इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

१२ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतीय अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा आज शंभरावा बर्थ डे. आज गूगलनं डूडल करुन त्यांचं काम सेलिब्रेट केलंय. साराभाईंनी रचलेल्या पायावरच भारताने आता चांद्रयान मोहीम आखलीय. यातल्या एका यानालाही साराभाईंचं नाव देण्यात आलंय.

अवकाश संशोधन क्षेत्र आज जे काही दिसतंय ते केवळ विक्रम साराभाई यांच्या संशोधन आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे. नावीन्य हा त्यांच्या अवकाश संशोधन मोहिमेतला महत्वाचा भाग होता. त्यांना भारतीय अवकाश संशोधनाचे जनक म्हटलं जातं ते यामुळेच. ते जसे वैज्ञानिक होते तसेच उत्तम उद्योगपती होते. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था पाहिल्या की हे लक्षात येतं.

बालपण सुखवस्तू कुटुंबात

अहमदाबादच्या एका कापड विक्रेत्याच्या घरात १२ ऑगस्ट १९१९ मधे विक्रम साराभाईंचा जन्म झाला. त्यांचा जन्म एका सुखवस्तू कुटुंबात झाला. लहानपणापासून त्यांना विज्ञानामधे आवड होती. आई वडलांनी उभ्या केलेल्या रिट्रीट या शाळेत त्यांचं शिक्षण झालं. याच शाळेत विज्ञान आणि संशोधनासाठीचं वेगळं वर्कशॉपही होतं.

मोतीलाल नेहरु, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरु, सरोजिनी नायडू, मौलाना आजाद, सी. वी. रमन अशा त्यावेळच्या मोठ्या व्यक्तींशी त्यांच्या कुटुंबाचा घरोबा होता. त्या सगळ्यांचं त्यांच्या घरी येणं जाणं असायचं. महात्मा गांधीही त्यांच्या घरी येऊन गेलेले होते. या सगळ्या गोष्टींचा परिणामही त्यांच्या बालमनावर झालेला होता.

शिक्षण आणि संशोधनाला सुरवात

१९४० ला विक्रम साराभाई महाविद्यालयीन शिक्षणासाठी अमेरिकेतल्या केंब्रिज युनिवर्सिटीत गेले. तिथल्या सेंट जॉन्स कॉलेजमधे नैसर्गिक विज्ञान शिकले. दुसरं महायुद्ध सुरु झाल्यावर बंगळूरुला आले. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंसमधे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी. वी. रमन यांच्या मार्गदर्शनात त्यांनी  रिसर्चर म्हणून काम सुरु केलं. १९४५ मधे पुन्हा केंब्रिजला गेले आणि तिथं १९४७ मधे पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.

घरी आल्यावर त्यांनी अहमदाबादेत फिजिक्स रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. आईवडलांनी स्थापन केलेल्या विज्ञान संस्थेत या प्रयोगशाळेचं काम चालू झालं. त्याला नंतर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च काउंसिल आणि डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जीचाही पाठिंबा मिळाला. १९४७ मधे क्लासिकल डांसर मृणालिनी यांच्याशी त्यांचं लग्न झालं.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

अनेक संस्था उभ्या केल्या

साराभाईंनी अनेक संस्था उभारल्या. अनेक संस्थांच्या उभारणीत योगदान दिलं. यामधे अहमदाबादेत इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, दर्पण एकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस, कम्युनिटी सायंस सेंटर, स्पेस एप्लिकेशन सेंटर या संस्थांची स्थापना केली. कल्पक्कम इथे फास्टर ब्रिडर टेस्ट रिएक्टर, कोलकात्यात वॅरिएबल एनर्जी सायक्लोट्रोन प्रोजेक्ट, हैद्राबादमधे इलेक्टॉनिक कार्मोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि बिहारच्या जादुगडा इथे युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्था उभ्या केल्या.

१९५७-५८ हे वर्ष आंतरराष्ट्रीय जिवोफिजिक्स वर्ष म्हणून साजरं झालं. भारतात हा कार्यक्रम साराभाईंच्या नेतृत्वात पार पडला. काही काळ ते मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीमधे विजिटिंग प्रोफेसरही होते. १९६६ मधे एका विमान अपघातात होमी भाभा यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी एटॉमिक एनर्जी कमिशनचा भार सांभाळला.

इस्रोचे पहिले चेअरमन

वैज्ञानिक पद्धतीनं ते विचार करायचे. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक घटनेकडे पहायचा एक दृष्टीकोन होता. त्यांनी स्पेस प्रोगामची सुरवात तिरुवनंतपुरमच्या थुंबा या गावातून केली. इथं ऑफिसही नव्हतं आणि इन्फ्रस्ट्रक्चरही. तरीही तरूण वैज्ञानिकांना सोबत घेऊन त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलं.

अंतराळाच्या अभ्यासासाठी सॅटेलाईटची गरज होती. तेव्हा एका स्पेस रिसर्च संस्थेची उणीव भासली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु आणि होमी भाभा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. १५ ऑगस्ट १९६९ मधे त्यांनी इस्रोची स्थापना झाली. विक्रम साराभाईंना या संस्थेचं चेअरमन करण्यात आलं. त्यांनी खुप कमी काळ मिळूनही संशोधनाच्यादृष्टीनं भरीव काम केलं.

हेही वाचा: चांद्रयान २ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान

चांद्रयान २ ला साराभाईंचं नाव

साराभाई यांच्या काळात स्पेस प्रोग्राममधे हजारोंच्या संख्येनं स्टाफ जोडला गेला होता. टेक्नॉलॉजीपासून शेती, जंगल, महासागर, भूविज्ञान ते अगदी नकाशा तयार करण्यापर्यंत सगळ्यावर संशोधन केलं जात होतं. जगभरातल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन त्यांनी भारतातलं अवकाश संशोधन क्षेत्र विकसित केलं. इस्रोने चांद्रयान मोहिमेला एका लँडरला विक्रम हे नाव देऊन साराभाई यांच्या कार्याचा गौरव केलाय.

डॉ. विक्रम साराभाई यांना १९६२ मधे शांति स्वरुप भटनागर पुरस्कार मिळाला. १९६६ मधे त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. १९७२ मधे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. हा सगळा त्यांच्या स्पेस संशोधनातल्या योगदानाचा सन्मान होता. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. जगभरातल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन त्यांनी भारतातलं अवकाश संशोधन क्षेत्र विकसित केलं. ३० डिसेंबर १९६९ ला वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

इस्रो साजरं करतंय जन्मशताब्दी वर्ष

विक्रम साराभाई हे इस्रो या भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक. या संस्थेनं विक्रम साराभाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर भरगच्च कार्यक्रमाचं नियोजन केलंय. शाळेच्या मुलांसाठी प्रदर्शन, वेगवेगळ्या स्पर्धा, पुरस्कार आणि तसंचं अनेक मान्यवरांची भाषण असं हे स्वरुप असेल.

१२ ऑगस्ट २०१९ ते १२ ऑगस्ट २०२० या काळात कार्यक्रम असेल. १२ ऑगस्टला उद्घाटनाचा कार्यक्रम अहमदाबाद इथं असेल. तर समारोपाचा कार्यक्रम तिरुवनंतपुरम इथं होईल. त्यांच्यावरच्या एका कॉफी टेबल बूकचं प्रकाशनही याच कार्यक्रमात होणार आहे. त्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. एकंदर विक्रम साराभाईंचं जन्मशाताब्दी वर्ष हे त्यांच्या कामाची आठवण करुन देणारं असेल हे नक्की.

हेही वाचा: 

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही