रिकी केज: म्युझिकमधून पर्यावरणाचा संदेश देणारा संगीतकार

१० एप्रिल २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय.

ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा. ३ एप्रिलला अमेरिकेच्या लास वेगास इथल्या एमजीएम ग्रँड गार्डनमधे यावेळच्या पुरस्कार सोहळ्याने रंगत आणली. भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे रिकी केज आणि फाल्गुनी शाह या भारतीयांचा ग्रॅमी अवॉर्डनं सन्मान होणं.

पुरस्कार विजेते भारतीय संगीतकार रिकी केज यांना दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळतोय. यावेळी त्यांच्या 'डिवाइन टाइड्स' अल्बमला हा पुरस्कार मिळालाय. भारतीय संस्कृती आपल्या 'डिवाइन टाइड्स'मधून सातासमुद्रापार नेणाऱ्या रिकी केज यांचं संगीत पर्यावरण वाचवायचा संदेश देतं.

डॉक्टरकीऐवजी संगीत क्षेत्राची निवड

रिकी केज यांचा जन्म १९८१ला अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनात झाला. ८ वर्षांचे असताना रिकी केज भारतात स्थलांतरित झाले. त्यांचे आजोबा जानकीदास स्वातंत्र्यसैनिक होते. तर वडील आणि आजोबा व्यवसायाने डॉक्टर होते. त्यामुळे रिकी यांनी बंगळुरूच्या बिशप कॉटन बॉईज शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. आणि पुढे बंगळुरूच्याच 'ऑक्सफर्ड डेंटल कॉलेज'मधून दंतचिकित्सा या विषयात पदवी घेतली.

शिक्षण घेत असतानाच रिकी एंजल डस्ट या रॉक बँडमधे सामील झाले. हळूहळू त्यांना संगीत क्षेत्राविषयी ओढ निर्माण होत गेली. मूळ शिक्षण सोडून त्यांचं संगीत क्षेत्राकडे वळणं घरच्यांना पटलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना घरातून थोडाफार विरोधही झाला. पण रिकी यांनी ठाम राहत दंतचिकित्सेऐवजी संगीत क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतला.

वयाच्या २४ व्या वर्षी रिकी यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. एंजल डस्ट या रॉक बँडमधे ते कीबोर्ड वादक होते. हीच त्यांची सुरवात होती. २००३ला त्यांनी स्वतःचा स्टुडिओ उभा केला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करायला सुरवात केली. त्यांनी ३००० पेक्षा अधिक जिंगल बनवल्यात आणि सोबतच कन्नड सिनेमांना संगीत दिलंय.

हेही वाचा: प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

बिलबोर्डच्या यादीत भारतीय संगीत

पाकिस्तानी कव्वाल नुसरत फतेह अली खान आणि ब्रिटिश गायक पीटर ग्रॅबियल ही रिकी यांची संगीत क्षेत्रातली प्रेरणा होती. संगीत देत असताना त्यांनी त्यातलं भारतीय सौंदर्य टिकवायचा प्रयत्न केला. त्या सगळ्याचा पाया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कन्नड संगीत हाच राहिल्याचं रिकी यांनी एका इंटरव्यूमधे म्हटलंय.

भारतीय संगीतकार असलेल्या रिकी केज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हेडकॉर्टरसोबत अनेक प्रतिष्ठित ठिकाणी कार्यक्रम केलेत. जगभरातल्या २० पेक्षा अधिक देशांचे मिळून त्यांनी जवळपास १०० पुरस्कार मिळवलेत. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना संयुक्त राष्ट्राचा 'ग्लोबल व्युमॅनिटेरियन आर्टिस्ट' आणि 'युथ आयकॉन ऑफ इंडिया' असे महत्वाचे पुरस्कारही मिळालेत.

रिकी केज यांना मिळालेला हा दुसरा ग्रॅमी अवॉर्ड आहे. याआधी ७ वर्षांपूर्वी २०१५ला त्यांच्या 'विंडस ऑफ संसार' या अल्बमसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या मूल्यांवर आधारीत हा अल्बम होता. वेगवेगळ्या अल्बमची लोकप्रियता सांगणाऱ्या प्रतिष्ठित बिलबोर्ड मासिकाच्या यादीत हा अल्बम पहिल्या नंबरवर होता. भारतीय संगीत क्षेत्राच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं होतं.

दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर

केज यांचे आतापर्यंत १७ अल्बम रिलीज झालेत. पण ते सगळेच अमेरिकेत. यामागे भारतातलं हिंदी सिने संगीत क्षेत्राचं वर्चस्व कारणीभूत असल्याचं केज यांनी म्हटलं होतं. २०१३ला रिलीज झालेल्या त्यांच्या शांती ऑर्केस्ट्रा या अल्बमचं जगभर कौतुक झालं. त्यासाठी त्यांना हॉलिवूडची अनेक नामांकनंही मिळाली. न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या हॉलमधे त्यांना लाईव परफॉर्मन्स करायची संधी मिळाली होती.

जगभरातल्या अनेक संकटांच्यावेळी केज यांनी मदत केलीय. इस्राएल-पॅलेस्टिनी संघर्षात पॅलेस्टिनींच्या मदतीसाठी त्यांनी 'युनायटेड ऑल' नावाचा अल्बम केला. पर्यावरण जागृतीसाठी त्यांनी शांती संसार नावाचा अल्बम बनवला. २०१५ला संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तो लाँच करण्यात आला होता.

अनेक भारतीय संगीत शोमधे केज यांना जज म्हणून बोलावलं गेलंय. बंगळुरूमधे 'द माजोली म्युझिक ट्रस्ट' आहे. २०१२ला स्थापन झालेल्या या ट्रस्टचे केज विश्वस्त आणि संस्थापक सदस्य आहेत. भारतातल्या संगीत शिक्षणाचा दर्जा उंचावणं आणि वयोवृद्ध संगीतकारांसाठी पेंशन फंड उभा करणं हा या ट्रस्टचा महत्वाचा उद्देश आहे.

हेही वाचा: मोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज

अल्बममधून पर्यावरणाचा संदेश

ज्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बमसाठी रिकी केज यांना ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय तो अल्बम त्यांनी स्टीवर्ट कोपलँड यांच्यासोबत बनवलाय. कोपलँड हे इंग्लंडच्या रॉक ग्रुप 'द पोलीस'चे ड्रमर आणि प्रसिद्ध संगीतकार आहेत. ग्रॅमी अवॉर्ड मिळायची कोपलँड यांची ही पाचवी वेळ आहे. या अल्बममधे एकूण ९ गाणी आणि ८ वीडियो आहेत. यातून स्पेनमधल्या बर्फाळ भागातली जंगलं ते अगदी हिमालयापर्यंत वेगवेगळ्या संस्कृतींचं दर्शन होतं.

जगभर हवामान बदलाचं संकट उभं राहिलंय. त्यातून वाचण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करायला हवेत असं त्यांना वाटतं. त्यासाठी संगीत हे सशक्त माध्यम असल्याचं 'डाउन टू अर्थ' या वेबसाईटवरच्या इंटरव्यूमधे केज यांनी म्हटलंय. त्यामुळेच 'डिवाइन टाइड्स' हा अल्बम त्यांनी पर्यावरणाचा संदेश देणारं एक माध्यम बनवलं.

'डिवाइन टाइड्स'मधे संगीतकार आणि गायक सलीम मर्चंट यांचं 'आय एम चेंज' नावाचं गाणं आहे. इतरत्र सुगंध शोधणाऱ्या कस्तुरी मृगावर हे गाणं बनवलं गेलंय. बदल घडवायचा तर त्याची सुरवात स्वतःपासून असा संदेश 'आय एम चेंज' हे गाणं देतं. यातला 'हिमालयाज' नावाचा वीडियो असुदे किंवा तामिळनाडूच्या स्वामी मलाई मंदिरातल्या कामगारांवर बनवलेलं गाणं भारतीय परंपरा आणि त्या जोडीने पर्यावरणाचा संदेशही यातून दिला गेलाय.

संगीत बदलाचं माध्यम

पॉप, लोकसंगीत, भारतीय शास्त्रीय संगीत संगीताच्या या वेगवेगळ्या शैली आहेत. त्या प्रत्येकातून पर्यावरणाचा संदेश पोचवता येत असल्याचं 'डाउन टू अर्थ'च्या इंटरव्यूमधे केज यांनी म्हटलंय. लोकांना पर्यावरण समजून सांगायचं तर त्याआधी आपल्याला गरिबी, स्त्री पुरुष समानता, शिक्षण, स्वच्छता, पाणी अशा समस्यांवर बोलत रहायला हवं. केज यांनी याआधीच त्यादृष्टीने पावलं टाकली होती.

केज यांच्या संगीतामधे वैविध्य आहे. संगीत आणि कला हे सामाजिक विषय पोचवायचं सशक्त माध्यम असल्याचं भानही केज यांना आहे. त्यामुळेच त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन चिल्ड्रन इमर्जन्सी फंडसारख्या संस्थांसोबत जोडून घेत केज यांनी काम सुरू केलं.

संगीत हे माणसाच्या मनाला स्पर्श करतं. त्यातून येणारी प्रत्येक भावना आपल्या मनाला भिडते. आत खोलवर पोचते. आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. त्यातून बदलही घडवता येतो. एखाद्या चित्रातून जी बदलाची भावना आपल्यापर्यंत पोचू शकते तेच काम संगीतही करू शकतं. याच भावनेतून रिकी केज आपलं संगीत जगभर पोचवतायत.

हेही वाचा: 

जमाना मीमचा आहे!

आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

भारतातली विविधता बाजूला सारून देश एक कसा होणार?

लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट