ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

११ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारताचं कोरोनाशी लढणं सुरू असताना ट्रम्पपुराण घडलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरियाची औषधं न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याच्या बातमीनं खूप वाद निर्माण केला. दुसरीकडे ट्रम्प यांनी धमकी नाही तर विनंती केल्याचं काही लोक सांगताहेत. या साऱ्या ट्रम्पपुराणाची ही क्रोनोलॉजी.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे महिनाभरापूर्वीच भारत दौऱ्यावर येऊन गेले. सहकुटुंब जंगी पाहुणचाराचा लाभ घेतला. पण आता तेच ट्रम्प भारताला बघून घेण्याची भाषा करू लागलेत. पण आता भारतानं औषधांचा पुरवठा केल्यावर ट्रम्प नरमलेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थँक्यू म्हटलंय.

नेमका काय गोंधळ झाला?

६ एप्रिलच्या रात्री रोजच्याप्रमाणं कोरोनासंबंधी अपडेट देण्यासाठी अमरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. कोरोना वायरसनं हाहाकार माजवलेल्या अमेरिकेने नुकतीच कॅनडाला पुरवण्यात येणाऱ्या मेडिकल साहित्याची निर्यात बंद केलीय. त्यावर एका पत्रकारानं प्रश्न विचारला, अमेरिकेनं असचं धोरण सुरू ठेवलं तर बाकीचे देशही अमेरिकेचा पुरवठा बंद करतील का, जसं भारतानं अमेरिकेला पुरवण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाच्या निर्यातीवर बंदी आणलीय.

यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, ‘माझं पतप्रधान मोदींशी यावर बोलणं झालयं. भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. भारतानं अमेरिकेची ही मागणी मान्य केली नाही तर मला आश्चर्य वाटेल. मोदींनी औषध पुरवण्याबाबत मला शब्द दिलाय. तो त्यांनी पाळला नाही तरी काही हरकत नाही. पण मग आम्ही भारताला जशास तसं उत्तर देवू.’

ट्रम्प यांच्या या प्रेस कॉन्फरन्समधल्या एका शब्दानं वाद निर्माण केलाय. तो इंग्रजी शब्द आहे, रिटालिएशन. या शब्दाचा आपण ऑक्सफोर्ड डिक्शनरीत अर्थ शोधला तर तो बदला घेणं किंवा सूड घेणं असा आहे. ट्रम्प यांच्या मते,  हायड्रॉक्सिक्लोरोक्विन पुरवण्यासंबंधी प्रत्यक्ष मोदींशी सकारात्मक चर्चा झाली होती. तरीही ट्रम्प यांनी अशी खुलेपणानं धमकीची भाषा वापरणं कितपत योग्य आहे?  ट्रम्प यांचा स्वभाव पाहता यात काही आश्चर्य नाही. पण भारतात मात्र यावर वाद सुरू झाला.

हेही वाचा : युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

मैत्रीमधे सुडाची भावना कशी काय?

ट्रम्प यांच्या धमकीवजा भाषेवरून भारतात अनेक ठिकाणाहून विरोधाचा सूर उमटला. विविध माध्यमांतून ट्रम्प यांनी भारताला धमकी दिल्याच्या बातम्या छापून आल्या.  विरोधी पक्षांनी मोदी सरकारनं यावर मौनाची भूमिका घेतल्याची टीका करत ट्रम्प यांचा निषेध केला. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी मैत्रीच्या संबंधात सुडाची भावना कशी काय असू शकते असा प्रश्न विचारलाय.

युनायटेड नेशन्समधे अनेक दशकं कामाचा अनुभव असलेले काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एक ट्विट केलंय. त्यांनी माझ्या अनेक दशकांच्या अनुभवात एका देशाच्या प्रमुखाने दुसऱ्या देशाच्या प्रमुखाला असं खुलेपणानं धमकी दिल्याचं कधीही पाहिलं नसल्याचं सांगत ट्रम्प यांच्यावर टीका केलीय.

नरेंद्र मोदी आणि ट्रम्प हे एकमेकांचे जिगरी दोस्त म्हणून ओळखले जातात. अमेरिकेत मोदींचा एखादा इवेंट असेल तर तिथं ट्रम्प जातात. तसं मोदी एखाद्या इवेंटसाठी ट्रम्पला भारतात बोलवतात. गेल्या फेब्रुवारीतच ट्रम्प यांच्या भारत भेटीवेळी ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम घेतला. यासाठी खुद्द मोदींनी पुढाकार घेतला. एवढं सगळं नीट सुरू असताना आत्ता नेमकं काय बिनसलं?  एका पत्रकाराच्या साध्या प्रश्नावरून ट्रम्प ही सगळी दोस्ती विसरून भारताविरोधात सरळ सरळ धमकीची भाषा वापरत होते. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधावरून ते थेट हमरीतुमरीवर उतरलेत. काय आहे हे औषधं?

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन नेमकं काय आहे?

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे १९५५ साली शोधण्यात आलेलं औषध मलेरियावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येतं. कोविड १९ च्या उपचारावेळी हे औषध पेशंटला एक रिलीफ म्हणून उपयुक्त ठरू शकतं, अशी मेडिकल जगतात चर्चा आहे. पण या चर्चेला अजूनपर्यंत कुठलाच ठोस संशोधनाचा पुरावा नाही. फक्त फ्रान्समधे छोट्या सॅम्पलच्या आधारे करण्यात आलेल्या संशोधनानं या औषधाची डिमांड वाढलीय.

हायड्रॉक्सिक्लोरोक्विनमुळं कोविड १९ पूर्णपणे बरा होत नाही. पण पेशंटच्या लक्षणात सुधारणा होवू शकते. पेशंटचा श्वसनाचा त्रास कमी होवून त्याला वेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येत नाही.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही

लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

HYDROXYCHLOROQUINE & AZITHROMYCIN, taken together, have a real chance to be one of the biggest game changers in the history of medicine. The FDA has moved mountains - Thank You! Hopefully they will BOTH (H works better with A, International Journal of Antimicrobial Agents).....

— Donald J. Trump (@realDonaldTrump) March 21, 2020

ट्रम्प यांचा फाजील उत्साह

डोनाल्ड ट्रम्प हे जगातील एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत जे पत्रकार परिषदेत विविध आजारांवरचे प्रिस्क्रीप्शन लिहून देवू शकतात. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध कोविड १९ च्या पेशंटसाठी केवळ एक रिलीफ ठरू शकतं, असं एक प्राथमिक पातळीवरचं संशोधन आहे. पण या आधारावरच ट्रम्प यांनी १९ मार्चला एका पत्रकार परिषदेत कोविड १९ विरोधातील लढ्यात हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि अझिथ्रोमायसीन यांच्या कॉम्बिनेशनचा वापर करायला काय हरकत आहे, असा मुद्दा मांडला.

हे कमी म्हणून की काय २१ मार्चला फाजील उत्साहाच्या भरात त्यांनी एक ट्विट केलं. त्यात हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध मेडिसीनच्या इतिहासात गेम चेंजर ठरेल, असा दावा ठोकून दिला. अमेरिकेत कोरोनानं धुमाकूळ घालेपर्यंत कोरोना हा चिनी वायरस आहे, अशी थट्टा उडवत बेफिकीर राहिलेले ट्रम्प आता डॉक्टर बनलेत. कोरोना काळातल्या बेफिकीरमुळेच ते प्रचंड टीकेचे धनी झालेत.

वादाची क्रोनोलॉजी काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या ट्विटनंतर २१ मार्चला अमेरिकेनं भारताकडं हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची मागणी केली. ब्राझीलनंही हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि पॅरासिटामॉलची भारताला ऑर्डर दिली. त्याचवेळी आयसीएमआर अर्थात इंडियन कौंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं एक नोटीफिकेशन काढून कोविड १९ च्या पेशंटवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि पेशंटच्या घरच्या सदस्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या गोळ्या खाव्यात असं सांगितलं. त्यामुळं या गोळ्या कोविड १९ वर उपयोगी पडतात असा समज होवून भारतातल्या लोकांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा स्टॉक करून ठेवायला सुरवात केली.

२२ मार्चला देशांतर्गत तुटवडा निर्माण होवू नये म्हणून भारतानं हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी आणली. ४ एप्रिलला ट्रम्प यांनी मोदींशी परत फोनवर संवाद साधून हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची आधी दिलेली ऑर्डर पूर्ण करण्याची विनंती केली. यावर ट्रम्प यांच्या मते, मोदींची प्रतिक्रिया सकारात्मक होती. आणि हे सगळं चित्र इतकं स्पष्ट असतानादेखील ६ तारखेच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी भारतसंबंधी धमकीची भाषा वापरली.

हेही वाचा : कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

भारताकडे का केली मागणी?

मग तुम्ही म्हणाल, ट्रम्प यांनी ही औषधं भारताकडंच का मागितली. ती दुसऱ्या देशांकडून मागवून घेता आली असती की. तर त्याचं उत्तर सध्या तरी जगात भारताशिवाय दुसरा कोणताच देश मलेरियाच्या औषधांचा पुरवठा करण्याच्या स्थितीत नाही, हे आहे.

भारत हा फार्मास्युटिकल क्षेत्रातील प्रमुख उत्पादक आणि निर्यातक देश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात स्वस्त दरातील जेनेरिक औषधांची निर्मिती केली जाते. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा विचार करता इंडियन फार्मास्युटीकल अलायन्सच्या एका आकडेवारीनुसार, जगभर पुरवण्यात येणाऱ्या एकुण हायड्रॉक्सिक्लोरोक्विनपैकी ७० टक्के उत्पादन भारतात होते. दर महिन्याला ४० टन हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची निर्मिती करण्याची क्षमता भारताकडं आहे.

आपल्या देशात इपका लॅबोरेटरी, झायडस कॅडिला, वॉलेस फार्मास्युटीकल या प्रमुख फार्मा कंपन्या या औषधाची निर्मिती करतात. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची जितकी गरज लागेल तितकं उत्पादन या कंपन्यांमधे घेतलं जाऊ शकतं. आता तुम्ही विचाराल मग भारतचं एवढ्या मोठ्या प्रमाणत मलेरियाची ही औषधं कशाला तयार केली जातात?

भारतात या औषधाचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात होण्याचं कारण म्हणजे आपल्या देशात दरवर्षी मलेरियामुळं लाखो लोक आजारी पडतात. जागतिक आरोग्य संघटनेने २०१९ चा जागतिक मलेरिया अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यानुसार, भारतात ६७ लाख ३६ हजार लोकांना मलेरियाची लागण झाली व त्यातल्या १० हजार लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलयं. मलेरियाच्या बाबतीत भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. अमेरिकेसारख्या विकसित देशांत हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचे उत्पादन होत नाही. कारण तिथून मलेरियाचं उच्चाटन झालंय.

सरकारनं निषेध करायला हवा का?

ट्रम्प यांच्या बघून घेण्याच्या भाषेबद्दल आपल्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी यावर मीडियाचा एक घटक अनावश्यक वाद निर्माण करतोय, असा आरोप केला. याव्यतिरिक्त सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. या सगळ्या वादात मोदींचा गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा म्हणजेच पंतप्रधानकीचा उमेदवार बनण्यासाठीचं कॅम्पेन सुरू असतानाच एक मिनिटभराचा विडिओ वायरल झालाय.

इंडिया टीवीचे संपादक आणि आत्ता सरकारच्या शिफारशीवरून राज्यसभेवर नियुक्त झालेले रजत शर्मांनी आप की अदालत कार्यक्रमात मोदींना भारतावर असलेल्या आतंरराष्ट्रीय दबावासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावर मोदी म्हणाले, शंभंर कोटींच्या या देशावर कोणीही दबाव निर्माण करू शकणार नाही. उलट भारताकडं सगळ्या जगावर दबाव निर्माण करण्याची क्षमता आहे.

या घडामोडींवर जगभरातील प्रमुख वृत्तपत्रांत मात्र ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतानं हायड्रॉक्सिक्लोरोक्विनवरची निर्यात बंदी उठवली अशीच बातमी छापून आलीय. ट्रम्पच्या या बेजबाबदारपणामुळे भारताची फज्जिती झाली. पण भारत सरकारनं याचा साधा निषेधही केला नाही. आम्ही औषधं तर देऊतच पण तुमची भाषा काही बरी नाही, असं भारतानं ट्रम्पला सुनावायला हवं होतं.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याबद्दल अमेरिकन मीडियाचं म्हणणं काय?

भारताकडं सुवर्णसंधी

यानिमित्तानं भारताला एका संधी चालून आलीय. देशांतर्गत मागणी लक्षात घेवून भारतानं हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा पुरेसा साठा तयार ठेवलाय आणि त्यानंतरच ६ एप्रिलला हायड्रॉक्सिक्लोरोक्विनवरची निर्यातबंदी मागे घेतली. जगभरातून जवळपास तीसहून अधिक देशानी भारताकडे हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची मागणी केलीय. त्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय कंपन्या पूर्णपणे सक्षम आहेत.

यामुळं भारतीय फार्मा कंपन्यांची जगभरात प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि त्यामुळं कदाचित लाखो लोकांचे प्राणही वाचतील. या सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून भारताचे अमेरिकेसह इतर अनेक देशांसोबत दीर्घकालीन संबंधही दृढ होण्यास मदत होईल. सगळं जग ज्यावेळी आपापल्या सीमा बंद करून केवळ स्वत:चा विचार करतयं. त्यावेळी भारताला स्वत:च्या पलीकडं जावून जगाची मदत करण्याची सुवर्णसंधी चालून आलीय.

भारतानं हायड्रॉक्सिक्लोरोक्विनवरची निर्यातबंदी उठवल्यानंतर ट्रम्प यांनी एक ट्विट करून नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतूक केलंय. यामुळं भारत आणि अमेरिकी संबंधाला बळकटी मिळेल असं म्हटलयं. त्यावर मोदींनीदेखील तत्परतेनं रिप्लाय देवून त्यांच्या मताशी सहमती दर्शवलीय. आता क्षणाक्षणाला मतं फिरवणाऱ्या ट्रम्प यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा म्हणा. तसंच मोदींनी ट्रम्प यांच्या कौतुकाच्या ट्विटला जसं इन्स्टंट उत्तर दिलं. तसं बघून घेण्याची भाषा वापरली त्यावेळीही रिप्लाय द्यायला हवा होता. निषेध नोंदवायला हवा होता.

हेही वाचा : 

प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत

कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना

आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

शेतकऱ्यांच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?

लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी