एक्सई वेरियंट: ओमायक्रॉनचं नवं वर्जन, वाढवतंय टेंशन?

१२ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ३ मिनिटं


मुंबई आणि गुजरातमधे ओमायक्रॉनचा नवा एक्सई वेरियंट आढळून आला होता. हा वेरियंट याआधीच्या बीए.२.च्या तुलनेत दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. त्यामुळे टेंशन वाढलं होतं. मुंबईत आढळलेल्या पेशंटमधे मात्र एक्सई वेरियंट नव्हताच असा दावा केंद्रीय आरोग्य खात्याने केलाय.

कोरोनाच्या नव्या एक्सई वेरियंटच्या केसेस भारतात आढळून आल्यात. इतर वेरियंटच्या तुलनेत एक्सई दहा पट अधिक वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं म्हटलं होतं. ६ एप्रिलला मुंबईत एक्सई वेरियंटची पहिली केस आढळून आली. तर ९ एप्रिलला गुजरातमधे केस आढळून आल्यामुळे टेंशन वाढलं होतं.

चीनमधेही ओमायक्रॉनच्या केसेस वाढतायत. तिथं अनेक शहरांमधे लॉकडाऊन लावला जातोय. एक्सई वेरियंटच्या केसेस भारतात आढळल्यामुळे खबरदारी म्हणून भारत सरकारनंही ८ एप्रिलला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिलंय. त्यात राज्यांसाठी अनेक गाईडलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत.

एक्सई ओमायक्रॉनचं नवं वर्जन

ओमायक्रॉन वेरियंटमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट आली होती. या ओमायक्रॉनचे दोन उप-प्रकार आहेत. बीए.१ आणि बीए.२. यातलं बीए.२. हे वर्जन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवेळी सगळ्यात जास्त ऍक्टिव असल्याचं आणि त्याला सहजासहजी ट्रॅक करता येत नव्हतं. त्यामुळे बीए.२. कोरोनाचा वेगाने संसर्ग व्हायचं सगळ्यात मोठं कारण ठरलं होतं.

जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओच्या मते, ओमायक्रॉनचं बीए.२. हे वर्जन मागच्या काही महिन्यांमधे जगभर पसरतंय. त्याचवेळी बीए.१. आणि बीए.२.मधे प्रमाणेच अजून एक म्युटेशन आढळून आलंय. त्यालाच एक्सई वेरियंट असं म्हटलं जातंय. त्याआधी यात एक्सडी, एक्सएफ ही म्युटेशन आढळून आली होती.

१९ जानेवारीला इंग्लंडमधे पहिल्यांदा एक्सई वेरियंटची केस आढळली होती. भारतात कोरोनाच्या केसेस मागच्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार करता वेगाने घटतायत. पण दहा पट अधिक वेगाने वाढणारा एक्सई वेरियंट मात्र आपलं टेंशन वाढवू शकतो. इंग्लंडमधे हा वेरियंट आढळून आल्यावर आतापर्यंत जगभरातल्या ६०० पेक्षा अधिक लोकांचे नमुने टेस्टसाठी घेण्यात आल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलंय.

हेही वाचाः कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

एक्सई धोकादायक नाही

६ एप्रिलला डब्ल्यूएचओनं एक्सई वेरियंटला ट्रॅक केलं जात असल्याचं म्हटलं होतं. शिवाय हा वेरियंट बीए.२. च्या तुलनेत दहा पटीने पसरेल असं म्हटलं होतं. पण हा वेरियंट इतकाही धोकादायक नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मागच्या तीन महिन्यांमधे या वेरियंटच्या केसेसमधे फार काही वाढ झालेली नाही.

'असे वेरियंट पुढेही येत राहतील. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. एक्सई वेरियंट जास्त धोकादायक नसेल. पण वेळीच खबरदारी घ्यायला हवी.' असं प्रसिद्ध साथरोगतज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी 'द क्विंट'च्या एका छोटेखानी इंटरव्यूमधे म्हटलंय.

वेरियंटच्या अभ्यासात त्रुटी?

दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या महिलेमधे एक्सई वेरियंट आढळून आल्याचं म्हटलं होतं. तिच्या संपर्कात आलेल्या २३० जणांची टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी २२८ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला होता. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलच्या लॅबमधे या टेस्ट नीट झाल्या नसल्याचं आणि त्यात त्रुटी असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटलं होतं. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक'कडून त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली होती.

'ग्लोबल इनिशिएटीव ऑन शेअरिंग ऑल इन्फ्यूएंजा डाटा' हा एक महत्वाचा आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. इथं जगभरातल्या जिनोम सिक्वेन्सिगची माहिती गोळा केली जाते. जगात कुठंही नवा वेरियंट आढळून आला तर त्यासंबंधीची माहिती पहिल्यांदा इथं टाकली जाते. त्याचा अभ्यास केला जातो. कस्तुरबा हॉस्पिटलच्या लॅबमधल्या टेस्ट याच पद्धतीने केल्या गेल्याचं म्हटलंय.

मुंबईतल्या केसमधे मात्र चुकीच्या पद्धतीने टेस्ट झाल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटलं होतं. त्याच वेळी गुजरातच्या व्यक्तिमधे आढळून आलेल्या वेरियंट ची टेस्ट कोलकात्याच्या एका लॅबमधे करण्यात आली होती. त्याच्या जिनोम सिक्वेन्सिगनंतर तो एक्सई वेरियंटशी जास्त मिळता जुळता असल्याचं म्हटलं होतं.

हेही वाचाः 

कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं