'ग्लोबल हंगर इंडेक्स' भारताला आरसा का दाखवतोय?

१५ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


२०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' म्हणजेच भूक निर्देशांक जाहीर झालाय. ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या नंबरवर आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आपली कामगिरी फार खराब आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ हे शेजारी देश आपल्यापेक्षा सरस ठरलेत. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं याआधी म्हटलं होतं. अशावेळी हा रिपोर्ट महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

कोरोना वायरसनं सर्वसामान्य माणसांचं अक्षरशः कंबरडं मोडलं. ज्यांचं हातावर पोट होतं अशा लाखो लोकांचा या वायरसनं जीव घेतला. वायरसपेक्षाही भीषण होतं ते म्हणजे घरची चूल न पेटणं. आकडेवारी आली असेल नसेल पण दोन वेळचं पुरेसं अन्न न मिळाल्यामुळे कितीतरी लोकांना या कोरोना काळात उपाशीपोटी झोपावं लागलंय.

जगभर हे होत होतंच. भारतही याला अपवाद नव्हता. लॉकडाऊनच्या काळात इतर राज्यांमधल्या मजुरांचे झालेले हाल आपण टीवी, सोशल मीडियातून पाहिले असतील. अनवाणी चालतानाच्या रक्तबंबाळ पायांनी आपल्याला अस्वस्थही केलं असेल. दुसरीकडे कोरोना काळात बड्या उद्योपतींच्या वाढणाऱ्या संपत्तीच्या बातम्याही आपण ऐकल्या असतील.

भारतानं महासत्ता व्हायची स्वप्न पाहणं चुकीचं नाही. पण ही स्वप्न पाहताना आपले पाय जमिनीवर हवेत. असाच आपल्याला जमिनीवर आणणारा २०२१चा 'ग्लोबल हंगर इंडेक्स' आलाय. या रिपोर्टनं जगभरातलं भूक निर्देशांकाचं वास्तव मांडत असताना महासत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी काही धोक्याचे इशारेही दिलेत.

हेही वाचा: साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

असा तयार होतो रिपोर्ट

'ग्लोबल हंगर इंडेक्स' अर्थात जीएचआयचा रिपोर्ट दरवर्षी प्रकाशित होत असतो. आयर्लंडची 'कन्सर्न वर्ल्डवाइड' आणि जर्मनीची 'वेल्ट हंगर हिफ्ले' या संस्था हा रिपोर्ट तयार करत असतात. लोकांच्या पोटाची भूक भागवण्यासारख्या मूलभूत गोष्टीत जगभरातले देश नेमके कुठेयत हे या रिपोर्टमधून कळत असतं. त्यामुळेच ही आकडेवारी फार महत्वाची ठरते.

जीएचआयमधे ज्या देशांचा स्कोर कमी त्यांची कामगिरी चांगली आहे असं समजलं जातं. त्यांना वरची रँक मिळते. ज्यांचा स्कोर जास्त आहे त्यांची कामगिरी मात्र खराब समजली जाते. २०३० पर्यंत भूक निर्देशांक शून्यावर आणणं हे संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास कार्यक्रमाचं एक ध्येय आहे. एखाद्या व्यक्तीमधे किती कॅलरी आहेत यावरून या ग्लोबल हंगरचा अंदाज लावला जातो.

जीएचआयचा स्कोर काढण्यासाठी चार प्रमुख घटक असतात. कुपोषण, वजन, उंची आणि बालमृत्यूचं प्रमाण. स्कोरनुसार इंडेक्सचं कमी, मध्यम, गंभीर, धोकादायक, जास्त चिंताजनक असं वर्गीकरण केलं जातं. हा इंडेक्स जगभरातल्या देशांमधे उपासमारीसंबंधीची धोरणं, उपाययोजना राबवण्यासाठी मदत करत असतो.

भारत, पाकिस्तान-बांगलादेशच्या मागे

या इंडेक्समधे भारत ११६ देशांच्या यादीत १०१ व्या नंबरवर आहे. उपासमारीचं संकट अतिशय भीषण असलेल्या ३१ देशांमधे भारताचा नंबर लागतोय. २०२० मधे आपण जगातल्या १०७ देशांमधे ९४ व्या नंबरवर होतो. आपला जीएचआय स्कोर फार घसरल्याचं 'ग्लोबल हंगर इंडेक्स'च्या आकड्यांवरून स्पष्टपणे दिसतंय.

२००० मधे आपला जीएचआय स्कोर हा ३८.८ टक्के होता. २०१२ला २८.८ तर २०२१ला हाच स्कोर २७.५ वर पोचलाय. भारतातली ५ पेक्षा कमी वयाची मुलं जी उंचीपेक्षाही कमी वजनाची आहेत ती १९९८ ते २००२ दरम्यान १७.१ टक्के होती. २०१६ ते २०२०ला हा आकडा १७.३ वर आला. त्यामुळे त्यांच्यात कुपोषणाचं प्रमाण किती आहेत याचा अंदाज बांधता येतो.

अफगाणिस्तान, नायजेरिया, काँगो, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, सोमालिया, येमन, हैती, लायबेरिया असे १५ देश आपल्या मागे आहेत. तर ५ पैकी कमी स्कोर मिळवत चीन, ब्राझील आणि कुवेतसारख्या १८ देशांची कामगिरी उत्तम आहे. आपले शेजारी देश म्यानमार ७१, नेपाळ ७६, बांगलादेश ७६, पाकिस्तान ९३ असा स्कोर मिळवत आपल्या पुढे गेलेत.

हेही वाचा: लग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक

एका मिनिटाला ११ भूकबळी

प्रतिष्ठित अशा 'ऑक्सफॅम' या संस्थेनं 'हंगर वायरस मल्टिप्लेक्स' या नावानं जुलै महिन्यात एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. अनेक महत्त्वाच्या मुद्यांकडे ऑक्सफॅमनं जगाचं लक्ष वेधलं होतं. त्यात गंभीर मुद्दा होता तो जगभर उपासमारीमुळे होत असलेल्या मृत्यूचा. कोरोना वायरसपेक्षाही अधिक मृत्यू हे उपासमारीमुळे होत असल्याचं ऑक्सफॅमनं म्हटलं होतं.

उपासमारीमुळे जगभरात प्रत्येक मिनिटाला ११ लोकांचा मृत्यू होतोय. कोरोनाच्या काळात तर या संख्येत अधिकच वाढ झालीय. मागच्या वर्षभरात यात ६ टक्क्यांनी वाढ झाल्याचं निरीक्षण ऑक्सफॅमनं नोंदवलंय. जगातल्या १५.५ कोटी लोकांना पुरेसं अन्न मिळत नाहीय. मागच्या वर्षभरात यात २ कोटींपेक्षा अधिकची भर पडलीय. यातल्या दोन तृतीयांश लोकांवर उपासमारीची वेळ आल्याचं ऑक्सफॅमची आकडेवारी सांगतेय.

कोरोनामुळे जगभर आलेली आर्थिक संकटं, देशादेशांमधले लष्करी संघर्ष, हवामान बदलासारखी आव्हानं यामागे आहेत. याच कारणांमुळे ५.२० कोटी लोक उपासमारीच्या विळख्यात सापडलेत. त्याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर होतोय. एकत्रित प्रयत्नातून उपासमारीचं संकट कमी करायला हवं. त्यासाठी संयुक्त राष्ट्राला मदत करायची टाकून जगभरातले देश सैन्य खर्चावर अफाट खर्च करतायत असं म्हणत ऑक्सफॅमनं या देशांना आरसा दाखवलाय.

भारताचं शिकणं कमी, थयथयाट जास्त

भारताचा गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीचा स्कोर घसरलाय. कोरोनामुळे लोकांवर जे निर्बंध लादण्यात आले त्याचा लोकांवर परिणाम झाल्याचं हा रिपोर्ट म्हणतोय. २०२२ पर्यंत भारत कुपोषण मुक्त करण्याची घोषणा केली जातेय. पण या रिपोर्टनं आपल्यासमोर थेट आरसाच धरलाय. त्यातून आपण फार काही शिकायची शक्यता कमी आहे.

हा रिपोर्ट आल्यानंतर केंद्र सरकारच्यावतीने प्रतिक्रिया यायला लागल्यात. सरकारने हा रिपोर्ट फेटाळून लावत रँक देणारी ही पद्धतच अवैज्ञानिक असल्याचं म्हटलंय. केंद्रीय महिला आणि बालविकास खात्याने हा रिपोर्ट धक्कादायक असल्याचं म्हटलंय. त्यांनी हा रिपोर्ट तयार करणाऱ्या 'कन्सर्न वर्ल्डवाइड' आणि 'वेल्ट हंगर हिफ्ले' यांच्या कामावरही शंका घेतलीय.

भारताला महासत्तेची स्वप्न दाखवली जातायत. निवडणुकांमधून गरीबी आणि भूकमुक्तीच्या घोषणा दिल्या जातात. सत्तेच्या राजकारणासाठी त्या बऱ्या असतात. पण प्रत्यक्षात त्या कागदोपत्रीच राहत असल्याचं चित्र आहे. ऑक्सफॅमच्या रिपोर्टनंही याकडे लक्ष वेधलं होतं. पण त्याकडे आपण दुर्लक्ष केलं. आताही आपल्याला या रिपोर्टमधून शिकण्याची संधी असताना आपला केवळ थयथयाट चाललाय.

हेही वाचा: 

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!