टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

१४ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


क्रिकेट वर्ल्डकपमधली टीम इंडियाची कामगिरी एखाद्या पटकथेला शोभावी अशी राहिली. आपण सगळ्या मॅच जिंकून फायनलमधे इंग्लंडला चारी मुंड्या चीत करणार इथपर्यंत भारतीय चाहत्यांनी गृहित धरलं होतं. पण सेमी फायनलमधे न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभवाचं तोंड दाखवलं. या पराभव भारतीय चाहत्यांसाठी धक्कादायक होता.

क्रिकेट वर्ल्डकपमधून टीम इंडिया बाहेर गेली आणि अनेकांना मानसिक धक्का बसला. कारण साखळीत फक्त एकच पराभव पत्करणाऱ्या या संघाची वाटचाल विश्वविजेता बनूनच संपणार असं ज्याला त्याला वाटत होतं. तशात सेमी फायनलमधे न्यूझीलंड बरोबर गाठ पडली. त्यामुळे टीम इंडिया सहज फायनलमधे पोचणार असं गृहीत धरलं गेलं होतं. फायनल इंग्लंडविरुद्ध होणार आणि त्यांना वेगवान शैलीत हरवलं जाणार असंही सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांनी गृहित धरून ठेवलं होतं.

हेही वाचाः सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर

कमतरतेकडे नेहमीसारखंच दुर्लक्ष

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, ही बाब भारतीय चाहते नेहमीच दुर्लक्षित करतात. आणि आपल्या खेळाडूंना ‘रजनीकांत’ समजतात. ते काहीही करू शकतात असा अनेकांचा समज आहे. मोठी स्वप्नं बघायची आणि त्यात रमायचं ही भारतीयांची सवय आहे. स्वप्न जरूर बघावीत. महत्वाकांक्षी असावं हे सगळं खरयं. पण शेवटी वास्तव बघायचं असतं.

टीम इंडियाला या स्पर्धेत अक्षरशः खुला वाव मिळाला होता. अनेक मॅच टीम इंडियाच्या सोयीच्या होत्या. खेळपट्ट्यामधला डंख काढून घेण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे या मॅच बघायला भारतीय एकच गर्दी करतात. त्यांचा उत्साह अफलातून असतो. तसंच भारतीय क्रिकेट मंडळ सर्वात श्रीमंत आहे. वर्ल्डकप स्पर्धेला प्रायोजित करणारे सर्वाधिक पुरस्कर्ते भारताकडून होते.

याशिवाय टीवी प्रेक्षकांची संख्यासुद्धा टीम इंडियाच्या मॅचचं टाईमटेबल ठरवताना लक्षात घेतली गेली होती. म्हणून तर टीम इंडियाच्या मॅच शनिवार, रविवारी होते. टीम इंडिया जेवढी चांगली कामगिरी करेल तेवढा गल्ला भरणार होता. आणि सट्टेबाजारसुद्धा गरम होणार होता. या सर्व गोष्टींमुळे टीम इंडियाची घोडदौड दमदारपणे सुरु होती.

न्यूझीलंडने सगळे आडाखे मोडले

न्यूझीलंडविरुद्ध भारताचे बिनीचे तीन बॅट्समन प्रत्येकी एक रन काढून बाद झाले. आणि तिथेच मॅचची सूत्रं न्यूझीलंडकडे गेली. नंतर धोनी-जडेजा यांची फटकेबाजीही तमाम भारतीय प्रेक्षकांना दिलासा देण्यासाठी होती. अन्यथा पाकिस्तानी चाहत्यांना नावं ठेवणाऱ्या भारतीय चाहत्यांची मनोवृत्तीही वेगळी नाही. त्यांच्याकडून खेळाडूंना शिवीगाळ ठरलेली होती.

आता झुंज देऊन पराभूत झाल्याने कुणी खेळाडूंना अधिक दोष देणार नाही. अगदी पटकथा लिहिलेली असावी तसं सगळं घडत होतं असं कुणालाही वाटेल. भारताचे लाड करायचे तेव्हा केले गेले. फायनलमधे कुणीही असलं तरी गर्दी होतेच. साहजिकच टीम इंडियाला ढिला दोर दिला गेला होता.

भारतीय चाहते किती उतावीळ आणि गुडघ्याला बाशिंग बांधून असतात याची आता सर्वांनाच कल्पना आलीय. ढोलताशे घेऊन, तोंड रंगवून, झेंडे फडकावून, नाचून आरडाओरडा करून सहलीसारखे येणाऱ्या त्या उल्लू प्रेक्षकांची खरंच कीव वाटते. असा धांगडधिंगा भारतात बहुतेक ठिकाणी चालतो. पण इंग्लंडमधे सुशिक्षित, सुजाण आणि सुसंस्कृत असा भारतीय तिथं असलेल्या समजला खोटं ठरवणारी मस्ती होती.

हेही वाचाः टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे

भारतीयांना उल्लू कोण बनवतं?

गेल्या काही वर्षांत उन्माद ही भारतीयांची ओळख झालीय. भारत महासत्ता बनणार अशी स्वप्नं दिली गेल्यापासून हा उन्माद वाढताना दिसलाय. भारताने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा अशी ही उन्मादाची जात आहे. भारतीयांना भारतीयच उल्लू बनवत आलेत. कारण भारतीय भावनाशील आहे. प्रसिद्ध समीक्षकांनीसुद्धा हवा बघून टीम इंडियाचे गोडवे गायले.

कुणी हे लक्षात घेत नाहीये की टीम इंडियाची मधली फळी कमकुवत होती. चौथ्या क्रमांकासाठी कोण खेळायला येणार हे शेवटपर्यंत ठरलंच नाही. रिषभ पंतला बळेबळे चौथ्या क्रमांक दिला गेला. पण ही चाल चालली नाही. विजयशंकर, कार्तिक यांची निवड योग्यच नव्हती. केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी हे मॅच जिंकून देणारे बॅट्समन उरलेच नव्हते.

पराभवाच्या इतिहासाकडे कानाडोळा

कुलदीप, चहल आणि पंड्या हे अति चढवले गेलेले होते. तर भुवनेश आणि शमी यांच्यात डावा, उजवा ठरवणं कठीण झालं होतं. एकूण हा संघ समतोल आणि मजबूत नव्हताच. रोहित शर्माला सुदैवाने डावाच्या सुरवातीलाच चार वेळा जीवदानं मिळाली. आणि ही साथ सेमी फायनलमधे काही लाभली नाही.

आपण पाकिस्तानला हरवल्यानंतर खूपच जोशात होतो. पण पराभवाने आता सर्वांना जमिनीवर आणलंय. आपण पाकिस्तानला वर्ल्डकपमधे नेहमी हरवलंय. पण न्यूझीलंडनसुद्धा भारताला नेहमीच पराभूत केलंय हा इतिहास कुणी लक्षात घेतला नाही. हीच मोठी चूक झाली.

हेही वाचाः 

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे

देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

अंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत

वर्ल्डकप जिंकलेल्या टीममधले खेळाडू नंतर काय करतात?