्ये दम असल्याचे त्याने या दौऱ्यात सिद्ध करून दाखवलं. भारताची ही ऐतिहासिक कामगिरी असली तरी त्यात काही उणिवाही राहिल्यात.
वनडे आणि टी-२० मध्ये धावांचा पाऊस पडणारा रोहित टेस्टमधे साइड लाईन झाला होता. त्याला जवळपास वर्षभराने टेस्ट खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचा काही प्रमाणात फायदाही उठवला. पण सेट झाल्यावर बाद होण्याने त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही.
शतकी खेळी करण्याची संधी असूनही ती त्याने दवडली. आता त्याच्या डोक्यावर हनुमा विहरी आला आहे. त्यामुळे आता संधीत वाटणी आली. त्यामुळे त्याचं टेस्ट करिअर सेटल व्हायला आणखी वेळ लागू शकतो.
विराट कोहली आणि कांगारूंचं मैदानावरच नातं विळ्या भोपळ्यासारखं आहे. हा भोपळा कितीही विळीपासून दूर ठेवला तरी तो विळीवर जाऊन बसणारच. विराटने स्लेजिंग करणार नाही, असं अश्वसन दौऱ्याला निघण्यापूर्वी दिलं असलं तरी त्याने हा जुमला असल्याचं पहिल्याच टेस्टमधे सिद्ध करून दाखवलं.
विराटच्या मैदानावर वात्रट वागण्याने मोठ्या विजयालाही गालबोट लागतं. याही दौऱ्यात असंच झालं. एका कॅप्टनला तू टीमचा नेता आहेस याची पंचानी आठवण करून देणं हे लाजिरवाणं आहे. वात्रटपणा टाळण्याचा सल्ला देऊन जुनेजाणते खेळाडूही आता थकलेत. कंटाळलेत. पण विराटचा वात्रटपणा काहीकेल्या कमी होताना दिसत नाही.
या दौऱ्यात भारतीय बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. तरी इंग्लंड दौऱ्यासारखं ऑस्ट्रियातही शेपटाने भारताला काही प्रमाणात दमवलं. भारतीय गोलंदाजांनी शेपूट लवकर गुंडाळलं असतं तर त्यांच्या बॉलिंगचा दरारा अधिकच वाढला असता. शेवटी कंप्लिट डॉमिनेट करायला कोणाला आवडत नाही. हे झाले असते तर सोनेपे सुहागा म्हणता आलं असतं.
(लेखक पत्रकार आहेत. ते ज्युनियर लेवलवर महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळलेत.)