महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’  

१७ जुलै २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


धोनी हा भारतात अतिशय कल्पक कॅप्टन वाटायचा. पण बाहेर एकदम बुद्धू. त्याला बॉलिंगमधे फेरफार करणं तर जमायचंच नाही. तो संघाची निवडही चुकीची करायचा. पण धोनीनं भारतीय संघाला टेस्ट प्रकारात जागतिक मानांकनात अव्वल स्थानावर नेलं होतं हे विसरता नये. संघ आपला स्वतःचा आहे असं मानून तो मैदानात उतरायचा.

महेंद्र सिंग धोनीने काहीशी अचानक कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करली. त्याचे चाहते आणि बऱ्याच क्रिकेट पंडितांनाही ह्यामुळे झटका बसला. धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेलं योगदान पाहता त्याची निवृत्ती सन्मानपूर्वक, वाजतगाजत होईल अशी अपेक्षा होती. पण त्यासाठी लागणाऱ्या नशिबानं त्याला शेवटी दगा दिला असावा. एरव्ही तो नशीबवान समजला जात होता. त्याची कारकीर्द एवढी प्रदीर्घ आणि फलदायी ठरेल असं कुणालाच वाटलं नव्हतं.

धोनी हे एक ‘गूढ’ आहे

धोनी हे एक अजब रसायन म्हणायला हवं. त्याच्या खेळात तो ज्या छोट्या भागातून आला होता तिथला रांगडेपणा होता. पण नेतृत्व करताना तो व्यावसायिक इंग्लिश कॅप्टनाला लाजवेल असा संयम आणि थंडपणा दाखवायचा. संधीची वाट पहायचा आणि साधायचा. त्याची बॅट्समनी भलतीच आक्रमक. मॅच कुठल्याही प्रकारची असो. मोठे, दूरवरचे फटके मारणं त्याला जड जायचं नाही. पण कसोटीत तो तळाला येऊनच बॅट्समनी करत राहिला.

एकहाती तो झुंज देणारी बॅट्समनी करायचा. पण विदेशात तो तेवढा मोठा बॅट्समन वाटायचा नाही. विकेटकिपींगमधे त्याने हळूहळू सफाई आणली होती. पण कधी कधी तो महत्वाचा झेलही सोडायचा. धोनी एक ‘गूढ’ असल्याचं काहीजण मानतात ते उगीचच नाही.

हेही वाचा: इंग्लंड जगजेत्ता आणि न्यूझीलंडला चौक्यांचा चकवा

अनुभवी, नवोदित खेळाडूंशी समतोल

धोनी एक यशस्वी कॅप्टन होईल असं कधी कुणालाच वाटलं नव्हतं. धोनीने ६० कसोटी मॅचमधे भारताचं  नेतृत्व केलं. त्यापैकी २७ मधे त्याने विजय मिळवून दिला. तो कॅप्टन झाला तेव्हा संघात सचिन, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे, हरभजन असे एकापेक्षा एक ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडू होते. तो त्यांच्यापुढे बुजला नाही. आपले विचार त्याने ठामपणे राबवले. ह्या सगळ्या अनुभवी खेळाडूंशी त्यानं जमवून घेतलं. नवोदितांना प्रोत्साहनही दिलं.

तो नेहमी स्वतः आघाडीवर राहत नेतृत्व करत राहिला. संघ आपला स्वतःचा आहे असं मानून तो मैदानात उतरायचा. त्यामुळे सगळे खेळाडू त्याच्यासाठी एकत्र राहिले. सचिन, द्रविड, कुंबळे हे सुसंस्कृत, सभ्य असल्याचा त्याला फायदा झाला. ह्या खेळाडूंना कधी नाराज करुन राजकारण खेळायचा प्रयत्न त्याने केला नाही. हेही तितकंच खरंय.

हेही वाचा: टीम इंडियाच्या पराभवाला भारतीय चाहतेही जबाबदार

आणि धोनीचं वनडे संघातलं स्थान पक्कं झालं

राहुल द्रविड त्याला मानतो. कारण धोनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारा होता. आपण आधी करून दाखवायचं इथं त्याचं लक्ष असायचं. द्रविड आणि धोनी ह्यांच्यात एक वेगळा दुवा होता. त्याचं कारण धोनीला भारतीय संघात स्थान मिळवण्यामागचं खरं कारण राहुल द्रविड होता. २००३ मधे द्रविड वनडेत विकेटकिपींग करत होता. त्याची त्यामधनं सुटका करण्यासाठी निवड समिती तरुण विकेटकिपरचा शोध घेत होती. सय्यद किरमणीच्या कानावर धोनीचं नाव आलं होतं. पण त्यांनी त्याला विकेटकिपींग करताना बघितलं नव्हतं.

निवड समिती अध्यक्ष किरण मोरे स्वतः विकेटकिपर होते आणि बडोद्याचे कॅप्टनही. त्यांना द्रविडचे हाल बघवत नव्हते. तेव्हाच मोहालीला दुलीप स्पर्धेची अंतिम मॅच पूर्व आणि उत्तर विभागात खेळलाी जाणार होताी. मोरेंनी पूर्व विभागाचे समीतीवरचे प्रतिनिधी प्रणभ रॉय ह्यांना विनंती केली कि ह्या मॅचमधे धोनीला विकेटकिपींग करू द्यावं म्हणजे निवड समितीला त्याच्याबद्दल मत तयार करता येईल. पूर्व विभागाचा विकेटकिपर तेव्हा दीप दासगुप्ता होता. तो भारताकडून खेळला होता.

प्रणभ रॉय ह्यांनी दीप दासगुप्ताला चांगल्या प्रकारे समजावलं आणि धोनी यष्टीमागे उभा राहिला. त्या मॅचमधे त्याने तडाखेबंद बॅटींंगही केली होती. त्याचं विकेटकिपींग पाहून मोरेंना संतोष वाटला आणि धोनी भारतीय संघात आला. आपल्या पाचव्याच वनडेत त्यानं पाकिस्तान विरुद्ध जे दणदणीत शतक झळकावलं त्यानं तो एकदम प्रकाशात आला. त्यानंतर धोनीचं वनडे संघातलं स्थान पक्कं झालं. तो लवकरच जागतिक मानांकनात पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला हे विशेष. द्रविड आणि त्याचं भाग्य असं निगडीत होतं.

हेही वाचा: देशाने लढाई करावी पासून विश्वचषक जिंकावा हा उन्मादच

फुटबॉलमधला गोली, तिकीट क्लार्क ते भारताचा विकेटकिपर

धोनीला आधी फुटबॉलचंही वेड होतं. तो क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही दिवसभर खेळायचा. त्याच्या वडलांना हे बिलकुल पसंत नव्हतं. त्यानं अभ्यास करावा आणि चांगली नोकरी पत्करावी असं त्यांना वाटायचं. खेळात लक्ष घालून तो स्वतःचं नुकसान करतोय असं त्यांना वाटायचं. त्याची बहीण त्याला अभ्यासात मदत करायची. त्यामुळे तो पास व्हायचा.

एका मॅचमधे शाळेच्या क्रिकेट टीमचा विकेटकिपर पडल्यानं धोनीला त्याच्या शिक्षकांनी विकेटकिपींग करायला लावलं. फुटबॉल संघातला हा गोली मग विकेटकिपर झाला आणि धोनीचं भाग्य बदललं.

तो काही काळ रेल्वेत नोकरीला होता. तिकीट बुकिंग क्लार्क म्हणून काम करत असताना २००३ मधे भारतीय संघ विश्व चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचला होता. धोनीला तेव्हा जराही कल्पना नव्हती आणखी वर्षभरात तो भारतीय संघात असेल आणि आठ वर्षांनी तो विश्वचषक मुंबईला उंचावेल. धोनीची सगळी कहाणी  कादंबरी आणि चित्रपटात शोभावी अशीच आहे.

हेही वाचा: सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर

धोनीकडे प्रत्येकाला आपलसं करण्याची वृत्ती

वनडेमधला तो ‘ग्रेट फिनिशर’ म्हणून समजला जातो. बऱ्याच मॅचेस त्याने व्यवस्थित बॅट्समनी करून संघाला जिंकून दिलेत. पण हि चमक तो कसोटीत अधनं मधनं दाखवायचा. चॅपेल सांगतो त्यानुसार तो भारतात अतिशय कल्पक कॅप्टन वाटायचा. पण बाहेर एकदम बुद्धू. त्याला बॉलरीत फेरफार करणंही जमायचं नाही. तो संघाची निवडही चुकीची करायचा. पण धोनीनं भारतीय संघाला कसोटी प्रकारातही जागतिक मानांकनात अव्वल स्थानावर नेलं होतं.

आपल्या खेळाडूंसाठी तो गप्प रहायचा नाही. मंडळाचे आताचे चिटणीस संजय पटेल सांगतात. त्याने कधी स्वतःसाठी कसली मागणी केल्याचं आठवत नाही. पण संघासाठी तो जरूर आवाज उठवायचा. त्याला दौऱ्यावर खेळाडूला मिळणाऱ्या रोजच्या भत्त्यात वाढ हवी होती. दौऱ्यावर काही खेळाडू पत्नी, मुलांना घेऊन असतात. त्यांना हा भत्ता पुरायचा नाही. धोनीनं व्यवस्थितरीत्या भत्त्यात वाढ मागितली आणि मिळवली. त्याने जेव्हा संघाचे बॉलिंग आणि बॅटींगचे विदेशी प्रशिक्षक अलीकडे हटवले गेले तेव्हाही त्यांचा बचाव केला होता. त्याच्या ह्या प्रत्येकाला आपलंसं करण्याच्या वृत्तीमुळे त्याला प्रत्येकाचं सहकार्य मिळत होतं.

इंग्लंड, ऑस्ट्रेलियामधे लागोपाठचे पराभव त्याच्या विरूद्धचं वातावरण तयार करून गेले. विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियात सध्या आपल्या बॅट्समनीनं आणि ‘बोलंदाजीनं’ सर्वांना भारावलंय. त्यापुढे धोनी फिका पडत गेलाय. पण दोन विश्वचषक भारताला मिळवून देणारा आणि कसोटी संघालाही अव्वल स्थानावर नेणारा धोनी क्रिकेट रसिकांचा प्याराच राहणार आहे.

हेही वाचा: 

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

आपल्या आतला विवेकाचा आवाज म्हणजे गुरू 

चला आपणही साजरी करूया गुगलपौर्णिमा 

कंदील बलुच: पाकिस्तानी महिलांची प्रेरणा