पाकिस्तानात जन्मलेल्या कलाकारांच्या आठवणींचा सन्मान तिथे होतो का?

१५ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज भारताचा स्वातंत्र्यदिन. देश स्वातंत्र्य होत असताना अनेक कुटुंबांची फाळणीमुळे फरफट झाली. कुटुंबच्या कुटुंबं भारतात आली. भारतात येऊन आपलं नशीब आजमावलं. फार मोठी उंची गाठली. पण यापैकी काही कलाकरांच्या स्मृती पाकिस्तानमधे जपल्या जाताहेत.

हिंदी सिनेसृष्टीतले अभिनय सम्राट दिलीपकुमार यांचं पेशावरमधलं घर सांस्कृतिक ठेवा म्हणून पाकिस्तानने घोषित केलंय. दिलीपकुमार महान अभिनेता असल्यानं त्यांना दिला गेलेला हा मान योग्यच आहे. पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहे. तरी पाकिस्तान आणि भारत यांच्यामधे सांस्कृतिक देवाणघेवाण सुरु राहावी असा जोरदार मतप्रवाह आहे. त्यामुळे पाकिस्ताननं एक चांगला निर्णय घेतला होता यात शंका नाही.

दिलीपकुमार यांचं वस्तुसंग्रहालय उभारलं

फाळणीवेळी पाकिस्तानातून अनेक चांगले कलाकार भारतात आले. घरदार सोडून त्यांचे कुटुंबही आले. त्यांची घरं, त्यांच्या तिथल्या वास्तवातल्या स्मृती जतन करायला पाहिजेत. पण भारताच्या द्वेषापायी त्या स्मृती नष्ट करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतला नाही हे सुदैव म्हणायचं.

दिलीपकुमार यांची बायको सायरा बानू या स्वतः एक अभिनेत्री आहेत. त्यांच्याही मनात महान कलाकार असलेल्या नवऱ्याचं त्याच्या जुन्या घरात वस्तुसंग्रहालय व्हावं अशी इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तान सरकारला मदत करायची तयारीही व्यक्त केलीय.

दिलीपसाबची छायाचित्रं, वस्तू, कपडे काही देण्याची तयारी त्यांनी दर्शवलीय. दिलीपसाब सध्या स्मृतिभ्रंशाने आजारी आहेत. नव्वदी पार केल्यानं विकलांग झालेत. तरी सुद्धा त्यांनी त्याच्या उमेदीच्या काळात सायराला सांगून ठेवलं होतं, पाकिस्तानातल्या आपल्या जुन्या घराचा एक भाग वाचनालयासाठी राखून ठेवायला पाहिजे. स्वतः दिलीपकुमार यांना वाचनवेडं.

वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं वाचण्याचा नाद होता. पुस्तकांचा चांगला संग्रहही होता. म्हणून त्यांना घरात लायब्ररी सुरु करावीशी वाटत होती. पाकिस्तानने त्याचं जुनं घर संवर्धन करायचा निर्णय घेतल्यावर सायराने त्यांची इच्छा बोलून दाखवलीय. आता त्या घरात लायब्ररी सुरु होईल. इथे लाकांनी यावं, आपल्याला आवडतील ती पुस्तकं वाचत बसावं आणि ती तिथेच परत ठेवून निघून जावं असं दिलीपकुमार यांना अपेक्षित होतं.

हेही वाचाः जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

कपूर खानदानाचंही म्युझियम उभं राहिलंय

पेशावरमधे कपूर खानदानाचीही स्मृती जतन केली गेलीय. पृथ्वीराज कपूर यांच्या वडिलांचं मोठं घर तिथं होतं. १९४७ मधे फाळणी झाली आणि कपूर परिवार कायमचा भारतात येऊन राहिला. मध्यंतरी भूकंपामुळे हे घर खिळखिळं झालं होतं. म्हणून ते पाडण्याचा निर्णय घेतला गेला. पण आता तिथं एक भव्य वस्तुसंग्रहालय उभारलं गेलं. कपूर खानदानाशी संबंधित अनेक वस्तू, कपडे, छायाचित्रं तिथं ठेवली गेलीत. त्यामुळे पृथ्वीराज, राज, शम्मी, शशी, ऋषी ते आजच्या करिश्मा, करिना आणि रणबीर कपूरपर्यंतचं हे कपूर खानदान पाकिस्तानातही लोकप्रिय आहे.

कपूर आणि दिलीपकुमार यांच्यासारखंच आणखीही बऱ्याच बड्या हिंदी स्टार्सच मूळ पाकिस्तानात आहे. १९३० च्या आसपास दिलीपकुमारचे वाडवडील मुंबईला आले आणि १९४० मधे दिलीपकुमार पुण्याला आले. तिथे ते फक्त सुकामेवा विकायचे. पुढे ते सिनेक्षेत्राकडे वळले आणि हिरो म्हणून मोठं नाव कमावलं.

सुनील दत्त हेसुद्धा मुळचे झेलमचे. आता हा प्रांत पाकिस्तानात आहे. त्याचे वाडवडील फाळणीवेळी पाकिस्तान सोडून निघाले तेव्हा सुनील दत्त १८ वर्षांचे होते. त्यांचा परिवार हरयाणातल्या यमुना तीरावरच्या एका छोट्या गावात स्थिरावला. पुढे सुनील दत्त नशीब आजमावायला मुंबईत आले. काही काळ ते बीईएसटीमधे बस कंडक्टर होता. पण सिने इंडस्ट्रीने त्यांना नाव मिळवून दिलं. नर्गिससारखी बायकोही लाभली.

सुपरस्टार समजला जाणाऱ्या राजेश खन्ना यांचा जन्मही आताच्या पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातल्या बुरेवाला गावातला. त्याचं बालपण तिथेच गेलं. पुढे ते मुंबईतल्या गिरगावात येऊन राहिले आणि पक्के मुंबईकर झाले. बरोबर दोन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. १८ जुलैला. तेव्हा पाकिस्तानातूनही त्याच्या असंख्य चाहत्यांनी शोक व्यक्त केला होता. अलिकडे त्याचे सिनेमे येत नव्हते. तरीसुद्धा त्याच्या चाहत्यांची त्यांच्याविषयीची भावना कायम होती.

हेही वाचाः मिशन मंगल सिनेमातल्या त्या ५ महिला वैज्ञानिक आहेत तरी कोण?

शाहरुख आणि सैफचं मूळ पाकमधे

आजचा बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता समजला जाणारा शाहरुख खान याचं मूळही पाकिस्तानातच आहे. त्याचे आजोबा शहनवाझ खान हे नेताजी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद फौजेत होते. त्यांनी फातिमा नावाच्या मुलीला दत्तक घेतलं. तिचा मुलगा म्हणजे शाहरुख खान. पाकिस्तानातल्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल झहीर ऊल हे शहनवाझ यांचे पुतणे होत. ते शाहरुखचे चुलते आहेत.

सैफ आली खानचे चुलतेसुद्धा इसफिन्दियार पतौडी हेही आयएसआयमध्ये वरच्या पदावर आहेत. पतौडी परिवारही मूळचा पाकिस्तानातला आहे. पतौडी प्रामुख्याने क्रिकेट आणि राजकारण या दोन क्षेत्रात चमकत होते. सैफने मात्र आपली आई शर्मिला टागोरचं अभिनय क्षेत्र निवडलं.

गुलजार आणि आनंद बक्षींचं मूळही पाकिस्तानात

निव्वळ अभिनेतेच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीचे दोन मोठे गीतकारसुद्धा मुळचे पाकिस्तानचे आहेत. गुलजार हे आजचे आघाडीचे गीतकार आहेत. त्यांना ऑस्कर मिळालंय. त्यांचेंही मूळ गाव झेलममधे आहे. आपल्या कवितांमधून आणि गाण्यातून गुलझार मातृभूमीची ओढ प्रकट करत असतात. 

दिवंगत गीतकार आनंद बक्षी हेही रावळपिंडीचे होते. फाळणीच्या वेळी त्यांचा परिवार भारतात आला, तेव्हा ते १६ वर्षांचे होते. पण येताना त्यांनी पैसा-दागिने काही सोबत आणलं नव्हतं. फक्त फोटोंचा अल्बम सोबत होता. त्यांच्या वडिलांना याचा राग आला. पण हे फोटो आपल्याला पैसा मिळवून देतील असा त्यांना आत्मविश्वास वाटत होता. या फोटोंमुळे ते हिरो झाले नाहीत तरी सिनेक्षेत्रातच गीतकार म्हणून यशस्वी ठरले. 

महान दिग्दर्शक बंधू बी. आर. आणि यश चोप्रा हेही मूळचे पाकिस्तानचेच होते. लाहोरमधे त्यांचं टोलेजंग घर होतं. यशजींना इंजिनियर व्हायचं होतं. ते पंजाबमधे उच्च शिक्षणासाठी आले आणि नंतर लुधियानात राहिले. पण सिनेक्षेत्राची आवड असल्याने त्यांनी मुंबई गाठली आणि ते खरोखर हिंदी सिनेमा सृष्टीतले दिग्गज निर्माते, दिग्दर्शक झाले. त्यांच्याच कुटुंबातले शेखर कपूर यांनी तर जग गाजवलं. त्यांची राजकारणावरची मतंही चर्चेचा विषय ठरतात. 

हेही वाचाः टीम इंडियाच्या कोचसाठी दोन हजार अर्जांतून सहा नावं शॉर्टलिस्टमधे

भारतात नशीब आजमावलं जातंय

आताही बरेच पाक कलाकार भारतात भाग्य आजमावायला येत असतात. अनेकांना इथल्या सिनेसृष्टीने आधारही दिलाय. काही जण सवंग प्रसिद्धीसाठी इथे येतात. वीणा मलिक हे याचं उदाहरण सांगता येईल. अंगप्रदर्शन करून आणि टीवीवरच्या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. तिच्या हत्येचा फतवा पाकमधल्या अतिरेक्यांनी काढला.

वीणा मलिकला तेवढीच अधिक प्रसिद्धी मिळाली. पण तिची सिनेकारकीर्द काही आकार घेऊ शकली नाही. तसंच जुन्या सलमा आगाचंही झालं. त्या मानाने गायक अदनान सामीला चांगलं नाव मिळालं.  त्याची गाणीही हिट झाली. तो आता भारतीय नागरिकही बनलाय. राहत फतेह अली खान यांचीही गाणी गाजलीत. फवाद खान आणि अली जफर  ही ताजी नावं चर्चेत आहेत. हे सारं नवीन आहे. फाळणी आणि त्याच्याही आधी आलेले जे कलाकार किंवा त्यांचे परिवार होते. त्यांनी फारच मोठी उंची गाठली. त्यांच्या स्मृतींचं जतन होणं आवश्यक आहे. 

हेही वाचाः 

आज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस

पुरुषोत्तम बोरकरांचं जगणं वावटळीतल्या दिव्यासारखं

मुंबईचा श्रेयस अय्यर टीम इंडियात चौथ्या नंबरची जागा घेईल?