देशभरात राष्ट्रवादाचं भरतं आलंय. आपला मेनस्ट्रीम मीडियाही यात वाहवत जातोय. असत्यालाच सत्य म्हणून लोकांसमोर मांडलं जातंय. याला आधार आहे तो खोट्या बातम्यांचा. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाललंय. हे खरंच पत्रकारांना समजतंय की समजून घ्यायचं नाही.
१४ फेब्रुवारीपासून मी अनेक कागदी आणि काचेवरच्या युद्ध पिसाटांच्या तावडीत सापडलो होतो. मीच काय अवघा भारतच सापडलाय. दारिद्र्य, बेकारी, दुष्काळ, पाणी टंचाई, विषारी दारुचे बळी, स्त्री-प्रश्न अशा कितीतरी समस्या या पिसाटांना घाबरुन दडून बसल्या होत्या. पाकडे, फेकीस्तान, आतंकीस्तान अशी नामांतरं कानावर आदळली. तशी तंतरली, घुसून मारले, टरकली अशी क्रियापदंही पर्याय म्हणून आली. सामना वाचणं केव्हाच सुटलं होतं, काही दिवस सारी माध्यमं जणू ‘सामना’चे पत्रकार असल्याच्या भाषेत चालत होते.
इंग्रजीत ‘राइट ऑर राँग, माय कंट्री’ असं म्हणतात. त्याचा देशभक्तीशी संबंध आहे. खरंही असतं तसं. आपण जिथं जगतो तो देश खलास झाला तर व्हायचं कसं? पण डॉक्टर, पत्रकार, संशोधक, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, औषधनिर्माते या व्यावसायिकांना ‘काहीही असो – कसाही असो, माझा देश आधी’ असं म्हणता येईल का?
अग्रक्रम असला पाहिजे. पण दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. जवानाला, सैनिकाला बाजू नसते. त्याच्याकडे आपण किंवा शत्रू एवढाच पर्याय असतो. तो योग्यही असतो. मग पत्रकार आपल्या कार्यालयाच्या बंकरमधे बसून आणि शाब्दिक गोळीबार करून जवानासारखं का वागला? जे आपल्याला माहीत नाही ते लोकांना द्यायचं नाही हा पत्रकारितेचा एक सिद्धांत आहे.
लढाई, शस्त्रं, सीमा, वाहनं, शिस्त, जोखीम या गोष्टी कशाशी खातात याची जाण नसलेले स्त्री पुरुष पत्रकार एकाएकी युद्धशास्त्राचे जाणकार होऊन गेल्यावर काय होणार? व्हायचं तेच झालं.
सारा मास मीडिया त्याच्या परंपरांसहित, सोशल मीडिया आणि त्याच्या परंपरा यांच्या तावडीत सापडला. अतिशयोक्ती, असत्य, अफवा, अतर्क आणि असभ्यता यांचा अधर्म मास मीडियात माजला. मास मीडियानं एक धर्म पाळायचा असतो तो म्हणजे संविधानाचा.
सोशल मीडियाचा जन्मच मुळी परदेशी बाजारव्यवस्थेसाठी झाला. बाजाराला कसला आलाय धर्म म्हणून सत्य, संस्कृती, सभ्यता आणि समाजहित हे त्याच्यातले अडथळे आहेत. अधर्मात सहिष्णुतेला जागा नसते की सभ्यतेचा मुक्काम नसतो. सत्य तर पिटाळूनचं लावलं जातं. अतिरेक आणि पत्रकार यांचा काही संबंध नसतो. इथे तर अतिरेकी कोण हेच समजेना.
अल जझीराचे प्रतिनिधी भारताने जो तळ उध्वस्त केला तिथं जाऊन काय आढळलं? माणसं मारली गेल्याचे किंवा इमारत नष्ट झाल्याचे कसलेचं पुरावे तिथं नव्हते. एक पाटी होती. ती उर्दूत मदरशाची माहिती देत असल्याचं एक वार्ताहर सांगत होता. मग ३५० दहशतवादी ठार झाल्याचं भारतीय पत्रकार का सांगत राहिले? अशा अतिरेकी अपेक्षांचा भंग जर तितक्याच वेगाने झाला तर तमाम पत्रकारांवरचा लोकांचा विश्वास उडून जाईल की नाही?
विमानं, बॉम्बफेक, जाळ, नकाशे, डोंगर वगैरेची संगणकीय आभासी सजावट, तारस्वरात चाललेली वार्तांकनं आणि पार्श्वसंगीताचा दणदणाट यात खरी माहिती बिचारी जायबंदी झाली. कोण्या वाहिनीवर सैनिकी गणवेशात बातम्या देण्याचा प्रकारही झाला म्हणे. बापरे! चांगली माणसं दबावाखाली कोणत्या थराला जातात याची ही चुणुकच म्हणावी लागेल. युद्ध नको असं म्हणणाऱ्या शांततावाद्यांना हे खोट्या खोट्या गोळ्या घालून मारून टाकल्याचे ग्राफिकही करतील. काय भरोसा.‘अंधाधुन’ नावाचा सिनेमा पाहिला. त्यातली सारी पात्रं एकमेकांचा वापर करुन काही तरी स्वार्थ साधणारी आहेत. गुन्हेगारी वृत्तीची. दिग्दर्शक सुचवतो, की एक काळ असा येतो की कोणाचाच चांगुलपणावर विश्वास राहत नाही. सर्वत्र अंदाधुंदी पसरते.
आजचा काळ हा राष्ट्रवादाचा आहे. तो देशभक्तीच्या रूपात आपल्यावर मोहिनी घालतोय. देशभक्त वेगळा, राष्ट्रवादी वेगळा. देशभक्ती स्वाभाविक असते. राष्ट्रवाद एक कुटिल डावपेच आहे. आपली माध्यमं या डावपेचांना बळी पडलीत. अलीकडे प्रसारमाध्यमांत कमी पैशात राबणाऱ्या युवकयुवतींची भरती मुद्दाम केली जातेय.
समज कमी आणि कामाचा उरक भरपूर अशा या कष्टकऱ्यांना राष्ट्रवाद, देशप्रेम, आंतरराष्ट्रीय संबंध, राजकारणाचा स्वार्थ या गोष्टींचा काहीच पत्ता नसतो. ते सहजपणे प्रचारक बनून जातात. कित्येकदा देश आणि सरकार यांतला फरकही अस्पष्ट केला जातो. आपण देशाची बाजू घेतोय की सरकारची हेही कळत नाही. त्यामुळे सरकारच्या स्वार्थापायी देशाचं नुकसान होतंय याकडे पत्रकार म्हणून लक्ष जात नाही.
जे ४० जवान दहशतवाद्यांनी मारले त्याला सरकारची बेफिकिरी आणि उपेक्षा जबाबदार होती. लोकांनी हे समजून घ्यायच्या आत प्रचारकांची फौज प्रसारमाध्यमांत घुसली आणि तिने पत्रकारांच्या खांद्यावरून सामान्य प्रेक्षक आणि वाचक यांच्या खरी माहिती मिळवण्याच्या अधिकाराचा खात्मा केला. जनतेलाही माशी मारायला तोफेची गरज भासू लागली. खरंच माध्यमं संवादाचं काम करतात की विसंवादाचं?
(लेखक हे ज्येष्ठ माध्यम विश्लेषक आहेत.)